मराठी भाषा आणि साहित्याला नव्या वाटावळणांनी समृद्ध करणाऱ्या मराठवाडय़ाच्या प्रतिभासंपन्न भूमीतील ज्येष्ठ लेखक व समीक्षक तु. शं. कुलकर्णी. साहित्याच्या प्रत्येक क्रांतिकारी टप्प्याची डोळस नोंद अधोरेखित करत कथा, कविता आणि समीक्षा प्रांतात त्यांनी आपला वैशिष्टय़पूर्ण ठसा उमटविला. संपादन, अनुवाद क्षेत्रातील त्यांचे प्रभुत्वही लक्षणीय ठरले. मराठवाडय़ाच्या भूमीत त्यांनी केलेली काव्यविषयक नवजाणिवांची रुजवण व त्यांची प्रयोगशीलता वाङ्मयेतिहासात मात्र पुरेशा आस्थेने नोंदली गेली नाही. या साहित्यपंढरीच्या वारकऱ्याचे बहुलक्ष्यी साहित्य एकत्रितपणे आस्वादता, अभ्यासता यावे यासाठी प्रकाश मेदककर यांच्या संपादकत्वाखाली दर्पण प्रतिष्ठानने ‘निवडक तु. शं.’ हा ग्रंथ सादर केला आहे. तु. शं.चे निवडक साहित्य, त्यांच्या साहित्याचा र्सवकष आढावा घेणारी प्रस्तावना, भाषणे, मुलाखती आणि त्यांच्या कथा-कवितासंग्रहांना लाभलेल्या वा. ल. कुलकर्णी, नरहर कुरुंदकर आदी समीक्षकांच्या मर्मग्राही प्रस्तावना यांतून त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व उलगडले आहे.
तु. शं.नी १९५१ पासून लेखनास सुरुवात केली. औरंगाबादेतील पाच दशकांच्या वास्तव्यात त्यांनी विविधांगी आणि विपुल लेखन केले. या ग्रंथात लेखकातील अंतर्बाह्य़ ‘मी’चा शोध घेत त्यांच्या बहुआयामी व्यक्तित्वाचा वेध घेतलेला आहे.
मर्ढेकर, जी. ए., बी. रघुनाथ, नरहर कुरुंदकर यांच्या वाङ्मयीन जाणिवांचे खोल संस्कार तु. शं. यांचा प्रातिभधर्म घडवत गेले. असे असले तरी एका विशिष्ट वळणावर स्वत:चा अंत:सूर पकडत स्वत:चे वेगळेपणही त्यांनी सिद्ध केले. महानगरातला अस्वस्थ, एकाकी, उसवलेला, मूल्यऱ्हासाच्या जाणिवेने धास्तावलेला, क्षुद्रत्वाच्या जाणिवेने पछाडलेला आणि असंज्ञ स्तरावर भरकटलेला माणूस ही नवकथेची आशयसूत्रे. या सूत्रांसाठी तु. शं.नी निवडलेली पाश्र्वभूमी मात्र नवकथेपेक्षा वेगळी होती. निजाम राजवटीत त्यांनी अनुभवलेलं जितंजागतं वास्तव त्यांच्या अंतर्यामातील खळबळींसह त्यांच्या कथेतून अभिव्यक्त झालं.
तु. शं.ची कविता स्थूलमानाने रेगे, मर्ढेकरांशी नाते असलेली, असे म्हणत असतानाही ‘निवडक तु. शं.’मधील अनेक कवितांपाशी आपण थबकतो व नव्या प्रयोगशीलतेच्या प्रत्ययाने भारावून जातो. भावनिक क्षुब्ध प्रतिक्रिया आणि तटस्थ भावनिक समतानता ही त्यांच्या कवितेची वैशिष्टय़ं त्यांच्या कवितेबाबत सजग कुतूहल जागे करते.
या ग्रंथातील तु. शं.ची समीक्षा ही त्यांच्या चतुरस्र व्यासंगाची साक्ष होय. उर्दू, इंग्रजी आणि मराठी साहित्याच्या चिंतन-मननाने समृद्ध झालेले त्यांचे मन व्यापक जीवनजाणिवांसह त्यात अभिव्यक्त होते. मराठीतील कलामूल्यांनी विनटलेल्या साहित्यकृती, लेखकाच्या मनावर गारूड केलेले व आस्थाविषय झालेले प्रतिभावंत आणि समकालीन बंडखोर साहित्यकृती अशा तीन प्रकारांत त्यांनी समीक्षालेखन केले आहे. या त्यांच्या समीक्षालेखनाला समीक्षाप्रकारांच्या काटेकोर फूटपट्टय़ा लावता येणार नाहीत, पण त्यांच्या समीक्षालेखनाने एकंदर समीक्षा- व्यवहाराला नवी डूब देण्याचे, नव्या पाऊलखुणांचे निर्देश करण्याचे काम निश्चितच केले आहे. मर्ढेकर, बी. रघुनाथ, नरहर कुरुंदकर, जी. ए. यांच्या साहित्याची चिकित्सा करताना त्यांची लेखणी प्रगल्भतेचा वेगळाच प्रत्यय देते. ‘माहीमची खाडी’, ‘चक्र’, ‘वैतागवाडी’ इ. साठोत्तरी, बहुचर्चित कलाकृतींवर लिहिताना केवळ गोडवे न गाता त्यांतील कलामूल्ये, सौंर्दयमूल्ये यांची परखड चिकित्सा त्यांनी केली आहे. ‘प्रतिष्ठान’, ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता’ इ. संपादनांतून त्यांनी नव्या पिढीतील कवींचा चोखंदळ वृत्तीने घेतलेला शोध ही त्यांच्या विचक्षण संपादनाची साक्ष होय. उर्दू व इंग्रजीतील कलाकृतींचे, त्यांतील प्रतिभावंतांच्या जीवनजाणिवांचे त्यांनी केलेले मराठी अनुवादही उत्कट उतरले आहेत. ‘निवडक तु. शं.’मधील प्रत्येक दालनात एक नितळ, पारदर्शी, परखड व कलानंदाचा ध्यास घेतलेला कलावंत उलगडत जातो.
या ग्रंथाला लाभलेली प्रकाश मेदककर यांची प्रस्तावना कलानंदाची रेखीव मांडणी करते. तु. शं.च्या वाङ्मयीन प्रवासातील विकाससूत्रे समोर ठेवते आणि त्यांचा प्रातिभधर्म अधोरेखित करते.   
‘निवडक तु. शं.’,
संपादक- प्रकाश मेदककर,
 दर्पण प्रतिष्ठान, नांदेड.
पृष्ठे -३८५, किंमत- ५५० रु.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा