संतसाहित्याचे अभ्यासक यशवंत साधू यांचा हा संतसाहित्यावरील लेखांचा संग्रह. यात एकंदर २३ लेख असून ते वेळोवेळी लिहिलेले- म्हणजेच प्रासंगिक स्वरूपाचे आहेत. संतसाहित्य हाच लेखन-मननाचा विषय असल्याने त्याविषयीची वेळोवेळी केलेली ही टिपणे आहेत. वाचकांच्या सोयीसाठी त्यांची समीक्षा, चिंतन, चर्चा आणि वारसा अशा चार भागांत विभागणी केलेली आहे. सततच्या वाचनातून मनात निर्माण झालेले विचार लेखकाने या संग्रहातील लेखांतून नोंदवले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, संतसाहित्यातील सौंदर्याचे, त्यातील अध्यात्माचे चिंतन करता करता लेखक आवर्तात सापडतो. त्यातून त्याला बाहेर पडता येत नाही. अशा या आवर्ताची ही साखळी. पण यातले सर्वच लेख काही संतसाहित्याविषयीचे नाहीत, ते अध्यात्माविषयीचेही आहेत. हा फरक लेखकाने केलेला नाही. वाचकांनी तो केलेला बरा.
‘आवर्त’- डॉ. यशवंत साधू, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद, पृष्ठे – २१५, मूल्य – २२० रुपये.
तो विरुद्ध ती
स्त्री-पुरुष यांना परस्परांविषयी वाटणारे आकर्षण, त्यांच्या जडणघडणीतील बदल आणि भावभावनांची पातळी याची शास्त्रीय चर्चा करू पाहणारे हे पुस्तक. व्यवसायाने वैद्यकीय मानसतज्ज्ञ असलेल्या डॉक्टराने ते लिहिले आहे. त्यामुळे यात समुपदेशन, सल्ला, मार्गदर्शन हा प्रधान हेतू आहे. लैंगिक जीवन हा तसा जाहीररीत्या न बोलण्याचा विषय असला तरी भरपूर कुतूहल असणारा असल्याने, पण त्याविषयीची नेमकी माहिती नसल्याने योग्य समजापेक्षा गैरसमजच अधिक असलेला विषय असतो. हे पुस्तक त्या गैरसमजांना दूर करण्याचे काम करत स्त्री-पुरुषांनी परस्परांना कसे समजावून घ्यावे याचे दिशादिग्दर्शन करते. नैसर्गिक देणगी आणि स्वभाव यानुसार प्रत्येकाची जडणघडण होत असते. त्यामुळे ती त्या पातळीवर जाऊनच समजावून घेतली पाहिजे. मात्र, या पुस्तकाची मांडणी, शुद्धलेखन, वाक्यरचना, मुद्दय़ांची मांडणी, क्रम याकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. पुस्तकावर संपादकीय संस्कार अजिबात झालेले नाहीत. त्यामुळे पुस्तक वाचताना मध्ये मध्ये अडथळे येत राहतात.
‘ती अशी का वागते?’ – डॉ. प्रदीप पाटील, आकार फाऊंडेशन प्रकाशन, सांगली, पृष्ठे- १३४, मूल्य- १४० रुपये.
ओळख खोतांच्या लेखनसंपदेची!
अनियतकालिकांच्या चळवळीतील एक असलेल्या ‘अबकडइ’ या वैशिष्टय़पूर्ण दिवाळी अंकाचे संपादक आणि ‘उभयान्वयी अव्यय’, ‘विषयांतर’, ‘बिनधास्त’ या कादंबऱ्यांचे लेखक चंद्रकांत खोत यांच्या साहित्याचा स्थूल आढावा घेऊ पाहणारे हे पुस्तक. ते लेखकाने पीएच.डी.च्या प्रबंधासाठी लिहिले. आणि नंतर त्याचे पुस्तक छापले. मराठीमध्ये पीएच.डी.चे प्रबंध ज्या पद्धतीने लिहिले जातात, त्याच पद्धतीने हाही प्रबंध लिहिला गेला आणि त्याचे पुस्तक करताना त्यात फार काही बदल केले गेले नाहीत. त्यामुळे पुस्तकाची पृष्ठसंख्या तीनशेच्या पुढे गेली. अशा प्रकारच्या पुस्तकांचा सामान्य वाचकांना एकच फायदा असतो. तो म्हणजे यातून संबंधित लेखकाच्या सर्व पुस्तकांची, त्यांच्या विषयांची तोंडओळख होते. लेखकाची थोडीफार चरित्रपर माहितीही जाणून घेता येते. सुज्ञ वाचक तेवढे करून मूळ पुस्तकं वाचायला घेतात. आणि तेच अधिक श्रेयस्कर असते. पतंगराव कदम हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री असले म्हणून आणि त्यांच्याशी लेखकाशी ओळख आहे म्हणून त्यांच्या शुभेच्छा पुस्तकाच्या सुरुवातीलाच दिल्या आहेत. त्या टाळता आल्या असत्या तर अधिक बरे झाले असते. कारण त्यातून पुस्तकाच्या गुणवत्तेत कुठल्याही प्रकारची भर पडत नाही.
‘चंद्रकांत खोत : व्यक्ती आणि साहित्य’ – प्रा. डॉ. कृष्णा भवारी, चेतक बुक्स, पुणे, पृष्ठे- ३२८, मूल्य- ३२५ रुपये.
एनआरआय नव्हे, पीआरआय!
गेल्या काही वर्षांत परदेशात जाणाऱ्या, तिथेच स्थायिक होणाऱ्या भारतीयांची आणि महाराष्ट्रीयांचीही संख्या वाढते आहे. मायलोक सोडून गेल्यावर परलोक सुरुवातीला कितीही रम्य वाटला तरी नंतर मायलोकाच्या आठवणींचे कढ सतत ढुशा मारत राहतात. पण काहींना पर्याय नसतो, काहींना असतो पण तो स्वीकारता येतोच असे नाही. या सगळ्यात मोठी अडचण होते, ती ज्यांची मुलं परदेशात स्थायिक होतात, त्यांची आई-वडिलांची. मुलांशिवायचं म्हातारपण त्यांना दु:सह्य होतं. पण मुलाकडे जाऊन राहावं तर तिथेही मन रमत नाही. परदेश म्हणजे काही भारत नाही. त्यामुळे तिथे अनेक कामं अंगावर पडतात. त्यामुळे चार-दोन महिने परदेशात जाऊन परत मायदेशात येणं, तेही म्हातारपणी, हे सहन करावं लागतं. अशा एनआरआय पालकाची ही पीआरआय (ढ१४ िफी३४१ल्ल्रल्लॠ कल्ल्िरंल्ल) कहाणी आहे. शैली संवादी असल्याने हे पुस्तक वाचनीय झालं आहे.
‘मी ठफक’ – प्रतिभा देशपांडे, उन्मेष प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १८९, मूल्य- १८० रुपये.
वऱ्हाडी लोकजीवनाचा धांडोळा
विदर्भातील लेखिका प्रतिमा इंगोले यांचे हे नवे पुस्तक. अर्थात या पुस्तकाचे मूळ लेखन त्यांनी पीएच.डी.च्या निमित्ताने केले होते. तेव्हा त्याची पृष्ठसंख्या साडेसातशे होती. त्याला पुस्तकरूप देताना त्यांनी ती तीनशेपर्यंत आणली. त्यामुळे साहजिकच पुस्तक सुसह्य झाले आहे. पण प्रबंधाचे मूळ शीर्षकच बहुधा पुस्तकालाही दिले असल्याने वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठल्याही बोलीभाषेतल्या लोकगीतांतून त्या लोकजीवनाचे एकाच वेळी भूत-वर्तमानकालीन दर्शन होत असते. लोकजीवनाचे पैलू, कंगोरे, त्यातील रीतीभाती, प्रथा-परंपरा, यांची ओळख त्यातून होते. थोडक्यात लोकगीतं समाजदर्शनाचा आरसा असतो काही प्रमाणात. या पुस्तकात इंगोले यांनी वऱ्हाडी लोकगीतांच्या अभ्यासातून वऱ्हाड प्रांतातील लोकजीवनाचे दर्शन घडवले आहे.
‘वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास’ – प्रतिमा इंगोले, सोनल प्रकाशन, पुणे, पृष्ठे- ३०४, मूल्य- २५० रुपये.
स्त्री नायिकांच्या चरित्रकथा
या पुस्तकाचे संपूर्ण शीर्षक असे आहे, ‘समकालीन स्त्रियांच्या कादंबऱ्या : मेघना पेठे, कविता महाजन’. लेखकाने पुस्तकात थेट उल्लेख केला नसला तरी हे पुस्तकही प्रबंधाचेच आहे, असे त्याच्या रचनेवरून आणि मांडणीवरून वाटते. प्रस्तुत पुस्तकात मेघना पेठे यांची एकुलती एक कादंबरी ‘नातिचरामि’, कविता महाजन यांच्या ‘ब्र’ व ‘भिन्न’ आणि अरुणा सबाने यांच्या ‘विमुक्ता’ व ‘मुन्नी’ या पाच कादंबऱ्यांविषयीचे लेखन आहे. याच तीन स्त्री कादंबरीकारांची निवड का केली, याचं लेखकाने दिलेलं उत्तर आहे ‘माझी सोय’. असा सोयीचा मामला असला की, मग काही प्रश्न येत नाही. या पाच कादंबऱ्या ‘समकालीन सुशिक्षित आणि आर्थिकदृष्टय़ा स्वयंभू असलेल्या स्त्री नायिकांच्या चरित्रकथा आहेत’ आणि ‘मेघना-कविता-अरणाच्या कादंबऱ्यांनी स्त्रीत्वाचं ऊर्जित रूप अधोरेखित केलं आहे’ ही लेखकाची दोन विधानं, या पुस्तकाचं स्वरूप स्पष्ट करणारी आहेत. पुस्तकाच्या शेवटी लेखकाच्या व्यक्तिगत परिचयाची दहा पाने आहेत आणि त्यात तब्बल आठ ‘आगामी पुस्तके’ आहेत. इतकी ऊर्जा असल्यावर तीनशेतीनशे पानांची पुस्तकं लिहिणं फारसं कठीण जात नाही!
‘समकालीन स्त्रियांच्या कादंबऱ्या’ – डॉ. किशोर सानप, आकांक्षा प्रकाशन, नागपूर, पृष्ठे – ३०४, मूल्य – ३०० रुपये.