हा व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. यात एकंदर सोळा व्यक्तिचित्रे असून त्यात बिनधास्त-धडाकेबाज पत्रकार देवयानी चौबळ, कलंदर विलास वंजारी, रसिक मनाचे वितरक शरद वैद्य, स्वत:ला मवाली म्हणवणारे पण मवाळ व प्रेमळ षांताराम पवार, सिनेजगताचा चालताबोलता इतिहास द. भा. सामंत, साऊंड रेकॉर्डिगसाठी फिल्मफेअर मिळवणारे मनोहरदादा, नेपथ्यकार दामू केंकरे या चंदेरी जगतातील माणसांसोबत व्यंकू, अय्या गोडबोले, राकेश शर्मा अशा सामान्य पण भन्नाट माणसांचाही समावेश आहे. अर्थात ही व्यक्तिचित्रे त्या त्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे आरसे नाहीत, तर ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही कवडसेच सांगतात. पण ते या खुबीने की त्यावरून तो माणूस समजून घ्यायला मदत होते. आपापल्या मनाप्रमाणे, जिद्दीप्रमाणे जगणारी ही माणसं लोभस आहेत-काही तडकभडक वाटत असली तरीही- लोभावणारी आहेत. त्यांचं लेखकाशी असलेलं सख्य आपल्याही त्यांचं सोयरे व्हावं, असं वाटायला लावणारी आहे.
सख्य – रघुवीर कुल, अक्षर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १७८, मूल्य – १८० रुपये.
मूकसंवादांची उद्विग्न आतषबाजी
रामदास फुटाणे यांची ओळख त्यांच्या व्यंगात्मक लिखाणासाठी आहे. हा लेखसंग्रह त्याला थोडा अपवाद आहे. यातील पंचवीस लेख वर्तमान राजाकरण-समाजकारण-साहित्यकारण यातल्या चालू घडामोडींविषयीचे आहेत. या सर्व क्षेत्रांतल्या अनिष्ट प्रवृत्तींवर फुटाणे यांनी उपहासाचा आधार घेत कोरडे ओढलेले आहेत. त्यांची टवाळी केलेली आहे आणि प्रसंगी बोचकारे उमटावेत असे शब्दबाणही डागलेले आहेत. हे करताना फुटाणे यांची भाषा काही प्रसंगी घसरते, ते मात्र क्षम्य नाही. व्यंगात्मक लेखनाचा आसरा घेत असताना तोलही सांभाळला पाहिजे. पण फुटाणे यांच्या बोलण्यात तो असतो तसा या पुस्तकात नाही. पण तरीही हे पुस्तक खेळकरपणे वाचल्यास ते सुसह्य़ होते आणि आजच्या वर्तमान दांभिकतेविषयीची चीड निर्माण करते.
मूक-संवाद – रामदास फुटाणे, सुरेश एजन्सी, पुणे, पृष्ठे – ९६, मूल्य – १२० रुपये.
वऱ्हाडी लोकजीवनाचे दर्शन
या पुस्तकाच्या शीर्षकावरून हा प्रबंध आहे, हे स्पष्ट होते. लेखिकेने मनोगतात पुस्तकरूप करताना या प्रबंधाचे पुनर्लेखन केले असल्याचा उल्लेख केला असला तरी त्याचे मूळ प्रबंध रूप कायम राखलेले आहे. मूळ प्रबंध ७५० पानांचा होता. त्यामुळे लेखिकेने त्याचे भाग पाडून त्याची तीन पुस्तके केली. हे त्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पुस्तक. लोकगीते ही लोकजीवनाच्या दैनंदिन जगण्यातून निर्माण झालेली असल्याने त्यात सामाजिक चलनवलनाचे प्रतिबिंब पडलेले असते. त्यामुळे कुठल्याही बोलीभाषेतील लोकगीते त्या त्या भाषांतील लोकजीवनाचे दर्शन घडवत असतात. आपल्या वेगळ्या स्वभावैशिष्टय़ांमुळे उमटून पडणारी बोली म्हणून वऱ्हाडी भाषा ओळखली जाते. तिच्यातील लोकगीतांचा आढावा या पुस्तकातून घेतला गेला आहे. वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास – प्रतिमा इंगोले, सोनल प्रकाशन, अमरावती, पृष्ठे – ३०४,
मूल्य – २५० रुपये.
पाण्याची अजबगजब कहाणी
पाण्याविषयी शास्त्रीय आणि रंजक माहिती देणारे हे पुस्तक आहे. पाणी म्हणजे जीवन, असे म्हटले जाते. जीवनाला व्यापून राहणारे पाणी खरोखरच चमत्कारिक आणि अजब आहे. त्याची ही कहाणी आहे. उगम, सर्वसमावेश, प्रवास, विश्वव्यापी, मूलद्रव्य ते संयुग, पाणी म्हणजे?, बर्फाच्या बारा गती, पाण्याचा वर्णपट, सजीव सृष्टी आणि अनोखेपण या दहा प्रकरणांतून ती लेखकाने चांगल्या प्रकारे उलगडून दाखवली आहे. आपल्या विश्वाचा आधार असलेल्या पाण्याची मूळ प्रवृत्ती, त्याचे गुण-दोष.. थोडक्यात त्याचं सर्वागीण व्यक्तिमत्त्व या पुस्तकातून जाणून घेता येतं.
पाणी – एक वैज्ञानिक वेध – प्रा. डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १०१,
मूल्य – १०० रुपये.
फजितीचे किस्से
या पुस्तकात मराठी-हिंदी सिनेमा जगतातल्या लोकांनी त्यांच्या आयुष्यातला एकेक फजितीचा प्रसंग सांगितला आहे. मात्र पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुस्तकाचा मूळ कर्ता असल्यासारखा रमेश उदारे यांनी स्वत:चा उल्लेख केला आहे, तर आतील पृष्ठावर संपादन-संकल्पना अशी नावापुढे जोड दिली आहे. तीच मुखपृष्ठावरही द्यायला हवी होती. याचे संपादनही नीट झालेलं नाही.
फ फजितीचा – रमेश उदारे, आमोद प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १४४, मूल्य – १५० रुपये.