काही स्वत:चे अनुभव आणि काही सहवासातल्या व्यक्ती यांच्याविषयीचे हे लेखन. म्हणून डॉ. आनंद नाडकर्णी या संग्रहाला ललितलेखसंग्रह म्हणतात. मितुले’ हा शब्द ज्ञानेश्वरीतला. त्याचा अर्थ मोजका. त्याला लेखकाने रसाळ’ची जोड दिली.
यात एकंदर एकवीस लेख आहेत. पहिलाच लेख फर्डा वक्ता ते प्रांजळ निरूपण : एक प्रवास’ शीर्षकानुसार लेखकाच्या व्यासपीठावरून बोलण्याचा स्थूल आढावा घेणारा आहे. दुसरा लेख कधीकाळी लिहिलेल्या स्वत:च्याच कवितेची गोष्ट सांगतो. तिसरा लेख दोन क्रीडापटूंना मार्गदर्शन करत आत्मविश्वास देणारा आहे. माझा उमदा मित्र’ हा लेख एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयीच्या आठवणी जागवणारा आहे. त्यातून करकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अज्ञात पैलू जाणून घेता येतात. सुनंदा अवचट यांचेही व्यक्तिचित्र माझी आई-मैत्रीण’ या लेखात रेखाटले आहे. यातील सर्वच लेख प्रसंगपरत्वे लिहिले गेले आहेत.
यातील जवळपास सर्वच लेख चार-पाच पानांचे, म्हणजे तुलनेने लहान आहेत. त्यामुळे ते फटकन वाचून होतात. साधी सोपी भाषा आणि सहजसाधे विषय, असे एकंदर या पुस्तकाचे स्वरूप आहे. एखाद्या डॉक्टरने रुग्णाला समजावून सांगावे, त्या पद्धतीने लेख लिहिलेले असल्याने हे पुस्तक वाचनीय झाले आहे. मात्र संपादकीय संस्कार काळजीपूर्वक व्हायला हवे होते.
‘मितुले आणि रसाळ’ – डॉ. आनंद नाडकर्णी, अक्षर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १५१, मूल्य – १५० रुपये.
चिंतनशील तिरीप
या पुस्तकात दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या साध्यासुध्या प्रसंगावरील लेख आहेत. पण लेखकाच्या संवदेनशीलतेची, अचूक निरीक्षणक्षमतेची, हजरजबाबीपणाची आणि सजगतेची अलवार धून त्यातून ऐकून येते. लेखकाने आपल्या लेखनाचे मर्म मनोगतात सांगितले आहे. ते लिहितात – वैद्यकशास्त्र आणि साहित्य या दोन्ही माझ्या जिवलग आवडी. आयुष्यात एकीचं स्थान प्रिय पत्नीसारखं, तर दुसरीचं प्रिय सखीसारखं’. वैद्यकशास्त्रामुळे साहित्याकडे आणि साहित्यामुळे वैद्यकशास्त्राकडे पाहण्याची वेगळी दृष्टी लेखकाला मिळाली, त्या विचारांची ही तिरीप आहे. ती कवडश्यासारखीच मनाची पकड घेणारी आहे.
‘तिरीप’ – सुहास जेवळीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद, पृष्ठे – १०४, मूल्य – १०० रुपये.
जाहिरातींमागचे शास्त्र
टीव्ही, वर्तमानपत्रे आणि रस्तोरस्ती झळकणाऱ्या जाहिराती कशा प्रकारे तयार केल्या जातात, याची अनेकांना उत्सुकता असते. या पुस्तकाचा उद्देश काही ते कुतूहल शमविण्याचा नाही, तर या क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी संदर्भग्रंथ असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. त्यानुसारच या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. पण तरीही हे पुस्तक सामान्य वाचकांनाही मनोरंजक वाटू शकेल.
‘जाहिरातशास्त्र’ – डॉ. वंदना खेडीकर, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, पृष्ठे- ११५, मूल्य- ११० रुपये.