महाराष्ट्रात २००२ सालापासून माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. तेव्हापासून या कायद्याविषयी सतत काही ना काही चर्चा सुरूच असते. या कायद्याच्या अंमलबजावणीतील अडीअडचणी, त्याच्यामुळे अडचणीत येणाऱ्या संस्था, प्रशासकीय अधिकारी, शासन, नेते यांविषयी अधूनमधून माहिती उजेडात येतच असते. पण हा कायदा नेमका काय आहे, तो कसा वापरावा, कुठल्या गोष्टींबाबत तो परिणामकारक आहे व कुठल्या बाबतीत नाही, याची जनसामान्यांना फारशी माहिती नसते. या कायद्याविषयी त्यांना अनेक प्रश्न असतात, शंका असतात. माहिती मिळवण्यासाठीची नेमकी प्रक्रिया माहीत नसते. अर्ज कुठे करायचा, पाठपुरावा कसा करायचा, याविषयीही ते अनभिज्ञ असतात. या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करणारे हे पुस्तक आहे. माहितीचा अधिकार हे नागरिकांचं शस्त्र आहे. पण ते नेमकं कसं वापरायचं, याचे काही धडे या पुस्तकाच्या वाचनातून नक्कीच गिरवता येतील.
‘पैलू माहितीच्या अधिकाराचे’- विजय कुंभार, प्राजक्त प्रकाशन, पुणे, पृष्ठे- २३२, मूल्य- २२० रुपये.

स्त्री-पुरुष आकर्षणाविषयी..
‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ या पुस्तकाचे उपशीर्षक आहे- ‘स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध.’ स्त्री-पुरुष आकर्षण हा तसा सनातन विषय. त्याविषयी सतत लिहिलं जातं, बरंच काही बोललं जातं. परंतु त्याला शास्त्रीय आधार बऱ्याचदा कमी असतो. निरंजन घाटे हे विज्ञानलेखक असल्याने त्यांना शास्त्रीय पातळीवर याविषयी काय काय संशोधन झालेलं आहे, होत आहे याची योग्य ती माहिती आहे. त्याविषयी इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झालेलं लेखन, पुस्तकं, प्रयोग यांचा आधार तर त्यांनी या पुस्तकासाठी घेतला आहेच; पण आपल्याकडील गाणी, आठवणी आणि कथांचाही आधार योग्य ठिकाणी घेऊन मुद्दा स्पष्ट करण्यासाठी चपखलपणे त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक चांगलेच वाचनीय व उद्बोधक झाले आहे.
‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’- निरंजन घाटे, मनोविकास प्रकाशन, पुणे, पृष्ठे- २८०, मूल्य- २५० रुपये.

यशवंतरावांचे विचारधन
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निवडक लेख, साहित्य आणि भाषणांचा हा संग्रह. याची पहिली आवृत्ती २००० साली प्रकाशित झाली होती. मागील वर्ष हे यशवंतरावांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्यानिमित्ताने त्यांच्या काही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या, तसंच त्यांच्याविषयीची काही पुस्तकेही प्रकाशित झाली. हा संग्रहही त्यापैकीच एक. संपादक आणि यशवंतराव यांचा प्रदीर्घ काळ घनिष्ठ संबंध होता. त्यांनी यापूर्वीही यशवंतरावांविषयी लेखन केलेले आहे. यापूर्वी त्यांनी यशवंतरावांची संसदेतील भाषणे चार खंडांमध्ये प्रकाशित केलेली आहेत. हे पुस्तक त्या कामाचाच एक भाग आहे असे त्यांनी नमूद केले आहे. संस्कार, व्यक्ती, विचार आणि चिंतन अशा चार भागांत या पुस्तकाची विभागणी केलेली आहे. त्यांचे नियोजन आणि संपादनही काळजीपूर्वक केले गेले आहे. त्यामुळे हा संग्रह वेचक आणि वेधक झाला आहे.  
‘शब्दांचे सामथ्र्य’, संपादक- राम प्रधान, अमेय प्रकाशन, पुणे, द्वितीयावृत्ती, पृष्ठे- ४५६, मूल्य- ३७५ रुपये.

‘बाप’माणसाबद्दल बोलू काही..
भारतीय आणि मराठी साहित्यात ‘आई’विषयी विपुल म्हणावे इतके लिहिले गेले आहे, जाते आहे. त्या तुलनेत बापाविषयी मात्र फारसे लिखाण आढळत नाही. काहीच लेखन झाले नाही असेही नाही. ‘बाप’ या पुस्तकाच्या प्रास्ताविकात लेखकाने मराठीतल्या याआधीच्या काही बापांविषयीच्या पुस्तकांचा उल्लेख केलेला आहे. इतरांच्या साहित्यात आलेल्या बापाविषयीच्या उल्लेखांचीही नोंद आहे. मात्र, ही संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी छोटी आहे. त्यामुळेच कदाचित लेखकाला हे पुस्तक लिहावेसे वाटले असावे.
ग्रामीण भागातला शेतकरी बाप हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, तसा तो लेखकाच्याही आहे. कृषीसंस्कृतीतले बापाचे स्थान लोकगीते, लोककथा आणि लोकजीवन यांतून सतत अधोरेखित होते. हा बाप ‘बाप’माणूस असतो. अशा अनेक बापमाणसांची छोटी छोटी व्यक्तिचित्रे या पुस्तकात रेखाटली आहेत. बापाच्या कष्टाचा, त्याच्या मायेचा, त्याच्या अव्यक्त प्रेमाचा आणि त्याच्या भावविश्वाचा आलेख काढण्याचा प्रयत्न यात आहे. त्याला प्रत्यक्ष अनुभव, निरीक्षणे यांची जोड दिलेली आहे. बापाविषयीची जिज्ञासा शमविण्याचा प्रयत्न म्हणून या पुस्तकाचे लेखन केले गेले आहे.
मराठीमध्ये लिहिल्या गेलेल्या कथा, कविता, कादंबऱ्या, नाटके, सिनेमा यांतून बापासंबंधात झालेल्या चित्रणाचे संदर्भ, बापाविषयीच्या लोककथा यांचे दाखल देत लेखकाने बापाची महती सांगितली आहे. बाप म्हणून जगणाऱ्या अनेकांना भेटून, त्यांच्याशी बोलून लेखकाने त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजावून घेतले आणि त्यातून त्यांना एकंदरच ‘बाप’माणूस उलगडत गेला.
या पुस्तकाचे स्वरूप बरेचसे संकलनात्मक आहे. पण तरीही बापाबद्दल बरेच काही सांगणारे हे पुस्तक आहे. मराठीतल्या थोडक्या पुस्तकांपैकी एक असलेले बापाविषयीचे आणखी एक पुस्तक म्हणून हे निदान चाळून पाहायला तरी हरकत नाही.
‘बाप : शोध आणि बोध’, संपादक- डॉ. शिवाजीराव ठोंबरे, दिनमार्क पब्लिकेशन्स, पुणे, पृष्ठे- ३२८, मूल्य- ३०० रुपये.

Story img Loader