कथा-कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचे हे नवीन पुस्तक. काही समीक्षालेख आणि काही पुस्तक परीक्षणे यांचा संग्रह. यात सोळा आणि तीन परिशिष्टांत मिळून पाच, असे एकंदर २१ लेख आहेत. ‘निशाणी डावा अंगठा’ (रमेश इंगळे उत्रादकर), शरणकुमार लिंबाळे यांची ‘उपल्या’, ‘हिंदू’ आणि ‘बहुजन’ ही कादंबरीत्रयी, ‘प्रकाशाची झाडे’ (वसू भगत), ‘रंगभान’ (नीलिमा बोरवणकर), ‘रातवा’ (चंद्रकुमार नलगे), ‘पुनर्जन्म’ (मीरा तारळेकर), ‘मी सावित्री जोतिराव’ (कविता मुरुमकर) या पुस्तकांची परीक्षणे शोभणे यांनी केली आहेत. ‘स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्याच्या दिशा’, ‘साठोत्तरी मराठी कादंबरी’, ‘पावशतकातली मराठी कादंबरी’, ‘प्रादेशिक साहित्य आणि समरसता’, असे काही मराठी साहित्याचे आढावा घेऊ पाहणारे लेखही आहेत. परिशिष्टामध्ये शोभणे यांनी ‘पांढर’ या आपल्या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया सांगितली आहे. अजय चिकाटे यांनी घेतलेली त्यांची मुलाखत आहे आणि नव्या लेखकांशी हितगुज करू पाहणारे एक भाषणही आहे. साहित्याचे अभ्यासक, प्राध्यापक आणि साहित्याचे विद्यार्थी यांना संदर्भग्रंथ म्हणून हे पुस्तक उपयुक्त ठरू शकते.
‘त्रिमिती’ – रवींद्र शोभणे, विजय प्रकाशन, नागपूर, पृष्ठे – २२३, मूल्य – २५० रुपये.
सच्च्या कार्यकर्त्यांची वेधक ओळख
राष्ट्र सेवा दल हा श्वास आणि ध्यास असणाऱ्या आणि आयुष्यभर निरलस वृत्तीने सामाजिक कामात झोकून दिलेल्या पन्नालाल सुराणा यांच्याविषयीचं हे छोटंसं पुस्तक. त्याच्या लेखिका या सुराणा यांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. त्यांच्या घराशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे या पुस्तकाला एक आत्मीय स्पर्श झालेला आहे. हे काही रूढार्थाने चरित्र नाही. ही सुराणा पती-पत्नींची स्मरणगाथा आहे. सुराणा यांचे बालपण, शिक्षण, राष्ट्र सेवा दलाचे संस्कार, वीणाताईंशी झालेला विवाह, भूदान आंदोलन, समाज प्रबोधन संस्थेतील काम, संघटना बांधणी, मजूर संघटनांचे काम, राजकारणातील सहभाग, आणीबाणीविरुद्धचा लढा अशा सुराणा यांच्या विविध कामांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. गेली ४० हून अधिक वर्षे सातत्याने सामाजिक कामात गढून गेलेल्या सुराणा या सच्च्य कार्यकर्त्यांची ही वेधक ओळख आहे.
‘पन्नालाल सुराणा : एक समर्पित जीवन’ – डॉ. दीपा दिनेश सावळे, सुविद्या वितरण, सोलापूर, पृष्ठे – ८५, मूल्य – १०० रुपये.
ज्ञानेश्वरांचं गीतमय चरित्र
कवी नसलेल्या सश्रद्ध माणसाने एका आंतरिक ओढीने लिहिलेलं हे पुस्तक आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वर यांचं हे गीतमय चरित्र आहे. यात एकंदर ५७ गीतं आहेत. आळंदीला गेल्यावर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन रमाकांत देशपांडे परत निघाले तेव्हा त्यांना या संग्रहातील पहिलं आणि शेवटचं गीत सुचलं. नंतर त्यांनी जेथे जेथे ज्ञानेश्वर महाराज गेले- म्हणजे सिद्धबेट, विश्रांतगड, सासवड, आळेगाव, नेवासा, पैठण, काशी, नाशिक, पंढरपूर- त्या त्या ठिकाणाला भेट दिली. ज्ञानेश्वरी-अमृतानुभव वाचलं. त्यापासून स्फूर्ती घेऊन पुढील गीतं रचली. थोडक्यात पाश्र्वभूमी आणि काव्यरचना असी संबंध पुस्तकाची रचना केली आहे. शिवाय प्रत्येक गीताला रेखाचित्रेही काढली आहेत. त्यामुळे हे पुस्तक सुसह्य झाले आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी या पुस्तकाला आशीर्वादपर दोन शब्द लिहिले आहेत. त्यात त्यांनी हे पुस्तक वाचताना ग. दि. माडगूळकर यांच्या ‘गीतरामायणा’ची आठवण येत असल्याचे म्हटले आहे.
‘सचित्र गीत ज्ञानेश्वर’ – रमाकांत देशपांडे, श्रीज्योती प्रकाशन, नाशिक, पृष्ठे – १२६, मूल्य – १०० रुपये.
हरलेल्या लढाईची गोष्ट
पुस्तकाच्या नावावरून ही कादंबरी असेल वा कथासंग्रह असेल असे वाटते. कदाचित ललितलेख संग्रहही वाटू शकतो. पण ही आहे एका कॅन्सरपीडित स्त्रीची कहाणी. बरं, ती स्त्री कमी बोलणारी. त्यामुळे तिच्या अंतर्मनातली खळबळ जाणून कशी घेणार? म्हणून लेखकाने त्यात स्वत:चे तपशील भरले, तिच्या ठिकाणी स्वत:ला कल्पून. त्यामुळे ही केवळ वास्तव कहाणी राहिली नाही. त्यात कल्पिताचीही भर पडली. कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देणाऱ्या स्त्रीच्या वाटय़ाला आलेल्या सामाजिक अवहेलनेपासून, कौटुंबिक दुरावलेपणापासून ते मानसिक यातनांपर्यंतचा हा प्रवास आहे. त्यामुळे तो खिन्न व उदास करायला लावणारा आहे. पण जाणून घ्यावा असाही आहे. थोडक्यात ही हरलेल्या लढाईची गोष्ट आहे.
‘सहा संध्याकाळी’ – प्रदीप ओक, अक्षर मानव प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २१२, मूल्य – २०० रुपये.
काव्यमय ललित लेख
रेणू पाचपोर यांची मुख्य ओळख आहे ती कवी म्हणून. त्यांच्या संवेदनशील स्वरूपाच्या कविता अनेक रसिक वाचकांना आठवत असतील. पण हा संग्रह मात्र कवितेचा नसून ललितलेखांचा आहे. शिवाय हे सर्व लेख सदररूपाने वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे विषयही तसे साधेसुधे आहेत. पण पाचपोर वृत्तीने कवी असल्याने या लेखांमध्ये कवितेची सळसळ सतत ऐकू येते. सर्वच लेखांना काव्यस्पर्श झालेला आहे. कुठलाही कवी जेव्हा गद्य लिहितो, तेव्हा त्याला कवितेपेक्षा काही वेगळं दिसतं का, ते जाणून घेता येतं का, यापेक्षाही तो आपल्या भोवतालाकडे कसं पाहतो, हेच पाहिलं पाहिजे. पाचपोर यांच्या या संग्रहाकडेही तसं पाहता आलं तर हा संग्रह वाचनीय ठरू शकतो.
‘मंद दिव्यांचे प्रहर’ – रेणू पाचपोर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद, पृष्ठे – १८४, मूल्य – २०० रुपये.
अंशत: काल्पनिक कादंबरी
ही राजकीय कादंबरी आहे. त्यासाठी लेखकाने १९८० ते ९४ पर्यंतचा महाराष्ट्रातील काळ गृहीत धरलेला आहे. ‘अर्थात तत्कालीन महाराष्ट्रातील राजकारण ही केवळ आणि केवळ पाश्र्वभूमीच आहे,’ असेही लेखकाने आपल्या मनोगतात म्हटले आहे. पण अर्पणपत्रिकेच्या जागी जो मजकूर लिहिला आहे तो अधिक मजेशीर आहे. तो असा- ‘कलाकृतीची मांडणी करताना काही तपशील बदलले किंवा काही पात्रांची नावं बदलली किंवा काही प्रसंग मागे-पुढे केले, म्हणून ती कलाकृती काल्पनिक होते आणि वास्तव-दर्शनाची शक्ती हरवून बसते व केवळ क्षणिक मनोरंजनच करते, असं न मानणाऱ्या हजारो सुजाण रसिक वाचकांना..’ म्हणजे यातील बराचसा भाग वास्तव आहे आणि त्याकडे वाचकांनी तसेच पाहावे हे लेखकाने सूचित केलेले आहे. राजकारण हा गलिच्छ सत्ताकारण आणि भ्रष्टाचाराचा तमसकाळ असतो, ही लेखकाची धारणा असल्याने त्या पद्धतीनेच ही कादंबरी लिहिली गेली आहे.
‘क्षण क्षण संघर्षांचा’ – डॉ. गिरीश दाबके, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – २७२, मूल्य – २७० रुपये.