ग्रामीण महाराष्ट्राच्या शिक्षणप्रसाराचा व्यापक आढावा ‘ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षणपरंपरा’ या पुस्तकात घेतलेला आढळतो. या पुस्तकातील एकूण १२ लेखांपैकी पहिले तीन लेख ग्रामीण महाराष्ट्राची शैक्षणिक परंपरा, स्त्रीशिक्षणाची परंपरा आणि महात्मा फुले यांची हंटर कमिशनपुढील साक्ष यासंबंधात आहेत. प्रत्येकी चार लेख
साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्यावर लिहिण्यात आले आहेत. या लेखांमधून कर्मवीर भाऊराव पाटील आणि बापूजी साळुंखे यांच्या शिक्षणप्रसाराच्या कार्यावर प्रकाशझोत पडला आहे. कर्मवीर आणि बापूजी यांचे शैक्षणिक विचार आणि कार्यपद्धती याविषयी तुलनात्मक पद्धतीने लिहिलेला लेखही महत्त्वाचा ठरतो. ग्रामीण शिक्षणपरंपरेचा मागोवा घेताना शिक्षणाच्या गुणवत्तेसंबंधी आणि प्रसारासंबंधीही लेखकाने केलेले विवेचन महत्त्वाचे आहे.
‘ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा- कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे’ – रा. ना. चव्हाण, संपादक, प्रकाशक- रमेश चव्हाण, पुणे, पृष्ठे- २९८, किंमत- ३२० रुपये.
शास्त्रशुद्ध कवने
कै. श्रीधर नीळकंठ जोशी या आपल्या आजोबांच्या काही कविता त्यांच्या नातवंडांनी प्रकाशित केल्या आहेत. आपले वाडवडील कसे होते, हे जाणून घेऊन पुढच्या पिढय़ांना त्यापासून प्रेरणा मिळावी आणि नवकवितेच्या लखलखाटात जुन्या धाटणीची कविता नेमकी कशी होती, हे स्पष्ट व्हावे, असा या पुस्तक प्रकाशनामागचा दुहेरी हेतू आहे. या कवितासंग्रहाला संगीतकार यशवंत देव यांची सुरेख प्रस्तावना लाभली आहे. त्यात देव यांनीही ५०-६० वर्षांपूर्वी लिहिलेली ही कविता शास्त्रशुद्ध घडणीची आणि वृत्ते सांभाळून केली असल्याचे म्हटले आहे. या संग्रहातील काही कविता बालसुलभ भावना व्यक्त करणाऱ्या आहेत तर काही समाजोन्नती आणि राष्ट्रप्रेमाचा विचार रुजवणाऱ्या आहेत.
‘आमच्या आजोबांच्या कविता’ – कवी कै. श्रीधर नीळकंठ जोशी, स्पॅन पब्लिकेशन, औरंगाबाद, पृष्ठे- ५५, मूल्य- १०० रुपये.