अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, वेश्या, कुमारीमाता, देवदासी, परित्यक्ता, बलात्कारित भगिनी, वृद्ध, अपंग, अंध, मतिमंद, मनोरुग्ण, तृतीयपंथी, आपदग्रस्त या साऱ्यांनी बनलेलं जग हे रूढ जगापेक्षा वेगळं… ज्याला तिसरं जग म्हटलं जातं. या जगातल्या माणसांचं आणि त्यांना आधार, मायेची सावली देणाऱ्या, त्यांच्या आयुष्याला अर्थ देऊ पाहणाऱ्या संस्थांविषयीचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं ‘निराळं जग’ आणि ‘निराळी माणसं’ असे दोन भाग आहेत. पहिल्या भागात वरील माणसांच्या कर्मकहाण्या सांगितल्या आहेत, तर दुसऱ्या भागात त्यांच्याविषयी काम करणाऱ्या सतरा संस्थांची ओळख करून दिली आहे. ‘मतिमंदांना माणूस बनवणारा शिक्षक’, ‘बाल्य जपणारी फुलनदेवी’, ‘भयमुक्त बाल्याचा किमयागार’, ‘वेश्यांना माणूस बनवणारी आई’, ‘अनाथांचा आधारवड’ या लेखांच्या शीर्षकावरूनच या संस्थांची आणि त्यांच्या संचालकांची ओळख होते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात काम करणाऱ्या या संस्था निरलस आणि सेवाभावी कार्यकर्त्यांच्या हिमतीवर चालू आहेत. हे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटतात. आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडतात. त्या धडपडीतून हे तिसरं जग सावरायला मदत होते. मन विषण्ण करणारं वास्तव आणि वाचतानाच काळीज पिळवटून टाकणाऱ्या कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात. आपल्या संवेदनशीलतेवर करकरीत ओरखडा ओढत हे वास्तव आपल्याला हलवून टाकतं. आपण राहतो त्या समाजातच काही माणसांच्या वाटय़ाला कोणता भोगवटा येतो आणि त्यांच्यासाठी काही माणसं कशी स्वत:चं आयुष्य पणाला लावतात, याची दास्तान या पुस्तकातून जाणून घेता येते. कोणत्याही संवेदनशील माणसाला गदगदून टाकणारं हे पुस्तक आहे.
‘निराळं जग, निराळी माणसं’ – सुनीलकुमार लवटे, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृष्ठे – १३६, मूल्य – १५० रुपये.
टागोरांचे आणखी एक चरित्र
या वर्षी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्कार मिळ्याल्याला शंभर र्वष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने लिहिलेलं हे टागोर यांचं चरित्र. मात्र या पुस्तकाच्या प्रस्तावनेत टागोरांना १९९३ साली नोबेल मिळालं असा उल्लेख आहे तो चुकीचा आहे. तो १९१३ असा हवा होता. याचबरोबर प्रस्तावनेत ‘चरित्रसंग्रह’ असाही उल्लेख आहे, तोही चुकीचा आहे. शिवाय इतक्या छोटय़ा लेखनाला प्रस्तावना म्हणत नाहीत. असो. मराठीत आजवर टागोरांविषयी लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचाच प्रामुख्याने या चरित्रासाठी आधार घेतला गेला आहे. त्यामुळे हे चरित्र फार काही वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत नाही. असं असलं तरी या चरित्रातून टागोरांविषयीची माहिती एकसलगपणे वाचायला मिळते.
‘रवींद्रनाथ टागोर : एक संपन्न व्यक्तिमत्त्व’ – पद्मिनी बिनीवाले, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, पृष्ठे – १९२, मूल्य – २०० रुपये.
प्रेरणादायी व अनुकरणीय कहाणी
पर्यावरणाच्या ढासळत्या स्थितीविषयी आणि पाण्याच्या संभाव्य टंचाईविषयीही सातत्यानं बोललं जातं. अशा परिस्थितीत संदीप जोशी या मराठमोळ्या पर्यावरण शल्यविशारदानं राजस्थानातील उदयपूर येथील आयड या नदीचं पुनरुज्जीवन केलं. शहरी मैलापाणी आणि औद्योगिक सांडपाणी या दोन्ही प्रकारच्या प्रदूषणानं वेढलेली ही नदी त्यांनी अवघ्या तीन महिन्यात पर्यावरणमुक्त केली. त्याची ही कहाणी आहे. सरकार, समाज आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीनं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कशा प्रकारे काम करता येतं, याचं हे उदाहरण. प्रेरणादायी व अनुकरणीय अशी ही कहाणी आहे.
‘ग्रीन ब्रिजेस’ – गोपाळ जोशी, मेनका प्रकाशन, पुणे, पृष्ठे – ८६, मूल्य – १०० रुपये.