अमचं घर तेव्हा शहरातल्या टेकडीसदृश भागात होतं. त्यातही चौथा मजला. एका बाजूच्या खिडकीतून उतारावरची एक सरकारी इमारत आणि तिचं प्रशस्त आवार दिसायचं. त्यात झाडं चिकार. जांभळाची, आंब्याची, वडाची, शिरीषाची जुनी-मोठाली-गर्द झाडं. तिथून पोपटांचे थवे उडताना दिसायचे. पूर्वेकडच्या खिडकीतून डोंगर. सूर्योदय तर दिसायचाच, पण त्याहून जास्त अप्रूप वाटायचं ते त्या दिशेनं अपरात्रीच्या वा पहाटेच्या शांततेत ऐकू येणाऱ्या ट्रेनच्या भोंग्याचं. गच्चीवरून सगळं शहर दिसायचं. मामा-भाच्याच्या डोंगरापासून ते तेव्हा नव्यानं बांधल्या जाणाऱ्या महापालिकेच्या इमारतीपर्यंत आणि त्यालगतच्या शेताडीपर्यंत. वीसहून जास्त मजले असणाऱ्या इमारती मोजक्याच. बाकी सगळं शहर आपल्याहून बुटकं. नजरेच्या एका फेरीत न्याहाळता येणारं. उन्हाळ्यातल्या बहुतेकशा रात्री चटया नेऊन गच्चीत पसरायच्या आणि गप्पा ठोकत लोळायचं. हळूहळू उगवत जाणाऱ्या चांदण्या. एखादाच मागे राहिलेला चुकार बगळा. मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक. पौर्णिमेला आख्खाच्या आख्खा गरगरीत चंद्र. कोजागरीला सोसायटीतले लोक जमून भेळ करायचे, मसाला दूध प्यायचे आणि गाण्यांच्या भेंड्या खेळायचे. शहरात तेव्हा आकाश विझवून टाकणाऱ्या प्रकाशाच्या ओकाऱ्या टाकलेल्या नसत. उजेड आणि आवाज असायचा, पण सोबत करणारा.

दिवाळीच्या आसपास हवेत गारवा यायचा आणि होळीपर्यंत टिकायचा, जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पाऊस कोसळू लागायचा, मे-महिन्यात घामाच्या धारा लागायच्या. पण एसीवाचून जगणं शक्य होतं.

Technical progress , Visual pollution, thinking attitude,
क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
cyber crime
सायबर सुरक्षाकवच
butterfly
बालमैफल : आमच्या खिडकीतलं फुलपाखरू
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Loksatta lokrang Love Pictures Poet Relationship PWD Engineer
अन्यथा.. स्नेहचित्रे : अजंठ्याची पुसट रेषा…
Tara Bhawalkar, Tara Bhawalkar latest news,
‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’

रस्ते डांबरी होते. त्यात सिमेंटचा तोबरा भरायचा अद्याप शिल्लक होता. रस्त्यांच्या कडेनं ऐन शहरातही मधूनच माजलेल्या रानाचे हिरवे तुकडे लागायचे. तिथे चिकनखडे, खाजकुयली, एरंड आणि कसलीकसली अनाम झाडंझुडपं माजलेली असायची. पावसाळ्याच्या सुरुवातीला तिथून हमखास बेडकाचा आवाज यायचा. श्रावणातलं ऊन पडल्यावर अशा रानगट तुकड्यांवर चतुर भिरभिरताना दिसायचे. खूप पाऊस झाला, की चाळींसमोरच्या अंगणांमधून पाणी तुंबायचं आणि मोरीत गांडुळं दिसायला लागायची. लोक खडेमीठ घालून त्यांना तडफडवून मारायला धावायचे.

हेही वाचा – लोभस आणि रसाळ!

ऑफिस टाइमचे दोन-अडीच तास सोडून प्रवास केला, तर रेल्वे-बसमध्ये बसायला खिडकीची जागाही मिळू शकायची. स्टेशनाबाहेरचं एखाद्या किलोमीटरचं वर्तुळ रिक्षावाल्यांनी गिऱ्हाइकांवर नि गिऱ्हाइकांनी रिक्षांवर झडप घालण्यासाठी राखीव नसे. त्यासाठी रांग लावण्याची बावळट पद्धत होती. लोक गावी जाण्याकरता एसटीची तिकिटं काढायचे. गर्दीच्या दिवसांत त्याकरता एसटीत काम करणाऱ्या कुणाची तरी ओळख काढून जादा गाड्यांची तिकिटं मिळवायचे. अर्थात, गर्दीचे दिवस अशी एक वेगळी कॅटेगरी तेव्हा होती. एसटीचा तेव्हा ‘लाल डब्बा’ झाला नव्हता, तसंच सर्व्हिस रोड्स आणि बारक्या गल्ल्यांची हक्काची पार्किंगही झाली नव्हती. तितक्या चारचाक्याच नव्हत्या. त्यामुळे निदान मुंबईतल्या मुंबईत कुठूनही कुठेही तासा-दीड तासात पोहोचता यायचं. पावसामुळे लोकल ट्रेन्स बंद पडणं आणि अपघातामुळे वा कुणा नेत्याच्या भाषणामुळे रहदारी तुंबणं या तशा क्वचित घडणाऱ्या घटना होत्या.

माघी गणपती आणि नवरात्रातली देवी शहरात तेव्हाही बसत, पण त्यांची ठिकाणं मोजकीच आणि ठरलेली असायची. तिथल्या जत्रा अपूर्वाईच्या वाटायच्या. त्यातल्या कागदी पिपाण्या, पत्र्याच्या बेडक्या, वेताचे उघडमीट करणारे साप आणि धनुष्यबाण, मोठाल्या चरक्या हे सगळं वर्षाकाठी एखाद्दुसऱ्या वेळीच दिसायचं. रामनवमीला लोक सुंठवडा खायचे आणि तिन्हीसांजेला देवासमोर दिवा लावताना रामरक्षा पुटपुटायचे. रामाच्या देवळातला राम तेव्हा शालीन आणि सोज्ज्वळ ‘रामराणा’ होता, रामरक्षेची ‘पब्लिक अॅक्टिव्हिटी’ अद्याप व्हायची होती.

घरोघरी लॅण्डलाइन फोन आले होते. पण बाहेरगावी फोन करायचा, तर रात्री नऊनंतर सवलतीच्या दरात बोलता यायचं. त्यामुळे तेव्हा बाहेर पडून एसटीडी बूथ गाठला जायचा. परदेशी फोनबिन अपूर्वाईचीच गोष्ट. कुणीकुणी पेजर्स लटकवून शायनिंग मारणारे लोक दिसायचे. मोबाइल फोन येऊ लागले होते, पण सगळी भिस्त मिस्ड कॉल्स आणि एसेमेसवर असायची.

सिंगल स्क्रीन थिएटर्स जिवंत होती. फटाक्यांची माळ लावल्यावर ती जशी पुढे पेटत-तडतडत आणि मागे विझत-जळलेली दारू सोडत जाते, त्या धर्तीवर वाढत्या शहराच्या वेशीपल्याड उघडणाऱ्या आणि मग ओसाड पडत जाणाऱ्या मॉल्सच्या माळेचा जन्म नुकता कुठे होऊ लागला होता. त्यामुळे पॉपकॉर्न्सच्या किमती सिनेमाच्या तिकिटापेक्षा कमी असायच्या. ही सगळी मुंबईपासून जेमतेम पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या उपनगरी भागातली गोष्ट. काळाच्या पोटातही फार लांबची नाही बरं का, जेमतेम वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट.

पार ‘बटाट्याच्या चाळी’तलं शेवटाकडचं कढकाढू चिंतन वाटतं ना हे? आय नो. मला कल्पना आहे. हे सगळं निव्वळ स्मरणरंजनामुळे छान-छान वाटत असेल, अशी एक शक्यता नाकारता येत नाही.

आपल्या भारतीय मनाला गतकातरतेची चूष तशीही असतेच. आपल्याला कायम त्रेतायुगातल्या गोष्टी आदर्श आणि थोर्थोर; तर सध्याचं सगळंच भ्रष्ट भासत असतं. या खास भारतीय घडणीचाही थोडा भाग असेल. शहरी-सवर्ण-सुशिक्षित-कमावत्या अशा माझ्या सांस्कृतिक भांडवलामुळे ‘भरल्या-पोटी माझं सुख दुखतंय’ असंही थोडं असू शकेल. सगळंच थोडंथोडं शक्य आहे, थोडं खरंही आहे. सगळं नकारात्मकच आहे, असंही नाही. निदान माझ्यासारखं थोडंफार सांस्कृतिक भांडवल असलेल्या लोकांच्या हाती थोडा पैसा खेळू लागला आहे, बरीच वैद्याकीय प्रगती झाली आहे, जनसंपर्काच्या सोयी वेगवान झाल्या आहेत, त्यांनी अंतराच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत, संधींची रेलचेल झालेली आहे, शिक्षणाला अनेकानेक वाटा फुटल्या आहेत, परदेशगमन सोपं झालं आहे, आईबापांना त्यांच्या नोकऱ्यांच्या अखेरच्या काळात मिळणारे पगार पोरांना पहिल्या नोकरीत मिळू लागले आहेत. हे सगळं आहेच.

असेलही माझी बोच निखळ स्मरणरंजनी. पण सार्वजनिक अवकाशाचं काय? माझ्या आजूबाजूचा, अवघ्या पाव शतकाच्या कालावधीत आमूलाग्र बदलून गेलेला शहरी अवकाश तर खरा आहे? तो मला भेदरवून, घुसमटवून, चिरडून टाकतो आहे.

मला लक्ष वेधायचं आहे ते भयानक वेगानं काँक्रीटाइज झालेल्या, उजेडानं लखलखलेल्या, आवाजानं दणाणून गेलेल्या, अमानुष गर्दीनं वेढल्या गेलेल्या, रहदारीनं-सांडपाण्यानं तुंबणाऱ्या आपल्या सार्वजनिक अवकाशाकडे. मी गावाकडच्या ‘निसर्गरम्य’ अवकाशाबद्दल बोलत नाहीय. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या शहरांबद्दल बोलतेय. ती आत्ता-आत्तापर्यंत वेगवान, पण सौम्य आणि जैविक होती. ती विषम विकासानं बरबटत, अमानुष, बकाल, कृत्रिम होत गेली आहेत; दिवसेंदिवस अधिकाधिक वेगानं होताहेत.

गेल्या सहस्राकापर्यंत हडप करायला, विकायला, नफा करून घ्यायला भौतिक आणि मालकी हक्क असलेल्या गोष्टी लागायच्या. भूखंड लाटले जायचे. आता भूखंडच काय, साधी खेळाची मैदानं, बागा, खाड्यांकाठची कांदळवनं आणि तळ्यांच्या काठी स्वतंत्र जैवसाखळी वागवणाऱ्या पाणथळ जागाही हडप करून संपलेल्या आहेत. पिण्याचं पाणी तर कधीच विकायला निघालं. शहरांमध्ये मास्क लावून फिरण्याची सवय कोविडकाळानं लोकांना आयती लावून दिली, त्यामुळे शुद्ध हवा हीदेखील चैनीचीच बाब झाली आहे. मग बळकावायला उरलं काय? आता अमूर्त आणि विकत न घेता येण्याजोग्या गोष्टी बळकावल्या जातायत. नाही पटत? विचार करून बघा.

हेही वाचा – भारतीय वास्तव; वैश्विक दृष्टी…

बिनदिक्कत कुठेही आणि कितीही आवाज करा. कुणीही तुम्हाला जाब विचारू शकत नाही. तुमच्या भागातल्या नगरसेवकाचा उजवा हात असलेल्या कुणा अमुकजी तमुकजीला साहेबांच्या वाढदिवशी रात्री बारा वाजता फटाके वाजवून शुभेच्छा द्यायच्यात? अवकाश तुमचाच आहे. गणपती, नवरात्र आणि थर्टीफर्स्ट तर हक्काचेच होते. २६ जानेवारी नि १५ ऑगस्टची देशभक्ती लाउडस्पीकरवरून ‘ए मेरे वतन के लोगों’ आळवल्याशिवाय पूर्वीही साजरी होत नसे. पण आता सार्वजनिक अवकाशात असताना आपला गळता मोबाइल आपल्या कानातल्या बोंड्यांपुरता ठेवावा ही अपेक्षा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांवरचं आक्रमण वाटतं. साधा मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळचा वॉक? इच्छा असो वा नसो, ठिकठिकाणी स्पीकर्स लावून फिरता फिरता कानावर गाणी पडतील अशी सोय केलेली असते. तेवढ्यावर थांबायची गरज नाही. घरी हळद आहे? आणा डॉल्बीची भिंत. गल्लीत सत्यनारायण घालायचाय? बसवा भटजीला पूजा सांगायला माइकच्या बोंडक्यापाशी. सगळ्या गल्लीवर करा पुण्याची बरसात. होऊ द्या खर्च! शांतता आपल्याच तीर्थरूपांची आहे.

बचाबच उजेड करा. दुकानांसमोर मोठाली झाडं आहेत? सुमडीत रात्रीबेरात्री एखादं इंजेक्शन टोचा. महिन्या-दोन महिन्यांत झाड वठून मरतंय. तुम्ही दुकानावर रोषणाई करून गिऱ्हाईक खेचायला मोकळे. ते जमत नसेल, तर झाडावर अंदाधुंद लायटिंग तरी करा. इतकी सोय दिलीय निसर्गानं, ती वापरा. एखादी मोठीशी इमारत पुनर्विकसनासाठी घेतलीय? त्याच्या बाहेरच्या भिंती मोठाल्या चोवीस-तास चमकत्या जाहिरातींसाठी वापरून टाका. झगमगवून टाका रस्ते अहोरात्र. आयुष्यातला अंधार मिटवून टाका. प्रकाशाकडे चला. महामार्ग आणि उड्डाणपूल तर बोलूनचालून गाड्यांतून जाणाऱ्या लोकांना जाहिराती दाखवण्यासाठीच असतात, एरवी इतक्या रहदारीत तुंबलेलं असताना त्यांचा वेळ जायचा कसा? सगळीच्या सगळी दर्शनी जागा जाहिरातींसाठी विका, झगमगवा. उजळून टाका आसमंत. निऑन साइन्स लावा, फ्लड लाइट्स सोडा, लेझर किरण वापरा. चंद्र आणि ताऱ्यांसारख्या मागास गोष्टी इथं कुणाला बघायच्या आहेत?

लोकांपाशी असलेला स्वस्थ वेळ हीदेखील आता एक हडपण्यायोग्य कमॉडिटी आहे. कसं करायचं हे माहितीय? प्रादेशिक भाषांमधून सीरियली आणा तिन्हीत्रिकाळ चालणाऱ्या. त्याही आपल्या समृद्ध सोनेरी पुराणांवर आधारित असलेल्या वा आध्यात्मिक सत्पुरुषांच्या चमत्कारांचं दर्शन घडवणाऱ्या असतील तर सोन्याहून पिवळं. गल्लोगल्ली दिवाळीपहाटसदृश, पण शक्य तितक्या फुकट्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी होऊ द्या. तसंही आपल्याला कुठे द्यायचं आहे सभागृहाचं भाडं? रस्त्यावरच तर मांडव ठोकायचा आहे. त्यातूनही वेळ उरला, तर रिअॅलिटी शोज घडवा, रील्स बनवा, सेल्फी पॉइंट बांधवा. गुडमॉर्निंगयुक्त व्हॉट्सअॅप, इंस्टा-ट्विटर, फेसबुक आणि ओटीटी आहेतच. अवघा आनंदकल्लोळ उसळू द्या…
हे औपरोधिक-अतिरंजित वाटेल. थोडं अंगावर येणारं, थोडं उगाच भीती दाखवणारंही. पण आपल्या आजूबाजूचा भवताल निरखून बघा, नि यातलं काहीही खोटं असेल तर सांगा.

इतक्यावर थांबणार नाही हे. असं वाटतं, हळूहळू जिथे काहीही करायचं नाहीय – ऐकाबोलायचं-लिहावाचायचं-बघानाचायचं-खायचंप्यायचं नाहीय -असे शांत काळोखाचे तुकडे विकायला निघतील. किमान काही जणांच्या तरी खिशाला त्यांचं भाडं परवडेलच. अशा परवडणाऱ्या लोकांच्यात आपण असू, इतकी खातरजमा करून घेतली की झालं. मग एकविसाव्या शतकात सगळी धमाल आहे.

अरुण कोलटकरांच्या कवितेतल्याप्रमाणे ‘बघता बघता वस्तूंच्या रक्तात साखर होऊन’ जाण्याकडे आपला प्रवास भरधाव सुरू आहे.

(लेखिका जर्मन भाषातज्ज्ञ आहेत.)

meghana.bhuskute@gmail.com

Story img Loader