ब्रास फॅमिलीतले ट्रम्पेट हे वाद्य फार पूर्वीपासून केवळ सुरांच्या भरण्याकरिता त्याच्या कण्र्यावर मोठे बुच बसवून टूटीपीसमध्ये (म्हणजे सर्व वाद्यांवर एकच सुरावट वाजवणे) वापरले जाई. पण सी. रामचंद्रांपासून (इना मिना डिका/ चित्रपट- आशा), ओ. पी. नय्यर (ये चाँदसा रोशन चेहरा- कश्मीर की कली), सचिनदेव बर्मन (बाबू समझो इशारे हॉरन पुकारे- चलती का नाम गाडी) आणि शंकर-जयकिशन (नखरेवाली- नई दिल्ली) यांनी ट्रम्पेटच्या एकलवादनाचे यशस्वी प्रयोग आपल्या गाण्यात केले. शंकर-जयकिशन यांनी ‘जिस देश मे गंगा बहती है’मधल्या ‘आ अब लौट चले’ या गाण्याला ट्रम्पेट, फ्रेंच हॉर्न, ट्रोम्बोन, टय़ूबा अशा ब्रास सेक्शनचा गाण्यातल्या विविध संगीतखंडात जोशपूर्ण प्रयोग केला. ‘हिमालय की गोद में’ या चित्रपटातल्या ‘मै तो इक ख्वाब हूँ’ या गाण्याच्या वाद्यवृंदरचनेत श्रेष्ठ वाद्यवृंदरचनाकार प्यारेलालजींनी फ्लूगन हॉर्न (ट्रम्पेटचेच अतिशय मृदू भावंड) या वाद्याचा आरंभीच्या/ अंतऱ्यापूर्वीच्या संगीतखंडात अतिशय तरल प्रयोग केलाय. पंचमदांनी ‘तिसरी मंझिल’च्या अगदी टायटल म्युझिकपासून जो काही ब्रासवाद्यांचा विलक्षण भाववाही आणि जोशपूर्ण प्रयोग केला, त्यात ‘तुमने मुझे देखा’ या गाण्याच्या आरंभीच्या संगीतखंडात ड्रम्स सोलोपाठोपाठ येणारी ट्रम्पेटवरची अतिशय आर्त सुरावट हा अतिशय अनोखा अनुभव होता. बाकी त्यातल्या इतर सर्व गाण्यांत ब्रास सेक्शनचा स्वरावलींमध्ये आणि अधोरेखनाकरिता फार वेगळा वापर केला आणि तोच धागा त्यांनी पुढे नेला.. मग ‘हम किसीसे कम नही’मधलं ‘चाँद मेरा दिल चाँदनी हो तुम’ या गाण्याचा आरंभीचा संगीतखंड रचताना ट्रम्पेटच्या चिरफाळलेल्या (गार्गलिंग टोनपासून) ध्वनिपासून ते मर्दानी ललकारीपर्यंतच्या स्वरावली आणि जोडीला ट्रम्बोनादि ब्रास कुटुंबाची साथ यामुळे साऱ्या तरुणाईला झपाटून टाकणारी अशी संगीतानुभूती झाली.
पंचमदांखेरीज ब्रास सेक्शनचा अप्रतिम प्रयोग केला तो प्यारेलालजींनी.. ‘इन्तकाम’ या चित्रपटाकरिता लतादीदींनी अप्रतिम गायलेल्या ‘आ जाने जां’ या कॅबेऱ्या नृत्यगीताच्या वाद्य वृंदरचनेतला ब्रास सेक्शन म्हणजे अनुभवावी अशीच बात आहे. तीच गोष्ट ‘ओम शांती ओम’ या किशोरदांनी गायलेल्या ‘कर्ज’ या चित्रपटातल्या गाण्याची..चित्रपटसृष्टीत पूर्वी संगीतकार सी. रामचंद्रचे सहायक चिक चोकोलेट यांनी त्यांच्या अनेक गाण्यात ट्रम्पेट वाजवलेय. ‘मधुमती’ मधल्या जॉनी वॉकरच्या तोंडचे- ‘जंगल मे मोर नाचा किसीने ना देखा’ या गाण्यात ट्रम्पेट, ट्रम्बोन आणि पिकोलो यातून साकारलेल्या मजेदार संगीतखंडातून जानीभाईचं नवटाक झोकून धमाल करणं वाद्यवृंद संकल्पक संगीतकार सलील चौधरींनी इतकं मस्त पकडलंय की पूछो मत.. मोन्सारेट कुटुंबातले थोरले मोन्सारेट (वडील) आणि त्यांची ज्यो, बोस्को आणि ब्लास्को ही तीन मुले यांनी वर्षांनुवर्षे चित्रपटगीतांमध्ये ब्रास सेक्शन सांभाळला.. त्यातील ब्लास्कोसोबत हनिबल कॅस्ट्रो यांनी ट्रम्बोन तर उरलेल्यांनी ट्रम्पेट्सद्वारा आपले योगदान दिले. पण या सगळ्यांमधील सर्वश्रेष्ठ म्हणता येईल असे ट्रम्पेट आणि पिकोलो ट्रम्पेटवादक म्हणजे जॉर्ज फर्नाडिस. राहुलदेव बर्मनच्या सर्व गाण्यातील अद्भूत ट्रम्पेट सोलोज जॉर्जीसाहेबांचेच..
सुषीर वाद्यांच्या बाबतीत क्लरिओनेट हे मुळात तीव्र आणि तार स्वरातलं असल्यानं आमच्या तमाशामध्ये आणि उत्तरेतल्या कव्वाली आणि नौटंकी या लोककलांमध्ये सुरुवातीला स्वरांचा भरणा करण्याकरिता म्हणून उपयोजित केलेले वाद्य चित्रगीतांमध्येही त्याच हेतूने बराच काळ वापरले गेले. पुढे ओ. पी. नय्यरसाहेबांच्या गाण्यात दोन-तीन क्लरिओनेट्स, दोन-तीन फ्लूट्स, पिकोलो, सेक्सोफोन यांच्या समूहवादनातून साकारलेले छोटेखानी स्वरावलीचे तुकडे हे हमखास असत. नव्हे, ती त्यांची खास पेहेचान बनून गेली. नय्यर ब्रांड.. त्यातले गंगारामजी, जसवंतजी हे काही नामवंत क्लरिओनेटवादक.
सेक्सोफोन आणि सिल्वर फ्लूटचे सवरेत्कृष्ट वादक म्हणजे मनोहारी सिंग. हाल कैसा है जनाब का – चलती का नाम गाडी (पिकोलो), बेदर्दी बालमा तुझको- आरझू (सेक्सोफोन), तेरे मेरे सपने- गाईड (सेक्सोफोन), देखिए साहिबो आणि ओ हसीना जुल्फोवाली- तिसरी मंझिल (सिल्वर फ्लूट) यांसारखी असंख्य गाणी मनोहारीदांच्या वादनानं अधिक सुंदर झालीयेत.
संगीतकार सलील चौधरी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलालमधले प्यारेलाल यांचं अतिशय आवडतं वाद्य ओबो.. आपल्या सुंद्रीच्या जवळ जाणारा, पण अधिक गोल आणि गोड टोन असणारं ओबो वाजवणारे लल्लुरामजी आणि सुर्वेदादा.. ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’चा अंतऱ्यापूर्वीचा संगीतखंड आठवतो? .. अतिशय एकलपणाचा व्याकूळ भाव निर्माण करणारं हे वाद्य सलीलदांचं अतिशय लाडकं.
माऊथ ऑर्गन हे असंच छोटंसं वाद्य.. अरकोर्डियन, हार्मोनियमच्याच कुळातलं. संगीतकार राहुलदेव बर्मनसाहेबांनी एक बालपणीची आठवण सांगितल्याचे स्मरते. आठ- दहा वर्षांचा असताना त्यांच्या हाती पहिले वाद्य लागले ते माऊथ ऑर्गन आणि त्यावर स्वत: रचलेली धून त्यांनी आपल्या वडिलांना ऐकवली. मध्ये काही दिवस गेले आणि एक दिवस ते सचिनदांच्या नव्या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिगला गेले आणि पाहतात तो काय त्यांची ‘ती’ धून असलेले गाणे ‘है अपना दिल तो आवारा..’ रेकॉर्ड होत होते. पंचमदांनी त्यांचे परम मित्रद्वय संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘दोस्ती’ या चित्रपटातल्या गाण्यांमध्ये स्वत: माऊथ ऑर्गन वाजवलंय, तसा तो पुढे त्यांनी अनेक गाण्यात/ पाश्र्वसंगीतात माऊथ ऑर्गनचा फार सुंदर प्रयोग केला. आठवा ‘शोले’च्या पाश्र्वसंगीतात अमिताभ आणि जया भादुरीच्या मूक/ विफल प्रीतीला अधोरेखित करणारी माऊथ ऑर्गनवर वाजणारी धून.व्हायब्रोफोन हे वाद्य हिंदी चित्रपट संगीतात अवतरल्यावर मग पियानोचा प्रत्येक गाण्यातला अनिवार्य प्रयोग कमी झाला. गाण्यातल्या सर्व सुरावटींना संवादी आघातयुक्त सुराकाशाचं सुंदर पाश्र्वपटल देणं हे व्हायब्रोफोनद्वारे शक्य होऊ लागलं. स्निग्धता आणि तरल धूसरतापूर्ण सुरावलीच्या सुंदर पटलामुळे गाणं अधिक सुंदर होई. ‘न किसी की आँख का नूर हूँ’ (मोहम्मद रफी- लाल किला),  किंवा ‘कोई छुपके से आके ’(गीता दत्त- अनुभव) या गाण्यामध्ये व्हायब्रोफोनचा सुंदर एकल प्रयोग केलाय. त्यामुळे साठोत्तर काळातल्या जवळजवळ सर्व गाण्यात व्हायब्रोफोन हा अनिवार्य होता. पंचमदांनी तर अनेक गाण्यांत या वाद्यावर सोलो पीसेसही वाजवून घेतलेत. उदा. ‘ओ हसीना जुल्फोवाली’ (तिसरी मंझिल) मधल्या अंतऱ्यापूर्वीच्या संगीतखंडाच्या शेवटी व्हायब्रोफोनवर वाजणारी लयदार सुरावट. किंवा त्यांनीच अरेंज केलेल्या सचिनदेव बर्मनसाहेबांच्या ‘तलाश’ या चित्रपटातल्या ‘कितनी अकेली’ या गाण्याच्या संगीतखंडातला गाण्याच्या तालाशी अनाघाताने खेळत उलगडणारी सुरावट.. श्री. बजी लॉर्ड यांनी अनेक वर्षे अत्यंत कुशलतेने हे वाद्य वाजवून चित्रपट संगीतात फार महत्त्वाचे योगदान दिले.
व्हायब्रोफोनच्या कुटुंबातलं म्हणता येईल असं दुसरं सुंदर वाद्य म्हणजे ग्लॉक्स (मूळ नाव ग्लॉकेनश्पेल). तीन सप्तकाचे सूर असलेल्या धातूंच्या पट्टय़ाचा प्रयोग यात केला जातो. अतिशय कोमल.. तान्ह्य़ा बाळाच्या त्वचेइतका सुकोमल.. मृदू असा याचा नाद. कळीवरल्या दंवबिंदूसारखा.. किंवा पाकळीसारखा.. तेव्हा अतिशय सुकोमल, मृदू भाव मांडताना वाद्यमेळात या वाद्याचा प्रयोग केला जातो. ‘सुजाता’मधलं सचिनदांचं गीता दत्तनं गायलेली ‘नन्ही कली सोने चली’ ही लोरी आठवतेय? ग्लॉक्सचा फार सुंदर प्रयोग केलाय. अनेक बालगीतांत या वाद्याचा सदैव प्रयोग होत राहिला. जलतरंग हे असेच एक आघातांनी वाजणारे वाद्य. चिनी मातीच्या वेगवेगळ्या व्यासाच्या भांडय़ांत पाण्याच्या नेमक्या प्रयोगानं त्या भांडय़ातून हवा तो सूर निर्माण करून हे वाद्य सिद्ध होते. संगीतकार रोशनसाहेब हे स्वत: जलतरंग आणि दिलरुबा उत्तम वाजवत. त्यांच्या अनेक  गाण्यांत त्यांनी जलतरंग आणि ग्लॉक्सचा फार मनोहारी प्रयोग केलाय. जिंदगी भर नही भूलेंगे/ गरजत बरसत सावन आयो रे (बरसात की रात), काहे तरसाये जियरा/ ए री जाने न दुंगी (चित्रलेखा), रहे ना रहे हम (ममता). जलतरंगचा असाच सुंदर प्रयोग संगीतकार नौशादसाहेबांनी ‘मधुबन में राधिका नाचे रे’ (कोहिनूर) मध्ये केलाय. वाद्यांचा अतिशय साक्षेपाने आणि अर्थपूर्ण प्रयोग करून हिंदी चित्रपट संगीतातल्या महान संगीतकारांनी आपली गाणी अर्थपूर्ण, प्रभावी आणि रंजकही केलीत. तेव्हा गाण्यामध्ये गायक, संगीतकार आणि गीतकार यांच्यासारखाच महत्त्वाचा पण ‘अनसंग हिरो’ असतो त्या गाण्याला आपल्या वादनकौशल्यानं अधिक सुंदर करणारा वादक. तो आज असतो, उद्या नसतो, पण गाण्यात तो भरून असतो.. भरभरून राहतो आणि उरतोही..
(उत्तरार्ध)

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader