आमच्या संदीप खरेच्या कवितेमधल्या या ओळी गेली अनेक र्वष पाठ आहेत, पण काही माणसं आणि काही ओळी वाचत राहूनसुद्धा जाणवत नाहीत..
‘उदासीत या कोणता रंग आहे?
तुला ठाव नाही, मला ठाव नाही
जसा की नदीच्या तटी मी प्रवासी
तुला रंग नाही, मला गाव नाही।’
कवितेच्या घरापाशी खूप वेळ थांबलं, स्वत:शी प्रत्येक शब्द घोळवत राहिलं, की मग एका क्षणाला तिचं दार उघडतं आणि मग कागदापलीकडची कविता दिसू लागते. तिचे अंतरंग अनुभवणं म्हणजे भाग्य!
एका रात्री दिग्दर्शक मित्र रवी जाधव यांनी विजय तेंडुलकरांच्या ‘मित्रा’ या गोष्टीवर लिहिलेली पटकथा पाठवली आणि ती वाचता वाचता मला या ‘उदासी’चा रंग सापडला. एकदा रंग सापडला की सुरात ती गुणगुणणं हा तर केवळ सोपस्कार. अशी कित्येक माणसं आठवत गेली- ज्यांना तसं कागदावर लिहून दाखवता येईल असं दु:ख नाही; पण एक कायमचा शाप असावा अशी ‘उदासी’.. असा एकटेपणा.. ‘मित्रा’मधल्या त्या ‘वेगळ्या’ मुलीची घुसमट, तिचा संघर्ष आणि मग कायमची ‘उदासीनता’!!
आनंदाची चाल, दु:खाची चाल, शौर्याची चाल, विरहाची चाल अशा अनेक स्वररचना करता करता एक दिवस ‘घुसमट’ स्वरबद्ध झाली.. त्या ‘उदासी’त खूप काही सापडलं. दु:खी माणसांना एक थेट उपाय असतो ना? की कर्ज झालं.. फेडून टाका, एकटेपणा.. मिटवून टाका, अपयश.. खोडून टाका आणि कोंडी.. मोडून टाका!! आजाराचं थेट निदान व्हावं तसं दु:खाचं होतं. पण खोल खोल रक्तातला एकटेपणा..? त्याचं औषध? गर्दीत पण किती ‘उदास’ चेहरे दिसतात. संदीपनी हा रंग पकडला..
‘तुला ठाव होते, मला ठाव होते
कधी पार तारू न पोहोचायचे
कितीही जरी बोलशी हासुनि तू
किती डोह डोळ्यांत डहुळायचे।’
अश्रूंची किंमत कळलेला हा माझा मित्र पुन: पुन्हा त्या गूढ डोहात घेऊन जातो.
‘अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते।’
चाळिशीच्या पायरीला ज्यांचा पाय लागला त्यांचा खूप र्वष घट्ट पकडून ठेवलेला अश्रूंचा बांध अगदी अचानक छोटय़ाशा प्रसंगात फुटतो. गप्पा मारताना उगाचच भरून येतं. जुन्या घरावरून जाताना छातीत कसंसच होतं. मुलं झोपली की त्यांच्याकडे एकटक पाहत राहावंसं वाटतं. आणि मग अचानक गालावर उष्ण पाणी जाणवतं. तसं थेट कारण काहीच नसतं; पण वेळोवेळी संयमाने आवरलेले अश्रू असतात हे! ‘कुण्या काळचे पाणी’ असतं ते.. आयुष्याचा डोंगर चढून चाळिशीला डोंगरमाथ्यावरच्या देवळात दर्शन घेऊन पुन्हा चाळीस पायऱ्या उतरून जायचा परतीचा प्रवास सुरू झाल्याची ही खूण. खरे होत जातो आपण! उगाच रडू येणं हा कमकुवतपणा आहे, या उथळ विचारांपलीकडे अश्रूंशी मैत्री होते आपली. लहानपणापासून साठवलेले किती सल, किती हंबरडे छातीत कोंडून ठेवतो आपण! पण ‘अताशा’ त्याचा आक्रोश होत नाही; त्याचं ‘कुण्या काळचे पाणी’ डोळ्यांत येते!
न सोडवलेले गुंते डोक्यात घेऊन जगणारे आपण सगळे! यांच्या मनाचे कप्पे, त्यातला अंधार बघितला तो ‘मी महाकवी दु:खाचा’ असं म्हणणाऱ्या ग्रेससरांनी.
‘जेव्हा अंधारून येतो सारा अतृप्त पसारा’ असं जेव्हा ग्रेसच्या पुस्तकात वाचलं तेव्हा मनात खळबळ झाली. कित्येक संदर्भ, वाक्यं, संवाद, नाती अर्धवट टाकून आपण पुढे पुढे चालत असतो. एखाद्या संध्याकाळी आपण एकटेच घरात असताना हा सगळा ‘अतृप्त पसारा’ अंगावर येतो, प्रश्न विचारतो, जाब विचारतो. आपण निरुत्तर! तरीही उद्याकडे चालणारे.. प्रॅक्टिकल? की कोडगे?
रडकी मुलं हळूहळू मोठी झाली की शहाणी होतात. यशस्वीही होतात. आणि हळवी मुलं..? बहुधा कलाकार होत असावीत!! त्यांना जरा जपावं लागतं. म्हणजे ‘कलाकार’ म्हणून वावरणं वेगळं; आणि कलाकार म्हणून ‘जगणं’ वेगळं. मुलाखती देणं खूपच सोपं; पण संवाद साधणं अवघड!!
ग्रेससर म्हणतात-
‘मोरांना कळते वेळ,पण
कोकिळ असते हळवे’
दोन्ही कलाकारच.. पण एकाला सौंदर्याची जाणीव आहे. पाऊस पडल्यावर आपला पिसारा, त्याची गाणी, त्याची चर्चा याची जाणीव आहे त्याला. जसं काही कलाकारांच्या मनात काय करायचं, कसं करायचं- याआधीच ते कसं बघितलं जाईल, याची तगमग असते. आणि दुसरे हळवे कोकिळ. कदाचित अवेळी, अयोग्य जागी व्यक्त होणारे. कधी लपून राहणारे. पण असतात कलाकारच! मोरही आवडतो सगळ्यांना आणि कोकिळही. पण ‘कोकिळ असते हळवे’.. त्याला गोष्टी जास्त जाणवतात, त्रास देतात. सुधीर मोघे, संदीप, सौमित्र असे कितीतरी ‘हळवे’ जवळून पाहतोय. त्यांचा आनंदही वेगळा आणि एकटेपणाही!
दिवसेंदिवस अशा एक-एक ओळी वाचत तानपुऱ्याचा षड्ज-पंचम ऐकत बसणं ही माझी अनेक वर्षांची सवय! आणि मग खूप र्वष एकत्र राहून एकमेकांशी काहीही न बोलता सारं समजतं, तशा त्या ओळींमध्ये लपलेल्या गोष्टी, रंग आणि उसासेही जाणवतात. संगीतकार म्हणून स्वरबद्ध करायच्या असतात त्या या सगळ्या गोष्टी. कवीच्या शब्दांपलीकडे कागदावर खूप काही असतं.. त्या कवीचं बालपण, एकटेपणा, संघर्ष, हळवेपणा.. आणि या सगळ्याइतकंच खरं असणारं ‘माणूसपण’! ते शोधत बसतो मी तासन् तास.
‘जे सोसत नाही असले
तू दु:ख मला का द्यावे?’
गेले तीन महिने मनात घोळत असलेल्या या ग्रेससरांच्या ओळी रोज एकटा गातो. कुणालाच ऐकवाव्याशा वाटल्या नाहीत अजून. कारण माझा संवाद तर पूर्ण व्हायला हवा त्या ओळींशी! मग मी कोणाला तरी सांगू शकेन, की असं म्हणायचंय या रंगांना.
दु:ख मिळणारच प्रत्येकाला. ‘जरामरण यातून सुटला कोण प्राणिजात?’ असं माडगूळकरांनी सांगितलंय. पण माझ्या कुवतीपलीकडे का देतोस मला दु:ख? माझी तक्रार तिथे आहे, की सामान्य दु:खाची तयारी होतीच माझी; पण ‘जे सोसत नाही’ असं दु:ख मलाच का द्यावंसं वाटलं? मी सगळ्यांचे रोष, आरोप, त्रागा पचवून जेव्हा दूर निघून गेलो तेव्हा..
‘परदेशी आपुल्याघरचे
माणूस जसे भेटावे
जे सोसत नाही असले
तू दु:ख मला का द्यावे?’
हाच तो ‘उदासीचा रंग’.. सोसायलाही अवघड आणि शब्दांत, सुरांत मांडायलाही. खूप जोरात ओरडावं आणि हाक पोहोचूच नये, तशी अगतिकता, तशी पोकळी..
सगळं सोडून परदेशी एक अनोळखी माणूस म्हणून आरशात स्वत:कडे पाहावं- आणि तेवढय़ात तिथे आपल्या घरातला माणूस भेटून त्यांनी पुन्हा सगळे संदर्भ जागे करावेत, इतकं खोल दु:ख का द्यावंस मला? मीच का..?
हा रंग जितका शोधू तितका जंगलात खोल खोल आपला हात धरून घेऊन जाणारा. आणि सापडला म्हणता म्हणता निसटणारा. गडद, तरीही हळवा; जणू मारवा!!
पुन्हा एकदा ग्रेससर..
‘पडवीच्या देखाव्यातून दिसतात मठाचे खांब
क्षितिजाच्या जवळी जाता ते पुन्हा पसरते लांब!!
जे सोसत नाही असले
तू दु:ख मला का द्यावे?’
सलील कुलकर्णी – saleel_kulkarni@yahoo.co.in
उदासीत या कोणता रंग आहे?
समृद्धीचा रंग.. हिरवा. शांततेचा.. पांढरा. प्रेमाचा.. गुलाबी. राग-क्रोधाचा.. लालबुंद. दु:खाचा.. काळा! बालपणाचा.. सप्तरंगी! भक्तीचा.. केशरी! ..स्वत:शीच बोलत होतो. भावना आणि रंग यांच्या जोडय़ा लावत...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-07-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music and songs