संपूर्ण देशात महाराष्ट्र या प्रांताने संगीत क्षेत्राला आणि संगीताने या प्रांताला हातचे न राखता भरभरून दिले. परंतु आज महाराष्ट्र स्थापनेच्या हीरकमहोत्सवी वर्षांत संगीताची अवस्था काय आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कमालीची कालवाकालव होत आहे. तंत्रज्ञानाने केलेल्या अचाट आणि अफाट क्रांतीला सहजपणे झेलून तिच्यावर स्वार झालेल्या अभिजात संगीताला येणाऱ्या काळात प्रचंड आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात जास्त अडचण झाली ती भारतीय अभिजात संगीताची. कारण या संगीताला असलेला राजाश्रय संपला. नव्याने राष्ट्रउभारणीची जुळवाजुळव करताना संगीताला प्राधान्य मिळणे शक्य नव्हतेच. पण त्याचवेळी- म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याच्या आधी दशकभर या राज्यात अभिजात संगीतासाठी वेगवेगळ्या मंचांवर खूप मोठी चहलपहल सुरू झाली होती. याचे कारण सामाजिक आणि राजकीयही होते. कारण देशाच्या अन्य प्रांतांप्रमाणे आजच्या महाराष्ट्राच्या नकाशात त्यावेळी असलेल्या फारच थोडय़ा राजांच्या पदरी दरबारी गायक होते. सांगली, मिरज आणि कोल्हापूर ही संस्थाने याला मोठा अपवाद. त्यामुळे महाराष्ट्री संगीताचे झाड जवळजवळ फुललेलेच होते. एवढेच नाही, तर याच महाराष्ट्रातून बाहेर पडलेल्या अनेक ज्येष्ठ कलावंतांनी अन्य प्रांतांतही संगीताच्या वटवृक्षाला खतपाणी घालून ते टवटवीत करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. हे सगळे झाले ते बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्यासारख्या द्रष्टय़ा कलावंतामुळे. ते इचलकरंजीसारख्या गावातून थेट ग्वाल्हेरला गेले. त्यांच्याबरोबर त्या काळातील अनेक जण गेले. पण बाळकृष्णबुवा परत आले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या संगीताला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळाली.
ज्या प्रांताला अभिजात संगीताची कोणत्याही प्रकारची दीर्घकालीन परंपरा नाही तेथे संगीत एवढय़ा चांगल्या पद्धतीने ऐकणारे रसिक कसे काय असू शकतात, असा प्रश्न महाराष्ट्राबाहेरील अनेकांना पडतो. परंतु त्याचे उत्तर मात्र सापडत नाही. कोणत्याही मातीत जसे लोकसंगीत जन्मते आणि वाढते, तसेच याही प्रांतात घडले. आणि लोकसंगीताच्या बरोबरीने चार अंगुळे वर गेलेल्या भक्तिसंगीताने येथील रसिकांची संगीतविषयक जाण वाढवण्यास निश्चितच मदत केली. कीर्तन, भजन आणि अभंग यांसारख्या संगीतप्रकारांनी मराठीजनांच्या संगीतप्रेमाची मशागत केली. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या काळात या प्रांती अभिजात संगीताची एक पणती पेटली, ती आजतागायत तेवती राहिली आहे. महाराष्ट्राचे स्वत:चे असे वाद्य नाही. नाही म्हणायला चिपळ्या आणि झांज किंवा तुतारी ही वाद्ये महाराष्ट्राच्या नावावर जमा होतात. पण ही वाद्ये संगीत निर्माण करण्यासाठी उपयुक्त नाहीत. ती नाद निर्माण करतात, परंतु संगीत निर्माण करत नाहीत. कारण त्यांची निर्मिती संगीताला पूरक होण्यासाठीच झालेली आहे. बासरी, सतार, सरोद, वीणा यांसारख्या वाद्यांच्या परंपरेत महाराष्ट्रातील एकही वाद्य नाही. वाद्यांच्या आधीपासूनच अस्तित्वात आलेल्या संगीतातही या भूमीचे योगदान यथातथा म्हणावे एवढेच. अशा पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात हे मन्वंतर घडून आले.
ज्या प्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले, त्याच राज्यात देशातील मुलींची पहिली शाळाही सुरू झाली. तेराव्या शतकात सुरू झालेल्या संतांच्या अखंड परंपरेने याच भूमीवर नवे वैचारिक वादळही स्थापित झाले. या वैचारिक परंपरेतून निर्माण झालेल्या सामाजिक चळवळींचा थेट परिणाम कलांमध्ये घडून आला, तोही महाराष्ट्रात. विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत संगीत नाटकांमध्ये स्त्री-भूमिका करण्यासाठी पुरुषांनाच लुगडे नेसावे लागत होते. पुढारलेल्या समाजाने त्यातून वाट काढत हिराबाई बडोदेकरांच्या रूपाने पहिला शालीन, अभिजात स्वर ऐकला आणि मनापासून दादही दिली. ज्या काळात स्त्रीला गायन करण्याचीच काय, पण ऐकण्याचीही बंदी होती, त्या काळात हिराबाईंनी संगीताच्या माध्यमातून सांस्कृतिक क्रांती घडवली. त्याच काळात सुंदराबाई जाधव यांच्यासारख्या कलावतीने ‘एकच प्याला’(१९१९) या संगीत नाटकाच्या पदांना चाली देऊन नवे दमदार पाऊल टाकले. महात्मा फुले यांनी १८४८ मध्ये मुलींची शाळा सुरू करून जे बीज रोवले होते, त्याचा हा परिणाम होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राजकीय स्वातंत्र्याचाही तो परिपाक होता. अन्यथा शेजारी असलेल्या कर्नाटकातील कर्नाटक संगीताची परंपरा महाराष्ट्रात स्थायिक होण्याऐवजी शेकडो किलोमीटर दूरवरून संगीताची ही गंगा बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्रात आणली नसती आणि त्यांचे शिष्योत्तम विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून तिचा देशभर प्रचार आणि प्रसारही केला नसता. संगीतात असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कास धरण्यामागे शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याची प्रेरणा जशी कारणीभूत ठरली, तशीच संगीताबद्दलचे अध्ययन आणि अभ्यास करणाऱ्या विष्णू नारायण भातखंडे, गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, कृ. द. दीक्षित, वामनराव देशपांडे, डॉ. अशोक दामोदर रानडे यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे घडण्यासही उपकारक ठरली. एवढेच काय, जातीधर्माच्या पलीकडे जाण्याच्या मराठी प्रवृत्तीमुळे सर्वधर्मीयांना महाराष्ट्राने नेहमीच आदराने वागवले आणि प्रतिष्ठाही दिली. देशाच्या संगीत व्यवहारात चित्रपट संगीताचा वरचष्मा याच महाराष्ट्रामुळे दिसून आला. आणि संगीताची नवी बाजारपेठ उभी करण्यासाठीही महाराष्ट्रातील आर्थिक विकास उपयोगी पडला.
महाराष्ट्रातील अभिजात संगीताला स्थलांतराचा मोठा हातभार लागला. त्यामुळे हरियाणातील कैराना गावामधून आलेल्या अब्दुल करीम खाँ यांनी स्थापित केलेले ‘किराणा घराणे’ किंवा जयपूरहून या राज्यातील कोल्हापूर संस्थानात राजगायक झालेले अल्लादिया खाँ यांचे ‘जयपूर घराणे’, उत्तरेकडून येऊन मुंबईतील भेंडीबाजारात राहणाऱ्या अमानत अली यांचे ‘भेंडीबजार घराणे’, मेवातमधून सुरू झालेले आणि महाराष्ट्रात विकास पावलेले पं. जसराज यांचे ‘मेवाती घराणे’ या अभिजात संगीतशैलींचा विकास या मातीत झाला. त्याची पाळेमुळे जरी महाराष्ट्र स्थापनेपूर्वीची असली तरीही त्यांचा कलात्मक विकास मात्र नंतरच्याच काळात झाला.
मराठी संगीत नाटकाचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला आणि त्याचे हळूहळू विझत जाणेही बोलपटाच्या आगमनाबरोबर सुरू झाले. तरीही या नव्या अभिजात संगीताला मराठी रसिकांनी भरभरून दाद दिली. कारण बालगंधर्व, मा. दीनानाथ, केशवराव भोसले यांच्यासारख्या अतिरथींनी लोकप्रियतेच्या शिखरावर नेलेली ही परंपरा छोटा गंधर्व, शिलेदार कुटुंब यांनी मोठय़ा हिमतीने टिकवण्याचा प्रयत्न केला. या कलाप्रकाराला पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर नेणारे केशवराव भोळे, अभिजात संगीताच्या दरबारातही स्वनाममुद्रा उमटविणारे पं. जितेंद्र अभिषेकी आणि डॉ. वसंतराव देशपांडे यांचे योगदानही अभूतपूर्व असेच म्हणायला हवे.
त्याबरोबरीनेच महाराष्ट्राचे वेगळेपण दाखवणारा भावगीत हा शब्दसंगीताचा अभिनव संकर साठच्या दशकानंतर अधिकच फुलला. ‘गीतरामायण’ हा सुधीर फडके- ग. दि. माडगूळकर यांचा प्रयोग साठच्याच दशकातला, परंतु पुढील काळाची पावले ओळखणारा ठरला. गजानन वाटवे, सुधीर फडके, यशवंत देव, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर ही व्यक्तींची नावे राहिली नाहीत, तर ती भावसंगीतातील घराणीच झाली. ही परंपरा आजही तेवढय़ाच जोमाने सुरू ठेवणारी युवकांची फळी सहजपणे दिसत असली आणि त्यात अजय-अतुल यांच्यासारख्यांचे नाव झळकत असले, तरीही ही यादी लांब होत नाही, ही खंत आहेच. भक्तिसंगीतात राम फाटक आणि पं. भीमसेन जोशी यांनी केलेला ‘संतवाणी’, ‘अभंगवाणी’चा प्रयोग हा या प्रांताची नवी ओळख सांगणारा ठरला. पारंपरिक भक्तिसंगीताला अभिजाततेची जोड मिळाल्याने या संगीतप्रकाराला देशभर मान्यताही मिळाली.
साठनंतरच्या काळात मराठी प्रांतात राहून जग जिंकणाऱ्या अनेक थोर कलावंतांनाही आपले मूळ गाव सोडून यावे लागले. याचे मुख्य कारण या राज्यात अभिजात संगीताची जी मशागत झाली, ती अन्य कोणत्याही प्रांतापेक्षा वेगळ्या प्रकारची होती. म्हणूनच कर्नाटकातल्या गदगमधून पुण्यात स्थायिक झालेले भारतरत्न भीमसेन जोशी, उस्ताद अमीर खाँ, बनारसहून आलेले पं. हरिप्रसाद चौरसिया, काश्मिरातून येऊन अस्सल मुंबईकर झालेले पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद अल्लारखाँ, उस्ताद झाकीर हुसेन, व्हायोलिनवादक एन. राजम यांना या राज्याने आपल्या कुटुंबाचे सदस्यत्व बहाल केले. देशातील चित्रपटसृष्टीची राजधानी ठरलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या, संगीताच्या विविधतेने नटलेल्या आणि संपन्न असलेल्या संगीत परंपरांचे एक सुंदर कोलाज चित्रपट संगीताच्या रूपाने साऱ्या जगाला अनुभवता येऊ लागले. बंगाल आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये चित्रपटांचे माहेर बनली. परंतु मुंबईने त्यात जी आघाडी घेतली, त्यामुळे ते संपूर्ण जगाचे आकर्षण ठरले. नौशाद, सचिनदेव बर्मन, मदनमोहन, शंकर-जयकिशन (आणि साठच्या दशकानंतर आर. डी. बर्मन ) यांच्याबरोबरीने वसंत देसाई, सी. रामचंद्र यांच्यासारख्या अस्सल मराठी माणसांनीही या चित्रपट संगीतात मोलाची भर घातली. त्या सगळ्यावर चार चाँद लावले ते लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी. चित्रपट संगीत हा एक प्रचंड मोठा आणि अत्यंत ललितसुंदर असा घटनाक्रम आहे. त्यात इतक्या जणांचे योगदान आहे, की अनेक तालेवार नावे वगळली जाण्याचीच शक्यता अधिक.
घराण्यांच्या उगमातून निर्माण होत गेलेल्या शैलीच्या अनेक नव्या प्रयोगांचेही मराठी रसिकांनी स्वागत केले. अण्णासाहेब किलरेस्कर यांनी संगीत नाटकाच्या रूपात कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीतातील जो संकर घडवून आणला, तोही सर्वात प्रथम महाराष्ट्रानेच स्वीकारला. नुसता स्वीकारला नाही, तर त्याचे स्वागत केले. अभिजात संगीताला नाटय़संगीतातून समाजापर्यंत पोहोचता आल्याने ते दरबारातून थेट सामान्यांपर्यंत पोहोचले. अभिजाततेला त्यामुळे खतपाणी मिळाले आणि नवे प्रयोग करण्याची ऊर्मी प्राप्त झाली. नवे स्वीकारण्याची मराठी रसिकांची ही क्षमता देशातील सगळ्याच कलावंतांसाठी आव्हानात्मक ठरली. आपल्या कलाप्रयोगांना समजावून घेणाऱ्या रसिकांच्या शोधात िहडणाऱ्या कलावंतांना त्यामुळे महाराष्ट्र आपला वाटू लागला. महाराष्ट्रातील रसिकांची दाद मिळावी यासाठी अक्षरश: तडफडणाऱ्या देशातील अनेक कलावंतांची जी आतुरता असते, त्याचे कारण येथील संगीत परंपरांना रसिकांनी पारखून घेतले. अन्य कलाप्रकारांच्या तुलनेत संगीताला मराठी माणसाने नेहमीच उजवे स्थान दिले. त्यामुळे संपूर्ण देशात या प्रांताने संगीत क्षेत्राला आणि संगीताने या प्रांताला हातचे न राखता भरभरून दिले.
आज महाराष्ट्र स्थापनेच्या हीरकमहोत्सवी वर्षांत संगीताची अवस्था काय आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कमालीची कालवाकालव होत आहे. केवळ आणि केवळ संगीतच करेन, अशी भीष्मप्रतिज्ञा घेऊन ती तडीस नेणाऱ्या मागील पिढीतील कलावंतांकडे असलेली हिंमत आता हळूहळू पुसट होत चालली आहे. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली वल्कले बदलत, पण संगीताचा गाभा जराही हलू न देता अभिजात संगीताने आपली ताकद आजमावली. संगीताचे भविष्य काय, असा प्रश्नही पडू नये अशा प्रचंड व्यक्तिमत्त्वाच्या कलावंतांची गजबज असलेल्या या राज्याला आता झाले आहे तरी काय, असा प्रश्न सगळ्या कलावंतांना व्याकुळ करतो आहे. तंत्रज्ञानाने केलेल्या अचाट आणि अफाट क्रांतीला सहजपणे झेलून तिच्यावर स्वार झालेल्या अभिजात संगीताला येणाऱ्या काळात प्रचंड आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. परंपरांना जोखड न मानता त्यामध्ये कलात्मक बदल घडवून आणणे हीच आजची खरी गरज. ही लढाई जेवढी अस्तित्वाची आहे, तेवढीच व्यावसायिकतेचीही आहे. संगीतासाठी उपलब्ध होणाऱ्या नव्या मंचांना सामोरे जात नव्या कल्पनांना अभिजाततेचे धुमारे फुटणे ही आता खरी गरज आहे. संगीताला आणखी काही दशके पुढे नेण्याची क्षमता असणाऱ्या पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, किशोरीताई आमोणकर यांच्यासारख्या प्रज्ञावंतांच्या खांद्यावर बसून अधिक लांबचे पाहू शकणाऱ्या नव्या प्रयोगशील कलावंतांचे निर्माण होणे फारच आवश्यक आहे. त्यासाठी व्यवसाय म्हणून संगीत टिकून राहण्याची व्यवस्था व्हायला हवी. सरकारने त्यासाठी जेवढे करायला हवे त्याहून जास्त इतरांनी करायला हवे. नाही तर ज्या महाराष्ट्र प्रांताचा संगीत हा जो खराखुरा आत्मा आहे, तोही काळाच्या झडपेत नाहीसा होण्याचीच शक्यता अधिक.