कुठलंही उत्पादन आकर्षक आणि लक्षवेधी रीतीने लोकांपर्यंत पोहोचणं, त्या उत्पादनाची लोकप्रियता वाढविणं, हा तद्दन व्यावसायिक हेतूजिंगल्सच्या मागे असतो. त्याच दृष्टीने अॅड् कंपन्या त्यामध्ये पैसे गुंतवीत असतात. उत्पादनाची सर्व वैशिष्टय़े जिंगलमध्ये आली पाहिजेत असा अॅड् एजन्सीवाल्यांचा आग्रह असतो. १९६५-७० च्या काळात प्रथम जिंगल रेडिओवरून प्रसारित झाली. त्याकाळी रेडिओ हे एकच जाहिरातीचं माध्यम होतं. विविध भारतीला स्पर्धा करणारे दुसरे रेडिओ चॅनेलही तेव्हा नव्हतं. त्यामुळे रेडिओ आणि जिंगल हे समीकरण त्याकाळी अगदी यशस्वी झालं होतं. नव्याने आलेल्या या प्रवाहास मग १९७२ पासून टेलिव्हिजनची साथ मिळाली. एक वादक, मग अॅरेंजर आणि त्यानंतर संगीतकार म्हणून मी केव्हा या जिंगल क्षेत्राचा भाग झालो, ते माझं मलाही कळलं नाही. सुरुवातीला शीलकुमार छड्डांचा ‘रेडिओवाणी’, गोयलांचा ‘रेडिओ जेम्स’, कुसुम कपूरचा ‘आर. टी. व्ही. सी.’ व नानावटींचा ‘वेस्टर्न आऊटडोअर’ असे बोटावर मोजण्याइतकेच रेकॉर्डिग स्टुडिओ तेव्हा होते.
जाहिरात हा आज आपल्या जगण्याचा एक भाग बनला आहे. अगदी रोज लागणाऱ्या वस्तू- म्हणजे टूथपेस्टपासून रात्री झोपण्यासाठी लागणारा बेड, एअरकंडिशन, फॅनपर्यंत सर्व गोष्टींची जाहिरात होऊ लागली आहे. मग ही वस्तू बरी की ती बरी? अशी लोकांची पंचाईत झाली. जिंगल दिवसातून जितक्या जास्तीत जास्त वेळा ऐकवाल किंवा दाखवाल, तितकी ती वस्तू चांगली, असा जनमानसात समज होतो. या क्षेत्राच्या वाढीने अनेक लहान-मोठय़ा लोकांना महत्त्व आलं. आज सिनेस्टारही अमाप पैसा घेऊन जाहिरात क्षेत्रात उतरले आहेत. सिनेमाइतकीच जाहिरातही ग्लॅमरस झाली आहे. मोठय़ा आर्थिक उलाढालींचं केंद्र म्हणून जाहिरात क्षेत्राला आज वलय प्राप्त झालं आहे. जिंगलने आजपर्यंत खूप कलाकारांना खूप काही दिलं. पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या आर्टिस्टनी मुंबईसारख्या शहरात जिंगल्सच्या जोरावर गाडी, फ्लॅट्स घेतले. एका सिंथेसायजरच्या मदतीने मीसुद्धा जिंगल्सच्या क्षेत्रात एकेक पायरी वर चढत गेलो. अनिश्चितता असलेल्या या क्षेत्रामध्ये राहूनही मला आयुष्यात स्थिरता मिळाली. जिंगल्सचा यात खूप मोठा वाटा आहे.
मुळात जिंगल्स हा प्रकार संपूर्णपणे व्यावसायिकतेच्या कसोटीवर आधारलेला असतो. मला विचाराल तर जिंगल बनवणं, त्याला चाल लावणं हे काम खूपच आव्हानात्मक आहे. इथे प्रत्येक गोष्टीला वेळेचं बंधन असतं. गाणं रंगवण्यासाठी तुम्ही आलाप घेऊ शकता, तान मारू शकता. त्यात ५-१० सेकंद वाढले तरी कोणी विचारणारं नसतं. पण इथे १०-२०-३० सेकंदांतच सर्व काही करावं लागतं. बरं, ३० सेकंदाची जिंगल्स असली तरी २३-२४ सेकंदच तुमच्या वाटय़ाला येतात. बाकीचे ५-६ सेकंद स्पोकन वर्ड्ससाठी (व्हॉइस ओव्हर) ठेवावे लागतात. जिंगल्स म्हणजे सेकंदा-सेकंदाची लढाई असते. शब्दांच्या आणि वेळेच्या चौकटीत राहूनच संगीतकाराला काम करावं लागतं. क्लायंट जेवढा जागरूक वा संवेदनशील असतो, तेवढीच जागरूकता, तत्परता संगीतकाराकडे असावी लागते.
अमाप पैसा असलेल्या या इंडस्ट्रीमध्ये कष्टाला दुसरा कसलाही पर्याय नाही. कष्टाची तयारी आणि जिंगल्स करण्यासाठी तत्परता लक्षात आल्यावर एकामागून एक जिंगल्स मी करीत गेलो. तेल, साबण, श्ॉम्पू, ब्लेड, चपला, बूट, क्युटिक्युरा टाल्कम पावडर, झंडू बाम, धारा तेल, ओके नहाने का साबू, संतूर सोप अशा कितीतरी जाहिराती केल्या. प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन कल्पना वापरावी लागते.
रेडिओ अॅडव्हर्टायझिंग प्रोडय़ुसर्स असोसिएशन (फअढअ) यांचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळाही असतो. त्यामध्ये रेडिओ-टीव्हीवरची सर्व भाषांमधील सर्वोत्तम जिंगल्स, कार्यक्रम, गायक, निवेदक यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. एक वर्ष असं होतं की, ‘रापा’ची वेगवेगळ्या भाषेतील जिंगल्स कंपोझिशनची २८-३० अॅवार्डस् एकटय़ा मलाच मिळाली होती. तेव्हा त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमीन सयानी यांनी गंमतीने मला ‘अॅवार्डस् नेण्याकरिता लॉरी आणलीयस का?’ असं विचारलं होतं.
आज मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपण एवढं काम केलंय.. आणि तेही चांगल्या प्रतीचं- याचा खरोखरच अचंबा वाटतो. तेव्हा कामाची व त्यातून मिळणाऱ्या पैशांची गरज होती म्हणा- जिंगल्सचं आव्हान नेहमीच आनंदाचं वाटे. मनात कुठेतरी स्वत:विषयी खात्रीही होतीच. खुमखुमी होती. ही चाल नाही आवडली तर दुसरी करू, हा आत्मविश्वास होता. हा त्यावेळच्या वयाचा परिणाम म्हणा हवं तर! सांगीतिक विचारांना आव्हानाची जोड मिळाली. जसा गळा नेहमी गाता असावा लागतो, तसेच संगीतकारालाही चाली करीत राहण्याची सवय हवी. आजही सकाळी वर्तमानपत्र हातात पडते तेव्हा त्यातील हेडलाइन्सनाही मी माझ्या मनात एक चाल लावून टाकतो.
संगीतकार म्हणून जिंगल्स लगेचच पकड घेणारी असणं आणि ती दुसऱ्या कुठल्याही जाहिरातीसारखी न वाटणं, हे महत्त्वाचं पथ्य पाळावं लागतं. मला नेहमी गुरूसमान असलेल्या पं. जीतेंद्र अभिषेकींची आठवण येते. ते म्हणायचे, ‘अशोक, मुखडा सणसणीत झाला पाहिजे. अंतरा आपोआप होतो मग!’ जिंगल्स करताना वा टायटल साँग करताना मी हे नेहमी लक्षात ठेवूनच काम करतो. गाणं ऐकल्याबरोबर ते गुणगुणावंसं वाटलं पाहिजे.
आजही स्टुडिओकडे जाताना तीच ऊर्जा, तोच उत्साह मला खुणावत असतो. नवं काम करताना तीच उत्सुकता मनात कायम असते. माझ्या हातून काम पूर्ण होईपर्यंत तीच अस्वस्थता, तीच तळमळ आजही माझ्यात टिकून आहे. याचं सगळं श्रेय मी संगीताला देतो. जुने बंध सोबत घेऊन नव्या पिढीशी मी नातं जोडलं आहे. आणि म्हणूनच मी कायम आनंदी आणि तरुण आहे असं मला वाटतं
जिंगलनं मला घडवलं!
कुठलंही उत्पादन आकर्षक आणि लक्षवेधी रीतीने लोकांपर्यंत पोहोचणं, त्या उत्पादनाची लोकप्रियता वाढविणं, हा तद्दन व्यावसायिक हेतूजिंगल्सच्या मागे असतो.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 16-03-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व जिंगल बेल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music made me