|| मुकुंद संगोराम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
संगीत ही माणसाची निकड आहे. गाण्यापासून सुरू झालेला संगीताचा प्रवास पुढे संगीत मैफली, नंतरच्या काळात गाण्याच्या रेकॉर्ड्स काढण्याचं आलेलं तंत्र, त्याचं पुढे कॅसेट्समध्ये झालेलं रूपांतरण.. आणि त्यानंतर सीडीचा जमाना आला. तोही पुढे संगणकयुगात आंतरजालाच्या घोडदौडीत मागे पडला. आता यूटय़ुबवरून शेकडो, हजारो गाणी साठवून ती हवी तेव्हा ऐकण्यापर्यंत आपली मजल गेली आहे. परंतु त्याचवेळी संगीताच्या सर्जक कलावंतांचं हक्काचं व्यासपीठ हरवलं आहे. येत्या काळात तंत्रज्ञानाच्या चमत्काराने ते निर्माण होईलही; परंतु सध्या तरी या आघाडीवर भलंमोठं प्रश्नचिन्ह आहे.
दरवर्षीच्या गणेशोत्सवात काही गाणी लोकप्रियतेच्या शिखरावर जातात. जाल तिथं तेच गाणं. त्याचे शब्द, त्याचं संगीत, त्यातला आवाज या सगळ्याचं अनोखं मिश्रण असणारी ही गाणी फक्त आणि फक्त गणेशोत्सवासाठीच तयार होण्याचा काळ अगदी अलीकडचा.. म्हणजे जागतिकीकरणानंतरचा. तोपर्यंत उत्सवी संगीत असं काही फार ठळकपणे दिसणारं नव्हतंच काही. एक तर उत्सवात ढणढण संगीत वाजवण्याचा तो काळ नव्हता. गणेशोत्सवात तर भाषणे, चर्चा, परिसंवाद, संगीताचे कार्यक्रम असाच माहोल असायचा. पण हे सारं अगदी मध्यमवर्गापुरतं मर्यादित असे. गणेश मंडळांची प्रतवारी त्यांच्या कार्यक्रमांच्या दर्जावरून ठरायची. त्यांनी आरास करण्यासाठी किती पैसे खर्च केले आहेत, यापेक्षा त्यामध्ये नावीन्य किती आहे, याला महत्त्व असण्याचा तो काळ. पण गणपतीत ‘जवा नवीन पोपट हा, लागलाय मिठू मिठू बोलायला’ किंवा ‘मुंगडा मुंगडा’ यासारख्या गाण्यांनी अक्षरश: हैदोस घालायला सुरुवात झाली, तो काळ नव्वदच्या दशकातला. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तेव्हा घडत असलेले संशोधन संगीतासाठीही उपयुक्त ठरतच होतं. म्हणजे भारतातल्या कोणी स्वप्नातही केली नसेल, अशी ‘डिस्क जॉकी’ (डीजे) ही संकल्पना प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली होती. गणपतीसाठी लताबाईंच्या आवाजातली आरती किंवा त्यांचे भक्तीसंगीताचे अल्बम्स ध्वनिमुद्रिकांच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले, तेव्हा त्यांना गणपती उत्सवाच्या काळात पहिली पसंती मिळत होती. संगीत ही विक्रीयोग्य वस्तू होण्यासाठी तंत्रज्ञानाची जी प्रचंड मदत झाली, त्याने संगीत घरोघर सहजपणे पोहोचू लागण्याची पहाटच झाली.
ध्वनिमुद्रणाचे तंत्रज्ञान विकसित होण्यापूर्वीच्या काळात ते प्रत्यक्ष ऐकणे एवढीच शक्यता होती. करमणुकीचेही तेवढेच साधन होते. पण ते सहजी उपलब्ध नव्हते. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात हे तंत्र अवतरले, तेव्हाही बहुतेकांनी त्याला नाकेच मुरडली. कारण तेव्हाची ध्वनिमुद्रणाची क्षमता फार तर दोन मिनिटे होती. त्यामुळे सहा-सात तास चालणाऱ्या मैफलीत राग पिसून गाणारे गवय्ये या तंत्रज्ञानाला अनुकूल असण्याची शक्यताच नव्हती. तरीही विज्ञानाचा रेटा असा अतिप्रचंड असतो, की त्याही काळात भविष्याची चाहूल असणाऱ्या अब्दुल करीम खाँ यांच्यासारख्या द्रष्टय़ा कलावंताने अशा दीड-दोन मिनिटांच्या रागसंगीताच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. कचकडय़ाच्या एका गोल तबकडीवर साठवून ठेवलेले हे संगीत कधीही, केव्हाही ऐकण्याची एक नवी सोय त्यामुळे निर्माण झाली. पण तेव्हा हे तंत्रज्ञान सामान्यांच्या आवाक्याबाहेरचंच होतं. संगीत नाटकांना होणारी गर्दी त्यामुळे कमी झाली नाही, उलट वाढतच गेली. राजामहाराजांच्या दरबारातच सादर होणारं अभिजात संगीत सामान्यांपर्यंत पोहोचविण्याची संगीत नाटक ही नवी व्यवस्था होती. ध्वनिमुद्रणाच्या तंत्रामुळे बालगंधर्वाच्या संगीताचा दस्तावेज आजही उपलब्ध होऊ शकला हे खरे; पण तेव्हाच्या काळातील अतिशय उंचीच्या कलावंतांनी मात्र त्याकडे पाठ फिरवल्याने संगीताचेच नुकसान झाले. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, विष्णु दिगंबर पलुस्कर, भास्करबुवा बखले यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या नाहीत, ही इतिहासातील एक अतिशय दु:खद घटना म्हणायला हवी.
नभोवाणी हे संपर्काचं नवं माध्यम तेव्हाच आलं. मोठय़ा आकाराचे रेडिओ ही त्या काळातील अभिजनांची खूण होती. पण ट्रान्झिस्टरने ती हवा लवकरच काढून घेतली. श्रवणाचा आनंद हे त्या माध्यमाचं बलस्थान होतं. १९३२ मध्ये चित्रपट बोलू लागला (खरं तर गाऊ लागला!) तेव्हा त्यातील गाणी स्वतंत्रपणे ऐकण्याची व्यवस्थाच उपलब्ध नव्हती. परंतु ही गरज लक्षात घेऊन नभोवाणीने अतिशय हुशारीने माध्यमाच्या सादरीकरणात बदल केले. आकाशवाणी संगीत सभा किंवा ‘गीतरामायण’ ही त्याची खूण. आपली आवड, भूले बिसरे गीत, बिनाका गीतमाला, नाटय़संगीत यांसारख्या कितीतरी कार्यक्रमांना जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. पण मनात रुंजी घालणारं गाणं पुन:पुन्हा ऐकण्याची व्यवस्था तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली नव्हती. त्यामुळे अशा कार्यक्रमांत ते ऐकायला मिळेल, या आशेने श्रोते त्यासाठी जिवाचा कान करत. आताच्या पिढीला हे सगळं आश्चर्यकारक वाटत असलं, तरी त्या काळातील प्रत्येकाला हे सगळं अतिशय नवखं आणि प्रिय होतं, हे मात्र नक्की.
तीन मिनिटांच्या ध्वनिमुद्रिका ही त्या काळातील एक जबरदस्त ‘क्रेझ’ होती. एवढय़ाशा अवधीत संगीत सादर करणे ही प्रतिभेचीच कसोटी होती. पण विज्ञानाच्या प्रगतीने तो काळ आठ मिनिटांपासून ते २० मिनिटांपर्यंत पोहोचला आणि एका नव्या क्रांतीचा उदय झाला. ध्वनी साठवून ठेवणारी चुंबकीय पट्टी हे तंत्र तर आणखीच पुढे जाणारं होतं. स्पूल रेकॉर्डिग महाग असलं, तरी अगदी आवाक्याबाहेरचं नव्हतं. अगदी दोन तासांपर्यंत आवाज साठवण्याची क्षमता असणारं स्पूलचं तंत्र हाताळण्यास मात्र कठीण होतं. विशिष्टांनाच ते वापरता यायचं. एकूणच प्रगतीचा वेग आजच्या तुलनेने कमी राहिल्याने कॅसेटचे तंत्र अवतरण्यास २०-२५ वर्षे लागली. या तंत्राने मात्र संपूर्ण भारत अक्षरश: ढवळून निघाला. त्यामुळे ध्वनिमुद्रणाचा काळ २० मिनिटांवरून एकदम ४५ मिनिटांपर्यंत पोहोचला आणि एकाच कॅसेटमध्ये दोन बाजूंची व्यवस्था करून तो दीड तासांपर्यंत गेला. टेपरेकॉर्डर नावाचे यंत्र तेव्हा बाजारात आले आणि झटक्यात ते घरोघरी पोहोचले. बाजारपेठ म्हणून भारताने फारच उंच भरारी घेतली. अगदी २५ रुपयांत चित्रपटांची गाणी मिळणाऱ्या कॅसेट्सने तर धुमाकूळच घातला. या तंत्राने केव्हाही आणि कुठेही ध्वनिमुद्रण शक्य झालं. तोपर्यंत प्रचंड खर्चीक असणारं हे तंत्र आता सामान्यांच्या हाती सहजपणे पोहोचलं होतं.
बॅटरीवर चालणाऱ्या टेपरेकॉर्डरने तर धमालच उडवून दिली. सहज हाताळता येणारं हे यंत्र कित्येक जण बरोबर घेऊन फिरायचे. बरोबर हव्या त्या कॅसेट्स असायच्या आणि हवं ते गाणं सहजपणे ऐकण्याची एक अप्रतिम अशी सोय त्यामुळे निर्माण व्हायची. अनेक घरांमध्ये पुस्तकांच्या जागी कॅसेटस् दिसायला लागल्या. याचं कारण हाताळण्यातली सुलभता आणि हवं ते गाणं ऐकण्याची सोय. कॅसेट्स कालबाह्य़ होणारच नाहीत अशा भाबडय़ा समजुतीत अनेकांनी घरांमध्ये कॅसेट्सचा प्रचंड साठा केला. एखाद्या ग्रंथालयाप्रमाणे अमुक एक कॅसेट पटकन् मिळण्यासाठी सोय केली. त्यात आणखी एक अद्भुतरम्य सुविधा होती. ती म्हणजे संगीताच्या देवाणघेवाणीची. एकमेकांना ध्वनिमुद्रिका देण्यासाठी दोघांकडेही ते ऐकण्याचे यंत्र असण्याची आवश्यकता होती. ते यंत्र महागही होतं, त्यामुळे घरोघरी पोहोचलेलं नव्हतं. कॅसेटमुळे मात्र ते फारच सोप्पं झालं. संगीताच्या वहनामुळे ते मोठय़ा प्रमाणात प्रसरण पावू लागलं. ही क्षमता इतकी मोठी, की त्याची एक बाजारपेठच तयार झाली. हा काळ जागतिकीकरणाच्या आरंभाचा- म्हणजेच संगीत ही विक्रीयोग्य वस्तू होण्याचा!
पण तंत्रप्रगतीचा वेग तोपर्यंत इतका वाढला होता, की लक्षात यायच्या आतच ते टेपरेकॉर्डर भंगारात दिसायला लागले. कारण ‘कॉम्पॅक्ट डिस्क’ (सीडी) या नव्या तंत्राचा झालेला अवतार. ७० मिनिटांचे संगीत साठवण्याची सीडीची क्षमता महत्त्वाची होतीच, पण संगीताच्या मुद्रणतंत्रातील आधुनिकतेने त्याचे श्रवणसुख कितीतरी पटींनी वाढले. उत्तम तंत्राने संगीत ऐकणं हे किती स्वर्गीय सुख असतं याचा अपूर्व अनुभव सीडीमुळे यायला लागला. परिणामी घरातल्या कॅसेटस्चं काय करायचं, अशा चिंतेने ग्रस्त झालेल्या रसिकांना कॅसेटच्या तुलनेत महाग असल्या तरी सीडी घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामध्ये पुन्हा पुन्हा ऐकण्याची सुभगता हे त्याचं मुख्य कारण. जी प्रत्येकाची कायमचीच गरज असते. कॅसेटस् वाजवून वाजवून तुटायच्या, त्यांची लांबी वाढायची, त्यामुळे श्रवणातील आनंद कमअस्सल व्हायचा. सीडीमध्ये हे काही होण्याची शक्यता नव्हती. पण सीडी हाताळून हाताळून खराब होणं व्हायला लागलं आणि संगीताच्या संगणकीकरणाचं नवं तंत्र अवतरलं. परिणामी सीडी नावाची गोष्ट नाहीशी झाली आणि इथे वेगळ्याच अडचणीला सुरुवात झाली. संगीत विक्रीची जी दालने होती, ती कॅसेटनंतर सीडींनी भरली गेली. पण आता त्यांना कुलुपं लावण्याशिवाय पर्याय उरला नाही. एक दीर्घकाळ सुरू राहिलेली साखळी अशा तऱ्हेने खंडित झाली.
गणेशोत्सवात गाजणारं आणि आपल्याला आवडणारं गाणं आपल्या घरी, आपल्या कपाटात सुरक्षित आहे याचा जो दिलासा होता, तो गेल्या काही वर्षांत संपुष्टात आला. संगीत ही विक्रीयोग्य वस्तू असली तरीही ते महाकाय पातळीवर निर्माण व्हायला लागलं. आंतरजालाच्या शोधाचा हा थेट परिणाम! त्यामुळे आंतरजालावर सगळं संगीत साठवलं जायला लागलं आणि ते एका कळीवर मिळायला लागलं. आपल्या हातातील त्याचा मालकी हक्क आपोआप गळून पडला. हवं ते हवं तेव्हा पटकन् मिळणं, ही कोणत्याही रसिकाची अत्यावश्यक गरज. पण या ‘प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी’ने नव्याच अडचणी निर्माण होऊ लागल्या. आंतरजालावर संगीताच्या उपलब्धतेची शक्यता वाढली. हवं ते संगीत पटकन् मिळण्यासाठी या आंतरजालाच्या प्रणालीत सतत बदल होत राहतात, परंतु त्याने संगीत सहजसाध्य होतंच असं मात्र नाही. या घटनेने विक्रीयोग्य संगीताची जागतिक बाजारपेठ बहरली. पण ‘विक्रीयोग्य’ या उपाधीने गुणात्मक अडचणीही निर्माण झाल्या. त्याला पर्याय म्हणून यूटय़ूबसारखं एक व्यासपीठ तयार झालं. कोणालाही सहज प्रवेश करता येणारं हे व्यासपीठ ही नवी क्रांती होती. तिथं संगणकीय साठवणीचा इतका अतिप्रचंड साठा उपलब्ध आहे, की त्याने छाती दडपून जावी.
दरम्यानच्या काळात पृथ्वीवर अवतरलेल्या मोबाईल या यंत्राने माहिती आणि करमणुकीच्या क्षेत्रांत जी त्सुनामी निर्माण केली, त्याने आधीच्या काळातील सगळी आयुधे गळून पडली. कॅमेऱ्याचा अस्त होण्यास जसा मोबाईल कारणीभूत ठरला, तसेच टेपरेकॉर्डरची गरजही संपुष्टात आली. पण मोबाईलमध्ये साठवलेले संगीत पुन्हा ऐकण्यासाठी जी संगणकीय व्यवस्था असायला हवी, ती नसल्याने पुन्हा शोधकार्यात फारच वेळ खर्ची होतो. पेन ड्राईव्ह या नव्या शोधाने माहितीचा साठा करण्याचे एक अतिशय सोपे हत्यार प्रत्येकाच्या हाती आले हे खरे असले, तरीही त्यासाठी मोजावे लागणारे पैसे सामान्यांच्या हाताबाहेरचे आहेत. बरं, तो पेन ड्राईव्ह मोबाईलला जोडण्याची सोय अद्याप तरी उपलब्ध झालेली नाही. आंतरजालावरील संगीत शोधून ऐकण्यासाठी ‘कनेक्टिविटी’ची सुविधा हवी, ती भारतात सर्वदूर मिळत नाही, हे वास्तव श्रोत्यांच्या अडचणीचं ठरतं आहे, ते वेगळंच.
एवढय़ा महाकाय साठय़ातून हवं ते क्षणार्धात मिळविण्यासाठी करावी लागणारी धडपड हे आजचं श्रवणाचं वास्तव आहे. मध्यरात्री उठून गाणं ऐकण्याची ऊर्मी यावी आणि या महासाठय़ातून ते शोधण्यासाठी दमछाक व्हावी, असं घडायला लागलं आहे. त्यामुळे संगीत मिळण्याच्या एका नव्या व्यवस्थेची फारच आवश्यकता निर्माण झाली आहे. आपल्याकडे शेकडो कॅसेटस् किंवा सीडी आहेत, याचा वृथा अभिमान गळून पडणे यात गैर काहीच नाही. संगणकात साठवून ठेवण्याची क्षमता अपरिमित असली, तरीही ते हाताळण्यायोग्य यंत्र अजून उपलब्ध नाही. हार्ड डिस्क या तंत्राने हा साठा हवा तेवढा वाढवता येतो. तो सहज उपलब्धही होतो. पण त्यासाठी संगणकाची आवश्यकता असते. म्हणजे एका कळीवर ते हवं तिथे मिळण्याची शक्यता मावळते. त्यामुळे गणेशोत्सवासाठी तयार केलेली गाणी कशी मिळवायची, असा प्रश्न रसिकांना पडतो आणि ती कशी उपलब्ध करायची, असा प्रश्न कलावंतांना पडतो. एखादी नवी कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठच नसल्याने आंतरजालावरच्या महासागरात एक थेंब सोडून रसिकांची वाट पाहत बसायची, असं त्रांगडं झालंय. सतत नवं शोधत राहण्यासाठी द्यावा लागणारा वेळ वाढतोय. आणि त्यामुळे जे सहज मिळतं तेवढंच ऐकण्याची सवयही वाढीला लागते आहे. हे सारं चित्र बदलण्याचं सामथ्र्य तंत्राच्या आविष्कारातच आहे. पण ते अजून तरी अवतरलेलं नाही. ती बाजाराची गरज आहे, हेही अजून लक्षात आलेलं दिसत नाही.
काळाचा झपाटा आणि जगण्याचा वेग इतका वाढतो आहे, की हाती असलेल्या इवल्याशा वेळात नेमकं काय काय करायचं, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. अशा वेळी सहज, सोपी व्यवस्था निर्माण करून तो सोडवणं हे फारच अत्यावश्यक गोष्ट ठरते आहे. नव्या दमाच्या कलावंतांना समाजासमोर येण्यासाठी आणि नावीन्याचा शोध घेणाऱ्या प्रत्येक रसिकासाठी ती काळाची गरज आहे.
mukund.sangoram@expressindia.com