अमरेन्द्र धनेश्वर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाचे वर्ष हे सी. आर. व्यासांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. कुमार गंधर्व, रामभाऊ मराठे या दिग्गज कलाकारांचे व्यास हे समकालीन आणि या सर्वाचे गुण जाणणारे गायक, रचनाकार, गुरू आणि आयोजक. विविध रागांची निर्मिती करणाऱ्या आणि मुंबईची संगीतसंस्कृती समृद्ध करणाऱ्या या कलावंताच्या कार्याचे स्मरण..

एकोणीसशे चाळीसच्या दशकापासून १९९० पर्यंत आकाशवाणी या माध्यमाने मनोरंजनाच्या क्षेत्रावर वर्चस्व गाजवले होते, हे कदाचित एकविसाव्या शतकात वाढलेल्या पिढीला खरे वाटणार नाही. परंतु चित्रपट संगीत, सुगम संगीत, लोकसंगीत आणि रागदारी संगीत अशा सर्व शाखांना प्रसारासाठी आणि लोकाश्रयासाठी आकाशवाणीवर अवलंबून राहावे लागत असे. चित्रपट संगीताचे शौकीन ‘बिनाका गीतमाला’ आणि ‘भुले बिसरे गीत’साठी आसुसलेले असत; आणि रागदारी संगीताचे रसिक शनिवारी रात्री प्रसारित होणाऱ्या ‘नॅशनल प्रोग्रॅम ऑफ म्युझिक’साठी कान टवकारून बसलेले असत.

एकोणीसशे साठच्या दशकात माणिक वर्माचा राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यांनी ‘बागेश्री’ रागातला बडा ख्याल भरल्यानंतर ‘ना डारो मोपे रंग’ ही द्रुत एकतालात बांधलेली आकर्षक चीज सुरू केली. माणिक वर्माचे एक गुरू गुणीदास जगन्नाथबुवा पुरोहित यांना ही चीज भारीच पसंत पडली. माणिकताईंना त्यांनी विचारले, ‘‘ही कुणाची रचना?’’ माणिकताई म्हणाल्या, ‘‘मला वसंतराव कुलकर्णीकडून मिळाली.’’ जगन्नाथबुवांचे एवढय़ावर थोडेच समाधान होणार? ते थेट वसंतराव कुलकर्णीच्या क्लासवर जाऊन थडकले आणि वसंतरावांना या बंदिशीसंबंधी विचारू लागले. वसंतराव ताबडतोब म्हणाले, ‘‘ही बंदिश सी. आर. व्यासांची आहे.’’ वास्तविक व्यास हे तेव्हा जगन्नाथबुवांकडे तालीम घेत असत; पण आपण बंदिशी बांधतो हे काही त्यांनी बुवांना सांगितले नव्हते. तो जमानाही शिष्यांनी गुरूसमोर फुशारक्या मारण्याचा नव्हता. सी. आर. व्यास दर बुधवारी जगन्नाथबुवांकडे तालमीसाठी जात असत. तसे ते गेले तेव्हा बुवांनी बागेश्री राग सुरू केला आणि ‘ना डारो मोपे रंग’ ही चीजच गायला सुरुवात केली. व्यास गालातल्या गालात हसत होते. ही आपणच बांधलेली चीज आहे असे बुवांना सांगितल्यावर बुवा म्हणाले, ‘‘पण यात तुमचं नाव कुठे?’’ तोपर्यंत व्यास आपल्या रचनांमध्ये आपले ‘तखल्लूस’ (टोपणनाव) घालत नव्हते. त्यांना ‘गुणीजान’ हे टोपणनाव जगन्नाथबुवांनी दिले. इतरांच्या गुणांची कदर करणारा अथवा पारख असणारा तो गुणीजान अशी या नावामागची जगन्नाथबुवांची कल्पना होती. जगन्नाथबुवांना ‘गुणीदास’ हे नाव त्यांचे गुरू आग्रेवाले विलायत हुसेन खान खाँसाहेब यांनी दिले होते. व्यासांना ‘गुणीजान’ हे नाव देऊन बुवांनी ही परंपरा पुढे जात असल्याचे संकेत दिले.

यंदाचे वर्ष हे व्यासांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. कुमार गंधर्व, रामभाऊ मराठे या दिग्गज कलाकारांचे व्यास हे समकालीन आणि या सर्वाचे गुण जाणणारे गायक, रचनाकार, गुरू आणि आयोजक अशी चौफेर कामगिरी रागदारी संगीताच्या क्षेत्रात सुमारे चार दशके त्यांनी केली. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी, पद्मभूषण, हफीज अली खान स्मृती सन्मान असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण करणे उचित ठरणार आहे.

व्यासबुवा हे मूळचे मराठवाडय़ातले. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावचे. त्यांच्या घरात पहिल्यापासून आध्यात्मिक वातावरण असल्याने ते संस्कार त्यांच्यावर सहजच होत गेले. भगवद्गीता, भागवत यांचे अध्ययन, मनन आणि पठण करतच ते लहानाचे मोठे झाले. त्यांच्या बंदिशीवर या सर्वाचा प्रभाव पडणे अपरिहार्य होते. ‘देसी’ रागात त्यांनी कुब्जेच्या कहाणीवर ‘आरे आई’ ही रचना बांधली आहे. अशा अनेक रचना आहेत.

१९४२ साली ते मुंबईत आले. त्या काळात गिरगावातल्या मुगभाट भागात ‘ट्रिनिटी क्लब’ अत्यंत सक्रिय होता. मोठमोठे कलावंत तिथे गायनवादनासाठी ‘हाजरी’ देत असत. तिथे तरुण वयातल्या व्यासांनी ‘मुलतानी’ रागातला ख्याल ऐकवला. तो ऐकून नाफडेनामक ज्येष्ठ रसिक म्हणाले, ‘‘तू चांगला गायलास, पण तो ‘मुलतानी’ नसून ‘मुलतोडी’ होता. तू चांगल्या गुरूकडे शिकलास तर गाण्याला आकार आणि रूप लाभेल.’’ त्यांनी ग्वाल्हेर परंपरेतल्या राजारामबुवा पराडकरांकडून शिकण्याची प्रेरणा व्यासांना दिली. तसे त्यापूर्वी किराणा घराण्याच्या गोविन्दराव भातंब्रेकरांकडे व्यासांनी धडे गिरवले होते. आता ते ग्वाल्हेर घराण्याच्या विशाल महालात दाखल झाले होते. राजारामबुवांना ग्वाल्हेरच्या मिराशीबुवांची तसेच गायनाचार्य भातखंडेंची तालीम मिळाली होती. ते सर्व धन व्यासांसाठी खुले झाले आणि त्यांनी त्याचा कसून अभ्यास केला.

यशवंतबुवा मिराशी हे विष्णू दिगंबरांचे गुरुबंधू आणि महाराष्ट्रात ग्वाल्हेर गायकीची गंगा आणणाऱ्या बाळकृष्णबुवांचे थेट शिष्य. त्यांच्यापाशी पारंपरिक चिजांचा अक्षरश: खजिना होता. असे म्हणतात, नुसत्या ‘तोडी’ रागातले ३२ विलंबित ख्याल त्यांना अवगत होते. त्यांच्या शिष्यवर्गात द. वि. पलुस्कर, राम मराठे, यशवंतबुवा जोशी हे सर्व व्यासांचे सहाध्यायी होते. मिराशीबुवा मुंबईत आले की पराडकरांकडे किंवा व्यासांकडे राहत आणि त्यांच्याकडून व्यास विद्याग्रहण करत. रात्री ११ ते २ अशी त्यांची तालमीची वेळ असे.

गवयाला किंवा वादकाला रागाचा परिचय करून घ्यायचा असेल तर त्या रागातल्या अधिकाधिक रचना शिकून घ्यायला हव्यात, असा बुजुर्गाचा आग्रह असे आणि तो निखालस योग्य होता. अशा तऱ्हेने मिराशीबुवा आणि पराडकरबुवांकडून शेकडो रचना व्यास शिकले. ग्वाल्हेर परंपरेत अनवट म्हणून गणले गेलेले मालव, चंपक, खट वगैरे रागही त्यांनी आत्मसात केले. १९५५ मध्ये गिरगाव चौपाटीजवळच्या भारतीय विद्या भवनात त्यांनी अध्यापनाला सुरुवात केली. श्रीकृष्ण नारायण ऊर्फ अण्णासाहेब रातंजनकर यांच्या सहवासात ते आले. व्यासबुवा अण्णासाहेबांचा उल्लेख ‘प्रकांडपंडित’ असाच करत असत. चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे, एस. सी. आर. भट्ट आणि दिनकर कायकिणी यांच्याबरोबर व्यासांचे आदान-प्रदान चालत असे. आग्रा घराण्याचा संस्कार त्यातून मिळत गेला. रातंजनकरांबरोबर दीड महिने भारतभर प्रवासही केला. त्यातून पुष्कळ विद्याधन मिळाले, असे व्यास कृतज्ञतेने म्हणत.

असे विविध संस्कार आत्मसात केल्यामुळेच त्यांना स्वतंत्र रागांची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळाली. धनकोनी कल्याण, शिवअभगी, सुधरंजनी, अहिरावती इत्यादी रागांची निर्मिती त्यांनी केली. ‘‘कोणत्याही रागाचं मर्म उलगडून दाखविण्याची विलक्षण हातोटी व्यासबुवांपाशी होती,’’ असे त्यांच्या शिष्या आणि इंदोरच्या ज्येष्ठ गायिका शोभा चौधरी सांगतात. त्यांच्याकडे न शिकलेली शाश्वती मंडलसारखी गायिका ‘धनकोनी कल्याण’ आवर्जून गाते आणि त्यांच्या रचना अश्विनी भिडे, आरती अंकलीकर यांच्यासारख्या नामांकित गायिका गातात, हे महत्त्वाचे.

त्यांच्या शिष्यवर्गात प्रभाकर कारेकर, नीलाक्षी जुवेकर, निर्मला गोगटे, मंगला रानडे, लीली करंबेळकर, कुन्दा वेलिंग, अपर्णा केळकर, सुहास व्यास, श्रीपती हेगडे, श्रीपाद पराडकर, श्रीराम शिंत्रे, सतीश व्यास आणि संजीव चिम्मलगी असे प्रसिद्ध कलाकार आहेत. व्यासांनी एकदा जगन्नाथबुवांच्या आणि पराडकरबुवांच्या उपस्थितीत जगन्नाथबुवांचा ‘स्वानंदी’ हा राग गायला होता. त्या वेळी पराडकरबुवा जगन्नाथबुवांना म्हणाले, ‘‘माझ्या शिष्याचे तुम्ही कल्याण केलेत.’’ त्यावर जगन्नाथबुवा उत्तरले, ‘‘पाया तुम्ही भक्कम केलात, मी फक्त कळस चढवला.’’ गुणीदास संगीत संमेलनाची स्थापना करून व्यास परिवाराने अखिल भारतभर जगन्नाथबुवांचे नाव प्रसिद्धीस नेले. खुद्द व्यासांनी जगदीश प्रसादांसारख्या अत्यंत गुणी आणि रसिल्या गायकाला मंच उपलब्ध करून दिला ही केवढी गुणग्राहकता. आपल्या गायनाने व्यासांनी ‘स्वानंदी’सारख्या नव्या रागांना ‘रागत्व’ दिले, असे गिंडेसाहेब म्हणत असत. व्यासबुवा आणि गिंडेसाहेब दोघांनीही विशेषत: मुंबईची संगीतसंस्कृती समृद्ध केली. दोघांनीही कार्यरत असतानाच कलकत्त्यात अखरेचा श्वास घेतला हा विचित्र योगायोगच म्हणायचा.

  amardhan@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Musical culture commemorating the work of this artist who enriched the music culture of mumbai amy
Show comments