नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मराठी संगीताचा प्रवास वेगवेगळ्या संगीतकारांनी, गायकांनी आणि गीतकारांनी ज्या पद्धतीने घडवला त्याविषयी आपण आधीच्या लेखांमध्ये विस्तृतपणे वाचलं. परंतु सुगम संगीत आणि सिनेसंगीत यांचा जर विचार केला तर सांगीतिकदृष्टय़ा जरी थोडेफार नवीन प्रयोग मराठी संगीतामध्ये झाले असले तरीसुद्धा तांत्रिकदृष्टय़ा व साऊंडचा विचार करता मराठी संगीत हिंदी संगीताच्या मानाने बरेच मागासलेले राहिले आहे असे आपल्याला जाणवते. संगीत संयोजनाच्या बाबतीतसुद्धा तेच तेच रिदम पॅटर्न, त्याच त्या ठरावीक सुरावटी आणि लोकप्रियतेचे तेच ते घासून गुळगुळीत झालेले ठरावीक निकष वापरून नवीन गाणी तयार होत होती. अगदी विसाव्या शतकाच्या अखेपर्यंत त्यात फारसा बदल होत नव्हता. आनंद मोडक, भास्कर चंदावरकर आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी यात काही क्रांतिकारक बदल केले; परंतु तरीसुद्धा एका ठरावीक परिघामध्येच मराठी संगीत नांदत होते. आणि ते तसे असले तरच चांगले असते अथवा लोकप्रिय होते असा समज बऱ्याच संगीतकारांनी आणि निर्मात्यांनीसुद्धा करून घेतला होता. त्याच काळात हिंदी चित्रपट संगीतामध्ये अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, पंचमदा आणि ए. आर. रहमान अशी स्थित्यंतरे घडत गेली आणि एकूणच रसिकांच्या अंगवळणी हे बदल हळूहळू पडत गेले. त्यामुळे अनिल विश्वास ते ए. आर. रहमान हा प्रचंड बदल लोकांनी सहज स्वीकारला, कारण तो हळूहळू लोकांच्या पुढे आणला गेला. मराठीमध्ये मात्र हा बदल पहिले चाळीस-पन्नास वर्षे झालाच नाही. आणि एकदम तो रसिकांच्या पुढे उभा ठाकला एका संगीतकार जोडीच्या रूपाने.. अजय-अतुल! हा बदल स्वीकारायला कर्मठ मराठी रसिकांना पहिल्यांदा थोडेसे जड गेले असले तरी कालांतराने त्या संगीतातील नावीन्य, झिंग आणि एक निराळ्या प्रकारचा गोडवा रसिकांना आवडू लागला आणि कुणालाही मिळाली नाही एवढी लोकप्रियता या जोडगोळीला मिळाली. त्यामुळे  कितीही झालं तरी अजय-अतुल यांच्या आधीचे मराठी संगीत आणि त्यांच्या उदयानंतरचे मराठी संगीत असे दोन भाग निश्चित पडतात. अजय-अतुल यांच्या रूपाने पठडीबाज मराठी संगीताला एक नवे रूप आणि नवचैतन्य मिळाले, हे मान्यच करावे लागेल.

mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
legendary filmmaker shyam benegal
अग्रलेख: भारत भाष्य विधाता!
Why Hindu gods dance
हिंदू देवता नृत्य करतात तर इतर धर्मातील देव नृत्य करत नाहीत असे का?। देवदत्त पट्टनायक यांच्याबरोबर कला आणि संस्कृती
Avimukteshwaranand Saraswati Criticized mohan bhagwat
Avimukteshwaranand Saraswati : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भडकले शंकराचार्य, “सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप सुरु होता, आता…”
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Pankaj Tripathi
पंकज त्रिपाठी दशावतार लोककला कोकणातल्या ‘या’ गावी शिकले; अनुभव सांगत म्हणाले, “मुंबईत येण्याआधी नशिबाने…”

माझी आणि अजय-अतुल यांची ओळख साधारण ९५ सालातली. आम्ही दोघेही त्या वेळेला नवीन नवीनच या क्षेत्रात आलो होतो. सोलापुरातील एका अपरिचित अशा नवीन संगीतकाराच्या गाण्याच्या अल्बमचे रेकॉर्डिग. त्यातील काही गाण्यांचे संगीत संयोजन मी केले होते आणि काही गाण्यांचे अजय-अतुल यांनी. त्यावेळेसच माझ्या हे लक्षात आले की, यांची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. गाण्याच्या प्रवासातील पहिले स्टेशन हे माझ्या दृष्टीने ‘मेलडी’ हे होते. त्यानंतर ‘हार्मनी’ आणि मग ‘ताल’! अजय-अतुल यांच्याबाबतीत हा क्रम बरोबर उलटा होता. कुठल्याही गाण्याचा विचार हे त्याच्या तालसंयोजनापासून ते करीत असत. गाणे तयार करत असताना पहिल्यांदा त्याचा ताल धरला जायचा आणि त्या अनुषंगाने नंतर त्यातील हार्मनी आणि मेलडी यांचा विचार व्हायचा. त्यामुळे अजय-अतुल यांच्या सर्व गाण्यांना तालाचं एक भक्कम अधिष्ठान आहे असं आपल्याला दर वेळेस जाणवतं. कुठल्याही अर्थाने मेलडी आणि हार्मनी यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आहे असं मात्र अजिबात नव्हे. त्यालाही तेवढंच महत्त्व असे. परंतु त्यांचा नंबर मात्र नंतर येत असे, एवढंच! दोघंही तशा अर्थाने संगीत शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकलेले नव्हते. महाराष्ट्रात वडिलांच्या नोकरीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या बदल्या आणि त्यामुळे त्या- त्या ठिकाणचे ऐकू येणारे संगीत आणि मुळातच एक अत्यंत प्रखर संगीतबुद्धी आणि सतत काहीतरी वेगळं करण्याची उमेद यातून हे अजब रसायन तयार झालं होतं. ही त्यावेळी जाणवलेली एक छोटीसी वाऱ्याची झुळूक पुढे जाऊन एका वादळात रूपांतरित होईल याची स्पष्ट जाणीव आम्हा सर्व मित्रांना त्याचवेळी झाली होती.

कालांतराने अजय-अतुल मुंबईला स्थलांतरित झाले आणि अतिशय कष्टाने व जिद्दीने त्यांनी आपल्या संगीत कारकीर्दीचा पाया रचला. आमचे मित्र नंदू घाणेकर यांनी गदिमांच्या जुन्या गाजलेल्या गाण्यांना पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने चाली देऊन त्याचा ‘अगदि आज’ नावाचा एक अल्बम रेकॉर्ड केला होता. त्याचे संगीत संयोजनही अजय-अतुल यांनी केले होते आणि नंतर प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांच्याकडेसुद्धा त्यांनी संगीत संयोजनकार म्हणून अतिशय अप्रतिम अशी कामगिरी केली. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेचं शीर्षक संगीत ऐका. कुठलेही शब्द न वापरता केलेलं हे शीर्षक संगीत अतिशय परिणामकारक होतं आणि खूप वेगळं होतं. त्याचं बरंचसं श्रेय अजय-अतुल यांच्याकडे जातं. त्याच सुमारास त्यांनी ‘टाइम्स म्युझिक’ या म्युझिक कंपनीने निर्माण केलेल्या ‘विश्वविनायक’ या ध्वनिफितीचं संगीत दिग्दर्शन आणि संगीत संयोजन केलं. शंकर महादेवन आणि एस. पी. बालसुब्रमण्यम या दिग्गज गायकांनी गायलेल्या या ध्वनिफितीमुळे अजय-अतुल यांचं या क्षेत्रामध्ये पडलेलं पहिलंच पाऊल इतकं दमदार होतं, की त्यानंतर त्यांनी केवळ यश आणि यशच मिळवलं. सुरेश लालवाणी, रमाकांत पाटील यांच्यासारख्या दिग्गज वादकांनी या अल्बममध्ये हजेरी लावली आणि त्यांची वाहवा अजय-अतुल यांनी मिळवली. या सर्वच संस्कृत स्तोत्रांना जो अप्रतिम वाद्यमेळ लाभलेला आहे, तो अतिशय क्रांतिकारी आणि स्तिमित करणारा आहे. ट्रंपेट क्लॅरिनेटसारखी वाद्यं या गाण्यांमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याला ऐकू येतात, की या कल्पकतेचे कौतुक केल्यावाचून राहवत नाही. Strings चा वापर या अल्बममध्ये ज्या पद्धतीने झाला ती पद्धत नंतर अजय-अतुल यांची एक Signature च बनून गेली. आत्ता इतक्यात आलेल्या ‘सैराट’ या चित्रपटामध्येसुद्धा या पद्धतीने Strings वाजलेल्या आपण ऐकल्या. ‘विश्वविनायक’ या अल्बममुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश सुकर झाला, एवढे मात्र निश्चितपणे म्हणता येईल.

परंतु तरीसुद्धा ‘विश्वविनायक’चं स्वागत सुरुवातीला तसं थंडपणेच झालं. मी वर उल्लेखिलेल्या रसिकांच्या स्थितीवादी मानसिकतेमुळे (inertia) या अल्बमला सुरुवातीला प्रसिद्धी मिळाली नाही. ही कोंडी खऱ्या अर्थाने फुटली ‘अगं बाई अरेच्चा!’ या चित्रपटाने. यातील संगीताने चित्रपट संगीताच्या लोकप्रियतेचे त्यावेळचे सगळे मापदंड ओलांडले आणि अजय-अतुल यांच्याकडे मराठी रसिक अतिशय आदराच्या भावनेने बघू लागले. यातील ‘मल्हार वारी’ या शाहीर साबळे यांच्याबरोबर गायलेल्या गीतामुळे मराठी लोकसंगीताला एका वेगळ्या आणि त्याचवेळी पारंपरिक अशा वाद्यमेळाच्या कोंदणात अजय-अतुल यांनी बसवलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी स्वत:ची  ओळख निर्माण केली. याच मालिकेत पुढे ‘नदीच्या पल्याड’, ‘डॉल्बीवाल्या, बोलव माझ्या डीजेला’, ‘तुझ्या पिरतीचा इंचू मला चावला’, ‘माऊली माऊली’ आणि ‘कोंबडी पळाली तंगडी धरून’ अशा अनेक गाण्यांनी जन्म घेतला. मराठी लोकसंगीताला एक ग्लॅमर प्राप्त करून देण्याचं काम या गाण्यांनी निश्चितपणे केलं. परंतु मराठी लावणीसारख्या कलाप्रकाराला ‘पिंजरा’ आणि ‘एक होता विदूषक’ या चित्रपटांनंतर खऱ्या अर्थाने प्रचंड लोकप्रियता जर कुठल्या चित्रपटामुळे मिळाली असेल, तर त्यात ‘नटरंग’ या चित्रपटाचा उल्लेख करावाच लागेल. पारंपरिक बैठकीच्या लावणीपासून ते फडावरच्या लावणीपर्यंतचे ठेके आणि त्याला दिलेला  आधुनिक स्वरसाज या जोरावर या चित्रपटाच्या संगीताने एक अतिशय उंच असं स्थान प्राप्त केलं. ‘अप्सरा आली..’ या ओळीला म्हटलं तर पारंपरिक बैठकीच्या लावणीचा ठेका आहे, परंतु त्यात ढोलकीबरोबर हलगीसारख्या वाद्यांचा वापर केल्यामुळे त्याला एक अतिशय आगळे रूप प्राप्त झाले आहे. त्यात गाण्यात संतूरसारखं वाद्य वापरून जे काय अजब मिश्रण तयार झाले आहे त्याला खरोखरीच तोड नाही. ‘आता वाजले की बारा’ ही एकविसाव्या शतकातली सर्वोत्तम लावणी आहे याबद्दल कुठलीही शंका निदान मला तरी नाही. ‘खेळ मांडला..’ हे गाणंसुद्धा याच चित्रपटातलं. कोरस आणि strings चा वापर हे या गाण्याचं सर्वात प्रमुख वैशिष्टय़. एकूणच ‘नटरंग’ने मराठी संगीताला अनेक योजने पुढे नेलं याबद्दल कुणालाही शंका नसावी.

अजय-अतुल हे प्रसिद्ध दक्षिणात्य संगीतकार इलायाराजा यांचे अतिशय परमभक्त. त्यांच्या बऱ्याच गाण्यांमध्ये हा दक्षिणात्य प्रभाव प्रकर्षांनं जाणवतो. त्यांचं मराठी संगीत हे इतर मराठी संगीतापेक्षा वेगळं ठरण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. एकूणच अजय-अतुल यांचं संगीत मराठी लोकसंगीत, दाक्षिणात्य सिनेसंगीत आणि पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत या तीन पायांवर अतिशय देखणेपणाने उभं आहे. त्यांनी स्वरबद्ध केलेल्या रोमँटिक गाण्यांमध्ये त्यांच्यावरचा दक्षिणोत्तर प्रभाव अत्यंत ठळकपणे दिसतो. जसे की ‘जीव रंगला’ किंवा ‘मन उधाण वाऱ्याचे’ किंवा ‘सैराट’मधील ‘याड लागलं’ ही गाणी ऐकली की त्यांत कुठेतरी दाक्षिणात्य हळुवार गाण्यांची झलक आपल्याला दिसते. ‘सैराट’ या चित्रपटामुळे अजय-अतुल यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची कीर्ती मिळवली यात शंका नाही. त्या चित्रपटातील गाणी अत्यंत भव्य होती आणि अमेरिकेत जाऊन केलेल्या रेकॉर्डिगमुळे त्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती हे खरेच; परंतु सांगीतिकदृष्टय़ा बघायला गेलं तर त्या गाण्यांमध्ये तशा अर्थाने वेगळेपणा फार नव्हता, असं निदान माझं तरी मत आहे. ‘नटरंग’मध्ये किंवा ‘एकापेक्षा एक’सारख्या टीव्ही शोच्या शीर्षकगीतामध्ये अजय-अतुल यांच्यातील जिनियस संगीतकार दिसतो तेवढा तो मला ‘सैराट’मध्ये दिसला नाही. ‘सैराट’मध्ये त्यांच्या आधीच्याच बऱ्याच कामांचे प्रतिबिंब परत एकदा दिसतं. जुनाच यशस्वी फॉम्र्युला परत एकदा वापरण्याची सावध भूमिका मला त्यात जाणवते. अपवाद फक्त ‘आताच बया’ या गाण्याचा. आणि यात काही वावगे आहे किंवा चूक आहे असं मला वाटत नाही. असा कोणताही संगीतकार मी बघितलेला नाही, की ज्यांनी कायम स्वत:च्या कामांना छेद देणारंच काम सतत केलं आहे. त्यामुळे अजय-अतुल याला अपवाद असण्याचं काहीही कारण नाही. ‘सैराट’मुळे अजय-अतुलला प्रचंड यश मिळालं हे खरं असलं तरीसुद्धा ‘सैराट’ हे अजय-अतुल यांचं सर्वोत्तम काम आहे का, याविषयी माझ्या मनात शंका आहे.

या सगळ्यांमध्ये अत्यंत ठळकपणे दिसणारी एक गोष्ट म्हणजे अजय गोगावले नावाचा गायक. गाण्याच्या अंतरंगात घुसून, पूर्णपणे समर्पित होऊन आणि अत्यंत समजून गाणारा या दर्जाचा दुसरा गायक आज मराठीमध्ये आहे असं मला वाटत नाही. ‘देऊळ बंद’ या प्रसिद्ध चित्रपटातील ‘देवाविना माणसाची जिंदगानी एकटी’ या गाण्याकरिता मी अजयच्या आवाजाचा वापर केला होता तेव्हा मी हा जिवंत अनुभव घेतलेला आहे. गायक हा संगीतकाराच्या भूमिकेत शिरून आणि जवळपास परकायाप्रवेश करून जेव्हा गाणं सादर करतो आणि त्याला अजयसारख्या अफाट सांगीतिक बुद्धिमत्तेची जोड मिळते तेव्हा काय जादू घडते हे मी इथे कितीही रकाने भरून लिहिलं तरीही विशद करून सांगता येणार नाही. ती ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्याचीच गोष्ट आहे. स्वत:ची गाणी अजय गातो तेव्हा ही किमया घडतेच; परंतु इतरांची गाणी गातानासुद्धा जे संगीतकाराच्या मनातलं गाणं आहे ते ओळखून आणि त्याला काही पटींनी वृद्धिंगत करून जो परिणाम अजय आपल्यासमोर सादर करतो, तेवढी क्षमता असलेले आज भारतात फार गायक शिल्लक आहेत असं मला वाटत नाही.

कधी कधी अजय-अतुल यांच्या गाण्यांत तोच तोचपणा जाणवतो हे खरं आहे. परंतु लोकांना वाटतं त्याप्रमाणे हा दरवेळेस संगीतकाराचाच दोष असतो असं नाही. बऱ्याचदा निर्मात्यांचा तसा हट्ट असतो किंवा चित्रपटाच्या विषयांचं बंधन असतं. आणि बऱ्याच वेळा कामाच्या व्यग्रतेमुळे आणि डेडलाइन्समुळेही या गोष्टी घडतात. व्यावसायिक गणितं सांभाळून आपली कला कायम ऊर्जितावस्थेत ठेवणं ही सोपी गोष्ट नव्हे. अजय-अतुल यांनी ही किमया अत्यंत यशस्वीपणे आत्तापर्यंत साधली आहे हे तर उघडच आहे. त्यामुळे अशा प्रकारची कुठली स्थिरता आलीच असेल तरी ती तात्पुरती असणार यात काही शंका नाही. आणि पुढच्या कामात आपल्याला एक वेगळेच अजय-अतुल दिसतील याची खात्री आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी शतक बदललं आणि विसाव्या शतकात काही अपवाद वगळता एका ठरावीक पद्धतीने लोकांसमोर येणारं मराठी संगीत हेसुद्धा शतकाबरोबर बदललं, ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्यासारख्या रसिकांच्या नशिबी हा सुंदर योग लिहिलेला होता. आणि याचं सर्वाधिक श्रेय कुणाला द्यायचं असेल तर निदान मराठीपुरतं तरी ते अजय-अतुल यांनाच द्यावं लागेल. त्यांच्या पुढील वाटचालीत आपल्याला अजून नवनवीन प्रयोग आणि नवनवीन कीर्तिमान स्थापित झालेले दिसतील याविषयी कुणाच्याही मनात संदेह असण्याचं कारण नाही.

Story img Loader