रमाकांत परांजपे
प्रख्यात व्हायोलिनवादक, संगीत संयोजक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांचे व्हायोलिनवादन म्हणजे जणू गारुडय़ाचा खेळ असे. गीताशी समांतर व्हायोलिनवादन करणं ही उच्चकोटीची कला आहे. ती त्यांना साध्य झाली होती. म्हणूनच ते ‘गाणारं व्हायोलिन’ हा आगळा कार्यक्रम सादर करू शकले. त्यांच्या जाण्याने एका श्रेष्ठ कलाकाराला संगीतदुनिया पारखी झाली आहे..
मी शाळकरी विद्यार्थी असताना प्रभाकर जोग यांचे व्हायोलिनवादन ऐकले होते. पुण्यात नूमवि प्रशालेच्या प्रांगणामध्ये ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांचा ‘गीतरामायण’चा कार्यक्रम झाला होता, तेव्हा प्रभाकर जोगजी व्हायोलिनच्या साथीला होते. त्यांचे व्हायोलिनवादन ऐकून मी अतिशय प्रभावित झालो होतो. मी सातवी-आठवीमध्ये असेन. त्यावेळी मी व्हायोलिन शिकत नव्हतो. मी प्रेक्षकांमध्ये खूप लांब बसून हा कार्यक्रम ऐकला होता. पण जोगसाहेबांच्या व्हायोलिनचे सूर ऐकल्यानंतर हे काहीतरी अद्भुत आहे हे जाणवले होते.
पुढे ‘गीतरामायण’चा सुवर्णमहोत्सव न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर झाला होता. त्या काळात जोग यांच्याशी अधिक परिचय झाला. ‘गीतरामायण’च्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमामध्ये मी व्हायोलिनवादनासाठी होतो आणि जोग संगीत संयोजक होते. त्यावेळी ते गायक आणि वादकांची तालीम घेऊन ‘गीतरामायणा’तील गाणी बसवून घेत होते. या सुवर्णमहोत्सवासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी उपस्थित होते. मुंबईला मी चित्रपटसृष्टीमध्ये व्हायोलिनवादन करण्यासाठी गेलो त्याही काळात जोग यांच्याशी संबंध आला. मुंबईत चित्रपटसृष्टीत वादक कलाकारांची सिने म्युझिशियन असोसिएशन (सीएमए) ही संघटना आहे. त्या संघटनेचे प्रभाकर जोग बरीच वर्षे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्याशी गाठीभेटी होत असत. पुण्यात जोग वास्तव्यास आले तेव्हा त्यांच्या दोन-तीन ध्वनिमुद्रणामध्ये मी व्हायोलिनवादन केले. ते संगीतकार आणि मी व्हायोलिनवादक असे आमचे नाते होते.
प्रभाकर जोग यांचे आणि माझे गोत्र एकच आणि ते म्हणजे व्हायोलिन! जोग यांचे स्वरलेखन (नोटेशन) वाचन एकदम पक्के होते; जे सुगम संगीतासाठी आवश्यक असते. माझासुद्धा नोटेशनचा अभ्यास चांगला असल्याने त्यांच्याशी गट्टी जमली. स्वरज्ञान चांगले असल्याने ते नोटेशन पटकन् लिहून घेत असत. व्हायोलिन हा विषय असला तरी त्यामध्ये गीत- वादक म्हणजेच ‘साँग व्हायोलिनिस्ट’ हा समान धागा होता. ही व्हायोलिनवादनाची शेवटची पायरी समजली जाते. गायकांना त्या स्वरसंगीताचा उपयोग होत असतो. गीतातील प्रत्येक बारकावा तंतोतंत वाजवता येणारे व्हायोलिनवादक म्हणून जोग यांचा दबदबा होता. कोणत्याही गीताच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी वाद्यमेळ्यामध्ये ४० ते ५० व्हायोलिनवादक असले तरी साँग व्हायोलिनिस्ट एकच असतो. अन्य व्हायोलिनवादक संगीताचे तुकडे (ग्रुप म्युझिक पिसेस) वाजवत असतात; पण साँग व्हायोलिनिस्ट हा गायकाच्या स्वरांच्या बरोबरीने वादन करत असतो. गायकाच्या बरोबरीने हुबेहूब सुरेल वाजवणे आवश्यक असते. असे साँग व्हायोलिन वाजवणारे कमी लोक असतात. जोगसाहेब उच्च श्रेणीचे साँग व्हायोलिनिस्ट होते. मलाही ‘सीएम’ची अ श्रेणी होती; म्हणजे अजूनही आहे. त्यामुळे आमचे छान सूर जुळले. माझा मुलगा केदार हा सिंथेसायझरवादक आहे. जोगसाहेबांचा ‘गाणारं व्हायोलिन’ हा स्वतंत्र कार्यक्रम होत असे. केदारने अनेक कार्यक्रमांमध्ये जोगसाहेबांच्या व्हायोलिनवादनाला साथ केली आहे. त्यांच्या अनेक सीडी प्रकाशित झाल्या आहेत. त्यातही केदार याने त्यांना साथसंगत केली असून, संगीत संयोजनही केले आहे.
ध्वनिमुद्रण होताना बऱ्याचदा जोग यांच्याशी माझा संबंध येत असे. मी नोटेशन पटापट लिहून घेत गीताची चाल किंवा संगीताचे तुकडे लवकर आत्मसात करीत असल्याने त्यांना माझे व्हायोलिनवादन आवडायचे. जोगसाहेबांशी माझा वैयक्तिक असा जास्त संबंध आला नाही. जो काही आला तो कार्यक्रमांच्या आणि ध्वनिमुद्रणाच्या निमित्तानेच. मी व्हायोलिनवादन शिकत असताना माझ्या डोळ्यासमोर जे आदर्श होते त्यामध्ये जोगसाहेबांचे स्थान अग्रभागी होते. सुगम संगीतामध्ये ते आदर्श होते. त्यांच्या हातामध्ये अतिशय गोडवा होता आणि ते अत्यंत सुरेल वादन करीत असत.
‘प्रभाकर जोग हे आपल्या व्हायोलिनमधून स्वरच नाही तर व्यंजनेही वाजवतात,’ असे गौरवोद्गार जोग यांच्या व्हायोलिनवादनाची प्रशंसा करताना पु. ल. देशपांडे यांनी काढले होते. रसिकाग्रणी रामूभय्या दाते (ज्येष्ठ भावगीतगायक अरुण दाते यांचे वडील) यांनीही जोग यांच्या वादनाचे कौतुक केले होते. गाण्यातील अक्षरे जणू व्हायोलिनमधून उमटतात असे त्यांचे वादन होते.
पुणे विद्यार्थीगृह संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालयामध्ये मी शिक्षक म्हणून कार्यरत होतो. ध्वनिमुद्रण असेल तेव्हाच मी मुंबईला जात असे. कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्यामुळे मला नोकरी करावी लागली. सतत रजा काढून मुंबईला जाणे मला शक्य झाले नाही. त्यामुळे नोकरीचा व्याप सांभाळून मला जमेल तेवढे काम मी करीत असे.
जोगसाहेब यांच्यासमवेत मी जास्त वादन केले नाही याचे कारण म्हणजे आमचे वाद्य एकच! आम्ही दोघेही साँग व्हायोलिनिस्ट. कोणत्याही गाण्याच्या ध्वनिमुद्रणामध्ये साँग व्हायोलिनिस्ट एकच असतो. त्यामुळे आमच्यापैकी एकालाच ती संधी मिळायची. मी मुंबईला जाऊ लागलो तोपर्यंत जोगसाहेब यांनी काम करणे थांबवले होते. जवळपास ते निवृत्त होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे त्यांच्याशी कामानिमित्तानेही जास्त संबंध आला नाही. श्रीधर फडके, राम कदम, यशवंत देव, श्रीनिवास खळे अशा अनेक संगीतकारांबरोबर मी व्हायोलिनवादन केले. मात्र, जोग संगीतकार होते त्या काळात मला त्यांच्यासमवेत काम करता आले नाही, ही रुखरुख लागून राहिली आहे.
व्हायोलिनवादक, संगीत संयोजक आणि संगीतकार अशी जोग यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध रूपे असली तरी मला स्वत:ला ते संगीतकार म्हणून मोठे वाटतात. त्यांनी स्वरबद्ध केलेली गीते मला आवडतात. बाबूजींच्या स्वरातील ‘स्वर आले दुरूनी’ आणि ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’ ही गाणी जोग यांच्या संगीतरचनेतील उत्तुंग प्रतिभेची लेणी आहेत. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ हे मालती पांडे-बर्वे यांच्या स्वरांतील भावगीत तर चाफ्यांच्या फुलासारखे टवटवीत आहे. अगदी दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ चित्रपटातील ‘हिल हिल हिल पोरी हिला.. तुझ्या कप्पालीला टिला’ हे गीत जोग यांच्या संगीतामुळे अफाट लोकप्रिय झाले. त्यांच्या ‘शुभंकरोती म्हणा मुलांनो..’ या गीताला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाने चार चाँद लागले आहेत. ‘गीतरामायण’च्या निर्माणामध्ये जोग यांचे मोलाचे योगदान होते. त्यात व्हायोलिनवादक आणि संगीत संयोजक या दोन्ही भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. बाबूजींची असंख्य गीते लोकप्रिय होण्यामध्ये प्रभाकर जोग आणि श्यामराव कांबळे या संगीत संयोजकांचा मोठा वाटा होता.
माझा भाऊ श्यामकांत परांजपे याने जोगसाहेबांसमवेत भरपूर काम केले आहे. गिटार आणि सिंथेसायझर ही वाद्ये वाजविणारा श्यामकांत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. त्याचे वाद्य वेगळे असल्याकारणाने त्याला जोगसाहेबांचा प्रदीर्घ सहवास लाभला. मुळात मी मितभाषी स्वभावाचा. जोगसाहेब आणि मी- आमच्या वयामध्ये अंतर मोठे होते. एक तर ते मला ज्येष्ठ आणि त्यात त्यांचा दबदबा यामुळे त्यांच्याशी गप्पा मारण्याचा प्रसंग कधी आला नाही. रंगीत तालीम किंवा ध्वनिमुद्रणाला गेल्यानंतर लगेच काम सुरूच होत असे. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा संबंध फारसा येत नसे.
शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी