अलीकडेच हिंदी सिनेमाचे एक निर्माते भेटले. निराश वाटले. म्हणाले, आता पडद्यावर दारू चालत नाही, सिगरेट चालत नाही, बलात्कार नाही, सेक्स नाही. हे सगळं नसेल तर वाईट माणूस दाखवायचा तरी कसा, असा प्रश्न त्यांना पडला होता. मी त्यांना धीर देण्यासाठी ‘वाईट माणूस हवाच कशाला?,’ असं काहीतरी म्हणालो. ते म्हणाले, ‘फक्त चांगल्यांचा सिनेमा होत नाही. चांगला माणूस पिणार नाही. बलात्कार करणार नाही. कॅब्रे बघणार नाही, की कुणाचा गळा चिरणार नाही. अशा फालतू माणसांचं कंटाळवाणं आयुष्य बघायला कोण पैसा वाया घालवेल? वाईट माणसांमुळेच टैमपास होतो. सिनेमा चालतो.’ हे ऐकल्यावर उद्या सगळेच चांगले झाले तर जग कंटाळवाणं होईल, या विचाराने मला घाबरायला झालं.
बा हेर नव्या वर्षांच्या स्वागताची गडबड सुरू झाली आहे. म्हणजे हे वर्ष संपत आलं की काय? काल- परवाच तर आपण सगळे एकतीस डिसेंबरला एकत्र बसलो होतो. खऱ्या-खोटय़ा गप्पा मारल्या होत्या. थोडय़ा कुचाळक्याही केल्या होत्या. डोळ्यातून पाणीही आलं होतं. ते अश्रू नाहीत असं आपण स्वत:ला समजावलं होतं. नाचता येत नसताना नाचलो होतो. गाता येत नसताना गायलोही होतो. खूपच गंमत केली होती. रात्री बारा वाजता एकमेकांना प्रेमाने मिठय़ाही मारल्या होत्या. वर्ष उत्तम जाईल अशी खात्री झाल्यावरच आपण पार्टीतून उठलो होतो. रात्री रस्त्यात कोण कुठली बिनओळखीची माणसंही हरवलेला भाऊ भेटावा तशी भेटली होती. आपण त्यांना मनापासून ‘वर्ष आनंदाचं, सुखाचं जावो,’ असं म्हणालो होतो. त्यांनी ‘आनंदात राहीन’ अशी मान डोलावल्यावर आपल्याला बरं वाटलं होतं. आतून भरून आल्यासारखं झालं होतं. असो!
आता उद्या रात्री बारानंतर पुन्हा एक नवीन वर्ष सुरू होणार आहे. रस्त्यावर धांदल सुरू झाली आहे.
मी वर्षभर लिहितो आहे. आपल्याशी गप्पा मारतो आहे. विषयाचा प्रॉब्लेम झाला नाही. आपल्याकडे विषयांचा प्रॉब्लेम नसतो. राजकारणी, बुवा, बाबा, साहित्यिक, विद्वान सगळेच विषय पुरवत असतात. शिवाय गप्पांना विषय करून कुठेही पोहचता येतं. टैमपास करता येतो.
परवा रस्त्याने चाललो होतो. भररस्त्यात दोघे आकाशाकडे बघत उभे होते. ते वेडसर नाहीत अशी खात्री झाल्यावर मीही त्यांच्या मागे उभा राहिलो. ते काय बघताहेत त्याचा अंदाज येईना. ते समोरच्या टॉवरकडे बघत असावेत असं वाटून मीही टॉवर न्याहाळू लागलो. मूळचे दोघे गेले. पण बघता बघता मागे पन्नास नवीन गोळा झाले. चौकशी सुरू झाली. तेराव्या मजल्यावरून बाईने उडी मारली अशी बातमी कळली. न बघितलेल्या बाईसाठी लोक हळहळू लागले. हळहळल्यामुळे त्यांना बरं वाटू लागलं. काही भडकले. संतापाने थरथरू लागले. थरथरल्यामुळे त्यांना बरं वाटू लागलं. काही अस्वस्थ झाले. विचार करता करता स्वत:चं कपाळ बडवू लागले. कपाळ बडवल्यामुळे त्यांना फ्रेश वाटू लागलं. असं सर्वाना बरं वाटल्यावर उडीची चर्चा सुरू झाली. माणसं उडीची कारणं शोधू लागली.
काहींनी बायकोचा छळ करणाऱ्या नवऱ्याच्या भयंकर गोष्टी सांगितल्या. तर काहींनी ‘बाईचं पाऊल वाकडं पडलं आणि बाई घसरल्या..’ अशी मनोरंजक गोष्ट रचून ऐकवली. टॉवरसमोरच हवेशीर फुटपाथवर राहणाऱ्या एका माणसाने- ‘माणूस जमीन सोडून आकाशाच्या जवळ गेला की दु:खी होतो,’ अशी थिअरी मांडली. काहीजण- ‘वर पोकळी असते.. पोकळी माणसाला गिळते,’ असं म्हणू लागले. गरीब वाटणाऱ्या एकाने तर- ‘वर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे श्रीमंत वर घुसमटतात आणि खाली उडय़ा मारतात,’ असा मुद्दा मांडला. सर्वाच्या गोष्टी खऱ्या होत्या. बाई पडल्या की नाही, हे महत्त्वाचं नाही. सर्वाचा टैमपास झाला. वेळ मजेत गेला. सर्वाना आनंद झाला, हे महत्त्वाचं!
अलीकडेच हिंदी सिनेमाचे एक निर्माते भेटले. निराश वाटले. ‘सिनेमातली गंमत आता संपली. गोष्ट रचण्यावर बंधनं आल्यामुळे धंद्याची पुरी वाट लागली,’ म्हणाले. आता पडद्यावर दारू चालत नाही, सिगरेट चालत नाही, बलात्कार नाही, सेक्स नाही. हे सगळं नसेल तर वाईट माणूस दाखवायचा तरी कसा, असा प्रश्न त्यांना पडला होता. मी त्यांना धीर देण्यासाठी ‘वाईट माणूस हवाच कशाला?,’ असं काहीतरी म्हणालो. ते म्हणाले, ‘फक्त चांगल्यांचा सिनेमा होत नाही. चांगला माणूस पिणार नाही. बलात्कार करणार नाही. कॅब्रे बघणार नाही, की कुणाचा गळा चिरणार नाही. अशा फालतू माणसांचं कंटाळवाणं आयुष्य बघायला कोण पैसा वाया घालवेल? वाईट माणसांमुळेच टैमपास होतो. सिनेमा चालतो.’ हे ऐकल्यावर उद्या सगळेच चांगले झाले तर जग कंटाळवाणं होईल, या विचाराने घाबरायला झालं. ‘आपल्या व इतरांच्या टैमपाससाठी थोडं वाईट वागायची सवय लावून घ्यावी काय?,’ असे विचार मनात येऊ लागले आहेत. असो!   
मध्यंतरी नॉर्वेत एक घटना घडली. तिथे भारतीय नवरा-बायको आपल्या मुलाबरोबर सुखाने राहत होते. भारतीयांना फुकट टैमपास आणि फुकटातलं सुख हवं असतं. परदेशात त्यांचे वांधे होतात. काय करावं, कळत नाही. तर नॉर्वेतले आई-वडील फुकटचा टैमपास म्हणून आपल्या लाडक्या मुलाला सकाळ-संध्याकाळ बडवत. बडवाबडवीमुळे धम्माल मनोरंजन होत असे. आई-वडलांचा आनंद बघून मुलालाही धन्य वाटत असे. भारतीयांचा ‘छोटय़ांना तुडवणे’ हा सर्वात आवडता टैमपास आहे.
शाळेत नोकरीला कंटाळलेले मास्तर मुलांना बडवतात. ‘बडवणाऱ्या मास्तराचे पाय धरणाऱ्या मुलांना ज्ञान व पुण्य लाभते,’ असं शिकवल्यामुळे मुलं निमुटपणे ते सोसतात. नवरे बायकांना बडवतात. बायका ‘हाच नवरा जन्मोजन्मी लाभावा,’ म्हणून प्रार्थना करतात. छळ म्हणजे प्रेम. छळ करवून घेण्यातच खरं सुख आहे, असे संस्कार झाल्यामुळे आपण सतत छळ करणाऱ्यांच्या शोधात असतो. असो!
तर नॉर्वेतल्या प्रेमळ भारतीय आई-वडलांना तिथल्या सरकारने मुलाचा छळ केला म्हणून तुरुंगात डांबलं. इथले अनेकजण हळहळले. ‘श्रेष्ठ भारतीय प्रेम जगाला कळू शकणार नाही,’ म्हणाले.
परवा अमेरिकेत एका मुलाने २७ जणांना ठार केलं. त्या मुलाच्या प्रेमळ आईची गोष्ट आता समोर आली आहे. आईने आपल्या मुलाचा टैमपास व्हावा म्हणून मुलाला खूप खेळणी आणून दिली. खोटय़ा बंदुका आणून दिल्या. टीव्हीवरचे रक्त उसळायला लावणारे हिंसक कार्यक्रम दाखवले. मुलाचा टैमपास होईना. आईचं मन द्रवलं. आईने मुलाला खऱ्या बंदुका आणून दिल्या. बंदूक चालवायला शिकवली. नेम चुकणार नाही असं जबरदस्त ट्रेनिंग दिलं.
आई कामानिमित्त सतत बाहेर असायची. मुलाला एकटय़ाला भीती वाटू नये म्हणून घरात खूप बंदुका होत्या. मुलाला आई जवळ हवी होती. बंदुकीला आईची जागा घेता आली नाही. एकटय़ा मुलाच्या मनातलं भयही घालवता आलं नाही. नुसत्या बंदुकीकडे बघून टैमपास होत नाही. त्यासाठी चाप ओढावा लागतो. कुणीतरी मरावं लागतं. मुलाने आईसकट २७ लहान-मोठय़ांना संपवून टाकलं.
अमेरिका हा शस्त्र विकून श्रीमंत झालेला देश आहे. अमेरिकेने आपला दारूगोळा खपावा म्हणून युद्धं घडवून आणली. जगाचा टैमपास व्हावा म्हणून धक्का बसतील असे अद्भुत युद्धाचे खेळ टीव्हीवरून दाखवले. आता टैमपास करणाऱ्यांवरच टैमपास उलटला आहे. अमेरिकेतली मुलं म्हणे घाबरून गेली आहेत. मुलं शाळेत जाताना बंदुका लपवून घेऊन जातात. सतत चाप ओढायच्या तयारीत असतात. अमेरिका डिप्रेशनमध्ये गेली आहे. माणसाचा माणसावर विश्वास राहिला नाही अशी अवस्था झाली आहे. माणसं सैरभैर झाली आहेत. अशा सैरभैर माणसांना बरं वाटावं, त्यांच्यावर कुणीतरी प्रेम करावं म्हणून खास माणसांवर प्रेम करायला शिकवलेल्या कुत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. माणसं त्यांच्याकडून प्रेम करवून घेतात.
आपल्याकडे परवा दिल्लीत चालत्या बसमध्ये चौघा-पाचजणांनी एका मुलीवर बलात्कार केला. आपल्या माणूस घडवण्याच्या सिलॅबसमध्ये काही गडबड झाली आहे का? कुत्र्यांना माणुसकी, प्रेम शिकवता येतं, तर मग माणसांना का नाही? आपल्या शाळा-कॉलेजात कुत्र्यांचा सिलॅबस शिकवल्यामुळे काही फरक पडू शकेल का? असो!
परदेशातल्या एका बाईचा किस्सा ऐकला. बाई वेगाने गाडी चालवत घराकडे निघाल्या होत्या. रस्त्यात अपघात झाला. बाईने कुणालातरी धडक दिली. तिथे अपघात झाल्यावर थांबावं लागतं. पळून जाता येत नाही. पण बाई थांबल्या नाहीत. पोलीस बाईंच्या घरी पोहोचले. ‘थांबला का नाही?,’ विचारल्यावर बाई म्हणाल्या, ‘मी मुलासाठी आइस्क्रीम घेऊन निघाले होते. थांबले असते तर आइस्क्रीम वितळलं असतं.’ बाई आनंद वितळेल म्हणून घाबरल्या. आपण सगळेच घाबरतो. फालतू आनंद फ्रिजमध्ये ठेवायला धावतो. थांबून कुणाला मदत करण्यात मोठा आनंद असतो, हे आपल्याला कळत नाही. आपल्याला थिल्लर आनंदातच गंमत वाटते.
परवा नाटकाला गेलो होतो. टैमपास झालाच पाहिजे, म्हणणारे काही रसिक नाटकाला जमले होते. ‘केळ्याच्या सालीवरून केळं  घसरत नाही, घसरतो तो माणूस!’ किंवा ‘ढगाने आकार बदलला म्हणून पाऊस पडत नाही..’छाप वाक्यांमध्ये जीवनाचा फार मोठा अर्थ आहे असं समजून प्रेक्षक टाळ्या पिटत होते. ‘कबाब में चड्डी’सारख्या विनोदांना पोट धरून हसत होते. नाटकात कुणी बाईची छेड काढतो म्हटल्यावर शिट्टय़ा वाजवत होते. कुणावर दु:खाचा डोंगर कोसळला तरी त्यांचं हसणं थांबत नव्हतं.
नाटकाने टैमपास होत नाही म्हणून एका थोर समाजसेविकेच्या भाषणाला गेलो. बाई त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या खऱ्या-खोटय़ा गोष्टी मिटक्या मारत ऐकवीत होत्या. स्वत:चा व इतरांचा टैमपास व्हावा म्हणून दु:ख रंगवीत होत्या.
आता थिल्लर, चिल्लर गोष्टींशिवाय टैमपास होतच नाही. काहीतरी उत्तेजित करणारं सणसणीत हवं असं वाटत राहतं. फक्त गरमागरम वडय़ाने भागत नाही. सोबत लवंगी मिरची हवीच असं वाटायला लागतं. पूर्वी क्रिकेटच्या खेळात फलंदाजाने एखादी सिक्सर ठोकली की आनंद व्हायचा. आता सिक्सरसोबत अर्धनग्न तरुणी नाचल्याशिवाय आनंद होत नाही. आता कुणी थोर मेला तरी काही वाटत नाही. पण हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्या किंवा तोफा डागल्या, की डोळ्यांतून पाणी यायला लागतं.
परवा स्टेशनवर उभा होतो. गर्दी होती. सगळ्यांच्याच टैमपासचे वांधे झाले होते. एवढय़ात अनाऊन्समेंट सुरू झाली. एक बाई ‘कांजूरमार्ग स्टेशनवर गाडी थांबणार नाही..’ अशी घोषणा सेक्सी आवाजात करीत होत्या. कंटाळलेले उत्तेजित झाले. मलादेखील एखाद् दिवशी कांजूरमार्गला जाऊन यावं असं वाटू लागलं.
सतत उत्तेजित करणारा टैमपास कुठे शोधावा?
काहीजण तर आता ‘आमच्या डोळ्यासमोर उघडय़ावर सर्वाना फाशी द्या,’ असं म्हणू लागले आहेत. तर त्यापेक्षा भारी टैमपासच्या शोधात असणारे काहीजण ‘आम्हीच सर्वाना फासावर लटकवतो,’ असं म्हणू लागले आहेत. असो!
शेवटी काही सटरफटर गोष्टी..
आपला फाळणीचा इतिहास माहीत नसलेलं एक माकड म्हणे बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात शिरलं. पाकिस्तान्यांना माकडाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी माकडाला तुरुंगात डांबला. चौकशी सुरू आहे. पुढे पाकिस्तानातून काही कबुतरं उडत भारतात आली. त्यांचं घुमणं संशयास्पद वाटलं म्हणून त्यांना इथे तुरुंगात डांबलं गेलं आहे. त्यांचीही चौकशी सुरू आहे. ढग इकडून तिकडे जातात. त्यांची चौकशी कशी करत असतील, कळत नाही. सर्वत्र संशय बळावला आहे. पूर्वी कावळा खिडकीत आला किंवा चिमण्या घरात घुसल्या की आनंद व्हायचा. टैमपास व्हायचा. आता भीती वाटू लागली आहे.
मी वर्षभर तुमच्याशी सटरफटर गप्पा मारल्या. तुम्हाला त्या आवडल्या. आता माझ्या विद्यार्थिनीने तिच्या शाळेत घडलेला एक किस्सा ऐकवला, तो सांगून मी थांबतो.
ख्रिसमसला तिच्या शाळेत कार्यक्रम असे. दरवर्षी एक मास्तर सांताक्लॉजचं सोंग काढून फिरायचा. मास्तर दुष्ट होता. मुलांना तो मास्तर अजिबात आवडायचा नाही. मास्तरला वाटायचं, प्रेमळ सांताक्लॉजच्या आड दडलेल्या आपल्याला कुणी ओळखणार नाही. पण काही मुलांनी ओळखलेलं असायचं. मुलांना वाटायचं-त्या सांताक्लॉजला खऱ्या नावाने हाक मारावी. पण आपण हाक मारली, त्याचं ढोंग उघडं पाडलं तर मास्तर बडवेल, या भयानं मुलं गप्प राहायची.
मी वर्षभर अशा अनेक सांताक्लॉजांना त्यांच्या खऱ्या नावाने हाक मारायचा प्रयत्न केला. माझा टैमपास झाला. तुमचाही झाला असेल. असो!
शेवटी- आपलं नवीन वर्ष हसण्या-हसवण्यात सरो. आपला चांगला टैमपास होवो. थिल्लरापल्याडचा आनंद आपल्याला लाभो, अशा शुभेच्छा देऊन मी थांबतो.
चिअर्स! (समाप्त)

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maheep Kapoor gatecrashed Sanjay Kapoor party
‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”