मराठी वाङ्मय व्यवहारातील ताज्या घडामोडी, स्थित्यंतरे, नवे-जुने लेखक, वाचक आणि समीक्षक यांच्यातील दुवा असलेले ‘ललित’ मासिक जानेवारीपासून सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने प्रारंभापासून त्याच्याशी जोडले गेलेले चित्रकार वसंत सरवटे यांनी ‘ललित’च्या वाटचालीचा घेतलेला मागोवा.
‘ललित’ मासिक या महिन्याअखेरीस ४९ र्वष पुरी करून येत्या जानेवारीपासून सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरं करणार आहे. या गोष्टीचा मला साहजिकच आनंद होत आहे. त्याच्या जन्मापासूनच्या वाटचालीमध्ये ‘ग्रंथप्रेमी’ नावाच्या त्याच्या साहाय्यक मंडळाचा मी सदस्य आहे. त्यावेळच्या ‘ललित’च्या भविष्याच्या आमच्या अपेक्षा आज आठवल्या की आमच्या आनंदाला अनपेक्षिततेचं एक परिमाण आहे, तेही मनाशी येतं आणि केवळ ग्रंथलेखन, ग्रंथप्रकाशन, ग्रंथसंग्रह या विषयांनाच पूर्णपणे वाहिलेले मासिक आणि कथा, कविता, विनोद (आणि व्यंगचित्रे) इ. मनोरंजनावर आधारित मासिकांच्या आयुर्मर्यादा समोर आल्या की ‘ललित’बद्दलच्या आनंदाला जोडून आलेलं नवलमिश्रित कौतुकही स्पष्ट दिसतं.
केशवराव कोठावळे यांच्या मॅजेस्टिक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांच्याकडे जयवंत दळवी, रमेश मंत्री, शं. ना. नवरे, मधु मंगेश कर्णिक, उमाकांत ठोमरे, पंढरीनाथ रेगे, पुरुषोत्तम धाक्रस असा त्यावेळच्या नवोदित लेखकांचा (ज्यामध्ये मीही असे.) एक ग्रुप जमत असे. या ग्रुपच्या एका वीकएंडच्या विहार लेकच्या सहलीत यापकी बहुतेक सर्वजण होते. त्यावेळच्या गप्पागोष्टींत साहित्य, ग्रंथलेखन, ग्रंथवाचन इत्यादीवरील विषयांना पूर्णपणे वाहिलेलं, ज्यामुळे साहित्यिकांना सिनेनट-नटय़ा, दिग्दर्शक इत्यादी सिनेमा-नाटकाशी संबंधितांना लोकांमध्ये असतं, त्या प्रकारचं ग्लॅमर निर्माण करून देता येईल असं एक मासिक आपण काढावं अशी योजना पुढे आली. सर्वानी तिला बिनविरोध पािठबा तर दिलाच; पण अशा मासिकासाठी आपण पूर्णपणे आणि मनापासून साहाय्य करू, असं वचन दिलं. याच ग्रुपचं पुढे ‘ग्रंथप्रेमी मंडळ’ असं नामकरण झालं. त्यानंतर झालेल्या बठकांमध्ये मासिकाचं नाव ‘ललित’ असावं, त्याचं संपादकत्व केशवराव कोठावळे यांनी करावं, त्यांना ग्रंथप्रेमी मंडळाने साहाय्य करावं व छपाई मौजकडे सोपवावी असा निर्णय घेण्यात आला.
तो काळ नवकथा, नवकवितेचा होता. अशा परिस्थितीत याहून वेगळ्या विषयाला पूर्णपणे वाहिलेलं ‘ललित’सारखं मासिक काढणं हे मोठं धाडसचं होतं. पण ग्रंथप्रेमी मंडळाच्या तरुण व महत्त्वाकांक्षी लेखकांना हा धोका पत्करावा असं वाटलं आणि त्यासाठी जरूर ते कष्ट व साहाय्य करण्याची संपूर्ण तयारी त्यांनी दर्शविली. त्याचबरोबर मराठीतील मान्यवर साहित्यिक, टीकाकार, प्रकाशक इ. ग्रंथविषयांशी संबंधितांचं सहकार्य मिळवणं गरजेचं होतं. त्यासाठी ‘ललित’ त्यांच्याही हिताचा आहे, हे त्यांना पटवणं महत्त्वाचं होतं. जानेवारी १९६४ ला प्रसिद्ध झालेल्या पहिल्या अंकामध्ये लेखक, प्रकाशक, विक्रेते आणि मुख्य म्हणजे वाचक यांच्यामध्ये परस्परांशी जिव्हाळ्याचे व सलगीचे संबंध करणं, हे ‘ललित’चे धोरण असेल असं नमूद करण्यात आलं होतं.
त्याप्रमाणेच ‘ललित’च्या सर्व अंकांमधली सदरं तसंच साहित्य संमेलन व अन्य लक्षणीय, गौरवणीय प्रसंगांच्या निमित्ताने जे खास अंक प्रसिद्ध केले गेले, ते या धोरणाशी सुसंगत असेच होते. परिणामी ‘ललित’चा वाचकवर्ग कालांतराने अपेक्षेहून अधिक प्रमाणात वाढत गेला. ‘ललित’च्या वाटचालीत केशवराव कोठावळे यांचे आकस्मिक निधन हा मोठाच धक्का होता. ‘ललित’च्या भावी अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह टाकणारा होता. पण त्यांचे चिरंजीव अशोक यांनी आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर हा समरप्रसंग ओलांडला व मासिकाला अधिक प्रगतिपथावर नेलं.
‘ग्रंथप्रमी मंडळा’ने सर्व प्रकारचं साहाय्य ‘घरचंच’ काम समजून करण्याचं आश्वासन दिलेलं होतंच आणि त्याचा ‘ललित’च्या प्रगतीला हातभार लागत होताच. या सर्वामध्ये लक्षणीय होतं- जयवंत दळवींचं ‘ठणठणपाळ’ हे दर महिन्याला प्रसिद्ध होणारं सदर.
‘ललित’चं एकूण स्वरूपच असं नव्हतं, की सामान्य वाचकालाही त्यामधील मजकूर करमणूक करणारा वाटेल. जे स्वभावत:च वाचनप्रेमी आहेत, त्यांची गोष्ट वेगळी. ‘ठणठणपाळ’ सदर मात्र पहिल्या अंकापासून अपवादरीत्या लक्षवेधी ठरलं. त्याने सर्वच प्रकारच्या वाचकांना भारून टाकलं. इतकं, की ‘ललित’ हातात पडला की पहिल्यांदा ‘ठणठणपाळ’चं पान उघडून वाचायला घेतो, असं सांगणारे वाचक होते! काय होतं असं या लिखाणात? साहित्यिक जगात घडलेल्या किंवा घडल्या अशा वार्ता असलेल्या घडामोडी, त्यामध्ये गुंतलेले साहित्यिक, त्यांच्या एकमेकांबद्दलच्या प्रतिक्रिया, वादविवाद इत्यादी हे ‘ठणठणपाळ’चे विषय. आणि त्यावर खेळकर शैलीत केलेली चेष्टा-मस्करी. संदर्भ वैयक्तिक असले तरी त्यामधील विनोद निर्मळ मनाने केलेला असायचा. अशा प्रकारे, की खुद्द त्या व्यक्तीनं हसून दाद द्यावी. तिचं उणदुणं खडूसपणानं विनोदासाठी कधीही ‘ठणठणाळ’नं वापरलं नाही. त्यामुळे ‘ठणठणपाळ’नं आपल्यावर विनोद करावा, असं खुद्द त्यालाच सुचवणारे काही साहित्यिक होते म्हणतात! त्यामुळे ‘ठणठणपाळ’ दीर्घकाळ वाचकांकडून पसंतीची वाहवा मिळवत ‘ललित’मध्ये येत राहिले. खुद्द दळवींनीच ते थांबवण्याचा निर्णय घेतल्यावर ते बंद झालं. पण त्या सदराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानं संपादकांना अशा प्रकारच्या विनोदी सदराची जरूर वाटली आणि त्या धर्तीवरच्या ‘अलाणे-फलाणे’, ‘पितळी दरवाजा’, ‘आनंदीआनंद’, ‘टप्पू सुलतानी’ अशा सदरांचा ‘ठणठणपाळ’ची जागा भरून काढण्याचा संपादकांनी उपयोग केला. पण ‘ठणठणपाळ’ची लोकप्रियता त्यांना लाभली नाही.
ग्रंथप्रेमी मंडळाच्या सदस्यांमध्ये मीच एकटा चित्रकार होतो. त्यामुळे ‘ललित’चं दृश्यरूप सजवण्याची जबाबदारी माझ्या एकटय़ावर पडणं अटळ होतं. मासिकाची किंमत आटोक्यात राखण्यासाठी मुखपृष्ठावर चित्र फक्त दिवाळी अंकावर द्यायचं, इतर महिन्यांच्या मुखपृष्ठांवर प्रकाशकांकडून फूल पेज जाहिराती घ्यायच्या आणि आतील मजकुरासाठी चित्रंही फक्त दिवाळी अंकांसाठी द्यायची असा सुरुवातीलाच निर्णय घेतला गेला होता.
मासिकाचं स्वरूप लक्षात घेऊन मुखपृष्ठांतील आशय साहित्यिक संदर्भ असलेला आणि निर्मिती प्रक्रियेचे अनेकविध रूपं चित्रीत करणारा असावा असा विचार ‘ललित’च्या सुरुवातीच्या काही दिवाळी अंकांसाठी मी करून त्याप्रमाणे चित्रं केली. नंतरच्या चित्रांमधून कला आणि समाजकारण/राजकारण यांचा परस्पर संबंध चित्रीत केला. तर अगदी अलिकडच्या चित्रांमधून सद्य राजकीय परिस्थितीवर आधारलेलं चित्रण आलं आहे. या वर्षीच्या अंकावर तर अरिवद केजरीवाल व रॉबर्ट वडेरा समोरासमोर ठाकलेले आहेत. आणि न्यायाधीश महाराज कुंठीत होऊन ते पाहत बसले आहेत.
दिवाळी अंकातील लेखासाठी जी चित्रं काढायची होती, ती मी कुठेही पान भरून काढली नाहीत. मजकुराचा छोटा भाग व्यापणार चित्रं, सहज लक्ष गेलं तर पाहिलं जावं एवढंसं आणि तेही मजकुराचं थेट चित्रण करणारं नाही तर त्याला समांतर भाष्य मांडणारं. उदा – बालकवी आणि त्यांची पत्नी यांच्यामधील दुरावलेल्या संबंधांवरील लेखावरच्या छोटय़ाश्या चित्रात फक्त दोन रेल्वे रुळ मी दाखवले होते. शेजारीशेजारी. पण कधीही एकत्र न येऊ शकणारे. या चित्रात दुसरा एक संदर्भ सूचित केला गेला आहे. बालकवींचा रेल्वेखाली सापडून घडून आलेला मृत्यू!
‘ललित’मध्ये संख्येने मी जास्त चित्रं काढली आहेत, ती ‘ठणठणपाळ’च्या सदरासाठी. पण तेथेसुद्धा मजकूराच थेट चित्रण कुठेही नाही. मजकुरातील आशयाशी समांतर आशयाचं वेगळं रूप दाखवणारी ही चित्रं आहेत. ‘ठणठणपाळ’च्या मजकुरात काही लेखक सर्कसमधील खेळाडू असतात, तेव्हा माझ्या चित्रीकरणात हीच मंडळी प्रेक्षक म्हणून आलेली असतात.
‘ठणठणपाळ’च्या लेखाबरोबर ‘ठणठणपाळ’नं उल्लेखलेल्या साहित्यिकांची जी अर्कचित्रं मी रेखाटली आहेत, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये काहींची चेष्टामस्करी असून देखील त्यांनी ती खेळकर दृष्टीने घेतली अशा तऱ्र्हेने ‘ठणठणपाळ’च्या लिखाणाशी माझी चित्रं समधर्मी झाली आहेत.
मजकुरातील शाब्दिक आशयासोबत स्वतंत्र दृष्य आशय दिल्यानं वाचकाला दृष्य तपशीलाचा विचार करण्याला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न सहजासहजी झाला आहे. हे माझं एक साहित्यिक पुण्यकर्मच!
चित्रकार म्हणून ग्रंथप्रेमी मंडळाचा सदस्य या नात्यानं ‘ललित’ला दृश्यरूप देण्यात माझा सहभाग हा असा राहिला आहे.
माझं साहित्यिक पुण्यकर्म!
मराठी वाङ्मय व्यवहारातील ताज्या घडामोडी, स्थित्यंतरे, नवे-जुने लेखक, वाचक आणि समीक्षक यांच्यातील दुवा असलेले ‘ललित’ मासिक जानेवारीपासून सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने प्रारंभापासून त्याच्याशी जोडले गेलेले चित्रकार वसंत सरवटे यांनी ‘ललित’च्या वाटचालीचा घेतलेला मागोवा.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 30-12-2012 at 03:40 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My cultural religious act