असेच दिवाळीच्या नंतरचे दिवस होते आणि तेव्हा दिवाळीत थंडीही पडायची. त्या तशा सुखावणाऱ्या गार हवेत वॉकमनमध्ये कॅसेट घालून मी कॉलेजच्या ग्रंथालयाच्या पायरीवर गाणी ऐकत बसलो होतो. आता त्या अल्बमचं नावही आठवत नाही; पण इंग्रजी प्रेमगीतांचा तो अल्बम होता. त्यातलं एक गाणं ऐकू लागलो- ‘My gift is my song and this one’s for you…’
lok10तो आवाज भरजरी होता; त्यामधलं पौरुष हे मार्दवालाही धरून ठेवणारं होतं. आणि त्या गायकाकडे बक्षिसीदाखल देण्यासारखं फक्त त्याचं स्वत:चं गाणं होतं. मधेच गाणं गाता गाता चाल सोडून तो गायक गद्यात म्हणू लागला – ‘Anyway the thing is-’ आणि ती ओळ म्हणतानाही तो उद्गार किती उत्स्फूर्त, सच्चा वाटला यार!  आणि मग समेवर येताना तो गायक गायला- ‘How Wonderful life is; while you’r in the world’ (तू जगात आहेस; म्हणून साऱ्याला कसा कोवळा अर्थ आहे.)
त्या ओळीपाशी मला एल्टन जॉन नावाचा प्रज्ञावान गायक-संगीतकार पहिल्याप्रथम गवसला. मला तेव्हा माहीत नव्हतं त्याचं नाव, गाव, त्याच्या नावामागची ‘सर’ पदवी. आणि त्याचे ते तऱ्हेवाईक गॉगल्स त्याच्या चाहत्यांना किती भावतात, हेही मला ठाऊक नव्हतं. पण मला ती कॅसेट ऐकताना दोन गोष्टी जाणवल्या. पहिलं म्हणजे हे गाणं म्हणायला पॉप असलं, तरी शास्त्रीय संगीताला जवळ जाणारं आहे. शास्त्रीय अभिजात गायन-वादन शैलीचा पायरव या गाण्याच्या नसेत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गायकाचा आवाज कमावलेला आहे. तो वर, खाली, आडवा, तिडवा कसाही फिरला तरी सुरेलच भासतो. आज इतक्या वर्षांनंतरही माझी ती निरीक्षणं मला चुकीची वाटत नाहीत. एल्टन जॉननं अभिजात पाश्चात्त्य संगीताला जसं आणि जेवढं पॉपला जोडलं आहे; तसं काम करणं मुश्कील आणि म्हणूनच दुर्मीळ स्वरूपाचं आहे. पुढे सिलीन डीयान आणि जेम्स हॉर्नरनं त्या दिशेनं काम केलं खरं; पण एल्टनइतकं सातत्य त्यांच्यात नाही. झपाटलेल्या समंधासारखं काम करत असला पाहिजे हा जॉन एल्टन. १९७० ते १९७६ या सहा वर्षांमध्ये त्याचे चौदा अल्बम निघाले! सरासरी वर्षांला दोन-तीन! आणि सारीच गाणी कशी तालेवार! पॉपची नस बरोबर जोखून असलेल्या त्या गाण्यामध्ये नर्मविनोद होता, प्रेमाची अभिव्यक्ती होती, ड्रम्स आणि चकाकत्या इलेक्ट्रिक गिटार्स होत्या; पण त्याचवेळी त्या गाण्यांमध्ये एल्टनचा पियानो बाखची, मोझार्तची, विवाल्डीची आठवण करून देणारे सूरही धरत असे.
एल्टन जॉन हे त्याचं खरं नाव नव्हे. ते कंपूमधल्या साथीदारांवरून सुचलेलं तऱ्हेवाईक नाव होतं. पण एल्टनचं गाणं मात्र मुळीच तऱ्हेवाईक नव्हतं. नाही. अभिजाततेची कक्षा न ओलांडताही एखादं गाणं पुरेपूर ‘पॉप’ कसं बनतं, याचा वस्तुपाठ त्याची गाणी देतात. म्हणजेच एल्टननं पॉपला थोडंसं अभिजन संगीताजवळ नेलं. आता शास्त्रीय संगीत आणि पॉप (किंवा आपल्या मराठीतल्या अत्यंत चुकीच्या संज्ञेत सांगायचं तर ‘सुगम’ संगीत) या दोन्हीमध्ये भांडण असायचं कारण नाही. खरं तरो Folk music(लोकसंगीत), Classical music (शास्त्रीय- अभिजात संगीत) आणि Pop music(याला मराठीत ‘जनसंगीत’ हा शब्द मला सुचवावासा वाटतो.) या एकाच त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत; एकमेकांना जोडलेल्या आहेत. सहअस्तित्व हे त्यांच्यासाठी अपरिहार्य आहे. संगीताच्या या Axiomatic Triangle Theory वर आक्षेप घेता आले तरी अजूनही जगभरचे संगीत समीक्षक ती मानतात.
पण आपण बुवा काही हे जाणत नाही. आपल्याला फरक दिसतोच की दोन तऱ्हांच्या गाण्यांत. शास्त्रीय संगीत गाणाऱ्या ज्येष्ठ गायिका समोर आल्या की आपल्या नेणिवेतलं कुणीतरी आपली पाठ वाकवून नमस्कार करायला लावतं. आणि ‘लता’ ही ऐंशीच्या घरात असली तरी आपली एकेरीत हाक मारावी अशी सखी असते! शास्त्रीय संगीत हे जणू कायम गुरुस्थानी असतं. ‘पॉप’ संगीतानं त्याच्या पायाशी बसून अधेमधे धडे घेतलेले बरे, असं ‘पॉप’मधल्याही कित्येकांना वाटत राहतं.
पण याचा अर्थ पॉप संगीताकडून अभिजात संगीताला काही शिकता येणार नाही, असं नाही! माझ्या शब्दात मांडण्याऐवजी क्लेमेन्स बर्टनहील याचे बोल ऐकवतो- ‘‘शास्त्रीय संगीत आणि पॉप इतके वेगळे भासतात, की त्यांचा डीएनए एकच आहे याचा विसर उभयपक्षी पडतो. संगीत हे अखेरीस संगीत असतं. आणि बाखपासून बिबर (जस्टीन) पर्यंतचं सारं संगीत हे अखेरीस बारा सुरांच्या ‘बििल्डग ब्लॉक्स’वर बनलेलं असतं.’’ क्लेमेन्सचं हे विधान किती मोलाचं आहे, हे अधोरेखित करायला नकोच. हे विधान वाचून पुष्कळांना रागावर आधारलेली हिंदी चित्रपटगीतं स्मरतील. पण तो एक स्तर झाला. आणि पुष्कळ वरचा. नीट ऐकलं तर त्या गायकीमागचं मूळ सुरांचं वस्त्र दिसू लागतं. ते मुळात चांगलं, अटकर, गळ्याला बसणारं असेल तर गाणं शास्त्रीय, की सुगम, की उपशास्त्रीय, हे सारंच गौण ठरतं.
पॉपलाही शास्त्रीय संगीताला देण्यासारख्या काही गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे लोकाभिमुखता! पॉप हे ज्या सहजतेनं माणसांमध्ये वावरतं, माणसांशी संवाद साधतं, ते अभिजात संगीतानं शिकण्यासारखं आहे. अभिजात संगीताचा डामडौल हा उत्तर-आधुनिक रसिकांच्या पुढय़ात खोटा वाटू शकतो. दुसरा गुण जो पॉपकडून घेण्यासारखा आहे, तो म्हणजे उच्च दर्जाची तांत्रिक निर्मिती. पॉपमध्ये गाण्यावर इतक्या वेळा संस्करण होतं, की तांत्रिकदृष्टय़ा ते बिनचूक बनतं. (म्हणजे चाल वाईट असू दे, पण ‘नाद’ हा नेहमी आकर्षक आणि उत्तमच बनतो. आपल्या सध्याच्या हिंदी चित्रपटगीतांसारखं!) पॉप गाण्यांमध्ये वाद्यं वाजविण्यासाठी पुष्कळदा शास्त्रीय संगीतामधल्या वादकांना पाचारण करण्यात येतं. (आपल्या इथेही करतात.) पण ऑपेरा गायिकांपेक्षाही व्हीटने ह्य़ूस्टनचा आवाज दणकट असूनही तिला कधी ऑपेरामध्ये गायला बोलावत नाहीत. तिसरं म्हणजे शास्त्रीय संगीतामधल्या माणसांचा ‘फोकस’ हा खूपदा आटोपशीर असतो. (आपण बरे, आपला पियानो.. आपली सतार- आपला ख्याल बरा!) याउलट पॉपमधल्या गायक-गायिकांचं परिप्रेक्ष्य व्यापक असतं, असं निरीक्षण अनेक अभ्यासकांनी नोंदवलं आहे. अर्थात, मला हे थोडं सब्जेक्टिव्ह वाटतं. पण तरी साधी पाश्र्वसंगीताची गोष्ट घ्या- संगीतकाराला सूर सोडून बऱ्याच गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. संवाद, प्रसंग, अभिनय, कॅमेरा, दिग्दर्शनाचा हेतू हे सारं त्याला अभ्यासावं लागतं. आणि या साऱ्यामुळे तो व्यापक परिप्रेक्ष्याचा धनीही बनतो.
पॉप आणि शास्त्रीय संगीताला जवळ आणणारे गायक सर्व संस्कृतींमध्ये असतात. एक प्रकारे किशोरी आमोणकर आणि भीमसेन जोशी यांनी अभंगांच्या मिषानं तेच काम केलेलं आहे. एल्टन जॉन, सेलिन डीयान आणि लुच्यानो पावरोत्ती यांनी तेच काम सातासमुद्रापार केलेलं आहे. तुम्ही ‘ऑल द वे’ गाणं ऐकलं आहे? सेलिन आणि लुच्यानो ते गाणं गातात तेव्हा पॉप गाणं ऐकतानाच अभिजाततेचा तो ध्यानमग्न सूरही कानी पडतो आणि सारं अंग थरारून उठतं. लोकसंगीत तिथेच कुठेतरी असतं. ते दिसत नसतं, ऐकू येत नसतं, जाणवत नसतं, एवढंच. संगीताच्या त्रिकोणाच्या त्या तीन बाजू एकमेकांवर नजर ठेवून उभ्या असतात आणि जे प्रमेय आपण सोडवू बघतो ते आनंदाचाच भाग ठरतं. हा, पण पूर्वग्रह मात्र काढायला हवेत.
मला आठवतंय, एकदा माझा अगदी अभिजात संगीतात बुडालेला गायक मित्र घरी आला तेव्हा मी मोठय़ा आवाजात ‘ढगाला लागली कळ’ ऐकत होतो. त्याला बसलेला धक्का अगदी उघड होता. त्याला एकाएकी भेटलं होतं लोकसंगीत- उडतं, चावट आणि साधंसं. त्याच्या तालात काही करामती नव्हत्या आणि गायकीमध्ये काही तान-पलटय़ांचं बौद्धिक आव्हानही नव्हतं. पण मला नेहमीच वाटत आलं आहे, की त्या गाण्यात जो जिवंतपणा आहे तो काही सर्रास आढळत नाही! ‘ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं’ म्हणताना दादा कोंडक्यांना त्याचा वात्रट अर्थच अपेक्षित असला पाहिजे. माझ्या सभ्य मित्राच्या सभ्यतेत तो अर्थ बसला नाही हे माझ्या ध्यानात आलं. पण त्याच्या हे ध्यानात आलं नाही, की कलाकाराच्या आत असणारी, त्याला सतत दुखावणारी कळ ही त्या आभाळातल्या सर्जक ढगासारखीच असते आणि मग निर्मितीचा पाऊस पडतो. अर्थात, तो मात्र थेंब थेंब गळत नाही, तो  आरपार  कोसळतो आणि आपल्याला सर्वागानं भिजवून टाकतो.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Story img Loader