गोष्ट आहे पाश्चात्त्यांच्या देशातील. एका ऑफिसमध्ये मॅनेजरच्या पदासाठी मुलाखती सुरू होत्या. आलेला उमेदवार अतिशय तडफदार, आकर्षक आणि उच्चविद्याविभूषित होता.
‘‘तुला शाळेत कोणत्या स्कॉलरशिप मिळाल्या?’’ – मुलाखतकाराचा प्रश्न. त्यावर उमेदवाराचे उत्तर नकारार्थी.
‘‘तुझा सगळा शैक्षणिक खर्च आणि फीज् तुझ्या वडिलांनी भरल्या का?’’
‘‘माझे वडील मी एक वर्षांचा असताना वारले. मला ते नीटसे आठवतही नाहीत. माझ्या आईने माझ्या फीज् भरल्या.’’
‘‘तुझी आई कोणत्या ऑफिसात काम करायची?’’
‘‘माझी आई कपडे धुण्याचे काम करी. धोबीण आहे ती.’’
त्यावर मुलाखतकर्त्यां संचालकाने त्या उमेदवाराला विचारले, ‘‘तुझे हात दाखव.’’ त्याचे हात मुलायम आणि नीटनेटके होते.
‘‘तू तुझ्या आईला कधी कपडे धुवायला मदत केली आहेस?’’
‘‘नाही, कधीच नाही. मी फक्त अभ्यास करावा असा माझ्या आईचा आग्रह होता. ती कपडे फार झपाटय़ाने धुते.’’
संचालक म्हणाले, ‘‘आज आपण येथेच थांबूया. तू घरी जाऊन तुझ्या आईचे हात हातात घे आणि उद्या भेट.’’
मुलाने घरी येऊन आईला तिचे हात दाखविण्यास सांगितले. आई आश्चर्यचकित झाली. तिने मुलापुढे आपले हात पसरले. हात रापलेले. भेगा पडलेल्या. कुठे चामडीला घट्टे, तर कुठे दडदडीतपणा.. मुलाने आपल्या हातांनी आईचे हात कुरवाळले. स्वच्छ केले. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ते आईच्या हातावर पडले. काही भेगा वेदनादायक होत्या. मुलाने हळुवार फुंकर घातली. आज पहिल्यांदा त्या मुलाला आईच्या हातांची शक्ती.. दानत.. समर्थता जाणवली. या भेगांनी त्याच्या शाळेची फी भरली होती. त्या दडदडीतपणाने त्याच्या कॉलेजशिक्षणाला उभारी दिली होती. आज मुलाने आईचे हात साफ केल्यावर प्रथमच स्वत: सगळे कपडे धुतले. दुसऱ्या दिवशी मुलगा परत ऑफिसात संचालकांना भेटला. म्हणाला, ‘‘आज मला खऱ्या अर्थाने कष्ट गृहीत न धरणं म्हणजे काय, हे समजलंय. नात्याचं अव्यक्त प्रकटीकरण मला उमगलंय. माझ्या यशामधला इतरांचा वाटा मला कळलाय. आज मला कृतज्ञतेचा बोध झालाय अन् तो मला माझ्या मायने करून दिलाय.’’ त्या मुलाची मॅनेजरपदावर निवड झाली अन् आपल्या पुढच्या कारकीर्दीत ती त्याने सार्थ करून दाखवली.
परमेश्वरानं आयुष्याला दिलेलं एक लेणं म्हणजे आई,
दिसताना दोन, पण कामाच्या वेळी सहस्र हात म्हणजे आई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा