एके दिवशी रात्री वैद्यनाथन् यांचा फोन आला. त्यांचा फोन आला की मी ओळखायचो- नवीन जिंगल आलेलं असणार त्यांच्याकडे! मला म्हणाले, ‘अशोक, कागज-पेन्सिल लो और एक नया जिंगल लिख लो.’ मी म्हटलं, ‘एक मिनिट!’ कागद घेतला, पेन घेतलं आणि म्हणालो, ‘हा बोलिए!’
मी विचारलं, ‘वो कैसे?’ ते म्हणाले, ‘तुम लिख तो लो!’ मी लिहायला सुरुवात केली. जिंगलचे शब्द असे होते-
‘मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा..’
मी म्हटलं, ‘आगे?’
ते म्हणाले, ‘अभी इतना ही है. इसकी दो-तीन धुनें उन्हे सुनानी है. और इसका बेस क्लासिकल होना जरुरी है.’
मी म्हटलं, ‘ओके. कब तक सुनाना है?’
ते म्हणाले, ‘कल शाम को मीटिंग है. उस में दो-तीन धुनें सुनानी है. कल पांच बजे वेस्टर्न आऊटडोअर स्टुडियो में पहुँच जाना.’
शब्द हातात पडल्यावर त्याच्या चालीची प्रक्रिया माझ्या मनात लगेचच सुरू होते, हे आता सगळ्यांना ठाऊक झालं होतं. मी यमन रागात एक चाल बांधली. दुसरी भीमपलासमध्ये व तिसरी भैरवीत. (जी आता टीव्हीवर वाजते ती!) सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी तिन्ही चाली ऐकल्या. भैरवीतली चाल सर्वाना आवडली. ‘वाह! क्या बात है!’ मग त्याची १२-१३ भाषांमध्ये स्क्रिप्टस् लिहून होणार, हेही ठरलं. सर्वाना हिंदीतील जिंगल पाठवली गेली.
काही दिवसांनी नाथन्चा पुरत फोन : ‘सब लँग्वेज रेडी है। इस दिन वेस्टर्न आउटडोअर में रेकॉर्डिग करनी है.’
मलिक स्वत: संगीताचा जाणकार होता. त्याचा गळाही बरा होता. पं. भीमसेन जोशींना तो एकटाच भेटायला गेला. त्यांना त्यानं ती चाल ऐकवली. मग पंडितजींनी आपल्या परीने ती बसवली. आम्हाला- म्हणजे मला वा नाथन्ना पंडितजींना शिकवण्याची तसदी घ्यावी लागली नाही. सकाळी दहा वाजता रेकॉर्डिगच्या दिवशी पोहोचलो तेव्हा बघतो, तर पंडितजी एका कारपेटवर दोन तंबोरे वाजवणारे आणि तबल्यावर नाना मुळे असे बसून रियाज करत होते. मी आश्चर्यचकित झालो.
‘त्यांना ही चाल कशी माहिती?’
मलिक म्हणाला, ‘मी टेप ऐकवली त्यांना. त्यांनी ती आपल्या परीने बसवली आहे.’
मी म्हटलं, ‘ओके.’ साधारण एकेक तासाने एकेका भाषेतलं रेकॉर्डिग करायचं ठरलं होतं.
पंडितजींसाठी ४५ सेकंदांचा वेळ दिला होता. रेकॉर्डिग सुरू झालं. आम्ही त्यांना सांगितलं की, ‘तुम्हाला हात केला की गाणं सुरू करा.’ ते ‘हो’ म्हणाले. पण मजा अशी, की त्यांना हात केला की ते तंबोरेवाल्यांना हात करायचे व नंतर गाणं सुरू व्हायचं. या खटाटोपात वेळ वाढायची. परत त्यांना सांगायचो, ‘हात केला की गाणं सुरू झालं पाहिजे.’ त्यावर ते ‘हो’ म्हणायचे. पण पुन्हा तेच व्हायचं. त्यांचंही बरोबर होतं. सूर मिळाल्याशिवाय कसे गाणार ते? मग मी दमण सूदला (रेकॉर्डिस्ट) सांगितलं, ‘त्यांना त्यांच्या हिशोबानं गाऊ दे. आपण कुठून सुरू करायचं तिथून टेप कापून टाइमिंग बघू या.’ जेव्हा ‘टेक् ओके’ झाला तेव्हा सर्वजण खूश झाले. पंडितजींचा भारदस्त आवाज, सुंदर चाल, नाना मुळेंचा तबला.. सगळं जमून आलं होतं.
त्यानंतर काश्मिरी भाषेचा सुपरवायझर आला. तोच लेखक आणि तोच गाणार होता. प्रोडय़ूसर मलिकचा एकच आग्रह होता- ‘मीटर बदललं तरी चालेल, पण ऐकताना ‘मिले सूर’ची ओरिजिनल सुरावट ऐकतोय असं वाटायला हवं.’ त्यामुळे दीपचंदी, दादरा, खेमटा, केहरवा अशा अनेक मीटरमध्ये भाषांची विविधता नटलेली असली तरी ऐकताना ती एकच सुरावट वाटायची. काश्मिरी भाषेतील रेकॉर्डिग करताना असं लक्षात आलं की, काश्मीरचं मूळ वाद्य संतूर सांगायला आम्ही विसरलो आहोत. पुष्कळ प्रयत्न केला. फोनाफोनी झाली. पण संतूर वाजवणारा कोणी मिळेना. आमचे साइड ऱ्हिदम-प्लेअर दीपक बोरकर यांच्याकडे हार्प होता. ते म्हणाले, ‘यावर संतूर इफेक्ट निघेल. आणि सर्व तारा भैरवीतच लावल्यामुळे हात किंवा स्ट्रायकर कुठेही पडला तरी तीच सुरावट ऐकू येईल. अन् दोन बारचा तर इन्ट्रो होता!’
मग मी आणि अॅरेजर धीरजने दोन पेन्सिली मागवल्या आणि आम्ही दोघांनी जे वाजतील ते सूर वाजवले. मस्त वाटला इफेक्ट! तेच फायनल झालं. गायक काश्मिरीच असल्याने जसा हवा तसाच रंग त्या भाषेला आला.
त्यानंतर कविता कृष्णमूर्ती व पंकज मित्रा यांच्या आवाजातलं बंगालीतला पोर्शन केला तेव्हा मलिकने सांगितलं, ‘इस में ऱ्हिदम वगैरा नहीं रखना.’
आम्ही विचारलं, ‘का?’
तर म्हणे, ‘बंगाली जरा सुस्त प्रकृतीचे असतात. त्यांचं सगळं राजेशाही असतं.’ म्हणून त्यांनी जेव्हा ‘शूट’ केलं तेव्हाही ट्रेनमधून जी माणसं उतरतात तीही स्लो मोशनमध्ये दाखवली आहेत. मला वाटलं, मलिकचं पेपरवर्क किती पक्कं आहे! शूटिंगच्या अगोदर ते असणं फार गरजेचं असतं. याचा प्रत्यय आम्हाला प्रत्येक भाषेच्या वेळी यायचा. अमुक भाषा म्हणजे तिचं टायमिंग ६ सेकंद, हिचं ७।। सेकंद, या भाषेचं ९ सेकंद.. अशी विभागणी असे. मी आणि कविता दोघेही त्यावरून भांडायचो- ‘७।। सेकंदांचे ८ झाले किंवा ६ वा ७ झाले तर काय फरक पडणार?’ त्यावर त्याचं उत्तर असे, ‘आपको नहीं पडता है, लेकिन मुझे पडेगा.’
‘बरं बाबा, करतो प्रयत्न त्यात बसवण्याचा,’ म्हणून आम्ही कामाला लागायचो.
त्यातला पंजाबी भाषेतला जो भाग आहे तो खुद्द मलिकच्या बहिणीने गायला आहे. मस्त खणखणीत आवाज आणि पंजाबी भाषेतील नजाकत तिच्या गळय़ात होती. मराठीतलं ‘तुमच्या आमच्या जुळता तारा’ या ओळीला मी चाल लावेपर्यंत सुषमाने पुढची ओळही म्हटली. मी म्हटलं, ‘अरे वा! आता तू कम्पोझरही झालीस की!’ सगळेचजण हसायला लागले. तिला थोडंसं लाजल्यासारखं झालं.
म्हटलं, ‘खरंच! छान आहे. आपण तसंच ठेवू या.’ यात माधव पवारांनी ढोलकीचा असा काही ठेका लावलाय, की मराठमोळ्या लावणीचा ठसका त्यात प्रत्यक्षात उतरला होता.
तामीळ, तेलगू, मल्याळम्, कन्नड भाषांतील गाण्यांसाठी आणि सुपरव्हायजर म्हणून ती- ती माणसं हजरच होती. रघू व कुरुविला अशी दोन गायक मंडळी व एम. पी. शर्मा, नानप्पन व बाकी भाषेवर प्रभुत्व असणारी मंडळी तिथे हजर होती. आम्ही आजपर्यंत मद्रासी भाषा म्हटली की मृदंगम्, मोरसिंग, मंजिरा, वीणा अशी वाद्यं वापरत असू. पण इथे या चार भाषांचं रेकॉर्डिग करताना खूप काही शिकायला मिळालं. एखादी भाषा करायला घेतली की त्यासाठीच्या वाद्यांचा मेळ बघून तो सुपरवायजर सांगायचा, ‘आमच्या इथे मृदंगम् वाजत नाही, घटम् वाजवतात.’ दुसऱ्या भाषेतला सांगायचा, ‘आमच्याकडे तावील् वाजवतात.’ तिसरा सांगायचा, ‘आमच्याकडे खंजिरा वाजवतात.’
दक्षिणात्य भाषा करताना खूप मजा यायची. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या नऊ अक्षरांसाठी त्यांची २०-२५ अक्षरं असायची. त्यामुळे ठेका बदलल्याशिवाय मलिकने दिलेल्या वेळेत बसणं कठीण होतं. मग आम्ही ते दीपचंदीत बसवलं. दुसरं खेमटय़ात बसवलं. आणि हे सर्व कम्पोझिशन तिथल्या तिथे व्हायचं. थोडासा ताण होता, पण काम करताना खूप मजा आली. कविता, सुषमा, रघू, कुरुविला, वादक कलाकार सगळय़ांचीच मदत होत होती.
सर्व भाषा संपल्या. आता फक्त हिंदीतलं ‘सूर की नदीयाँ हर दिशा से बहके सागर में मिले.. बादलों का रूप लेकर बरसे हलके हलके’ हा अंतरा रेकॉर्ड करायचा बाकी होता. लतादीदी तो गाणार होत्या. पण त्या तेव्हा भारतात नव्हत्या. मलिक म्हणाला, ‘माझी शूटिंगची डेट फिक्स आहे. मी एवढा वेळ नाही थांबू शकत. मला कवितेच्या आवाजात करून द्या. मग फायनल आपण दीदींच्या आवाजात करू.’ मग त्याचं रेकॉर्डिग झालं. त्याचं शूटिंगही झालं.
महिन्याभराने मला नाथन्चा फोन आला, ‘परसो सुबह आठ बजे दीदी डबिंग करने के लिये आ रही है. वेस्टर्न आऊडडोअर पहँुच जाना!’
अकराच्या दरम्यान दीदी आल्या. सोबत उषाताई होत्या. संजीव कोहली (मदनमोहनचा मुलगा) आले. मग चहापाणी, गप्पागोष्टी झाल्यावर कामाला सुरुवात झाली. अनेक टेक् झाले तरी गाणं ‘ओके’ होईना. टेक् झाला की उषाताई माझ्याकडे बघायच्या. माझं एक बोट वर असायचं. मग त्या दीदींना सांगत, ‘दीदी, अजून एक घेऊ या.’
त्यानं दीदी वैतागल्या. ‘काय होतंय काय? माझं काय चुकतंय?’
मग उषाताई आणि मी बाहेर सिंगर रूमकडे गेलो. माझी लताबाईंशी ओळख करून देण्यात आली. ‘दीदी, हे अशोक पत्की.’ दीदी म्हणाल्या. ‘हां! कुठेतरी नाव ऐकलंय!’
म्हणाल्या, ‘काय चुकतंय?’
मी म्हटलं, ‘तसं चुकत काही नाही, चाल बरोबर आहे, पण जिथे पॉझ घेतला आहे, तिथे तो यायला हवा. जिथे मिंड घेतलीय कवितेने- तिथे ती तशीच यायला हवी. कारण त्याच्यावर शूटिंग झालेलं आहे.’
म्हणाल्या, ‘मग गाऊन दाखवा मला.’ अरे बापरे! आली का पंचाईत! तरीही धीर करून ऐकवलं.
म्हणाल्या, ‘ठीक आहे. बघते प्रयत्न करून!’
मी ‘सॉरी’ म्हटलं आणि आतल्या मॉनिटर रूममध्ये सटकलो. त्यानंतर दुसराच टेक् ‘ओके’ झाला. त्याच दिवशी दीदींचं शूटिंगही वेस्टर्न आऊटडोअरमध्ये होतं. छान सफेद साडी, त्याला तिरंगी झालर.. याचं पहिलं टेलिकास्ट स्वातंत्र्यदिनी होणार होतं. १९८८ साल होतं ते. तेव्हापासून आज इतकी वर्षे झाली तरी पुन्हा पुन्हा हे गाणं बघणारे, ऐकणारे लोक भेटतात.
आम्ही या गाण्याचे तेरा भाषांतले तुकडे करून दिले. पण त्यांना जोडण्याचं मुख्य काम लुई बँक्सने केलं. ते जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर आलं तेव्हा सगळेच अवाक् झाले. कविता-सुषमाचा मला फोन : ‘अशोकजी, ये अपनने किया है इसका भरवसा ही नहीं होता.’
मलिकसाहेबांची संकल्पना- दिग्दर्शन, पियूष पांडे यांचे शब्द, मी, नाथन िव लुई बँक्स्चं संगीत. त्यातही लुई बँक्सला १०० पैकी २०० गुण! कारण त्याने जी माळ गुंफली आहे आणि शेवटचं ‘जय हे, जय हे!’ त्यानं असं काही उंचीवर नेऊन ठेवलं आहे त्याला तोड नाही!
‘राष्ट्रगीताच्या तोडीचं हे जिंगल झालं आहे,’ असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा आयुष्य सार्थकी लागलंसं वाटतं. कित्येक र्वष हे गाणं कुणी बनवलं, हे कोणाला माहीत नव्हतं. मी एवढय़ाचसाठी गप्प होतो, की हे खरं काम वैद्यनाथन्चं होतं. पण त्यांनी २० वर्षांपासून कम्पोज् करणं सोडून दिलं होतं. माझ्याआधी पंकज मित्राकडून ते कम्पोज् करून घेत. माझी ओळख झाल्यापासून मीच त्यांचं सारं काम करायचो. मला कधी माझं-तुझं वाटलं नाही. गुरुदक्षिणा म्हणूनच मी काम करायचो.
जाता जाता एक किस्सा सांगावासा वाटतो. त्यानंतर मलिकने देस रागावरही ‘मिले सूर’सारखं काहीतरी करावं म्हणून मला गळ घातली. शब्द होते- ‘बजे सरगम हर तरफसे गुंज बनकर..’ मलिक म्हणाला, ‘इस में तुम्हे जितना टाइम चाहिये, ले सकते हो।’
मी म्हटलं, ‘१५-२० सेकंद तरी पाहिजेत.’ सर्व मोठमोठे कलाकार होते. रामनारायणजी, हरिप्रसाद चौरासिया, अमजद अली खान, रविशंकरजी, पं. भीमसेन जोशी, पं. शिवकुमार शर्मा, अल्लारखॉं, झाकीर हुसेन. काही शास्त्रीय नृत्यांचे परफॉर्मन्स. पण.. ‘मिले सूर’ची मजा त्याला आली नाही. जे ५-६ सेकंदांत सांगून गेलो तेच आता १५-२०-२५ सेकंदांत झाल्यामुळे कंटाळवाणं झालं होतं. तेव्हा मलिक म्हणाला, ‘आता वेळेचं महत्त्व लक्षात आलं ना?’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा