डॉ. सिसिलिया काव्र्हालो
‘मिस्टरी’ हा शब्द उच्चारला तरी अगाथा ख्रिस्तीच्या गूढ कादंबऱ्यांची आठवण होते. मराठीतही नारायण धारप, रत्नाकर मतकरी आणि अन्य अनेक कादंबऱ्या चटकन नजरेसमोर येतात. सध्याच्या काळात रहस्य वा गूढ कथा कादंबऱ्या यांचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. अशातच शरद जतकर यांची ‘दि मिस्टरी ऑफ डिमेटर’ ही मूळ कादंबरी आपलं लक्ष वेधून घेते.. गूढाची उकलही ते सहज करतात.. घटनाप्रसंगांचा गुंता मोठय़ा शिताफीने सोडवतात.
ग्रीसमधील इंडस हेलेनिक पंथ आणि डायनिश पंथ यांच्यातील संघर्षांची पार्श्वभूमी या कादंबरीला असल्याची कल्पना करून त्यावर सदर कादंबरीचे कथानक बेतलेले आहे. सत्ताधारी पक्ष डायनिश पंथ यांनी इंडस हेलेनिक पंथावर केलेले अन्याय, अत्याचार आणि सुडाच्या इतिहासाला इंडस हेलेनिक पंथाने संयम – समन्वय व शोधकार्य यांनी दिलेले प्रत्युत्तर या कादंबरीत लेखकाने नेटकेपणाने मांडलेले आहे.
इंडस हेलेनिक आणि डायनिश पंथातील वैराचे प्रमुख कारण म्हणजे द्वेष आणि गैरसमज. क्वीन हेलेनानं पाटलीपुत्रावरून इंडस हेलेनिक लोकांबरोबर ग्रीसच्या जनतेसाठी पाठवलेला करोडो डॉलर्सचा खजिना चाच्यांच्या हल्ल्यात समुद्रात बुडाला, परंतु हा खजिना हेलेनिक लोकांनी लुटून नेला, असा गैरसमज पसरवून हेलेनिक लोकांचा छळ मांडण्यात आला. कित्येक वर्षे त्या लोकांना छळाला बळी जावे लागले. त्यानंतरही कित्येक वर्षांनी जेव्हा निवडणूक आली तेव्हा सत्ताधारी डायनिश पक्षापुढे आणि पर्यायाने जनतेपुढे सत्य आले पाहिजे म्हणून हेलेनिक पंथ चंग बांधून कामाला लागतो; आणि मग भारत, ग्रीस, इजिप्त, तुर्कस्थान येथपर्यंत पसरलेली पाळंमुळं खणून काढण्याचा प्रयत्न करतो- तेही सभ्य मार्गाने, संयमाने आणि संशोधक वृत्तीने!
शरद जतकर यांनी केलेला प्रवास, सांकेतिक लिपी आणि विविध भाषांचा त्यांचा असलेला अभ्यास, त्यांचे वाचन, चित्र, शिल्प, संगीत, वास्तुशास्त्र, पुरावस्तुसंग्रहालय, इतिहास, भूगोल, यांचे असलेले ज्ञान यांच्या पाऊलखुणा ‘डिमेटरच्या रहस्या’ त उमटलेल्या दिसतात. त्याचबरोबर समाजशास्त्र, लोकसंस्कृती, मानसशासत्र, समुद्रशास्त्र यांच्या अभ्यासाचीही सांगड सदर कादंबरीत घातलेली आहे आणि ती सारी माहिती कादंबरीला पूरक ठरलेली आहे.
हेलेनिक पंथाचे वयोवृद्ध नेते मार्कोस यांची हत्या, डायनिश पंथातील मारेकऱ्यांनी केल्यामुळे इंडस हेलेनिक पंथ सत्तेवर आला; तर त्या पंथाचे हाल संपतील आणि आपल्या पंथाचा छळ सुरू होणार अशी भीती डायनिश पंथाला वाटू लागते. म्हणूनच हेलेनिक पंथाची वाताहत करण्याच्या इराद्यातून मार्कोसची हत्या, एरिकचे अपहरण, कार्यकर्त्यांचा पाठलाग करून त्यांना भंडावून सोडणे, हल्ले करणे आणि त्यांच्या शोध कार्यात अडथळे निर्माण करण्याचे सत्र त्यांनी चालवलेले असते.
मार्कोसने आपल्या दैनंदिनीत टिपून ठेवलेल्या नोंदींच्या आधारे गुप्ततेची काळजी घेत हेलेनिक पंथाचे तीन गट कार्यरत झालेले असतात. भारतातील मोहिमेची जबाबदारी ग्रीसहून आलेल्या रॉबर्टकडे, तुर्कस्तानची जबाबदारी अथेन्सहून आलेल्या लिचीकडे आणि कोलिन आणि शेरिफा हे इजिप्तच्या शोधमोहिमेवर निघतात, रिसर्चवर असलेला रॉबर्ट, मरिन – आर्किओलॉजिस्ट असलेल्या हर्षद नेऊरगावकर आणि टपरीवर काम करणाऱ्या महादूच्या साहाय्याने भारतातील, विशेषत्वाने महाराष्ट्र, मध्यप्रदेशातील काही स्थळे हुडकून काढतो. नाशिक, पुणे अशा काही परिचित स्थळ – संदर्भामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणारे कथानक अगदी जवळचे वाटू लागते. आर्कियोलॉजिस्ट असलेली लिची इयानला हाताशी धरून तुर्कस्तानला कॅरोल नावाने वावरते. कोलीन आणि शेरीफा, ताहीर यांच्या मदतीने इजिप्तमध्ये शोधकार्य आरंभतात. मधल्या काळात अनेक नाटय़पूर्ण घटना घडतात, त्यातून त्या त्या देशाचा भूगोल आणि इतिहास मूर्तिमंत रूपात साकार झाल्याचा भास होतो आणि वाचकाची उत्सुकता शिगेला पोचते. मार्कोसने नोंदवलेल्या सांकेतिक काव्यात्म भाषेच्या आधारे शोधमोहिमेवर निघालेले तिन्ही गट, त्या – त्या देशातील पुरातत्वविभाग, ऐतिहासिक वास्तू, ताम्रपट, शिल्पं, चित्रं यावरील सांकेतिक लिपी वाचून आपल्या उपयोगाचं घबाड हाती लागल्याच्या आनंदात सलेमीच्या हाती सुपूर्द करतात आणि सलेमी त्याची योग्य ती छाननी करून गुप्त ठेवा मिळाल्याने हर्षभरित होते. इंडस हेलेनिक पंथाला भोगाव्या लागणाऱ्या सामाजिक अवहेलना, कुचेष्टांपासून आता त्यांना कायमची मुक्ती मिळणार असते आणि आपल्याकडे असलेल्या या संपत्तीचा उपयोग लोकहिताची कामे करण्यासाठी वापरण्याने मार्कोसच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या स्वप्नाची पूर्ती होणार असते. शेवटी सत्याचा विजय ठरलेलाच असतो. पत्रकार परिषद होते.. रहस्याची उकल पत्रकारांसमोर केली जाते. इंडस हेलेनिक पंथ प्रसिद्धीच्या झोतात येतो आणि इंडस हेलेनिक पंथाचा आंट्रोनिकोस निवडून येतो.
एकात एक गुंफलेल्या रहस्यांनी ‘दि मिस्ट्री ऑफ डिमेटर’ उत्कंठावर्धक झालेली आहे. शरद जतकर स्वत: वास्तुविशारद असल्यामुळे विविध भाषा, कला यांचा त्यांचा असलेला अभ्यास, जगभरचा केलेला प्रवास, वाचन यांचं प्रतिबिंब प्रस्तुत कादंबरीत आहे. त्यामुळे कादंबरीची वाचनीयता वाढलेली आहे. सदर कादंबरी पूर्णपणे काल्पनिक असली तरी त्यातील व्यक्तिरेखा अगदी जवळच्या व जिवंत असलेल्या वाटतात. केवळ मनोरंजनासाठी लिहिलेली कादंबरी वाचकाच्या डोळय़ात अंजनही घालते. वर्ण, वंश, जात, धर्म इत्यादी भेद, गरीब – श्रीमंत, उच्च – नीचता, समाज अस्थिर – प्रदूषित होत जातो. अवैध मार्गाने सत्ता – संपत्ती जमवून दुर्बलांवर अत्याचार करणे सर्वस्वी निंद्य आहे. उशिरा का होईना, पण इष्टाची अनिष्टावर मात होतेच, यावर पडणारा प्रकाश हे या रहस्य कादंबरीचे वैशिष्टय़ मानता येईल.
‘दि मिस्टरी ऑफ डिमेटर’- शरद जतकर,
वनमाली प्रकाशन, पुणे,
पाने- २६४, किंमत – ३०० रुपये.