समीर गायकवाड

नारायणकाकांच्या घराबाहेर सकाळपासूनच माणसांची रीघ लागली होती. ‘बामनकाका’ गेल्याचा गलका गावात तांबडफुटीलाच उठला आणि दिवस उजाडायच्या बेतात असतानाच काकांच्या घरी गाव गोळा होत गेलं. सुताराच्या आळीला वरच्या अंगाशी बामन गल्ली होती. तिथंच विठ्ठलाचं जुनाट मंदिर होतं. त्याला लागून कुलकण्र्याची तीन घरं होती. या तीन घरांमुळेच गल्लीचं नाव ‘बामन गल्ली’ पडलेलं. त्यांचे वाडवडील इथलेच असं ते आवर्जून सांगत. नारायण कुलकण्र्याच्या किती पिढय़ा इथं होत्या, हे सांगणारे जुने वड-पिंपळ गावात खूप कमी होते. नारायण, वामन आणि विष्णू हे तिघं सख्खे भाऊ. त्यातले नारायण थोरले. गावानं नारायण कुलकण्र्याना आपल्या घरातल्या ज्येष्ठ चुलत्याचं स्थान दिलेलं. ते अख्ख्या गावाचे काका होते. गावच्या विठ्ठल मंदिराची पूजाअर्चा त्यांच्याकडेच असे. आडाला पाण्याची ददात नव्हती तेव्हा आडावर सर्वात आधी पाणी शेंदायला गेलेला माणूस नारायणकाका असे. गांधी टोपी, पांढरीशुभ्र छाटी आणि तांबडं धोतर अशा वेशात ते भल्या पहाटे आडावर दाखल होत. घागर पाण्यात पडून तिचा ‘बुडूडूक’ असा आवाज आला की त्यांच्या मुखातून हरिपाठ सुरू झालेला असे. ‘पुण्याची गणना कोण करी’ म्हणेपर्यंत पाण्याने भरलेली घागर वर आलेली असे. दोन घागरी पाण्यावर त्यांचं भागे. खांद्यावर घागर घेऊन घराकडे निघालेले नारायणकाका दारासमोरून गेले की घरोघरी गलका होई. ‘‘नारायणकाकाचं पाणी भरून झालं. आता तरी उठा की!’’चा नाद घुमे. नारायणकाकांचा पाण्याचा हिशोब सोपा होता. एक घागर देवासाठी आणि एक घागर घरासाठी!

पापभीरू असलेल्या नारायणकाकांचा स्वभाव मनमिळाऊ होता. संथ लयीत वाहत जाणाऱ्या नितळ, स्वच्छ नदीच्या प्रवाहासारखं त्यांचं चरित्र होतं. त्यांना साथ लाभली होती वैजयंतीकाकूंची. गाव त्यांना ‘वैजंताकाकू’ म्हणे. नवऱ्याला झाकावं अन् यांना काढावं, इतकं त्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वात आणि स्वभावात साम्य होतं. वैजंताकाकू बोलायला लागल्या की कानात घुंगरं वाजत. गावातल्या बायका त्यांच्या शब्दाबाहेर नव्हत्या. तसंच काकांचंही होतं. गावातल्या तमाम लग्नांत आंतरपाट हाती धरून मंगलाष्टके म्हणण्यापासून ते बारशाच्या दिवशी पोराचं नाव ठरवण्यापर्यंत हरकामात काकाच लागत. एखाद्याच्या घरी नारायणकाकांना म्हाळाला बोलावलेलं असलं की त्या घरातलं वातावरण बदलून जाई. गेलेल्या माणसाच्या अशा काही आठवणी ते सांगत, की घरातली माणसं हमसून रडत. त्यामुळे त्या घरात काही भांडणतंटा लागलेला असला की तो आपसूक निकालात निघे.

लंकेची पार्वती असणाऱ्या वैजंताकाकूची एक खासियत होती. कुणाचंही रडणारं मूल तिच्या मांडीवर ठेवलं की ते गप होई. त्यामुळं पंचक्रोशीतल्या बायका तान्ही लेकरं घेऊन काकूच्या मांडीवर ठेवायला आणत. घरात वाटीभर खायला केलेलं असलं तरी त्यातलं चमचाभर मग या बायकांच्या हातावर येई. दोघंही नवरा-बायको मायाळू असल्यानं त्यांच्या विरोधात कधी कुणी जाण्याचा प्रश्नच आला नव्हता. संसारवेलीवरच्या दोन फुलांसह ते तृप्त होते.

एकदा मध्यरात्रीनंतर गावाबाहेर असलेल्या शंकर येसकराच्या घराकडून येणाऱ्या नारायणकाकांना गावातल्या काही लोकांनी पाहिलं आणि त्याचा बभ्रा झाला. आठवडाभर गावात त्यावर खल झाला. शंकर येसकर मरायला टेकला होता, पण काही केल्या त्याचा जीव जाता जात नव्हता. त्याच्या बायकोनं धाकटय़ा पोराला येसकराच्या पाळीच्या निमित्ताने गावात पाठवून वैजंताकाकूपाशी निरोप दिलेला. त्यांची स्थिती ऐकून काकांचं मन द्रवलं. बोभाटा होऊ नये म्हणून मध्यरात्रीस ते शंकरच्या घरी गेले. पण पहाटेस पाण्याची पाळी द्यायला गेलेल्या काहींनी त्यांना बरोबर ओळखलं. ‘ज्या येसकराला आपण आपल्या घरातलं सगळं शिल्लक, उष्टं अन्न देतो त्याला हवं असलेलं मरण दिलं तर कुठं चुकलं?’ असा रोकडा सवाल नारायणकाकांनी केला. गावाला त्यांचं म्हणणं पटलं. पण काहींना ते अखेपर्यंत रुचलं नाही. त्यात भर पडली काकांच्या भावकीच्या वर्तणुकीची.

नारायणकाकांकडे पिढीजात वारशाने गावाची देवदेवस्की आल्यानंतर त्यांच्या दोन भावांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शहराकडे कूच केलं. तिथं त्यांनी पौरोहित्य करून नावलौकिक वाढवला. वामन, विष्णू जेव्हाही गावाकडे येत तेव्हा त्यांच्या समाधानासाठी काका-काकू सोवळं पाळत. मग कुळाचार, विधिवत कर्मकांडे, मंत्रपठण, होमहवन भरभरून होत. ते गेले की काका-काकू पुन्हा सामान्य वागत. कुणाच्या घरी काही धार्मिक विधी असले तर नारायणकाकांनी एखाद्या वस्तूपायी अडवणूक केली नव्हती. अमुकएक दक्षिणा मिळावी म्हणून हट्टही केला नव्हता. त्यांनी गावाच्या बोकांडी कर्मकांडेही मारली नाहीत. वारीच्या काळात मात्र त्यांना उसंत नसे. काकडआरतीपासून ते काल्याच्या कीर्तनापर्यंत त्यांचा पिट्टा पडून जाई. पण त्यात त्यांना अलौकिक समाधान असे. कुणाच्या घरी माणूस गेलं की गरुडपुराण ते जरूर वाचत, पण पुन्हा म्हणत- ‘‘चांगली कम्रे हेच संचित आहे रे बाबांनो. जन्मदात्यांची सेवा हेच ईश्वरी कार्य आहे. माझा पांडुरंग फक्त मार्ग दाखवतो. कृपा करतो. पण त्याच्यापर्यंत जाण्यासाठी तुमचं आचरण शुद्धच हवं. बाकी पुराणातली वांगी पुराणात. लोकांच्या समाधानासाठी हे वाचलंच पाहिजे, पण जोडीने सत्यही सांगितलं पाहिजे.’’ ते असलं काही बोलू लागले की त्यांच्या वाणीला अद्भुत धार येई!

काळ बदलत गेला तशी गावाने कूस बदलली. हमरस्त्यात अनेकांच्या जमिनी गेल्या. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पसा आला. त्यातून खुन्नस वाढली. काहींनी दोन-तीन इमल्यांची घरे बांधली. तर सोपान जाधवांच्या पोरांनी भलंमोठं विठ्ठल मंदिर बांधलं. काही जुन्या-जाणत्यांनी त्यांना अडवून पाहिलं, पण पशापुढं शहाणपण चाललं नाही. नव्या मंदिरासाठी बाहेरून पंतोजी आले. त्यांची तिथंच राहण्याची सोय करण्यात आली. त्यांनी बारमाही सोवळंओवळं सुरू केलं. कर्मकांडांचे देखावे सुरू केले. धार्मिक नियम-रिवाज आणले. लोकांना त्याचं अप्रूप वाटलं. लोक भुलले. हळूहळू जुनं मंदिर ओस पडत गेलं. देखभालीअभावी ते जणू विजनवासात गेलं. नारायणकाका आणि वैजंताकाकूचं वयही दरम्यान वाढत गेलेलं. दोघंही थकले. पण त्यांनी आपल्या स्वभावधर्मात बदल केला नाही.

दरम्यान, काका-काकूंची मुलं शिकून मोठी झाली. चांगल्या नोकऱ्या मिळवून ती पुण्यात स्थायिक झाली. वर्ष-दोन वर्षांला त्यांचं गावात येणं होई तेव्हा ते आपल्या आईवडिलांना गाव सोडून आपल्याकडे येण्यास विनवीत. पण ते नकार देत. याच गावात आपण जन्मलो, वाढलो, सुखदु:खाचा ऊन-पाऊस झेलत जगलो, तेव्हा इथल्या मातीतच शेवट व्हायला हवा असं ते म्हणत. खिन्न मनाने मुलं त्यांचा निरोप घेत. काही वर्षांनी काकांचे भाऊबंद गावात यायचे बंद झाले. काकांची मुलेही आपापल्या संसारात रुतली. काकांचे नातू शिक्षणासाठी विदेशात गेले तेव्हा मुलांचंही येणं रोडावत गेलं. मुलांच्या मनीऑर्डरमध्ये मात्र खंड पडला नाही. परंतु काका-काकूंच्या दारी येणाऱ्या गरजू व्यक्तींसाठीच ती खर्ची पडे.

काका पुरते थकले तेव्हा नानू राऊत त्यांना पाणी आणून द्यायचा. आपल्या थरथरत्या हातांनी काकू काहीबाही रांधायच्या. दिवस त्यावर जायचा. सांज कलताच कंबरेत वाकलेल्या रूपेरी बायका आणि काही वठलेली सागवानी झाडं त्यांच्या अंगणात येऊन बसत. पडायला झालेल्या घराला साक्षी ठेवून जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पा तिथं झडत तेव्हा तुळशीपुढे तेवत असलेल्या मंद दिव्याचा प्रकाश त्यांच्या म्लान कांतीवर झळके. पिकल्या पानांचं मधुर गप्पाष्टक संपलं की तिथं एक उदासीनता दाटून येई. बाजलं टाकून त्यावर काका पडून राहत. झाडांच्या पानांमागून चांदणं त्यांच्या पडक्या घरात शिरे. कोनाडय़ात बसून अश्रू ढाळताना त्याला गहिवरून येई. तेव्हा वैजंताकाकूंचा सायमाखला हात काकांच्या डोक्यावरून फिरे. एकही शब्द न बोलता दोघांचे डोळे डबडबत. पलतीरावर तोरण बांधायला कोण आधी जाणार याची जणू ती मूकचर्चा असे! ते दोघं असे कासावीस झाले की कंबरेवर हात ठेवून उभे असलेले विठू-रखुमाई देवळाच्या चिरे ढासळलेल्या भिंतीआडून त्यांच्याकडे पाहून भावविभोर होत. काकांच्या पडझड झालेल्या घराचं अंगण शहारून जाई. बाक आलेला सोनचाफा अधिकच आत्ममग्न वाटे. मग ते दोन जीव एकमेकांच्या हातात हात गुंफून शांत पडून राहत..

पलतीरी आधी जाण्याची शर्यत वैजंताकाकूंनी जिंकली. तेव्हा गावाला वाटलं, आता नारायणकाका गाव सोडून पोरांकडे पुण्याला जाणार. पण काका गेले नाहीत. काकू गेल्यानंतर ते एकटे राहत. शून्यात नजर लावून तासन् तास बसून राहत. नव्या देवळातून स्पीकरवरून आरतीचा आवाज येताच नकळत टाळ्या वाजवत. पण त्याच वेळी डोळ्यांतून धारा वाहत. ‘कुलकर्णी म्हणजे बामन. मग हे इथं कुठून आले? गावाशी यांचा काय संबंध? ते आपल्या गावचे नाहीतच!’  नव्या पिढीच्या अशा चर्चा काकांच्या एकटय़ानं गावात राहिल्यामुळं थंड पडत गेल्या. काकांना मात्र या गोष्टीचं शल्य वाटे. ते म्हणत, ‘‘मी याच मातीतला आहे, हे माझा पांडुरंगच सिद्ध करेल. मला त्याची चिंता नाही.’’

आणि झालंही तसंच. काका गेले तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांचा परिवार विदेशात आपल्या मुलांपाशी होता. काकांच्या भावंडांनी गावात येण्यास नकार दिला. वारकरी भजनी मंडळ लावून त्यांची अंत्ययात्रा निघाली. ओढय़ाजवळच्या मसणवटीत त्यांची चिता रचली. ज्या नानू राऊतानं त्यांची अखेपर्यंत सेवा केली त्यानेच त्यांना अग्नी दिला. अंतिम क्षणी सगळं गावच त्यांचं कुटुंब झालं. नारायणकाकांची गावच्या मातीशी नाळ इतकी घट्ट होती, ती कुणालाच तोडता आली नाही. अगदी काळालादेखील नाही!

sameerbapu@gmail.com