‘लोकसत्ता- लोकांकिका’ स्पर्धेच्या निमित्तानं एकांकिका या रंगाविष्काराचा धांडोळा घेताना एकूणात स्पर्धेचा पंचनामा करणारे ‘फॅण्ड्री’कार नागराज मंजुळे यांचे भाषण..
‘लोकसत्ता-लोकांकिका’ पुणे केंद्राच्या स्पर्धाच्या समीक्षणाची जबाबदारी पार पाडताना मजा आली. खरं तर एकांकिका मी खूप वर्षांनी पाहत होतो. एकांकिका सादर करणाऱ्या व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या तरुणांचा उत्साह, जल्लोष, एकांकिका सुरू होण्यापूर्वीची त्यांची गडबड, प्रकाशयोजना, संगीत आणि तरुण ‘टॅलेंट’ या सर्व वातावरणाने मी भारावून गेलो आहे. एकांकिका पाहताना काही गोष्टी तीव्रतेने जाणवल्या आणि त्या इथे नमूद कराव्याशा वाटल्या. म्हणजे आमच्या गावच्या भाषेत.. आधी कडू, मग गोड.
आजचा विद्यार्थी किंवा तरुण सुट्टीवर असल्यासारखा वावरतो. त्याची स्वत:ची अशी वैचारिक भूमिका असत नाही. असलीच तर ती कुणावर तरी अवलंबून असते. त्यांच्या कलाकृतीमध्ये फार कमी वेळा सामाजिक बांधिलकी दिसून येते. वाचनही त्रोटक असल्याचे जाणवते.
आपण घराबाहेर आरसा न बघता पडलो तर कदाचित खूप गोंधळ होऊ शकतात. चेहऱ्याला काहीतरी लागलं असेल अथवा पोशाख व्यवस्थित नसेल तर आपलं हसं होऊ शकतं. म्हणूनच आपल्याकडे पारा-विकृत नसलेला आरसा असायला हवा; की जो आपलं खरं रूप नीट दाखवू शकेल. खरा मित्रसुद्धा पारा-विकृत नसलेल्या आरशासारखा आपल्याला आपल्या चुका  दाखवतो. एकदा का त्या चुका आपण दुरूस्त केल्या की आपण नीट व्यक्त होतो. कॉलेजातल्या विद्यार्थ्यांनी स्वत:ला खूप कठोरपणे तपासून पाहिलं पाहिजे. कौतुक तर तुमचं आहेच; पण माझी अशी धारणा आहे की, आपण कौतुकाने बिघडतो. याउलट, कुणी आपल्यावर टीका करत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपण मित्रांना चुकासुद्धा दाखवायला सांगितलं पाहिजे. ‘वा! बहोत बढिया.. छाँ गए गुरू!!’ म्हटलं की पुढे कुठेतरी जाऊन धडकण्याचीच शक्यता अधिक असते.
तुमचा  मित्र म्हणून मी तुमची सुरुवातीलाच माफी मागतो. पण मला जे वाटलं, जाणवलं, ते तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. मला एकांकिकेचे विषय वरवरचे वाटले. तुम्ही भारतात राहूनदेखील आपल्या विषयांकडे खूप दुरून पाहता. स्वत: निवडलेल्या विषयांबद्दलसुद्धा किमान माहिती  तुमच्याकडे होती. हे एसीमध्ये बसून उन्हाचं वर्णन केल्यासारखं आहे. एखादी एकांकिका असेल- किंवा खरं तर कोणतीही कलाकृती अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी बनते. तुम्ही जेलमधला अधिकारी दाखवला तर त्याची वेशभूषा, भाषा तशीच हवी. त्याच्या पायात काळे बूट असतील तर तो  हवालदार वाटू शकेल.लाल बूट असतील तर पीएसआय. तुम्ही म्हणत असाल, अमुकतमुक पदावरचा अधिकारी आणि त्याला दाखवत असाल भलतंच; तर प्रेक्षक म्हणून माझी दिशाभूल होते आणि मी आशय सोडून वेगळाच विचार करू लागतो. तुम्ही म्हणाल, माफ करा, थोडंफार चालतं; तर मात्र मी काही बोलू शकणार नाही. पण प्रेक्षक म्हणून नक्कीच माझी निराशा होईल.

जर तुम्ही ग्रामीण पाश्र्वभूमीवर आधारलेली कथा दाखवत असाल, तर तिथली भाषा मुळात नीट आणि तशीच बोलली गेली पाहिजे. बरं ग्रामीण बोलताय, तर कुठली बोलताय? कोल्हापूरची, विदर्भातली, सोलापुरातली, खान्देशी की आणखी कुठली? एकांकिकेत एकाच कुटुंबातील लोक वेगवेगळ्या भागातील ग्रामीण भाषा बोलत असताना दिसतात. तुम्ही जे कुटुंब, गाव उभं करताय, त्यांच्या भाषेमध्ये एकजीनसीपणा असणं अपेक्षित आहे. आपण जी भाषा बोलतो त्याला वास्तवाचे संदर्भ असायला हवेत.
कल्पनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोणतीही कल्पना ही दुरान्वये का होईना, पण वास्तवावर आधारित असते असं मला वाटतं. आता कोष्टी चावून एखादा स्पायडरमॅन कसा होऊ शकेल, किंवा ‘इन्सेप्शन’ चित्रपटात ‘वायर’ लावून आपण एकमेकांच्या स्वप्नात कसं जाऊ शकतो, या प्रश्नांना वैज्ञानिक उत्तर देत किंवा खऱ्या अर्थानं निर्थक ठरवत ते आपल्याला प्रचंड वेगळ्या जगात घेऊन जातात आणि तिथे ते आपल्याला त्यांच्या नियमांनी विचार करायला लावतात. म्हणूनच असं अनुभवसमृद्ध करणारं काही पाहिलं की आपण भारावून जातो. म्हणूनच माझं प्रेक्षक म्हणून असं म्हणणं आहे की, एक-दीड तास मी स्वत:ला फसवून घ्यायला येतो आणि तुम्ही मला नीट फसवलं नाही तर मला तुमचा राग येतो. मी आलोय तर त्या वेळेपुरतं तरी मला दुसरं कशाचं भान नाही राहिलं पाहिजे.
समोर दिसणारा, राबणारा शेतकरी जेव्हा मला स्वच्छ पांढऱ्या कपडय़ांत दिसतो, तेव्हा मी फसत नाही. मला कळतं, की याला नीट खुरपता येत नाही, याची भाषा चुकीची आहे. म्हणजे कला ही अशी गोष्ट आहे, की ज्यात ठगलं की मजा येते आणि नीट ठगलं नाही की राग येतो.
शेळीचा आवाज आणि शेळीचा आवाज काढणारा माणूस यातल्या कशाला आपण कला म्हणू? शेळी शेळीसारखं ओरडतेच, पण जेव्हा माणूस हुबेहूब शेळीसारखं ओरडतो तेव्हा आपल्याला मजा येते. हसायला येतं. तर आपण कशाचं तरी अनुकरण करतोय, कशाची तरी उभारणी करतोय, तर ती हुबेहूब करावी. तसं करण्यात आपला जोर कमी पडला तर ते हास्यास्पद होतं.
माहिती आणि ज्ञान यांत फरक आहे. एमपीएससी, यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण ‘हुशार’ म्हणू शकतो, कारण त्यांच्याकडे आपल्यापेक्षा माहितीचा साठा अधिक आहे. पण ज्ञान वेगळं आहे. आजकाल आपला सगळा शोध  ‘गुगल’च्या पायाशी येऊन थांबतो. आपण सगळे ‘नेट स्टडी’ करण्यात पटाईत झालो आहोत. पण इंटरनेटवर लोकांच्या जगण्याच्या सवयी, लकबी, त्यांची शैली यांचं निरीक्षण करता येईल का? लोकांच्या जगण्यात डोकावता येईल का? नक्कीच नाही. त्यासाठी  हिंडावं लागेल, लोकांना भेटावं लागेल, त्यांना वाचावं लागेल; तेव्हा कुठे ते आपल्या कलाकृतीत थोडंफार प्रतिबिंबित होईल.
आपण एकमेकांना प्रश्न विचारले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांना प्रश्न केले पाहिजेत. मित्रांनी एकमेकांना प्रश्न केले पाहिजेत. एकमेकांचं फक्त कौतुक करू नका. एकमेकांचे विचार तपासून घ्या. त्यातील चुका कठोरपणे दाखवा. त्या दुरूस्त करा. आणि एवढय़ा प्रचंड तयारीने समोर या, की बाकीचे अचंबित होतील. आणि आमच्याकडचे प्रश्न तुमच्यासाठी अपुरे ठरतील. फक्त आपण जे करू, ते अधिकाधिक उन्नत असेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहा.
आम्ही परीक्षक म्हणून दिलेला निर्णय हा आत्तापुरता अंतिम असला तरी तो कायमस्वरूपी नाही. कदाचित तुम्ही आमच्या अभिरुचीचे बळीही ठरू शकता. आम्ही ज्या चुका सांगितल्या त्या तुम्हाला पटल्या तर तुम्ही त्यावर विचार करून त्या दुरूस्त करू शकता. नाहीतर दुर्लक्ष करा, सोडून द्या. आमचंच बरोबर आहे, असंही तुम्ही म्हणू शकता. पुढे कदाचित तुम्ही बरोबर ठरला तर मला चुकीचं ठरायला आवडेल.
जसं मोहन आगाशे सर म्हणाले, की जे हरलेत त्यांना पुढच्या संघर्षांसाठी शुभेच्छा; आणि जिंकलेत त्यांनी मराठी नाटय़भूमीची सर्व जबाबदारी तुमच्याच खांद्यावर येऊन पडलीय अशा आविर्भावात जगू नये. तुम्ही सर्व चांगले कलाकार आहात. तुमच्यात खूप शक्यता आहेत. खरं तर सगळ्यांच्यातच शक्यता असतात; फक्त त्या तावूनसुलाखून बघितल्या पाहिजेत. बीज कणखर आहे, पण ते योग्य ठिकाणी पेरलं पाहिजे. दगडावर पेरून पाणी घातलं तर बीज कितीही चांगलं असलं तरी ते उगवणार नाही. योग्य बीज, योग्य माती यांचा संगम झाला तर तुम्ही वृक्षासारखे भरभरून तरारून जाल. या तरारण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा!    

devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
Story img Loader