नामदेव ढसाळांची कविता वाचताना पहिल्याच वाचनात वाचकांना दोन गोष्टी झपाटून टाकतात : एक म्हणजे त्यांची भयंकर प्रपातासारखी शक्तिशाली, आगळीवेगळी भाषा.. आणि दुसरं- त्यांचं अफाट आणि सर्वसामान्य वाचकांना अपरिचित असलेलं अनुभवविश्व. बा. सी. मर्ढेकरांनंतर मराठी कवितेला, कवितेच्या आशय-संरचना-रूप-भाषेला, अभिरुचीला नवीन वळण देणाऱ्या ढसाळांच्या कवितेचं वेगळेपण, श्रेष्ठत्व आणि तिची महता सांगणारा विशेष लेख.. त्यांच्या लघुनियतकालिकांच्या चळवळीतल्या सहकारी मित्रानं लिहिलेला !
नामदेव ढसाळ गेल्यानंतर अनेक आठवणींनी गर्दी केली. त्यातील एक आठवण ग्वाल्हेरची आहे. मध्यप्रदेश हिंदी साहित्य परिषदेच्या वतीनं मार्च १९८१च्या अखेरच्या आठवडय़ात ग्वाल्हेर इथं मराठीतील दलित कवितेवर एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुदीप बानर्जीनं ते आयोजित केलं होतं. सुदीप त्या वेळी तिशीत होता, भारतीय प्रशासनिक सेवेत होता, मध्यप्रदेशच्या संस्कृती विभागाचा सचिव होता, स्वत: उत्तम हिंदी कवी-नाटककार होता, आणि आरंभापासूनच वामपंथी विचारांची बांधीलकी मानणारा संवेदनशील लेखक होता. दलित कवितेवरचं महाराष्ट्राबाहेरचं, हिंदी भाषेतलं ते पहिलंच आयोजन होतं. त्या आयोजनात हिंदी-मराठीतले अनेक नामवंत लेखक होते. मराठी लेखकांपैकी दया पवार, चंद्रशेखर जहागिरदार, म. म. देशपांडे, मी होतो. दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ येऊ शकले नाहीत, पण चित्रेंनी आपला निबंध पाठवला होता. हिंदीतून त्रिलोचनजी, चंद्रकांत देवताले, ज्ञानरंजन, भगवत रावत, प्रभात त्रिपाठी, प्रयाग शुक्ल इत्यादी अनेक आघाडीचे लेखक होते. त्या वेळी हिंदीवाल्यांनी अतिशय आस्थेनं मराठीतली दलित कविता समजावून घेतली. जेव्हा एका सत्रात मराठीतल्या २०-२५ कवितांची हिंदी भाषांतरं वाचली गेली तेव्हा सगळ्या कवितांत नामदेव ढसाळच्या कवितांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याच्या आणखी कवितांची भाषांतरं वाचण्याचा आग्रह झाला. चर्चाही फार सखोल, व्यासंगपूर्ण झाल्या. त्यातही नामदेवलाच मध्यवर्ती स्थान मिळालं. त्रिलोचनजींसारखा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी दलित कवितेचा कट्टर समर्थक बनला. हिंदी साहित्यजगात खूप चर्चा झाली. यातूनच पुढं हिंदीवरून नामदेवच्या कवितांची मल्यालम, तमिळ, कन्नड, बंगाली, पंजाबी इत्यादी भाषांत भाषांतरं झाली आणि नामदेवची कविता मराठीच्या मर्यादा ओलांडून समकालीन भारतीय कवितेच्या व्यापक पटावर गेली.
सुदीप बानर्जी त्या वेळी मध्यप्रदेश साहित्य परिषदेच्या ‘साक्षात्कार’ या नियतकालिकाचा संपादकही होता. त्यानं ‘साक्षात्कार’च्या पुढच्या अंकात नामदेवच्या काही कवितांची हिंदी भाषांतरं छापली. ती खूप वादळी ठरली. त्यातल्या ‘भूख’ या कवितेत आणि दुसऱ्या एका ‘पाणी’ या कवितेत अस्सल शिव्या आणि तथाकथित अशिष्ट भाषा होती. त्यामुळे काही ‘संस्कृती संरक्षक’ भयंकर चिडले. ‘साक्षात्कार’ हे एका परीनं शासनाचंच नियतकालिक होतं. त्यामुळे नामदेवच्या कवितांच्या विरोधात काही ‘संस्कृती संरक्षक’ आमदारांनी विधानसभेत चर्चा उपस्थित केली. त्या वेळचे मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांनी त्यावर समर्पक उत्तरं देऊन विरोधकांना गप्प केलं. याचीही बरीच चर्चा झाली, आणि नामदेवच्या कवितांना हिंदी साहित्यात पुन्हा एकदा महत्त्वाचं स्थान मिळालं. नामदेवच्या कवितांत असं काय होतं की त्यामुळे त्यांना एवढं महत्त्व प्राप्त झालं?
नामदेवची कविता वाचताना पहिल्याच वाचनात वाचकांना दोन गोष्टी झपाटून टाकतात : एक म्हणजे त्याची भयंकर प्रपातासारखी शक्तिशाली, आगळीवेगळी भाषा, आणि दुसरं, त्याचं अफाट आणि सर्वसामान्य वाचकांना अपरिचित असलेलं अनुभवविश्व. या दोन्ही गोष्टींच्या खोलात शिरण्यापूर्वी त्यामागची पाश्र्वभूमी लक्षात घेतली पाहिजे.
नामदेवचा पहिला कवितासंग्रह ‘गोलपिठा’ १९७१ मध्ये प्रकाशित झाला. त्यातल्या कविता साठच्या दशकातच लिहिलेल्या होत्या. मराठी साहित्यात साठचं दशक हे लघुनियतकालिकांच्या चळवळीचं होतं. यातल्या अशोक शहाणे, राजा ढाले, मनोहर ओक, अरुण कोलटकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, सतीश काळसेकर, तुळशी परब, वसंत गुर्जर इत्यादींशी नामदेवचे संबंध होते. नामदेव स्वत:ही ‘विद्रोह’ नावाचं लघुनियतकालिक काढत होता. लघुनियतकालिकांची चळवळ प्रस्थापितांच्या विरोधातला विद्रोह होता. हा लढा वाङ्मयीन साहित्याच्या विरोधात असल्यामुळे साहजिकच साहित्याचं माध्यम असलेली भाषा हे प्रमुख लक्ष्य बनलं. प्रस्थापितांची भाषा त्या वेळी मध्यवर्गीय संवेदनांनी भरलेली, रूढीग्रस्त, रोमँटिक, काव्यात्म म्हणजे छद्मकाव्यात्म, प्रत्यक्ष जगण्यातील दाहक अनुभवांऐवजी अलंकरणावर भर देणारी, ग्रंथोपजीवी होती. त्यात सर्वसमावेशकता नव्हती. खूप बंधनं होती, आणि खूप निषिद्धता होत्या. लघुनियतकालिकांनी प्रत्यक्ष जगण्यातल्या अनुभवांवर भर दिला, कुठलेही अनुभव निषिद्ध मानले नाहीत, भाषेवरची शिष्टसंमत बंधनं झुगारून लावली, सर्वसामान्यांची, दलित-शोषित-वंचितांची भाषा आणि जीवनानुभव आहेत तसे, जाडेभरडे, कुठल्याही कलाकुसरीशिवाय मांडण्याचं धैर्य दिलं. सर्वसामान्यांना साहित्यनिर्मितीची दारं उघडून आपल्यालाही अस्तित्व आहे याचा आत्मविश्वास दिला. भाऊ पाध्येच्या ‘वासूनाका’नं, मनोहर ओकच्या काही कवितांनी आणि ‘चरसी’ कादंबरीनं, अरुण कोलटकरच्या ‘मैं मॅनेजर को बोला’सारख्या कवितांनी, अशोक शहाणे-रघू दंडवतेच्या भाषेनं, भालचंद्र नेमाडेच्या ‘कोसला’नं भाषिक कोंडी फोडली होती, आणि एका अर्थानं भाषेचं पुरोभूमीकरण व अपरिचितीकरण केलं होतं. पण नामदेवच्या कवितांत निव्वळ दलित-शोषितांच्या जगण्यातील भाषेचा जसाच्या तसा वापर एवढंच नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाषा नेणिवेतून आलेली आहे. सगळ्याच अस्सल कवितांची भाषा नेणिवेतूनच येत असते. अनुभवांचं सखोल आणि तीव्र चिंतनातून जाणं त्यासाठी आवश्यक असतं. अनुभवांचं आंतरिकीकरण झालं की शब्दांचं अपरिचित संघटन होतं, आणि अबोध मनातून भाषा उसळून येते. बा. सी. मर्ढेकरांनंतर मराठी कवितेला, कवितेच्या आशय-संरचना-रूप-भाषेला, अभिरुचीला नवीन वळण देणारे तीनच महत्त्वाचे कवी आहेत, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर आणि नामदेव ढसाळ. तिघांचीही कविता अगदी वेगवेगळी, स्वयंभू आहे, पण तिघांच्याही कवितांच्या भाषेचा जन्म नेणिवेतूनच झालेला आहे.
शैलीशास्त्राच्या दृष्टीनं नामदेवच्या कवितांची शैली जवळिकीची आहे, सहज संवाद साधणारी आहे, आत्मीय आहे. ‘गोलपिठा’तल्या काय किंवा नंतरच्या संग्रहातल्या कविता काय, सगळ्याच कवितांमधून सर्वनामांचं आधिक्य आहे. सर्वनामं इथं तृतीय पुरुषीपेक्षा प्रथम पुरुषी आणि द्वितीय पुरुषीच अधिक आहेत. सर्वनामांचा असा वापर हाही लघुनियतकालिकातल्या कवितांचीच देन आहे. मात्र ‘मी-तू-आम्ही-आपण-तुम्ही’ला व्यक्तिकेंद्रित किनारच जास्त होती. नामदेवच्या कवितांत ‘मी-तू’चं संक्रमण ‘आम्ही-तुम्ही’मधून व्यक्तिकेंद्रिततेकडून सामाजिकतेकडे होतं. नामदेवच्या कवितांचं लघुनियतकालिकांतल्या कवितांपेक्षा वेगळेपण इथं दिसतं. या कवितांतलं ‘आम्ही-तुम्ही’ ‘मी-तू’चं संक्रमण असल्यामुळे ते इतर दलित कवींमधील कवितांसारखं निव्वळ अमूर्त, अनुभवहीन वाटत नाही.
पण निव्वळ भाषेपुरतंच नामदेवच्या कवितांचं मोठेपण मर्यादित नाही. नामदेव आपल्या कवितांतून ज्या आशयाची निर्मिती करतो तोही लक्षणीय आहे. त्याचीही पाश्र्वभूमी महत्त्वाची आहे. नामदेव आपल्या विकसनशील वयात मुंबईच्या महानगरीय अधोविश्वात अत्यंत तीव्रतेनं जगला. संवेदनशीलता सतत जागी ठेवून त्यानं त्या विश्वातली सगळी स्पंदनं तीव्रतेनं टिपली. या वेळी त्याची चौकस बुद्धी, कुतूहल यातून स्वत:च्या आयुष्याबद्दलचे, आजूबाजूच्या विश्वातले सगळे विसंवाद, सगळी विषमता जगण्यातली मूल्यहीन धडपड त्याला प्रश्नांच्या जाळ्यात अडकवत होती. त्याला मूलभूत प्रश्न पडले. आणि ते दिवसेंदिवस अधिकच जटिल होत गेले. कुठल्याही अस्सल साहित्याचा जन्म नेहमी अशा प्रश्नांमधून, साशंकतेतूनच होत असतो. एरवी निव्वळ वर्णनात्मकताच उरते. त्यात सर्जनाच्या शक्यता नसतात. नामदेवनं आपल्या जीवनसंघर्षांत खूप वाचलं. कवितेबद्दल बोलायचं तर मराठी कवितेची संतकविता-शाहिरी परंपरा-विसाव्या शतकातली आधुनिक कविता वाचली, लोककविता वाचली. अगदी सूक्ष्मपणे वाचली. त्याच्या खाणखुणा नामदेवच्या कवितांमधून ठायी ठायी दिसतात. प्रस्थापितांचं साहित्य वाचताना त्याला जाणवलं की जे तो जगला होता, जगत होता, ते सगळे अनुभव प्रस्थापितांनी निषिद्ध मानले होते. ते अभिव्यक्त करण्याचं, ती भाषा ठासून मांडण्याचं धैर्य त्यानं मांडलं. प्रस्थापित साहित्याचे सगळे कायदाकानू, संकेत त्यानं मोडीत काढले. त्याच्यासमोर रस्ता होता तो लघुपत्रिकावाल्यांचा आणि बाबूराव बागूलसारख्या अस्सल लेखकाचा. त्यामुळे त्याची कविता फारशी खळबळ न करता मध्यप्रवाहात दाखल झाली. त्याच्या आधी जी खळबळ झाली, जे धक्के बसले ते भाऊ पाध्ये-अरुण कोलटकर-लघुपत्रिकावाल्यांनी पचवलेच होते. अर्थात नामदेवला धक्के बसलेच नाहीत असं नाही. पण नामदेवच्या प्रकृतीत त्याकडे लक्ष देणं बसत नव्हतं. आणखी एक म्हणजे त्याचं वाचन केवळ मराठीपुरतं मर्यादित नव्हतं. फारसं शिक्षण न झालेल्या नामदेवनं विश्वकवितेचीही माहिती करून घेतली. अमिरी बराका (ल राय जोन्स) सारख्या प्रखर विद्रोही आफ्रिकन-अमेरिकन कवीच्या कवितांचा आणि ब्लॅक पँथर चळवळीतल्या लेखनाचा त्याला चांगलाच परिचय होता. निव्वळ परिचय असून जीवनदृष्टी तयार होत नाही. त्यासाठी सखोल चिंतनाची गरज असते, आणि ते नामदेवकडे होतं. त्याच्या चिंतनाचा आवाका वाढत गेला तसं त्याला ‘गोलपिठा’तल्या भाषेतून बाहेर येणं अपरिहार्य वाटू लागलं असावं. ‘गोलपिठा’तली भाषा त्याला व्यापक चिंतनाला अपुरी वाटू लागली. म्हणूनच नंतर त्यानं प्रमाण भाषेचा वापर वाढवत नेला, आणि प्रमाण भाषेलाही व्यापक परिमाण दिलं.
नामदेवची एकूण कविता पाहता तिच्यात सतत विकसित झालेली, आणि ती अधिकाधिक प्रगल्भ होताना दिसते. आरंभीच्या संग्रहात त्याची दलितत्वाची जाणीव व्यक्त झालेली आहे. ‘गोलपिठा’ हा पहिलाच संग्रह त्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. त्यातली ‘पाणी’ ही अप्रतिम कविता लक्षात घ्यावी लागेल. त्यातल्या खालील ओळी बघा :
हे छळकऱ्यांनो
पाण्यासारखं सुंदर कर्तव्य दुसरं कुठलंच नस्तं जगात
पाणीटंचाई आली तर
तुम्ही शर्टासारखी शहरं बदलता
मग सांगा पाण्यावाचून तडफडून मरणारांनी
काय बदलावं
दलितत्वाच्या जाणिवेतून वर्ण आणि वर्गाची जाणीव होते. वर्ण हे धर्मसत्तेचं आणि वर्ग हे अर्थसत्तेचं वर्तुळ आहे. दलितांना बंदिस्त करणारी ही दोन वास्तवं आहेत. लोकशाहीनं दिलेल्या अभिवचनातून या दोन्ही बंदिवासातून दलित मुक्त होतील असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळून कित्येक र्वष लोटली तरी तसं काही घडलं नाही. अप्रत्यक्षरीत्या धर्मसत्ताही आर्थिक शोषणावरच आधारित आहे याची जाणीव नामदेवला साम्यवादी विचारधारेकडे घेऊन गेली. त्याचा हा प्रवास त्याच्या ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले’ या दुसऱ्या संग्रहात स्पष्ट दिसतो. या संग्रहातल्या ‘कुत्रा आणि प्रजासत्ताकाचे गाणे,’ ‘व्हायलन्सचे झाड’ अशा कवितांतून तो प्रभावीपणे दिसतो. त्याच्या पुढचा टप्पा डॉ. आंबेडकरांच्या विचारधारेचा आहे. डॉ. आंबेडकरांवर तर त्यानं अनेक कविता लिहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या काळात लिहिलेल्या या कवितांमधली पहिली ‘डॉ. आंबेडकर’ ही कविता ‘गोलपिठा’त आहे. आणि अशा सगळ्या कविता (सुमारे १३) ‘तुझे बोट धरून चाललो आहे’ या संग्रहात संकलित झालेल्या आहेत.
डॉ. आंबेडकरांच्या विचारधारेसोबतच त्याच्या काव्यप्रवासात पुढचा टप्पा आला तो बौद्धदर्शनाचा. मृत्यूवरील नामदेवच्या चिंतनात त्याचा एक कोन दिसून येतो. नामदेव स्वत:ला नास्तिक समजत होता असे त्याच्या कवितांतून उल्लेख आलेले आहेत. मात्र बौद्धदर्शनातील अनेक संदर्भ त्याच्या ‘निर्वाणा अगोदरची पीडा’ या अखेरच्या संग्रहात जागोजागी दिसून येतात. उदाहरणार्थ, ‘यथा दीपो निवास्ततो’, ‘गरिबांच्या नागार्जुना’, ‘सम्यक’, ‘निर्वाण’, ‘सर्व क्षणिकम्’, ‘सर्व धर्म अनित्य’, ‘निर्वाणतृष्णेचा क्षय’, ‘क्षणिकम् आहे दु:ख’, ‘प्रतित्य समुत्पाद’, ‘आष्टांगक’, ‘अव्याकृते’, ‘बारा निदाने’ इत्यादी इत्यादी. अशा रीतीने त्याचा काव्यप्रवास दलितत्वाची जाणीव- साम्यवाद- आंबेडकरवाद- बौद्धवाद असा झालेला आहे. एका परीनं आवर्तात सापडलेल्या दलित साहित्याला नवं रूप घेऊन बाहेर यायचं असेल तर मार्क्स- डॉ. आंबेडकर-बुद्ध यांच्या विचारांच्या समन्वयातच रस्ता सापडू शकेल, असंच नामदेवनं ‘निर्वाणा आगोदरची पीडा’मधून सुचवलेलं आहे.
‘निर्वाणा आगेदरची पीडा’ हा नामदेवचा सगळ्यात प्रगल्भ संग्रह आहे. या संग्रहाचा आवाका खूपच मोठा आहे. सर्वसामान्यांचं दैन्य, दु:ख, दारिद्रय़, जीवनसंघर्ष दिवसेंदिवस वाढतोच आहे. दलित-शोषित-वंचितांसोबतच ‘नाही रे’चा वर्ग वाढतो आहे. विषमतेच्या मुळाशी स्वार्थ लोलुपता, सत्तास्पर्धा, वर्ण-वर्गाचा नव्यानं होणारा उद्रेक वाढतो आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील श्रीमंत राष्ट्रांकडून गरीब राष्ट्रांचं सहजासहजी लक्षात न येणारं शोषण वाढतं आहे. पर्यावरणाचा ऱ्हास वाढतो आहे. जागतिकीकरणाचा विषारी विळखा वाढतो आहे. मॉल्सची मायावी सत्ता वाढते आहे. ही एक दीर्घ साखळी आहे, आणि त्या साखळीतील सर्वच घटकांचा विचार ‘निर्वाणा अगोदरची पीडा’मध्ये प्रकर्षांनं, प्रभावीपणे आणि काव्यात्म संतुलन ढळू न देणाऱ्या भाषिक सामर्थ्यांतून व्यक्त झालेला आहे.
नामदेवचा प्रवास एकूण चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा आहे. त्याचे आतापर्यंत एकूण नऊ संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्याच्या सर्व संग्रहांत सातत्य आहे, प्रखर सामाजिक जाणिवा आहेत आणि व्यक्तिकेंद्रित दु:खाचा उद्रेक आहे. या संग्रहांत ‘खेळ’ हा संग्रह एकदम वेगळा वाटतो. त्यातल्या अखेरच्या मुंबईवरच्या कवितेतही सामाजिक जाणीव आहेच. पण या संग्रहातील सर्वच कविता यौनभावाशी, सुरताशी आणि संभोगाशी निगडित आहेत. पण यौनभावाचं समान सूत्र असूनही यौनभावाकडे बघण्याच्या आपल्या विशिष्ट दृष्टिकोनामुळे नामदेव आणि चित्रे विरुद्ध ध्रुवावर उभे असल्याचं दिसतं. शिव आणि शक्तीच्या अद्वैताशी नातं जोडून चित्रे देहाच्याच साहाय्यानं देहातीत होण्याची कामना करतात आणि भारतीय परंपरेतल्या शैवदर्शनाचा परिचय देतात, तर नामदेव संभोगाच्या क्षणीही देहाला आणि स्त्रीच्या मानवी अस्तित्वाला विसरत नाही, आणि यौनभावातून अज्ञातात झेप घेण्याचं टाळतो. चित्रेप्रमाणेच नामदेवची समानसूत्रता मनोहर ओकच्या कवितांमध्येही असू शकते. दोघांनीही मुंबईच्या अधोविश्वावरच्या अनुभवांवर विलक्षण भाषेशी, शब्दांशी लडिवाळपणा करीत खेळ केलेला आहे. पण तरीही त्यांच्या कवितांत एक मूलभूत फरक आहे. ‘शब्दांच्याच नजाकतीला भुलणं शोभत नाही रे’ असं लिहिणारा नामदेव अधोविश्वातच वाढलेला, अधोविश्वाचा एक घटक असल्यासारखा ‘आतला’ माणूस आहे, म्हणून त्याचं अनुभवविश्व अधिक समृद्ध, गहन आणि प्रामाणिक आहे. याउलट मनोहर ओक अधोविश्वात ‘बाहेरचाच’ राहतो. त्यामुळे त्याला अनुभवांपेक्षा भाषेवर जास्त भर द्यावा लागतो.
निर्वाणा अगोदरची पीडा सहजपणे झेलून मरणाला धीरोदात्तपणे सामोरं जाणारा नामदेव ढसाळ आणि त्याच्याप्रमाणेच मर्ढेकरोत्तर मराठी कवितेला वळण देणारे दिलीप पुरुषोत्तम चित्रे व अरुण कोलटकर या तिन्ही कवींना कर्करोगालाच बळी पडावं लागणं, हा एक विचित्र योगायोग असाला तरी कवितेवर प्रेम करणाऱ्या असंख्य रसिक वाचकांसाठी तो एक दु:खद अनुभव आहे.
अस्वस्थ कवीच्या निर्वाणानंतर…
नामदेव ढसाळांची कविता वाचताना पहिल्याच वाचनात वाचकांना दोन गोष्टी झपाटून टाकतात : एक म्हणजे त्यांची भयंकर प्रपातासारखी शक्तिशाली, आगळीवेगळी भाषा.. आणि दुसरं- त्यांचं अफाट आणि...
First published on: 26-01-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namdeo dhasal