आपल्या कवितेनं मराठी साहित्याला, मराठी समाजाला हलवून सोडणारे, ‘दलित पँथर’ची स्थापना करणारे बंडखोर कवी आणि लढाऊ कार्यकर्ते नामदेव ढसाळ यांना ‘दलित कवी’ म्हणणं हे त्यांच्यावर अन्याय करणारं आहे, तसंच आपलं न्यूनत्व दाखवणारंही. ढसाळ हे कवी म्हणून केवळ मराठीच नव्हे तर भारतीय आणि जागतिक पातळीवरही महत्त्वाचं नाव आहे. ढसाळांच्या राजकीय भूमिका वादग्रस्त ठरल्या असल्या तरी त्यांची कविता मात्र नेहमीच अस्सल राहिली. त्यातून त्यांनी समष्टीच्या कल्याणाचीच चिंता केली. जातीअंतासाठी लढणाऱ्या ढसाळ यांच्याविषयी त्यांच्या जिवलग कवीमित्रानं लिहिलेला विशेष लेख..
आपल्याहून धाकटय़ाचं मरण हे खूप क्लेशदायक असतं. मी ७१ वर्षांचा असताना ६४ वर्षांच्या नामदेवचं निधन पचवणं कठीण आहे. नामदेवच्या मृत्यूने बसलेला धक्का हा तसा जबरदस्त आहे. त्याची कारणं काहीशी व्यक्तिगत आहेत. नामदेव माझा ४० हून अधिक वर्षांचा मित्र. त्याच्या कळत्या वयापासून ते शेवटपर्यंत आमची मैत्री अतूट राहिली. राजकीय पातळीवर अनेक मतभेद असतानाही त्याने ते कधीही आमच्या दोघांच्या प्रेमाआड येऊ दिले नाहीत. नामदेव हा केवळ माझा साहित्यविश्वातला वा चळवळीतला मित्र होता असं नाही, तर तो माझ्या कुटुंबाचा मित्र होता. आमच्या दोघांच्या आयुष्यातल्या सगळ्या सुख-दु:खाच्या दिवसांत आम्ही परस्परांच्या निकट राहिलो. नामदेवला त्याच्या आजारपणाच्या काळात मी शक्यतो भेटायचं टाळत असे. याचं कारण मला माझ्या मित्रांच्या आजाराविषयी त्यांच्याशी बोलणं फारसं रुचायचं नाही. पण तरीही त्याची पत्नी मलिकामार्फत किंवा त्याच्या स्वत:च्या खासगी ड्रायव्हरमार्फत आणि मित्रांमार्फतमी त्याची चौकशी करत असे. काही दिवसांपूर्वीच मलिकानं त्याची प्रकृती चांगली असल्याची आणि तो शस्त्रक्रियेमधून यशस्वीपणे बाहेर आल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे मी काहीसा सुखावलोही होतो आणि अचानक त्याच्या मृत्यूची बातमीच आली.
नामदेवच्या राजकीय आणि साहित्यिक अशा सगळ्या आयुष्याचं तपशीलवार आणि अचूक विवेचन करणं या घडीला कठीण आहे, पण तरीही काही गोष्टींचा उल्लेख करायला हवा.
त्याचा फोन आला किंवा मी त्याला केला की पहिल्यांदा ‘कॉम्रेड, लाल सलाम, जयभीम’ अशी हाक पलीकडून कानावर यायची. ती इथून पुढे येणार नाही. आता त्याचा फोनही येणार नाही आणि मलाही त्याला करता येणार नाही. त्यानं त्याचे कवितासंग्रह वा अन्य लेखन मला देताना नेहमी ‘कॉम्रेड सतीश’ असा माझा उल्लेख केला आहे. काही वेळा ‘जिवलग’, काही वेळ ‘मित्रवर्य’ या संबोधनानं, तर काही वेळा आम्हा दोघा पती-पत्नींना आदरपूर्वक आपली पुस्तकं भेट दिली आहेत. त्याला पद्मश्री जाहीर झाली, त्या वेळी तो सन्मान स्वीकारण्यासाठी त्याच्यासोबत मी आणि केशव मेश्राम  दिल्लीला गेलो होतो. तेव्हा तीन दिवस हॉटेलमध्ये त्याच्या बरोबरच होतो. मी त्याच्यासोबत अनेक वेळा प्रवास केला आहे आणि त्या प्रत्येक प्रवासात त्याच्यावरचं इतरांचं प्रेम आणि त्याचं इतरांवरचं प्रेम अनुभवलं आहे.
जुलै-ऑगस्ट, १९९७चा ‘अनुष्टुभ’ अंक नामदेव ढसाळ विशेषांक आहे. त्यात मी आणि प्रज्ञा दया पवारनं त्याची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. ती काही कारणानं पूर्ण रूपात त्या अंकात प्रकाशित होऊ शकली नाही. पण नामदेवनं त्या मुलाखतीचा उपयोग ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ या कवितासंग्रहात केला. या संग्रहाच्या कामात मी आणि प्रज्ञा दोघांनीही त्याच्याबरोबर संध्याकाळपासून उत्तररात्रीपर्यंत एकत्र काम केलं होतं. या संग्रहात त्याच्या कवितेतील जवळपास सगळी स्थित्यंतरं (निदान २००७ पर्यंत) पाहायला मिळतात, जाणवतात.
‘गोलपिठा’पासून अगदी आता आताच्या ‘निर्वाणा अगोदरची पीडा’, ‘चिंध्यांची देवी आणि इतर कविता’पर्यंत त्याची कविता प्रत्येक संग्रहात पुढे गेलेली दिसते. त्याचा जातिअंताचा आणि शोषितांसाठीचा लढा हा आमच्या दोघांतला मोठाच दुवा होता. निदान आमच्या आरंभीच्या काळात ते आम्हा दोघांचंही मिशन होतं.
विशेषत: १९७०पासून ८०पर्यंतचा काळ हा लघुनियतकालिकांच्या प्रस्थापित विरोधी चळवळीचा काळ आहे. या काळात नामदेवनं आपला जातिअंताचा अजेंडा कधीही सोडला नाही. खरं तर या आरंभीच्या काळात आमच्या जाती कधी आडव्या आल्या नाहीत. जातींना वेगळ्या अंगानं उठाव मिळण्याचा काळ हा १९८०-९०च्या दशकापासून सुरू होतो. आता त्या तपशिलात जाण्याची गरज नाही. परंतु ही गोष्ट नमूद करायला हवी- आम्ही कोणीही निदान त्या काळात जातीचा उच्चार कधीही केला नाही.
‘लघुअनियतकालिकांच्या चळवळीतला शेवटचा मालुसरा’ असा मी नामदेवचा पूर्वी उल्लेख केला आहे. नामदेवची लघुअनियतकालिकांच्या चळवळीतली भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. विशेषत: त्यानं आपल्या उभारीच्या काळातली सगळी र्वष या चळवळीशी जोडून घेतली आहेत. त्यामुळेच त्याची कविता ही कोणत्याही छोटय़ा आणि सशक्त असलेल्या कप्प्यामध्ये बंद करता येणार नाही. त्याचं साहित्यिक कर्तृत्व हे मराठी भाषेच्या मोठय़ा पटावरच विचारात घ्यायला हवं. आणि हेही नोंदवायला हवं की, तो फक्त मराठीतलाच नाही तर भारतातला आणि जगातलाही एक महत्त्वाचा कवी आहे.
आम्ही एकत्रच चळवळी केल्या. त्यात आम्ही नेहमीच बरोबरीने राहिलो. त्यानं आयोजित केलेलं लघुनियतकालिकांविषयीचं तीन दिवसीय चर्चासत्र असो किंवा आंतरराष्ट्रीय कविता उत्सव असो किंवा स्मशानात वाचायच्या कविता असो, आम्ही नेहमीच सोबत राहिलो.
कविता आणि माणूस.. त्यातही ढसाळसारखा माणूस आणि त्याची कविता ही खूपच गुंतागुंतीची आणि अतिशय जबाबदारीनं समजून घेण्याची गोष्ट आहे. काही प्रमाणात तसे प्रयत्नही झाले, पण ते पुरेसे नाहीत. विशेषत: त्याची कविता आणि त्याचं राजकीय वर्तन यांचा सांधा कसा लावावा, हा प्रश्न अनेकांसमोर असतो. या संदर्भातली चर्चा बऱ्याचदा झालेली आहे. अर्थात त्याचं राजकीय वर्तन आणि त्याची कविता यांचं एकास एक असं नातं सांगता आलं नाही तरीही त्यातली सुज्ञता समजून घ्यायला हवी. कवितेत नामदेव नितांत प्रामाणिक आहे. राजकीय वर्तनातही त्याचं वरवरचं दुभंगलेपण दिसत असलं तरी अंतत: त्यानं आपला सर्वहाराचा लढा आणि शोषितांविरुद्धचा सर्वागीण संघर्ष कधीही कवितेतून नजेरआड केला नाही. हे त्याचा कोणताही संग्रह समोर ठेवला तरी कळतं. आता प्रश्न उरतो, तो त्याच्या राजकीय वर्तनातल्या विसंगत बाबींविषयी. त्या संदर्भात काही जाणकार समविचारी मित्रांना हे सगळं तपशिलात जाऊन सांगावं अशी विनंती केली होती, पण ते काम अजून झालेलं नाही. मला एक धागा दिसतो आणि ज्याचा मी तपास घेतो आहे- तो म्हणजे नामदेव ज्या जातिव्यवस्थेतून, ज्या शोषित, तळागाळातल्या वर्गातून, ज्या गोलपिठय़ाच्या अंडरवर्ल्डशी संबंधित वावरातून वाढला, त्याचा विचार करताना ‘लुम्पेन प्रोलेटेरियट’ या संकल्पनेच्या जवळ जाऊन शोध घ्यावा लागेल. पण हे कठीण काम अजून तरी झालेलं नाही. त्यामुळेच नामदेवच्या वरवर वाटणाऱ्या राजकीय वर्तनातल्या कोलांटउडय़ा पार करत आपल्याला त्याकडे पाहावं लागणार आहे. आणि हे जर आपण नीटपणे केलं नाही तर याही पुढल्या काळात इतर अनेक ढसाळांच्या बाबतीत आपल्या चुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच  ‘लुम्पेन प्रोलेटेरियट’ची क्रांतीमधील भूमिका काय असू शकते किंवा तो त्याच्या वर्गजाणिवेपासून कसा विचलित होतो, का होतो याचा थांग आपल्याला लागणार नाही.
मी आपल्यापरीनं नामदेवला त्याच्या कवितांमधून समजून घेण्याचा प्रयत्न करत आलो आहे. ‘चिंध्यांची देवी आणि इतर कविता’ या त्याच्या अगदी अलीकडच्या संग्रहात मी त्याची पाठराखण (ब्लर्ब) करताना हे काही प्रमाणात व्यक्त केलंही आहे. त्याचा अधिक तपशिलात जाऊन विचार करण्याचा माझा इरादाही आहे. पण माझ्यापाशी तितकी बौद्धिक क्षमता आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे हे काम डाव्या विचाराशी संबंधित आणि अधिक बौद्धिक क्षमता असलेल्या मित्रांनी करायला हवं.
‘गोलपिठा’ किंवा ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले’ किंवा ‘आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी’ या कवितासंग्रहातील कवितेत, किंबहुना सगळ्याच कवितेत त्याचा सर्वहारा वर्गात सर्व जातीजमाती, कष्टकरी, शेतकरी या सगळ्यांना सामावून घेण्याचाच प्रयत्न आहे. त्याच्या एका लेखसंग्रहाचं नावही- ‘सर्व काही समष्टीसाठी’ असं आहे. त्यामुळे नेहमीच्या आपल्या पठडीतल्या अर्थानं नामदेव विशिष्ट जातीतल्या लोकांच्या शोषणाविषयी बोलतो असं म्हणता येत नाही. नामदेवनं स्वत:ही त्याच्या ‘दलित पँथर’संदर्भातल्या लेखनात, मुलाखतींतून आणि अन्य लेखनात स्पष्टपणे सांगितलं आहे. नामदेवला ‘दलित कवी’ म्हणणं ही आपल्याच समजुतीतली उणीव दाखवण्यासारखं आहे. त्याचं गद्यपद्य, वर्तमानपत्रांतील सदरलेखन आणि मुलाखती या सगळ्यांमधून त्याचा जातिअंतांचा लढा सर्वहारा वर्गाच्या लढय़ाशी जोडून घेण्याच्या प्रयत्नांचाच भाग आहे. ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ हा संग्रह मला भेट देताना त्यावर त्यानं लिहिलं आहे की, ‘कॉम्रेड सतीश, जातिअंतानंतरच वर्गयुद्ध जिंकू आपण – मान्य आहे ना तुला हे?’
एकंदर मराठी कवितेच्या परंपरेमध्ये काही निखळलेले दुवे आहेत. उदा. जिथून मराठी भाषेचा बंडाचा लढा सुरू झाला त्या महानुभव, तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्यामध्ये संस्कृत भाषेविरुद्धचा बंडाचा आवाज आहे. हा आवाज बंडाचा असण्याचं कारण या सगळ्या अठरापगड जातींतील बारा बलुतेदार संतलोकांमध्ये सगळा उमाळा व्यक्त होतो तो शोषितांविषयीचा आहे. संस्कृत भाषा ही नेहमीच्या बोलचालीची भाषा नाही. त्यामुळे ज्यांच्याकरता हे आपण बोलत आहोत त्यांना हे विचार कळायचे असतील तर मराठीचा आधार घेण्याशिवाय पर्याय नाही. अन्य इतर अनेक कारणं या संदर्भात दाखवता येतील.. पण तरीही बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतचा काळ हा मराठी कवितेच्या सर्वाधिक ऊर्जेचा काळ आहे. नंतरच्या काळात अधलेमधले काही अपवाद वगळता पुन्हा मराठी साहित्य हे वेगळ्या उच्चवर्णीय, उच्चवर्गीय यांच्या मिरासदारीत गुंतत गेलं. पुन्हा १९व्या शतकात बंड झालं. महात्मा फुले, लोकहितवादी, महर्षी शिंदे आणि आंबेडकर यांनी पुन्हा मराठीला संतपरंपरेच्या दीर्घकालीन लेखनाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. हे उघड आहे की, मधल्या काळातले अनेक आवाज त्या काळात दबून गेले. म. फुल्यांचं ‘तृतीय रत्न’ हे नाटक आपल्यासमोर येण्यास प्रदीर्घ काळ जावा लागला. असं अजून बरंच लेखन आहे जे कदाचित आपल्यापर्यंत आलंच नाही. यानंतर प्रस्थापित साहित्याविरुद्धचा पहिला अत्यंत जोराचा लढा १९६०नंतर प्रकर्षांनं उभारून आलेला दिसतो. मधल्या अनेक अपवादांविषयीच्या तपशिलात आता जाण्याचं कारण नाही. पण १९६०पासून जवळजवळ ७५पर्यंत प्रस्थापित साहित्याविरुद्धचा सगळा उठाव नामदेवच्या कवितेच्या आरंभी आहे. त्यामुळे त्याच्या कवितेची एकंदरच सगळी बांधणी, तिच्या आशयाच्या सगळ्या दिशा आणि पुढे जाऊन कवितेत काय व्हायला हवं याच्या धारणा या पूर्णत: बदललेल्या दिसतात. मराठी साहित्याचा गेल्या ५० वर्षांचा इतिहास यासाठी आपल्याला तपासता येईल. प्रस्थापित विरोधी लढय़ानं नामदेव जन्मला असं मला मुळीच म्हणावयाचं नाही, पण हा काळ त्याच्या कवितेच्या उभारणीला पूरक ठरला. ‘गोलपिठा’, ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले’ इथपासून त्याची कविता अशा बदलत्या खुणांनी व्यापलेली आहे. आणि ती अधिकाधिक प्रगल्भ होत ‘या सत्तेत जीव रमत नाही’, ‘निर्वाणा अगोदरची पीडा’ इथपर्यंत प्रवास करते. नामदेवची कविता आरंभीच्या काळात अधिक आक्रमक वाटते आणि नंतरच्या काळात अधिकाधिक समजूतदार होत प्रगल्भतेच्या अंगानं वाटचाल करताना दिसते.
एकुणातच नामदेवच्या निधनानं मराठी कवितेला श्रीमंत करणारा आणि मराठी कवितेला जगाच्या नकाशावर पोचवण्याची क्षमता असलेला एक श्रेष्ठ कवी आपण आणि जग गमावून बसलं आहे.

loksatta readers response
लोकमानस: चाल, चरित्र बिघडल्याने भामटेगिरीला ऊत
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Harshvardhan Patil On Ajit Pawar
Harshvardhan Patil : “मी पहाटे उठून कुठे जात नाही”, हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांवर खोचक टीका
NCP announced candidate from Sharad Pawar group in Murtijapur constituency there is split in party
राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटन सचिवाची सोडचिठ्ठी…सम्राट डोंगरदिवेंसमोर डोंगराएवढे…
nirmalatai vitekar
पाथरी मतदारसंघात ‘विटेकर विरुद्ध वरपूडकर’ जुनाच सत्तासंघर्ष नव्या रूपात
Buddhist Dalit communitys displeasure is a challenge to Congress in Bhandara Constituency
बौद्ध दलित समाजाच्या नाराजीचे भंडारा मतदारसंघात काँग्रेससमोर आव्हान!
prakash ambedkar
“योगेंद्र यादव यांची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका
Bachchu Kadus reaction to BJP candidate from Achalpur
अचलपूरच्या भाजप उमेदवाराबद्दल बच्चू कडू म्हणाले, “निष्ठावंतांना डावलून…”