स्वप्नात फक्त मुळाक्षरं दिसत होती.
नकळत बोटानं गिरवायला लागलो.
गिरवता गिरवता अलीकडचं अक्षर पुढच्या अक्षराच्या
पाठंगुळीला कधी बसलं, कळलंच नाही. मिसळून गेली एकमेकांत.
‘गमभन’ला वेगळं अस्तित्वच नाही.
एक गडबडगुंडा मुळाक्षरांचा.
हा गडबडगुंडा म्हणजे फार मोठा संस्कार.
नकळत हा गडबडगुंडा हाताला वळण लावतो.
हे नकळत छान, खूप छान.
गिरवण्याच्या वयात सगळंच नकळत.
राग, लोभ.. सारंच.
ठरवण्याआधीच सगळं घडून गेलेलं. ते वयच तसं.
वागण्यात वर्ण नाहीत. सगळंच निव्र्याज.
मुदलाची पर्वा नाही, व्याजाचा संबंध नाही.
कट्टीबट्टीत सगळं संपलेलं. क्षणात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज गमभन विसरलोय.
विसरलोय की हरवलोय?
आटपाट नगरात सगळंच कसं हरवत चाललंय?
वारा हरवला, पाऊस हरवला,
उन्हाचा हळवेपणा हरवला.
वांझ आभाळाला तीट लावल्यासारखा एखादाच ढग..
कळपातून हरवलेल्या रानगव्यासारखा.
वळचणीतून येणाऱ्या क्षीण फडफडीतूनच पाखरांची चाहूल उरलीय.
माणसाचा आकार पांघरलेल्या रंगीबेरंगी मुंग्या इतस्तत:
बोडक्या डोंगरावर निखाऱ्याचं आलवण आवळलेलं सूर्यानं.
वावटळीत एखादं सुकलं पान हवेत उसळी घेऊन
पुन्हा धुळीत उपडं, उताणं निजतंय.
डामरट रस्ते अंगावर क्षतं घेऊन निर्लज्जपणे पसरलेत ऐसपैस.

चौकाचौकात चबुतऱ्यावर आदर्शाची थडगी बांधलीत.
धर्माच्या झुलीमागे खरे चेहरे दिसेनासे झालेत.
सगळेच हुजरे. मुजऱ्यासाठी सगळे ओणवे..
त्यामुळे चेहऱ्याची जागा ढुंगणाने घेतलीय.
आयाबहिणींचा व्यापार नंबर एकवर आहे.
पिंजऱ्यातले पोपट मात्र खूश आहेत. दोन वेळची भ्रांत नाही.
भडव्यांच्या धंद्याला प्रतिष्ठा प्राप्त झालीय.
टोळ्यांचं राज्य आहे.

‘ते काय करताहेत हे त्यांना माहीत नाही देवा, त्यांना क्षमा कर..’
असं म्हणण्याइतका मी मोठा नाही. माझा सूळ मीच माझ्या खांद्यावर घेऊन चालतोय. शिव्याशाप देत.

संगमाच्या काठाला पिंडदानासाठी गर्दी उसळलीय.
कावळ्यांची चलती आहे. माजलेत xxxचे,
पिंडाला शिवायला त्यांना वेळ नाही.
स्वर्गाच्या दारात पितर मात्र खोळंबलेत.

वेताळ पोतडीतून नवनव्या गोष्टी सांगून नाडतोय.
खांद्यावरचं त्याचं ओझं भिरकावून द्यायचंय. पण-
शंभर शकलांची भीती बोकांडी बसलीय.

श्वासाची लय बिघडलीय. अचानक धाप लागून घशाला कोरड पडतेय.
समोरच्याच्या डोळ्यांतला डोह पाहून तहान भागवावी लागतेय.
भोवतालचा प्रत्येकजण माझ्याइतकाच दुर्दैवी, हाच एक दिलासा जगण्यासाठी.

प्रकाश गडप झालाय. काळोखाची सावली अजूनच गडद झालीय.
क्षितीज दूर गेलंय.
अज्ञातातून येणारे चित्रविचित्र ध्वनी काहीतरी सांगू पाहताहेत; पण मला कळत नाहीए.
काळावेळाचं भान हरपलंय.

नीलकंठानं मंथनातल्या हलाहलाची चूळ टाकल्यासारखं वाटतंय.
लंगडा बाळकृष्ण अपंगांच्या गणतीत गेलाय.
देवांचे दर ठरलेत, भाव हरवलाय.

रोज मरत असतानासुद्धा मृत्यूची भीती का वाटतेय?
सारे बाहुबलींचे गुलाम.
टोळ्यांचे म्होरके आम्हाला वाटून घेऊन गिळताहेत.
नंतर पाच वर्षांचं निवांत रवंथ.

दूर कुठेतरी रानात, डोंगराच्या कपारीत जमताहेत कुणीतरी पीडित,
एकमेकांच्या आधारानं. त्यांचीसुद्धा टोळी जमतेय.
‘त्या कपारीतली हवा मला मानवेल का?’
रोज हाच प्रश्न स्वत:ला विचारीत मी इथे घुसमटतो आहे.

आटपाट नगरात सगळंच कसं हरवत चाललंय.. माझ्यासकट.
मुळाक्षरं पुन्हा गिरवायला हवीत.   

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekars column adhun madhun nana