हां.. बोल जोर लगा के हय्या
अरे पंजा लगा के हय्या
अरे सोताच्या बळावर हय्या
बोल एकवीरा माता की जय..
सगळ्यांनी जोर लावला. पण होडी काय तसूभर हलेना. तसं माणकोजींच्या लक्षात काहीतरी आलं. ते म्हणाले, ‘ओ नारायनदादूस, होरी इकरं कुटं लोटताय? पान्यात घालायची ना होरी? मग किनाऱ्यावर काय ढकलताय?’
माणिकोजींनी हटकलं तशी नारोदादांच्या लक्षात त्यांची चूक आली. अर्थात चूक त्यांचीही नव्हती. माणसाच्या सवयी काही एका दिवसात जात नसतात! तरीही त्यांना अगदी ओशाळल्यागत झालं. पण स्वाभिमानाने त्यांनी तसं दाखवलं नाही.
‘एक मिन्टं हां. हल्लो हल्लो.. माईक टेस्टिंग वन्टूथ्री.. हां बोला.. जोर लगा के हय्या..’ माणकोजींनी पुन्हा तोंडाला माइक लावला.
तेवढय़ात बाबाजींच्या काहीतरी लक्षात आलं. ते गपकन् ताठ उभे राहिले.
‘अरे, पूजा राहिली ना- दर्याची पूजा!’
त्यासरशी एकच धावपळ उडाली. नारोदादांनी धावतच जाऊन सोन्याचा नारळ आपल्या हाती घेतला. तेवढंच काहीतरी हाती लागल्याचं समाधान!
‘नारळ मी वाह्य़नार,’ ते म्हणाले.
‘जमनार नाय. तो मान आमचा हाय! तसं आंदी ठरवलंय हाय.’
बाबाजींनी कमरेची लुंगी आणखी टाइट केली. तसे माणकोजी मधे पडले. आधी त्यांना वाटलं, जरा वेळ चालू द्यावं हे भांडण. तेवढीच मज्जा. पण मग त्यांनी विचार केला- जाऊ  दे. ज्याचा शेवट आधीच माहीत असतो, तो पिक्चर बघण्यात काहीच अर्थ नसतो.  
ते म्हणाले, ‘हे बघा. त्यावरून कज्जा नाय पायजे. सारखं सारखं दिल्लीला जायचा जाम कंटाला आलाय. असं करा- तुम्ही दोगंबी नारल पान्यात सोरा. बाबाजी, तुम्ही घाटाकरं तोंड करा. तुम्ही कोकणाकरं.’
‘हं म्हणा.. एक मिन्टं हां. हल्लो माईक टेस्टिंग वन्टूथ्री.. हां. म्हणा-
हे देवा समिंदरा, माझी नौका तुझ्या पान्यात सोडतो आहे.
वादलवाऱ्यापासून आमचे रक्षण कर. भरभरून मासली दे..
देवा समिंदरा, मागला हंगाम पार ओस गेला. दोन बोंबिल काय ते हाती लागलं.
सगली मासली गुजरातच्या ट्रॉलरवाल्यांनी हडप केली.
पन देवा, आवंदाचा हंगाम तरी बहरूं दे.
धंद्यात बरकत येऊं  दे..’
एका होडक्याच्या आडून दोघेजण गुपचूप हा सगळा प्रकार पाहात होते. त्यातील एकाने उग्र स्वरात विचारलं, ‘आपण काय नुस्तंच बघत ऱ्हायचं का? कधी लोटायची व्हरी?’
दुसऱ्याने मनगटावरच्या घडय़ाळात पाहिलं.
‘या प्रश्नावर निकाल घेण्याच्या संबंधानं अजून बराच टायम हाय. पहिल्यांदा कोणाच्या होऱ्या किती पाण्यात आहेत ते पायलं पायजे. तेच्यानंतर कोणाच्या होरीत आपली होरी ढकलायची ते ठरवता येईल!’
‘म्हंजे? व्हरी पान्यात नाय ढकलायची?’
‘नाही! होरी कधीही पाण्यात ढकलायची नसते! बुरन्याची भीती असते! अजून खूप शिकायचंय तुम्हांला! चला! कामाला लागा..’
त्यावेळी तिकडं वांद्रय़ाच्या कोलीवाडय़ात एकच जल्लोष सुरू होता. डीजेवर कोळीगीतं वाजत होती. माणसं नटूनथटून आली होती. हसतखिदळत होती. कमरेला नवीकोरी लुंगी. अंगात पैरण. डोईला रुमाल. हातातलं वल्हं असं तलवारीसारखं धरलेलं. दादूजी जय्यत तयारीत होते.
त्यांनी आदूजीला विचारलं, ‘सोन्याचा नारल घेत्ला का?’
‘घेत्ला.’
‘होरीचं काय?’
आदूजी म्हणाले, ‘हे काय. रातभर घरातली सगली रद्दी संपवली आमी! कित्ती होऱ्या केल्यात बगा! बंबी होरी, शिराची होरी, सादी होरी..’
‘पक्षाची होरी! ती केलीत?’ दादूजींनी कडक आवाज काढण्याचा प्रयत्न केला.
‘कार्यकर्त्यांनी केलीय!’
दादूजींनी डोईवरचा रुमाल सावरल्यासारखा करून गुपचूप कपाळावर हात मारून घेतला. ते म्हणाले, ‘ठिकाय. चला. हे वल्हं घ्या हाती. अहो, त्याचा घोरा करू नका. असं तलवारीसारखं धरा. मर्दाचे बच्चे आहात तुम्ही. झालंच तर महाराष्ट्राचे भावी मु.. असूं दे. ते नंतर बगू. चला.’
मग वांद्रय़ाहून समुद्राच्या दिशेने जल्लोषात मिरवणूक निघाली.
जुहू किनाऱ्यावर त्याचवेळी सागरपूजा रंगात आली होती.
देवेनभौ, नाथाभौ, विनूदा असे तिघेही एकमेकांच्या हाताला हात लावून बसले होते. प्रत्येकाचा दुसरा हात मात्र मोकळा होता!
गुरुजी पूजा सांगत होते-
‘हं. म्हणा, सुवर्ण नारिकेलं स्वाहा
अडीच हजार किलो चंदन काष्ठम् स्वाहा
दोन हजार किलो घृतम् स्वाहा
आता सगळ्यांनी होडीला हात लावा. दोन्ही.’
तेवढय़ात विनूदा म्हणाले, ‘थांबा, थांबा. तीन तिघारा काम बिघारा व्हायचा.’
देवेनभौ म्हणाले, ‘अरे, तीन तिघारा कसा व्हईल? नितीनदादूस कुटं गेले?’
पाहतात तो नितीनदादूस गायब. ही शोधाशोध सुरू झाली. अखेर कोणीतरी बातमी आणली- ते दादरमधी आहेत. राजगडावर राखी घेऊन गेलेत. आज नारली पुनवेबरोबर रक्षाबंधनसुद्धा आहे ना! इसरलात काय?