‘नाघं’ची ‘नदीकिनारी’ ही कविता बरे झाले शेतात वाचली. कुणीही आजूबाजूला नव्हते. माझ्या असे लक्षात आले, की माझ्या शरीराच्या हालचाली होत आहेत. नजर कधी आभाळात, कधी क्षितिजाकडे जात आहे. पांढरे ढग निळे अन् काळे (नाही नाही- काजळे) दिसू लागले आहेत आणि एका रांगेत शिस्तबद्ध शांततेत जाणारे (माझ्या डोक्यावरील आभाळात नसलेले) बगळे दिसू लागले. उगीचच कुठलीतरी कुजबूज ऐकण्यासाठी माझे कान टवकारले गेले आहेत. आणि नदीच्या पाण्यात मी कोणा सखू किंवा पारूबरोबर उभा आहे. माझ्या असे लक्षात आले, की हे या देशपांडे नावाच्या बावाजीने- म्हणजे त्यांच्या कवितेने केलेले हे चेटूक!
जरा निळ्या अन् जरा काजळी
ढगात होती सांज पांगली
ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी, गऽ!
कुजबुजली भवताली रानें
रात्र म्हणाली चंचल गाणे
गुडघाभर पाण्यात दिवाणे दोन फरारी, गऽ!
नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी, गऽ!
चाळीसेक वर्षांपूर्वी ना. घ. देशपांडे यांच्या या ओळी वाचल्या आणि स्तब्ध झालो. आनंदित झालो. पण बराच वेळ कबूल करवेना, की या कवितेने आपल्याला बांधून ठेवले आहे. एक तर गद्धेपंचविशीत होतो. नव्या कविता लिहीत होतो म्हणून स्वत:ला नवकवी समजत होतो. सामाजिक जाणिवेच्या कवितांचा बोलबाला होता म्हणून ‘प्रेम आणि निसर्ग’ या विषयांशी संबंधित कविता लिहिणारे कवी म्हणजे रोम जळत असताना फिडल वाजवणारे नीरो वगैरे असे विचार प्रिय होते. आणि आधीच्या पिढीतील कवींना समज थोडी कमीच होती, असे मानण्याचा उद्धटपणाही अंगात होता. पण तेव्हाच वाचन वाढू लागले तसे या ओढलेल्या वृत्तीचे कवच तडकू लागले. खरे तर ‘रडूबाई’ असे हिणवत होतो त्या बालकवी ठोंबरे यांची ‘खेडय़ातील रात्र’ ही कविता वाचली (आणि ‘पारवा’) तेव्हा मनोमन स्वीकारले होते की आपल्या ‘बा’च्याने अशी कविता लिहून होणे नाही.
‘नाघं’ची ‘नदीकिनारी’ ही कविता बरे झाले शेतात वाचली. मोठय़ाने वाचली. कुणीही आजूबाजूला नव्हते. माझ्या असे लक्षात आले, की माझ्या शरीराच्या हालचाली होत आहेत. नजर कधी आभाळात, कधी क्षितिजाकडे जात आहे. पांढरे ढग निळे अन् काळे (नाही नाही- काजळे) दिसू लागले आहेत आणि एका रांगेत शिस्तबद्ध शांततेत जाणारे (माझ्या डोक्यावरील आभाळात नसलेले) बगळे दिसू लागले. उगीचच कुठलीतरी कुजबूज ऐकण्यासाठी माझे कान टवकारले गेले आहेत. आणि नदीच्या पाण्यात मी कोणा सखू किंवा पारूबरोबर उभा आहे. माझ्या असे लक्षात आले, की हे या देशपांडे नावाच्या बावाजीने- म्हणजे त्यांच्या कवितेने केलेले चेटूक आहे. मी घाबरूनच गेलो. स्तिमितही झालो. ऐंद्रिय संवेदनांना असे आणि इतके आवाहन एखादी कविता, तिच्यातील शब्दसंयोजन आणि प्रतिमा करू शकते? पुरावा माझ्या समोरच होता. आणि ‘फरारी’ हा चक्क गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असलेला किंवा एखाद्या हिंदी सिनेमाचे शीर्षक असल्यासारखा शब्द..? ही कविता अशी भिनली, की त्यावेळचे मित्र मी भेटलो की म्हणायचे- ‘आता पुन्हा ‘नदीकिनारी’ ही कविता ऐकवायची नाही.’ मग या कवितेला खिशात ठेवले. मनात ठेवले. प्रवासात बरोबर घेतले. तिच्याशी लाडीगोडी केली, आर्जवे केली, कुशीत घेऊन झोपलो, तेव्हा कुठे तिने सांगितले, की मठ्ठ माणसा, ते दोघे प्रेम हा जगाच्या दृष्टीने भयंकर असा गुन्हा करीत आहेत. गाव आणि गावकरी यांच्यापासून दूर नदीचे पात्र ओलांडून ते जात आहेत. (दुनियावालों से दूर, जलनेवालों से दूर..) पकडले जाण्याची आशंकाही आहे. म्हणून ते फरारी आहेत.. हे कळलं न् एकदम मोकळं वाटलं. मनातल्या मनात एक पत्र लिहायला घेतलं.. रा. रा. कविवर्य श्री. ना. घ. देशपांडे यांना बालके नारायणचा शिरसाष्टांग नमस्कार.. (पुढे काही वर्षांनी कळले की ‘ना. घ.’ वकील आहेत. पुन्हा ‘फरारी’ हा शब्द आठवला आणि गंमत वाटली. मनात विचार आला- हेही एक कारण असू शकते काय?)
‘नाघं’चा जन्म १९०९ सालचा. त्यांचा ‘शीळ’ हा पहिला कवितासंग्रह निघाला १९५४ साली. ‘अभिसार’ १९६३ साली. नंतर ‘खूणगाठी’, ‘गुंफण’, ‘कंचनीचा महाल’.. ‘खूणगाठी’ला साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले. काही वर्षांपूर्वी त्यांची जन्मशताब्दी होती. तेव्हा काही भाषणे, एक-दोन कार्यक्रम झाले, तेवढेच. ‘शीळ’ या कवितेला जी. एन. जोशींनी संगीतबद्ध केले. पुढे ‘डाव मांडून भांडून..?’ किंवा ‘बकुळफुला, धुंडिते तुला धुंडिते वनात’ अशी आणखी चार-दोन कवितांची गाणी झाली. आचार्य अत्रे यांनी सुचवूनसुद्धा ‘नाघं’नी मराठी सिनेमासाठी गाणी लिहिली नाहीत.
प्रीतीच्या मुलुखातली
आता नको बातमी
सारे जीवन डावलून बसलो
येऊन खेडय़ात मी..
या ओळी, किंवा-
वेगळीच जात तुझी
वेगळाच ताल
तू अफाट वाट तुझी
एकटाच चाल..
असे म्हणणारा हा कवी अंतर्मुख होता. पण एकलकोंडा किंवा माणूसघाणा नव्हता. वकिलीचा व्यवसाय नीतिमत्तेचे संकेत पाळून करत होता. एका शिक्षणसंस्थेचा अध्यक्ष म्हणून चोख व्यवहार आणि नियम पाळणारा प्रशासक म्हणून कार्यरत होता. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्रातून सत्कारासाठी आमंत्रणे आली. पण कवीने जागा सोडली नाही. हे माहीत असल्यामुळे त्यांना अध्यक्ष करण्यासाठी विदर्भ साहित्य संघाने आपले संमेलनच उचलून मेहकरला नेले. पर्वत महंमदाकडे गेला. ‘नाघं’साठी या संमेलनाला पु. ल. देशपांडे मेहकरला आले होते. संमेलन संपले अन् पुन्हा हा काव्यक्षेत्रातील योगीपुरुष मेहकरातील एका चिंचोळ्या गल्लीतील जुन्या माळवदाच्या घरात ध्यानस्थ झाला.
या कवीने त्याच्या कवितेला अंतर्गत संगीत प्रदान केलं. नाद, ध्वनी, लय या चिजा म्हणजे त्यांच्या कवितेचे अवयवच होते. त्यांचा आस्वाद, आनंद आणि अभ्यास यांचा ध्यास ज्यांना लागतो त्यांचा काळ सुखाचा होतो.
जलधारांत तारा छेडत
आला श्रावण छंदीफंदी
त्याची चढते गीतधुंदी

श्रुतिमधुर घनगंभीर
स्वर सुंदर श्रावणाचे
मधु मदिर भावनांचे
या ओळींचे काय करावे? संगीत कानात साठवून घ्यावे की अर्थ मनात उमजून घ्यावा. (या ओळी वाचताना ‘बरसात की रात’ या जुन्या चित्रपटातील पहिलेच गाणे ‘गरजत बरसत सावन आयो रे..’ हे गाणे, साहीरचे शब्द, रोशनसाहेबांची सुरावट, बरसाती वातावरण यांसह ते दृश्यच मनासमोर साक्षात् होते.)
त्यांची प्रेमकविता शरीर नाकारत नाही. खरे तर ‘ती’ (ती म्हणजे कविता आणि कवितेतील नायिका) पिशी आणि उन्मादी आहे. स्वत:हून आसुसून प्रियकराला साद घालणारी आहे..
झोंबतो गारवा घुमतो पारवा
वाऱ्यात वाजते शिटी
सहस्र भुजंगबळाने राजसा
एकच घाल रे मिठी
मिठी! तीही एकच म्हणजे एकदाच. तीही स्नेहाने नाही, बळाने! तीही साधी नाही, सर्पाची नाही, तर भुजंगाची. आणि बळ एका नाही, हजार भुजंगांचे. ‘शब्दांनो मागुते या’ असे म्हटले जाते. पण शब्दांच्या मागे मागे गेलो तर केवढातरी मोठा ‘आनंदघन’ हाती लागतो.
‘नाघं’ची कविता चालत येतच नाही. पदन्यास करतच येते. ‘काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे’ यापुढील एक कडवे असे आहे-
माझी तुझी चोरटी
जेव्हा मिळाली मिठी
झाले जगाचे कडे माझ्या-तुझ्याएवढे
असे म्हणतात, की अनेक कवी प्रेमाला विश्वाचे परिमाण देतात. ‘नाघ’ विश्वाला प्रीतीचे परिमाण देतात. ‘प्रीती’- जी ‘नाघं’च्या कवितेचा मूलस्रोत आहे- आणि ती विश्वाला व्यापून उरणारी आहे.
कवी शिस्तीत (बेस्ट वर्ड्स इन् बेस्ट ऑर्डर) शब्द लिहितात. ना. घ. शब्दांनाच शिस्त लावतात. (बी. ए.ला शिकताना त्यांनी गणित आणि तत्त्वज्ञान हे विषय घेतले होते. हा केवळ योगायोग असावा का?) गोळीबंद रचना. एक अक्षर का विरामचिन्हही इकडे-तिकडे सरकवता येऊ नये अशी कवितेची चिरेबंदी बांधणी. (कधी कधी गमतीदार विचार मनात येतो, की ‘ना. घं.’च्या कवितेत साकार झालेली नायिका बांधेसूद आहे की तिच्यापेक्षा ‘नाघं’ची कविता बांधेसूद आहे!)
आपल्याकडे शिक्के मारण्याची पद्धत आहे. हा प्रेमाचा शाहीर, हा मार्क्‍सवादी कवी, हा कामगार कवी, हा दलित कवी, हा शेतकरी कवी, ही स्त्रीवादी- असे. अन् मग त्या चौकटीतच विचार करायचा. एकाने केले की पुढे बाकीचेही त्याच वाटेने जातात.
‘नाघं’नी केवळ प्रेमकविताच लिहिल्या नाहीत, तर त्यांचे सामाजिक आणि राजकीय भानही प्रखर होते.
आहे काय माझे ज्याच्या बळावर
मारू मी बढाया
म्हणतात कोणी माझ्या नावावर
होतात लढाया
ही कविता किंवा निमूटपणे सर्व सहन करणाऱ्या सामान्य माणसाला उद्देशून लिहिलेली कविता-
कुजबुजतो तो आहे विकृत
मुकाच बसतो तो आहे मृत

Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
official language in india article 343 for official language of the union
संविधानभान : राष्ट्रभाषा नव्हे; राजभाषा

तूच भिला तर या जगतावर
दिसेल सत्यच खोटय़ावाणी
तूच भिला तर कपटी खोटे
खऱ्याप्रमाणे म्हणेल गाणी
आज, २०१३ साली देशातील राजकीय स्थितीचे अवलोकन केले तर पन्नासेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘नाघं’च्या ओळी समकालीनच ठरतात.
‘नाघं’च्या घरातील वातावरण धार्मिक होते. त्यांचे सख्खे भाऊ वि. घ. देशपांडे हे हिंदुमहासभेचे नेते होते. मध्य प्रदेशातून खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांचे राहणे परंपरा जपणाऱ्या खेडय़ामध्ये होते. पण ‘नाघं’नी प्रेमाची धीट अभिव्यक्ती करणाऱ्या कविता लिहिल्या- ज्या त्या काळाच्या पुढच्या होत्या. ‘नाघं’नी महात्मा गांधींवर कविता लिहिल्या आणि त्यांची तुलना बुद्ध आणि येशू यांच्याशी केली, तेवढे महत्त्वाचे स्थान विश्वेतिहासात दिले.
माणूस होतो रंग, माणूस होतो भेद;
माणूस होतो शस्त्र, करीत जातो छेद;
उतू येते पांढऱ्या वर्चस्वाची नांदी;
माणूस होतो हिंसा, तेव्हा येतो गांधी
नेहरूंना ‘उदयाचा यात्रिक’ म्हणून गौरव करणारी कविता त्यांनी लिहिली. त्यांची ‘क्रांती’ शीर्षकाची कविता वाचल्यानंतर कळते, की जगभरातल्या राजकीय क्रांतींचा त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या संदर्भात खास त्यांच्या शैलीत कसा समाचार घेतला आहे.
आपल्या वर्गीय आणि वर्णीय मर्यादा ओलांडून कलावंत कसा सत्याकडे झेपावतो यांचे चांगले उदाहरण म्हणजे ‘नाघं’ची कविता.
ना. घ. तृप्त होते. समाधानी होते. आयुष्याच्या संध्याकाळी हा आत्ममग्न, तरीही जागृत कवी- ज्याने कधी काही मागितले नाही; पण जे आले, भेटले, लाभले, त्याबद्दल आनंदी होते. ही सौम्य-सुंदर वृत्ती म्हणजे या ओळी-
भवताली थरकते मुकेपण
फुलेंच गेली तरीही ये पण
अजून माझ्या तळहातावर
सुगंध उरले, सुगंध उरले.