जरा निळ्या अन् जरा काजळी
ढगात होती सांज पांगली
ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी, गऽ!
कुजबुजली भवताली रानें
रात्र म्हणाली चंचल गाणे
गुडघाभर पाण्यात दिवाणे दोन फरारी, गऽ!
नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी, गऽ!
चाळीसेक वर्षांपूर्वी ना. घ. देशपांडे यांच्या या ओळी वाचल्या आणि स्तब्ध झालो. आनंदित झालो. पण बराच वेळ कबूल करवेना, की या कवितेने आपल्याला बांधून ठेवले आहे. एक तर गद्धेपंचविशीत होतो. नव्या कविता लिहीत होतो म्हणून स्वत:ला नवकवी समजत होतो. सामाजिक जाणिवेच्या कवितांचा बोलबाला होता म्हणून ‘प्रेम आणि निसर्ग’ या विषयांशी संबंधित कविता लिहिणारे कवी म्हणजे रोम जळत असताना फिडल वाजवणारे नीरो वगैरे असे विचार प्रिय होते. आणि आधीच्या पिढीतील कवींना समज थोडी कमीच होती, असे मानण्याचा उद्धटपणाही अंगात होता. पण तेव्हाच वाचन वाढू लागले तसे या ओढलेल्या वृत्तीचे कवच तडकू लागले. खरे तर ‘रडूबाई’ असे हिणवत होतो त्या बालकवी ठोंबरे यांची ‘खेडय़ातील रात्र’ ही कविता वाचली (आणि ‘पारवा’) तेव्हा मनोमन स्वीकारले होते की आपल्या ‘बा’च्याने अशी कविता लिहून होणे नाही.
‘नाघं’ची ‘नदीकिनारी’ ही कविता बरे झाले शेतात वाचली. मोठय़ाने वाचली. कुणीही आजूबाजूला नव्हते. माझ्या असे लक्षात आले, की माझ्या शरीराच्या हालचाली होत आहेत. नजर कधी आभाळात, कधी क्षितिजाकडे जात आहे. पांढरे ढग निळे अन् काळे (नाही नाही- काजळे) दिसू लागले आहेत आणि एका रांगेत शिस्तबद्ध शांततेत जाणारे (माझ्या डोक्यावरील आभाळात नसलेले) बगळे दिसू लागले. उगीचच कुठलीतरी कुजबूज ऐकण्यासाठी माझे कान टवकारले गेले आहेत. आणि नदीच्या पाण्यात मी कोणा सखू किंवा पारूबरोबर उभा आहे. माझ्या असे लक्षात आले, की हे या देशपांडे नावाच्या बावाजीने- म्हणजे त्यांच्या कवितेने केलेले चेटूक आहे. मी घाबरूनच गेलो. स्तिमितही झालो. ऐंद्रिय संवेदनांना असे आणि इतके आवाहन एखादी कविता, तिच्यातील शब्दसंयोजन आणि प्रतिमा करू शकते? पुरावा माझ्या समोरच होता. आणि ‘फरारी’ हा चक्क गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असलेला किंवा एखाद्या हिंदी सिनेमाचे शीर्षक असल्यासारखा शब्द..? ही कविता अशी भिनली, की त्यावेळचे मित्र मी भेटलो की म्हणायचे- ‘आता पुन्हा ‘नदीकिनारी’ ही कविता ऐकवायची नाही.’ मग या कवितेला खिशात ठेवले. मनात ठेवले. प्रवासात बरोबर घेतले. तिच्याशी लाडीगोडी केली, आर्जवे केली, कुशीत घेऊन झोपलो, तेव्हा कुठे तिने सांगितले, की मठ्ठ माणसा, ते दोघे प्रेम हा जगाच्या दृष्टीने भयंकर असा गुन्हा करीत आहेत. गाव आणि गावकरी यांच्यापासून दूर नदीचे पात्र ओलांडून ते जात आहेत. (दुनियावालों से दूर, जलनेवालों से दूर..) पकडले जाण्याची आशंकाही आहे. म्हणून ते फरारी आहेत.. हे कळलं न् एकदम मोकळं वाटलं. मनातल्या मनात एक पत्र लिहायला घेतलं.. रा. रा. कविवर्य श्री. ना. घ. देशपांडे यांना बालके नारायणचा शिरसाष्टांग नमस्कार.. (पुढे काही वर्षांनी कळले की ‘ना. घ.’ वकील आहेत. पुन्हा ‘फरारी’ हा शब्द आठवला आणि गंमत वाटली. मनात विचार आला- हेही एक कारण असू शकते काय?)
‘नाघं’चा जन्म १९०९ सालचा. त्यांचा ‘शीळ’ हा पहिला कवितासंग्रह निघाला १९५४ साली. ‘अभिसार’ १९६३ साली. नंतर ‘खूणगाठी’, ‘गुंफण’, ‘कंचनीचा महाल’.. ‘खूणगाठी’ला साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले. काही वर्षांपूर्वी त्यांची जन्मशताब्दी होती. तेव्हा काही भाषणे, एक-दोन कार्यक्रम झाले, तेवढेच. ‘शीळ’ या कवितेला जी. एन. जोशींनी संगीतबद्ध केले. पुढे ‘डाव मांडून भांडून..?’ किंवा ‘बकुळफुला, धुंडिते तुला धुंडिते वनात’ अशी आणखी चार-दोन कवितांची गाणी झाली. आचार्य अत्रे यांनी सुचवूनसुद्धा ‘नाघं’नी मराठी सिनेमासाठी गाणी लिहिली नाहीत.
प्रीतीच्या मुलुखातली
आता नको बातमी
सारे जीवन डावलून बसलो
येऊन खेडय़ात मी..
या ओळी, किंवा-
वेगळीच जात तुझी
वेगळाच ताल
तू अफाट वाट तुझी
एकटाच चाल..
असे म्हणणारा हा कवी अंतर्मुख होता. पण एकलकोंडा किंवा माणूसघाणा नव्हता. वकिलीचा व्यवसाय नीतिमत्तेचे संकेत पाळून करत होता. एका शिक्षणसंस्थेचा अध्यक्ष म्हणून चोख व्यवहार आणि नियम पाळणारा प्रशासक म्हणून कार्यरत होता. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्रातून सत्कारासाठी आमंत्रणे आली. पण कवीने जागा सोडली नाही. हे माहीत असल्यामुळे त्यांना अध्यक्ष करण्यासाठी विदर्भ साहित्य संघाने आपले संमेलनच उचलून मेहकरला नेले. पर्वत महंमदाकडे गेला. ‘नाघं’साठी या संमेलनाला पु. ल. देशपांडे मेहकरला आले होते. संमेलन संपले अन् पुन्हा हा काव्यक्षेत्रातील योगीपुरुष मेहकरातील एका चिंचोळ्या गल्लीतील जुन्या माळवदाच्या घरात ध्यानस्थ झाला.
या कवीने त्याच्या कवितेला अंतर्गत संगीत प्रदान केलं. नाद, ध्वनी, लय या चिजा म्हणजे त्यांच्या कवितेचे अवयवच होते. त्यांचा आस्वाद, आनंद आणि अभ्यास यांचा ध्यास ज्यांना लागतो त्यांचा काळ सुखाचा होतो.
जलधारांत तारा छेडत
आला श्रावण छंदीफंदी
त्याची चढते गीतधुंदी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा