चंद्रकांत कुलकर्णी

कवीनं अल्पाक्षरी असावं, लेखकानं संवादी असावं, नाटककारानं मितभाषी असावं, नटानं ‘बिटविन द लाइन्स’ व्यक्त करावं, तंत्रज्ञानं शब्दांशिवाय ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा, पोत, तीव्रतेतून अवकाश भारून टाकावं, प्रेक्षकांनी ‘मौन’ राहून, पण अत्यंत ‘एकाग्र’ होऊन हे सगळं अनुभवावं, समीक्षकांनी नाटय़ानुभवाचं अचूक विश्लेषण आणि रसग्रहण करावं.. नाटकाच्या आदर्श प्रक्रियेत एवढं सगळं अभिप्रेत असतं. पण मग आरंभापासून अंतापर्यंत प्रत्येक क्षणाचा साक्षीदार असलेल्या दिग्दर्शकानं काय करावं? नाटकाची नवीकोरी संहिता हातात आल्यावर आणि अधाशीपणानं ती वाचून काढल्यावर पहिल्यांदा त्याला स्वत:ला आलेला खरा अनुभव आणि त्यावेळची उत्स्फूर्त, प्रामाणिक प्रतिक्रिया एवढा छोटा काळ सोडला, तर पुढे मात्र त्याला नाटकाशी निगडित सगळ्याच घटकांशी अथक बोलावंच लागतं. नाटक वाचल्यावर रचनेविषयी आणि काही बदलांविषयीचं टिपण करेपर्यंतच दिग्दर्शकाचं एकटेपण मर्यादित राहतं. नंतर मात्र त्याला सतत संपर्क, संवाद, चर्चा असं व्यक्त व्हावंच लागतं.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Oxford University picks brain rot as word of the year
अग्रलेख : भाषेची तहान…

हे असं सगळं केवळ एक-दोनदा नव्हे, तर प्रत्येक नाटकाच्या वेळी असंख्य वेळा करून झाल्यामुळं असेल; पण मला बोलण्यातूनच व्यक्त व्हायची सवय झालीय. हे सदर लिहिण्याविषयी मला ‘लोकसत्ता’तून विचारलं गेलं तेव्हा पहिली प्रतिक्रिया संभ्रमाची आणि ‘हे शक्य होईल का?’ अशीच होती. मला किंचित पत्रकारितेचा अनुभवही होता. त्यामुळे ‘डेडलाइनचा डेंजर झोन’ खुणावत होताच. पण एक ‘एक्सरसाइज’ म्हणून ही लेखन कामगिरी स्वीकारली. हे सगळं करताना आपण जसं बोलतो तसंच लिहू या, एवढंच फक्त ठरवलं. (पुढे अनेकांनी लेख वाचून हीच प्रतिक्रिया दिल्यामुळे खूप बरंही वाटलं!) काही गोष्टी पक्क्या ठरवल्या. आपल्याच नाटकांविषयी लिहायचं असलं तरीही लिखाण केवळ आत्मपर व्हायला नको. इतर संदर्भ, नामोल्लेख ओघानं यावेत. त्या- त्या वेळची नेमकी सर्जनप्रक्रिया मांडता यायला हवी. भवतालाचं भानही त्यात असावं. नाटकाच्या प्रक्रियेतील सर्व घटकांच्या योगदानाला अधोरेखित करता आलं पाहिजे. आणि हे सगळं कसोशीनं पाळण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. केवळ इतिहास नको, फक्त स्मरणरंजन नको; तर प्रत्येक नाटकाच्या निमित्तानं झालेली वैचारिक देवाणघेवाण, ते नाटक सादर करण्यासाठी वापरलेला ‘दृष्टिकोन’, नाटककाराला नाटक सुचण्यापासूनच्या बिंदूपासून ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासातली गंमतजंमत, त्या- त्या वेळी वापरण्यात आलेली विशिष्ट ‘नाटय़पद्धत’ याविषयी बोलता आलं पाहिजे, हे सतत डोक्यात होतं.

दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक नाटकावर लिहिण्यापेक्षा विशिष्ट टप्प्यावरील काही महत्त्वाच्या कलाकृतींवर, त्या नाटय़प्रवासाबद्दल इथं मांडणी केली. २०१५ साली ‘लोकरंग’मध्ये नव्वदोत्तरी नाटकांविषयीच्या सदरात ‘यळकोट’वर व्यक्त झालो होतो, म्हणून त्याची पुनरुक्ती टाळली. ‘वाडा.. मग्न.. युगान्त’ नाटय़त्रयी तर मी एकदा प्रायोगिक मंचावर आणि नंतर थेट व्यावसायिक रंगभूमीवर खूप वेळ देऊन सादर केली. माझ्यासाठी आयुष्यातली ती एकूणच खूप मोठी उपलब्धी आहे. पण त्याबद्दलही ‘लोकसत्ता’मध्येच दोन वेळा लिहिलं होतं आणि हे सदर सुरू करण्यापूर्वीच या प्रकल्पाविषयीचं ‘दायाद’ हे पुस्तक ‘जिगीषा’नं प्रकाशित केलं, म्हणून मग त्यावरही या सदरात लिहिलं नाही.

१९९० ते २००० या एकाच दशकात मी मराठी, हिंदी, गुजराती रंगभूमीवर २५ हून अधिक नाटकं दिग्दर्शित केली. त्यामुळं या ‘नव्वदोत्तरी दशका’बद्दल माझ्या मनात एक विशेष स्थान तर आहेच; पण याच दशकात कोणतीही व्यावसायिक तडजोड न करता मी आणि माझ्या समकालीनांना हवं तसं नाटक करता आलं, पाहिजे तो विषय निवडता आला, ‘प्रायोगिक-व्यावसायिक’मधली दरी अरुंद करता आली, प्रेक्षक आणि निर्मात्यांचा मोठा विश्वास संपादन करता आला, हेही मला तितकंच महत्त्वाचं वाटतं. या सळसळत्या दशकात व्यावसायिक रंगभूमीवर आलेल्या महत्त्वाच्या नाटकांमध्ये आशय-विषयांचं प्रचंड वैविध्य होतं. या एका तपाच्या कालावधीत आलेल्या काही महत्त्वाच्या नाटकांकडे, त्यांच्या लेखक-दिग्दर्शकांच्या यादीकडे नजर टाकली तरी या दशकाच्या ऊर्जेची प्रचीती येईल.

‘कोण म्हणतं टक्का दिला?’ (संजय पवार-सुबोध पंडय़े), ‘नातीगोती’ (जयवंत दळवी-वामन केंद्रे), ‘डॉक्टर! तुम्हीसुद्धा..’ (अजित दळवी- चंद्रकांत कुलकर्णी), ‘चारचौघी’ (प्रशांत दळवी- चंद्रकांत कुलकर्णी), ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ (अभिराम भडकमकर- चंद्रकांत कुलकर्णी), ‘एक झुंज वाऱ्याशी’ (पु. ल.  देशपांडे- वामन केंद्रे), ‘आत्मकथा’ (महेश एलकुंचवार- प्रतिमा कुलकर्णी), ‘ध्यानीमनी’ (प्रशांत दळवी- चंद्रकांत कुलकर्णी), ‘राहिले दूर घर माझे’ (शफाअत खान- वामन केंद्रे), ‘आमच्या या घरात’ (प्रवीण शांताराम- प्रकाश बुद्धिसागर), ‘अधांतर’ (जयंत पवार- मंगेश कदम), ‘वाटा-पळवाटा’ (दत्ता भगत- सुधीर मुंगी), ‘कारान’ (तुषार भद्रे), ‘किरवंत’ (प्रेमानंद गज्वी- डॉ. श्रीराम लागू), ‘वाडा.. मग्न.. युगान्त’ नाटय़त्रयी (महेश एलकुंचवार-चंद्रकांत कुलकर्णी), ‘यळकोट’ (श्याम मनोहर – चंद्रकांत कुलकर्णी), ‘सावल्या’ (चेतन दातार- पं. सत्यदेव दुबे), ‘प्रेमाची गोष्ट’ (श्याम मनोहर- अतुल पेठे), ‘ढोलताशे’ (चं. प्र. देशपांडे- विजय केंकरे), ‘बुद्धिबळ आणि झब्बू’ (चं. प्र. देशपांडे- गिरीश पतके), ‘गांधी विरुद्ध गांधी’ (अजित दळवी- चंद्रकांत कुलकर्णी), ‘घर तिघांचं हवं’ (रत्नाकर मतकरी), ‘गांधी-आंबेडकर’ (प्रेमानंद गज्वी-चेतन दातार), ‘किमयागार’ (वि. वा. शिरवाडकर- दीपा श्रीराम), ‘प्रकरण दुसरे’ (विवेक लागू), ‘सूर्य पाहिलेला माणूस’ (मकरंद साठे- अतुल पेठे), ‘शोभायात्रा’ (शफाअत खान- गणेश यादव), ‘दुसरा सामना’ (सतीश आळेकर- वामन केंद्रे), ‘चाहूल’ (प्रशांत दळवी- चंद्रकांत कुलकर्णी), याशिवाय ‘ऑल दी बेस्ट’ (देवेंद्र पेम) यांसारख्या नाटकांनी तरुण प्रेक्षकांना मोठय़ा संख्येनं नाटकाकडे वळवलं.

यातला वेगवेगळ्या नाटय़संस्थांचा पुढाकार हाही अत्यंत महत्त्वाचा भाग होता. समांतर रंगभूमीवर ‘आविष्कार’, ‘आंतरनाटय़’, ‘प्रयोग परिवार’, ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’, ‘लोकरंगमंच’, ‘प्रत्यय’, ‘देवल क्लब’, ‘नाटय़-आराधना’, ‘इप्टा’, ‘निनाद’, ‘परिचय’, ‘समन्वय’, ‘जागर’ आदी अनेक नाटय़संस्था अत्यंत उत्साहात, जाणीवपूर्वक नाटक सादर करतच होत्या. त्यातली ‘झुलवा’, ‘चारशे कोटी विसरभोळे’, ‘सांधा’, ‘आपसातल्या गोष्टी’, ‘एक डोह अनोळखी’, ‘लोकमहाभारत- जांभूळ आख्यान’, ‘किंग लियर’, ‘चाफा’, ‘भूमितीचा फार्स’, ‘दगड का माती’, ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘साठेचं काय करायचं?’, ‘राधा वजा रानडे’, ‘मसाज’ ही काही ठळक आठवणारी नावं.

जणू काही हे सगळे रंगकर्मी नियमित एकत्र भेटून, निश्चित धोरण आखून ही सगळी नाटकं एकापाठोपाठ करताहेत की काय, असं वाटावं इतका मोठा हा आवेग होता! पण जरी आम्ही सगळे प्रत्यक्ष काही ठरवण्यासाठी भेटत नसलो तरी ‘समविचारीपणा’, ‘सहसंवेदना’ हा समान धागा आम्हाला घट्ट जोडणारा होताच. ‘एनएसडी’बरोबरच महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठांतल्या नाटय़शास्त्र विभागातील प्रशिक्षित रंगकर्मीचा वाढता ओघ हाही एक महत्त्वाचा घटक होताच. नाटय़प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्ष कलाक्षेत्रात काम करताना मात्र दूरचित्रवाणी आणि चित्रपटाच्या माध्यमातच पुढे काम करण्याचा हल्लीचा ‘ट्रेंड’ तोपर्यंत रूढ झाला नव्हता. याच दशकात टीव्ही लोकांच्या दिवाणखान्यात ठाण मांडून बसला आणि त्यांना घरातून उठून नाटय़गृहापर्यंत जाण्यासाठीचा अडथळाही ठरू लागला. जागतिकीकरणाच्या अनेक घटकांनी माणसाचं दैनंदिन वेळापत्रक बदललं. कामाचे तास बदलले. फोन-हेडफोन्सनी माणसं एककल्ली बनू लागली. बॉम्बस्फोट, दंगलींनी वातावरण गढूळलं. २४ तास जिवंत वाहणारं हे गतिमान शहर आक्रसून गेलं. नाटकाच्या रात्रीच्या प्रयोगाच्या वेळेवरही त्याचा परिणाम झाला. फक्त मुंबईतच नाही, तर शहराशहरांमध्ये लोकवस्ती मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरित होत होती. माणसं स्वत:चं घर घेऊन मूळ जागा सोडून लांब लांब जाऊन राहू लागली होती. नाटय़गृहांमध्ये राजकीय मेळावे, लावण्यांचे कार्यक्रम जोर धरू लागले होते. या सगळ्या राजकीय- सामाजिक- आर्थिक बदलांचे अडथळे ‘नाटक’ सादर करणाऱ्यांना येतच राहिले. पुढच्या विखंडित दशकाची ही नांदी होती. पण म्हणून रंगभूमीवरचे प्रयत्न मात्र तसूभरही कमी झाले नाहीत. दर्जेदार नाटकांच्या उभारणीत अनेक रंगकर्मी त्याच जोमानं काम करीतच राहिले. ‘मराठी नाटक’ पुन:पुन्हा उसळी मारून वर येतच राहिले.

रंगभूमीशी निगडित लेखक, दिग्दर्शक, नट या प्रमुख घटकांपकी अनेकांनी दूरचित्रवाणी-चित्रपट माध्यमातली आव्हानं पेलण्यासाठी रूळ बदलले. काहींनी वारंवार रंगभूमीकडे ‘यू टर्न’ घेतला. काहींनी पाठ फिरवली. पण ती कायमची नव्हती. काही काळानं ते पुन्हा रंगमंचावरच्या जिवंत जादूची किमया अनुभवायला परतले. मीसुद्धा या दशकानंतर दूरचित्रवाणी- चित्रपट माध्यमांतर केलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘पिंपळपान’, ‘टिकल ते पोलिटिकल’च्या निमित्तानं टेलिव्हिजन आणि ‘बिनधास्त’ ते ‘फॅमिली कट्टा’ असे अकरा चित्रपट केले. पण जाणीवपूर्वक मर्यादित काळानंतर मी ठरवून पुन्हा पुन्हा नाटक मात्र करीतच राहिलो. या माध्यमांतरातही साहित्य- नाटक या स्रोताचा प्रामुख्यानं वापर करून पाहिला. विशेषत: ‘पिंपळपान’च्या निमित्तानं ‘वावटळ’ (व्यंकटेश माडगूळकर), ‘ऑक्टोपस’ (श्री. ना. पेंडसे), ‘माणूस’ (मनोहर तल्हार), ‘अंधाराच्या पारंब्या’ (जयवंत दळवी), ‘कमला’ (विजय तेंडुलकर) अशा दर्जेदार साहित्य-नाटय़कृतींचं छोटय़ा पडद्यावरचं रूपांतर आणि ‘भेट’ (रोहिणी कुलकर्णी) या कादंबरीचं चित्रपट रूपांतर हे दिग्दर्शक म्हणून खूप मोठं समाधान देऊन गेले. एकाच वेळी रंगमंचावरच्या ‘स्थळ-काळ-कृती’चं बंधन आणि त्याच्या सामर्थ्यांचा अनुभव, तर दुसरीकडे ही मर्यादाच नसलेलं आणि एक त्रिमितीचं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं माध्यम! या दोन्ही माध्यमांत एकाच वेळी काम करताना दिग्दर्शकाला प्रकर्षांनं मूलभूत कलेच्या क्षेत्रातील भिन्न तत्त्वांची जाणीव आणि आकलन होतं. या दोन्ही-तिन्ही माध्यमांत इकडचं ‘कौशल्य’ तिकडे वापरता येत नाही, ही खरी त्यातली मौज. म्हणूनच आतून ठरवलं होतं- ‘रंगमंचावर सिनेमा करायचा नाही आणि पडद्यावर नाटक करायचं नाही!’ ३० सेकंदांची जाहिरात ते नऊ तासांचं नाटक दिग्दर्शित करताना सूक्ष्म ते भव्य पातळीवर (मायक्रो ते मॅक्रो) काम करून पाहता आलं. तपशीलवार आणि खोलात जाऊन काम करण्याचा अनुभव घेता आला. पण ‘नाटक २४ ७ ७’ या शीर्षकात ते मुद्दामच अंतर्भूत केलं नाही. त्याविषयी स्वतंत्ररीत्या मांडणी करण्याचा मानस आहे.

सदराची सुरुवात झाली तेव्हा ‘हॅम्लेट’च्या भव्य प्रकल्पात प्रचंड गुंतून गेलो होतो. सादरीकरणाचं मोठं अवकाश आणि आवाका असलेल्या या जागतिक कीर्तीच्या नाटकाला रंगमंचीय रूप देण्याच्या सर्जनशील खटाटोपात मग्न होतो. त्यातून वेळ काढून नियमित सदर लिहिताना काही काळ दमछाक झाली. ‘हब्रेरियम’च्या यशस्वी उपक्रमानंतर सुनील बर्वेसह आम्ही पाच दिग्दर्शक फक्त नाटकं पाहण्यासाठी लंडनला गेलो होतो. जवळपास सहा-सात वेगवेगळ्या आकृतिबंधाची नाटकं आम्ही त्या दहा दिवसांत पाहिली. वर्षांनुर्वष एकाच नाटय़गृहात एकच नाटक होणं, त्याची भव्य निर्मिती, तांत्रिक कौशल्य, प्रेक्षकांचा ओघ याविषयी आम्ही एकमेकांशी पूर्णवेळ बोलत होतो. असंच काहीतरी आपण आपल्याकडे का करू नये, असं आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं. ‘हॅम्लेट’च्या निर्मितीमागे हेही बीज मनात कुठंतरी होतंच. ‘हॅम्लेट’ रंगमंचावर आलं. महाराष्ट्राच्या नाटय़रसिकांनी त्याचं प्रचंड मोठा प्रतिसाद देऊन स्वागत केलं. मराठी रंगभूमीवर प्रथमच एवढय़ा मोठय़ा, भव्य सादरीकरणासाठी तीन महिने झटलेल्या सर्व नट-तंत्रज्ञांच्या श्रमांचं चीज झालं. एक अद्भुत समाधान आम्हा सगळ्यांना मिळालं. ‘जिगीषा- अष्टविनायक’च्या बिनचूक नियोजनाला ‘झी मराठी’च्या प्रस्तुतीचं पाठबळ मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ‘हॅम्लेट’नं वेधून घेतलं. विशेष म्हणजे आजच ‘हॅम्लेट’चा हीरकमहोत्सवी प्रयोग होतो आहे याचं मनाला विशेष समाधान वाटतंय. ‘हॅम्लेट’च्या प्रोसेसवर भविष्यात विस्तारानं लिहावं लागेलच.

या सदराच्या निमित्तानं तात्पुरती का होईना, नियमित लिखाणाची थोडी सवय, शिस्त लागली. ही संधी दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे मन:पूर्वक आभार! प्रत्येक लेख छापून आल्यानंतर नेमानं आणि अगत्यानं प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या सर्व मित्रमत्रिणींचाही मी ऋणी आहे. सदराच्या शेवटी ईमेल आयडी देण्याच्या प्रथेमुळे अनेक नवीन मित्रांची भर पडली, संपर्क-संवाद झाला. पहिले दोन लेख छापून येतायत- न येतात, तोच ‘राजहंस’ प्रकाशनाच्या दिलीप माजगावकरांचा नाटककार मित्र अभिराम भडकमकरमार्फत निरोप आला की, ‘पुढे याचं पुस्तक नक्की करू या!’

बघता बघता वर्ष सरलं. आठवणींची एक मोठ्ठी ‘हार्डड्राइव्ह’ रिकामी झाली. मागे वळून तटस्थपणे पाहताना तीन दशकांच्या ‘कालचक्रा’त बसून फिरून येता आलं. सर्जनाच्या क्षेत्रातल्या मूलभूत संकल्पनांची उजळणीही झाली. या सदराचं ‘पिंपळपान’ मला माझ्या या वर्षीच्या डायरीत जपून ठेवता येईल. आता नवीन वर्ष, नवी दैनंदिनी, नवे संकल्प, नव्या वाटा! तुम्हा सर्वाना नवीन वर्षांच्या शुभेच्छा!

chandukul@gmail.com (समाप्त)

Story img Loader