एकांकिका, नाटक, मालिका, चित्रपट या सगळ्या माध्यमांत लेखक म्हणून व्यक्त होणाऱ्या अभिराम भडकमकरला मी महाविद्यालयीन काळापासून ओळखत होतो. वादविवाद स्पर्धामध्ये सहभागी असल्यापासूनच! पुण्यातल्या एकांकिका स्पर्धामध्ये त्याच्या एकांकिका झालेल्या पाहिल्या. पुढे दिल्लीच्या एनएसडीमध्ये रीतसर नाटय़- प्रशिक्षण घेऊन तो मुंबईत आला. अभिनय-लेखन या दोन्ही क्षेत्रांत त्याला काम करायचं होतं. पण लेखक म्हणून तो खूप लवकर कार्यरत झाला. १९९४ साली आम्ही एकत्र नाटक केलं- ‘ज्याचा त्याचा प्रश्न’!

‘ध्यानीमनी’नंतर माझ्या हाती पुन्हा एक नवं आणि आशयप्रधान नाटक मिळालं याचा मला विशेष आनंद होता. त्यामुळे या दशकातली वेगळ्या नाटकांची मालिका खंडित न होता तशीच पुढे सुरू राहिली. एकूणच नव्वदोत्तरी काळात विषयांचं वैविध्य किती होतं, प्रशिक्षित आणि काही वैचारिक पाया असलेले किती रंगकर्मी यादरम्यान प्रायोगिक रंगभूमीवरून व्यावसायिकवर कार्यरत झाले, लिहिते झाले, दिग्दर्शक झाले, याबद्दल एकदा सविस्तर लिहिण्याचा विचार आहेच; परंतु हे नाटकदेखील विषयांच्या या वैविध्याची साक्ष देणारं ठरलं. आपला एक समवयीन मित्र, तरुण रंगकर्मी असा एक आव्हानात्मक, वेगळा विषय निवडतो आणि तो मुख्य धारेत नाटय़रूपात मांडतो याचं अप्रूप वाटलं. एव्हाना अशा नाटकांसाठी निर्मातेही पुढे येऊ लागले होते. त्यापकी लता नार्वेकरांची अशीच उत्तम साथ मला मिळाली. त्याही धाडसी प्रयोगांसाठी नेहमीच उत्सुक असायच्या. ‘चारचौघी’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ आणि ‘ज्याचा त्याचा विठोबा’ अशी तीन आशय-विचारप्रधान नाटकं मी त्यांच्याबरोबर ‘श्री चिंतामणी’साठी केली. काही वेगळं हाती आलं की या बाईंमध्ये संचारणारं चतन्य मी प्रत्यक्ष अनुभवलंय.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम

मला आठवतं, मी ‘बनगरवाडी’ चित्रपटाचं चित्रीकरण करून नुकताच परतलो होतो. ‘अभिनेता’ म्हणून एक वेगळा अनुभव घेऊन ताजातवाना होऊन या नाटकाच्या निमित्तानं पुन्हा मी ‘दिग्दर्शका’च्या भूमिकेत शिरलो. नाटक वाचल्यानंतर अभिरामशी खूप चर्चा झाल्या. मुख्य धारेतल्या नाटकाच्या आशय-मांडणीविषयी आमचं एकमत होतंच. त्यामुळे पुनल्रेखन, छोटे-मोठे बदल, सादरीकरणातले तपशील याबद्दल सातत्यानं बोलणं व्हायचं. समकालीन असण्याची एक वेगळी मिती आमच्या त्या संवादाला होती.

‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकाचा विषयही तसा संवेदनशील आणि नाजूक होता.. आस्तिक-नास्तिकता या कोणत्याही काळात चिरंतन असणाऱ्या प्रश्नावरचं हे नाटक होतं. नाटक खळबळजनक व्हावं, वाद निर्माण व्हावा असा आमचा कुणाचाच हेतू नव्हता. उलट, रंगमंचावर तो मांडताना खूप जाणीवपूर्वक, संतुलितरीत्या सादर करावा लागणार होता. ‘परमेश्वर’, ‘देव’ ही कल्पना की संकल्पना? या प्रश्नाची ज्याची त्याची उत्तरं सुरुवातीपासूनच अगदी पक्की असतात असं नाही. जगण्याच्या प्रवाहात तुमचं आकलन वाढत जातं, तुम्ही प्रगल्भ होत जाता, एखाद्या विशिष्ट विचारसरणीचे संस्कार तुमच्यावर होत जातात आणि मग त्यानुसार ही ‘संकल्पना’ वैयक्तिकदृष्टय़ा स्पष्ट होत जाते. त्यातही ‘आहे’ की ‘नाही’? हा प्रश्न पडण्यापेक्षा ते एक गृहीत सत्य मानून जगणाऱ्यांचं प्रमाण आजूबाजूला नेहमीच जास्त आढळून येतं. शिवाय त्याला धर्म, श्रद्धा, कर्मकांड, समाजाचं मानसशास्त्र, शिक्षण, सामाजिक चळवळ असेही अनेक कंगोरे! मुळात वातावरण कोणतंही असो, वय व शिक्षणानुसार प्रत्येकाची या संकल्पनेविषयीची ‘धारणा’ हळूहळू पक्की होत जाते. शिक्षणाच्या मूलभूत प्रक्रियेत तुम्ही जसजसा ‘विज्ञान’ हा विषय शिकत जाता, तसतशी जगण्यातल्या अनेक आश्चर्याची गुपितं उलगडत जातात. खरं तर असं विज्ञाननिष्ठ होत जाणं स्वाभाविक व सहज; पण तसं होत नाही. असं कसं? का? असा प्रश्न कुणी विचारला तर आजूबाजूची मंडळी एका दिशेला बोट दाखवतात. जणू तिथे एक अदृश्य ‘पाटी’ कुठेतरी लावलेली असते. तिथे शून्यात पाहून आपण ती वाचायची असते, हा सामाजिक संकेत!

एकूणच हा विषय जसा व्यापक, तसाच गुंतागुंतीचा. तो दोन तासांच्या नाटकात मांडणं, त्या अनुभवानं तुम्हाला आत्मपरीक्षण करायला लावणं, ही तारेवरची कसरत. परंतु या नाटकात अभिरामनं खूप विचारपूर्वक ही सगळी मांडणी केली होती. पात्रं, व्यक्तिरेखा निर्माण करताना त्यानं काही ‘प्रतीकं’ वापरली आणि भोवताली घडणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा घटनांना ‘स्थळ-काळ-कृती’चं परिमाण प्राप्त करून दिलं. नाटक सुचण्याची प्रक्रिया सांगताना स्वत: अभिरामनं मुंबईत तो जिथं राहत होता त्या भागातल्या एका छोटय़ा ‘मठा’ची आठवण आवर्जून सांगितली होती. मोठं नाटय़पूर्ण स्थळ! बुद्धी, तर्कापेक्षा भावनिकदृष्टय़ा मानसिक आधार शोधण्याचं एक ठिकाण! त्या वातावरणाकडे पाहताना आणि तत्कालीन सामाजिक घटनांच्या निरीक्षणातून लेखकाला या नाटकाची रचना सुचली. त्यातूनच त्यानं श्रद्धा-अंधश्रद्धा, नशीब-कर्तृत्व, शिक्षण-वैज्ञानिक दृष्टिकोन, भावनिक आधार-मानसिक अडथळा अशा दोन्ही बाजूंच्या संघर्षांची कथानकात विविध अंगांनी मांडणी केली. प्रखर विचारांच्या चळवळीतला ‘भास्कर’, निर्मळ मनाची शिक्षिका ‘निर्मला’, हुशार, पण स्थितीवादी आणि नशिबावर विसंबून असणारा ‘सुभाष’ आणि शालेय विद्यार्थी असणारा, घरी विज्ञाननिष्ठ वातावरण आणि बाहेर मात्र वेगळाच माहौल अनुभवणारा संभ्रमित ‘मनू’ (मानवेंद्र) अशी पात्रं लेखकानं निर्माण केली. या सगळ्यांना त्यानं आधुनिक शहरातल्या एका अजूनही जुन्या असलेल्या ‘वाडय़ा’त नेऊन ठेवलं. अधूनमधून त्या वाडय़ात येणाऱ्या ‘गोंद्या’ व ‘सगुणा’ या नवरा-बायकोच्या निमित्तानं एका वेगळ्या सामाजिक, आर्थिक गटाला त्यानं प्रतिनिधित्व दिलं. शिवाय फोनवरून आणि कथानकातील संदर्भावरून दादासाहेब, राणा मॅडम, सदावत्रे, लेले ही काही मंडळी जरी प्रत्यक्षात रंगमंचावर येत नसली तरी प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर कल्पनेत का होईना, पण त्या व्यक्तिरेखा निर्माण केल्या. त्यांच्या विंगेतल्या कृतीचासुद्धा उपयोग नाटककारानं मंचावर घडणाऱ्या घटनांमधून अप्रत्यक्षपणे केला.

नटांच्या निवडीबाबत निर्मात्या लता नार्वेकर, मी व अभिरामने वेळोवेळी खूपदा सविस्तर चर्चा केल्या. वंदना गुप्ते, डॉ. गिरीश ओक, डॉ. शरद भुताडिया, सचिन गोस्वामी, सविता खोसे, ओम राऊत हा नटसंच पक्का झाला. एकमेकांच्या कामाच्या पद्धतीविषयी प्रत्येकालाच उत्तम माहिती होती, अंदाज होता. वंदनानं आणि मी तर एव्हाना पाच नाटकांमधून अभिनेत्री-दिग्दर्शक म्हणून प्रत्यक्ष काम केलेलंच होतं. गिरीशची व्यावसायिक रंगभूमीवरील सर्व नाटकांतली कामं मी पाहिली होती. सचिन गोस्वामीबरोबर थोडंबहुत काम आधी केलं होतं. सविता मात्र टीममध्ये नव्यानं सामील झाली होती. भूमिकेची तिचीही उत्तम समज तालमींमध्ये दिसली. सगळ्यात वयानं लहान होता ओम राऊत. शालेय रंगभूमी, बालचित्रपटांतून त्यानं कामं केलेली होती; पण मुख्य धारेतील नाटकांचे प्रयोग, तालमी यांत तोही हळूहळू रमत गेला. त्याचं एकूणच सगळं काम तब्येतीनं. स्वत:च्या संथगतीनं! आणि मी मात्र तालमीत वेगानं कामाला लागायचो. त्यामुळे काही वेळा त्यानं ओरडाही खाल्ला. पुढे वंदनानं त्याला रंगमंचावरच्या प्रत्येक प्रयोगात उत्स्फूर्ततेनं कसं सामील व्हायचं, याचं तिच्या खास शैलीत मार्गदर्शन केलं! डॉ. भुताडिया हे सोलापूर-कोल्हापूरच्या प्रायोगिक रंगभूमीवरचे दिग्दर्शक-नट. ‘प्रत्यय, कोल्हापूर’तर्फे अनेक महत्त्वाच्या नाटकांमधून, स्पर्धा, प्रायोगिक चळवळीत सहभाग असलेले. ते या नाटकाच्या निमित्तानं मुंबईत आले. त्यांच्यामुळे नाटकातल्या ‘भास्कर’ला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त झालं. ‘भास्कर’ची तगमग, त्याचा बुद्धिप्रामाण्यवाद त्यांनी अर्थपूर्णरीत्या व्यक्त केला.

मोहन शेडगेंनी रचलेल्या एका वाडय़ातल्या दोन बिऱ्हाडांत ही पात्रं तालमीत हळूहळू रुळू लागली. वंदनानं खूप सहजपणे आणि नसर्गिकरीत्या ही शिक्षिकेची भूमिका साकारली. तिची मातृत्वाची आस, शिक्षिकेचा व्यवसाय, मनूप्रति तिचा स्नेह, आपुलकी, भास्करविषयीचा आदर आणि एक साधी गृहिणी.. असं सगळं जगणंच तिनं जिवंतपणे उभं केलं. डॉ. गिरीश ओकने मात्र सुभाषच्या या भूमिकेत ‘बॅटिंग’ केली. त्याला त्या पात्राची ‘लय’ फार सुंदर गवसली आणि त्यानं तालमीत ती जोपासली. फोनवरचे सहज संवाद, खूप महत्त्वाकांक्षा नसणं, पटकन् कुणावरही विश्वास टाकून मग अपेक्षाभंगानंतर तिरमरून उठणं, दारूच्या सीनमधली ‘भडास’ हे सगळं त्यानं अंगावर घेतलं, पेललं. त्याची पावतीही त्याला दर प्रयोगागणिक आणि पुरस्कारांनी आपसूक मिळाली. डॉ. शरद भुताडियांसाठी मुळातच ‘भास्कर’ ही व्यक्तिरेखा खूप जवळची होती. त्याची तात्त्विक मांडणी, अभ्यास, एका कार्यकर्त्यांची तळमळ, बाहेरच्या समाजात काही पटकन् बदलत नाही याविषयीची त्याच्या मनातली चीड, अनाथ मुलाला दत्तक घेऊन बाप-मुलाचं एक वेगळंच नातं निभावण्याची त्याची धडपड, मुलाला केवळ भावनिक कोषात न अडकवता बाहेरच्या संघर्षांसाठी तयार ठेवण्यासाठीची त्याची वृत्ती, प्रत्यक्ष आंदोलनातला आवेश, सुभाषला ‘धाडसी निर्णय घे’ असा सल्ला देणारा ज्येष्ठ मित्र.. या सगळ्या छटा डॉ. भुताडियांनी समर्थपणे रंगवल्या. ओम राऊतला त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता, बोलके डोळे याचा खूप उपयोग झाला. फक्त त्याच्या रंगमंचावरच्या हालचाली, आवाजफेक यावर जरा सविस्तर काम करावं लागलं. त्यानंही ते मन:पूर्वक केलं. अभिरामनं त्याच्या तोंडी काही वरवर निरागस वाटणारे, पण आत कळीचा मुद्दा असणारे संवाद लिहिले होते. ओमने ते कुतूहल आणि तो भाबडेपणा खूप सच्चेपणानं पेलला. नाटकात फक्त काही दृश्यांपुरतीच या वाडय़ात येणारी गोंद्या-सगुणा ही जोडी. खूप कमी वेळासाठी ते रंगमंचावर असतात. पण या निवडक प्रसंगांमधूनही अत्यंत प्रभावी कामं या दोघांनीही केली. थोडी वेगळी ग्रामीण बोलीभाषा, त्यानुसारची देहबोली याचा उत्तम आविष्कार त्यांनी केला. रंगमंचावरची त्यांची ही नवरा-बायकोची ‘केमिस्ट्री’ इतकी जमली, की पुढे प्रत्यक्ष आयुष्यातही तशीच ती कायम राहिली. ‘त्यांचा त्यांचा’ हा ‘जीवनसाथी डॉट कॉम’चा प्रश्न त्यांनी बहुतेक या नाटकाच्या तालमी आणि प्रयोगांदरम्यान सोडवला होता! एकूणच या नाटकाच्या दिग्दर्शन प्रक्रियेत मला माझा तरुण मित्र आशुतोष भालेरावचं मोलाचं साहाय्य झालं.

या नाटकाच्या पाश्र्वसंगीताच्या निमित्तानं पहिल्यांदाच राहुल रानडेबरोबर काम केल्याचं स्पष्ट आठवतं. प्रायोगिक नाटक, ग्रिप्स थिएटर अशी पार्श्वभूमी असलेल्या राहुलला संगीत आणि ध्वनी दोन्हींचा एकत्र वापर पाश्र्वसंगीतात करण्याची उत्तम जाण. या नाटकात ‘नाटय़पूर्ण’ अशा घटना रंगमंचाबाहेरच सतत घडतात. त्याचे पडसाद मात्र प्रत्यक्ष पात्रांच्या प्रतिक्रियेत, मानसिकतेत मोठा बदल घडवून आणतात. वाडय़ाच्या बाहेर रस्त्यावर लांबून येणारी पालखी, टाळ, मृदुंग, लेझीम अशा वाद्यांच्या गदारोळात तिचं जवळ जवळ येत जाणं आणि मग त्या कल्लोळातच ब्लॅकआऊट होत जाणं अशा अनेक प्रभावी क्षणांनी नाटकाच्या परिणामाला त्यानं गडद केलं. टेपरेकॉर्डरवर ऐकू येणारं प्रवचन, पात्रांच्या मानसिक आंदोलनासाठी केलेला ‘पखवाज’ या वाद्याचा विशेष वापर हे उल्लेखनीय ठरलं. अर्थातच ‘नाटय़दर्पण’साठी सर्वोत्कृष्ट पाश्र्वसंगीताच्या पारितोषिकानं त्याला समर्पक अशी शाबासकीही मिळालीच.

‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या शीर्षकात ‘असू दे, आपल्याला काय त्याचं?’ असा सूर नव्हता, तर ‘ज्याच्या त्याच्या’ दृष्टिकोनाविषयीचा आदरच व्यक्त होत होता. सार्वजनिक जीवनात ‘परमेश्वर’ ही संकल्पना खूप गुंतागुंतीची बनत गेली आहे. वारंवार तिला तर्क-बुद्धीची कसोटी लावली जाते. या नाटकात काही पात्रं, काही घटना यांना नाटककारानं एकत्र गुंफलं आणि ‘या पेचाला कसं सामोरं जायचं, ते तुम्ही ठरवा’ अशा प्रकारचा अनुभव देऊ केला. या नाटय़ानुभवाला प्रेक्षकांनी दाद दिली. समीक्षकांनी त्याचं वेगळेपण नोंदवलं. पुरस्कारांनी लेखकाचं, नटांचं, निर्मात्यांचं मनोबल वाढवलं. प्रयोगांबरोबरच परिसंवादांतूनही या विषयावरच्या प्रामाणिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. दोन्ही अंगांनी मतप्रदर्शन झालं. रंगमंचाची चौकट तोडून नाटक असं जनमानसात पोहोचलं की आम्हा रंगकर्मीना हेतू सफल झाल्याचा खरा आनंद मिळतो, एवढं मात्र खरं!

chandukul@gmail.com

Story img Loader