नवा लेख लिहिताना अचानक लक्षात आलं की, पंचवीस वर्षांपूर्वी बरोब्बर आजच्याच दिवशी- म्हणजे ५ ऑगस्ट १९९३ रोजी ‘ध्यानीमनी’ या नाटकाचा पहिला प्रयोग ‘अश्वमी थिएटर्स’ आणि ‘चंद्रलेखा’नं रंगमंचावर सादर केला होता. ‘संहिता ते प्रयोग’ हा प्रवास प्रत्येक नाटकाबरोबर होतोच; पण दिग्दर्शक म्हणून ‘ध्यानीमनी’चा सहवास खूप काळ लाभला. मराठीनंतर लगेच गुजराती-‘मंत्रमुग्ध’ (१८ नोव्हेंबर १९९३), हिंदी- ‘बस इतना सा ख्वाब’ (१५ ऑगस्ट २०१०) आणि नंतर मराठी चित्रपट ‘ध्यानीमनी’ (१० फेब्रुवारी २०१७). दरम्यान काळ, भाषा, सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ बदलले; पण दरवेळी हा अनुभव आणि त्याचा परिणाम मात्र तसाच एकजिनसी, एकसंध आणि तीव्र राहिला.

एखाद्या अज्ञात स्थळाकडे पहिल्यांदाच जाताना आपल्याला प्रवासाचा एक वेगळाच आनंद मिळत असतो. रस्ता, आजूबाजूला दिसणारं सगळंच अपरिचित. वळणं येतात, घाट येतात, मधेच थकवा येतो; पण एकदा ईप्सित स्थळी पोहोचल्यावरचं समाधान काही औरच असतं. मात्र, पुढच्या वेळी त्याच ठिकाणी पुन्हा इतर मित्रांबरोबर प्रवास करताना कधी आपण पुन:प्रत्ययाचा आनंद मिळवतो, तर कधी मुद्दाम वाट वाकडी करून दुसरे पर्यायी मार्गही शोधतो. पण अखेरीस त्या जागी पोहोचल्यावरचा आनंदही तेवढाच ‘नवा’ असतो. तसंच काहीसं ‘ध्यानीमनी’च्या या चारही अनुभवांबाबत म्हणता येऊ शकेल. दरवेळी मी त्या संहितेच्या अधिक खोलात शिरू शकलो.. आशय-मांडणीच्या माझ्या समजुतीत मोलाची भरच पडत गेली.

philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
women responsibility, free Time women , women ,
रिकामटेकडी
चार धाम यात्रेतून उत्तराखंडला दररोज २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळतं. (फोटो सौजन्य पीटीआय)
Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारने पहिल्यांदाच हिवाळ्यात चारधाम यात्रा का सुरू केली?
Tourists, Khandala Lonavala hill stations traffic jam
नववर्ष स्वागतासाठी लोणावळ्यात पर्यटकांची झुंबड; लोणावळा, खंडाळ्यात ठिकठिकाणी कोंडी

पुण्यातल्या एका दत्तक-पालक शिबिराला काही नाटककारांनाही मुद्दाम निमंत्रित केलं गेलं होतं. त्यात अजित दळवी, प्रशांत दळवी आणि आणखी काहीजण होते. दिवसभराच्या त्या विविध अनुभवश्रवणानं ते सगळेच ढवळून निघाले. नाटकाचा नेमका आरंभिबदू कसा सुचला? विषयाची प्रेरणा नेमकी कधी मिळाली? याविषयी प्रत्येक नाटककाराचा अनुभव अत्यंत भिन्न स्वरूपाचा असतो. या शिबिरातल्या अनेक स्त्रियांच्या मनोगतांमधून प्रशांतच्या मनात ‘ध्यानीमनी’चं बीज रुजलं. तेव्हा एक बाई म्हणाल्या, ‘‘शेवटी मूल असणं म्हणजे तरी काय हो? अ फाइनली डिसऑर्गनाइज्ड होम! घरभर मांडलेला गोड पसारा!’’ या उद्गारातून लेखकाला शालिनीची पाळंमुळं सापडत गेली. आणि पुढे ‘शालू’च्या ‘ध्यानीमनी’ असलेला कल्पना-वास्तवाचा अद्भुत खेळ त्यानं रचला.

संहितेतल्या नेमक्या याच संवादामधून मला दिग्दर्शक म्हणून ‘ध्यानीमनी’च्या सादरीकरणाच्या शैलीची प्रेरणा मिळाली असं मला वाटतं. हे नाटक रंगमंचावर खेळवण्यासाठी विशिष्ट नेपथ्यरचना आवश्यक होती. विशेषत: सादरीकरणाची शैली निवडणं. यातला अखंड स्टेज बिझिनेस, खूप वस्तू, हालचाली यासाठी सूचक वास्तवतावाद पुरेसा ठरणार नव्हता. त्यासाठी मग निसर्गवादाच्या जवळ जाणारं, खूप तपशिलांतलं, खरंखुरंच वाटावं असं स्वयंपाकघर, मधली खोली, त्यातला व्हरांडा आणि बेडरूम अशी स्तरनिविष्ट रचना निर्माण झाली. या घरात वावरणारं कोणतंही पात्र फक्त बाथरूमध्ये गेलं तरच दिसत नाही. एरवी त्याचा सर्वत्र संचार प्रेक्षकांच्या नजरेसमोर सतत असावा हाच मुख्य हेतू होता. या घरातल्या बेसिनच्या नळाला पाणीही येत होतं आणि किचनमध्ये पेटवलेला गॅसही स्पष्ट दिसत होता. वस्तूंच्या या गराडय़ात आपला खेळ मनोभावे खेळणाऱ्या शालिनीच्या ठाम विश्वासाला पूरक असंच सगळं तिथं होतं. पहिल्या अंकाच्या शेवटी या घरात ‘मोहित’ नावाचा कुणी मुलगाच अस्तित्वात नाही, तो फक्त ‘कल्पनेतला’ आहे, हा अनुभव प्रेक्षकांना मिळण्यासाठी जाणीवपूर्वक मांडलेला हा ‘पसारा’ होता. एरवी प्रत्येकाच्या घरात आपण नेहमी पाहतो तसंच जिवंत वातावरण, तेच तपशील एवढे ठळकपणे दिसत असताना आणि मोहितच्या अस्तित्वाच्या खुणा समोर सर्वत्र विखुरलेल्या असताना ‘तो’ असणारच नाही याची पुसटशीसुद्धा शंका सुरुवातीला प्रेक्षकांना येऊ नये म्हणून ही सगळी दक्षता जाणतेपणानं घेतली होती. त्यात शालूची अखंड बडबड, तिची मिनिट टू मिनिट अशी वेगवान दैनंदिनी, त्यानुसार नैसर्गिकहालचाली, घरातल्या वस्तूंचं हाताळणं.. यामुळे आपलंच रोजचं जगणं रंगमंचावर दिसतंय, हा प्रेक्षकांचा ‘मेक बिलीफ’ अधिकाधिक घट्ट होण्यासाठी ही शैली पोषक ठरली. त्या दिवशीची सकाळ आणि त्याच दिवशीची रात्र अशा केवळ दोनच प्रवेशांमध्ये विभागलेला पहिला अंक केवळ ३०-३२ मिनिटांचा होता. आणि प्रचंड गतिमानतेनं हे सगळं घडून ‘मोहित’ नाहीच आहे, या िबदूवर पहिल्या अंकाचा पडदा पडण्याचा नाटय़पूर्ण क्षण निर्माण होत असे. प्रेक्षक सुन्न होऊन जागेवरच खिळून बसत असे. हा अनुभव ‘ध्यानीमनी’ला कायम आला. हा परिणाम इतका तीव्र स्वरूपाचा होता, की अनेक प्रेक्षक मध्यांतरात नाटय़गृहाच्या बाहेरही जात नसत. आता पुढे काय होणार? कसं होणार? या उत्सुकतेची परिसीमा गाठली जात असे. आणि मग पहिल्या अंकाच्या तुलनेत मोठा असणारा दुसरा अंकही प्रेक्षक तेवढय़ाच एकाग्रतेनं पाहत असे.

‘ध्यानीमनी’च्या पहिल्या वाचनापासूनच महेश मांजरेकर या नाटकाच्या अखंड प्रेमात होता. म्हणूनच या नाटकाची निर्मिती करताना पहिल्यांदाच ‘चंद्रलेखा’ आणि ‘अश्वमी थिएटर्स’ अशा दोन संस्था एकत्र आल्या. नीना कुळकर्णी, शिवाजी साटम, संदीप कुलकर्णी, प्रज्ञा जावळे अशा चारच कलाकारांच्या संचात केलेल्या नाटकाच्या अखंड तालमी नेहमीच आठवतात. संहितेत नाटककाराला आणि प्रयोगात दिग्दर्शकाला अभिप्रेत असणारं सगळंच विस्तारानं सादर करण्याची अत्यंत कठीण जबाबदारी नीना कुळकर्णीवर होती. ती ‘शालू’च तशी प्रचंड डिमांडिग होती. विचार, भावना, कृती, तर्क, आग्र्युमेंट सगळंच ती उत्स्फूर्तपणे आणि अथक करत होती. नीनाच्या उत्कृष्ट भूमिकांपकी एक अशी ही भूमिका ठरली. खूप उत्कटतेनं, नैसर्गिकपद्धतीनं तिनं ती साकारली. नव्हे, ती भूमिका ती जगलीच. प्रत्येक प्रयोगात नव्यानं ही ‘शालू’ साकारताना, भावनेची तेवढीच तीव्रता नियमित वापरताना अशा प्रकारच्या नाटकात कलाकाराला शरीरानं आणि मनानं दमवणारं ते ठरतं! पण नीनामधली समर्थ अभिनेत्री ही ‘शालिनी’लाही पुरून उरली. परिश्रमपूर्वक केलेल्या तालमी आणि दर प्रयोगामध्ये वापरावी लागणारी सळसळती ऊर्जा नीनाच्या ‘शालू’मध्ये सातत्यानं दिसली. प्रेक्षकांनी, समीक्षकांनी आणि पुरस्कारांनीही नीनाची अत्यंत योग्य अशी दखल घेतली. तिला मन:पूर्वक दाद दिली. शिवाजी साटम हा अत्यंत सज्जन ‘माणूस’ आणि तेवढाच प्रभावी ‘अभिनेता’! प्रदीर्घ कालावधीनंतर ते या नाटकाच्या निमित्तानं रंगमंचावर दाखल झाले होते. त्या गॅपचं टेन्शनही त्यांनी खूप घेतलं होतं. पण शांत, संयमी, मितभाषी, समजूतदार ‘सदा पाठक’ त्यांनी फार जाणकारीनं पेश केला. या अजब खेळात ‘शालू’ला असणारा तिच्या नवऱ्याचा ‘पॅसिव्ह सपोर्ट’ दाखवताना प्रत्यक्ष आयुष्यातला साधेपणा, सच्चेपणाच जणू त्यांच्या मदतीला आला.

संदीप कुलकर्णी हा प्रायोगिक रंगमंचावरचा कलाकार. दुबेजींच्या तालमीतला. त्यानंही सायकॉलॉजिस्टचा रोल खूप मनापासून सादर केला. कथानकाच्या आलेखात या पात्राचा मोठा सहभाग लेखकानं संहितेत अधोरेखित केला होताच; पण त्यानंही तो ‘कन्व्हिंसिंगली’ सादर केला. प्रज्ञा जावळे ही या संचातली सगळ्यात नवीन, वयानं लहान असलेली नटी. काही एकांकिका आणि शिबिरांमधल्या सहभागानंतर ती थेट या सीनियर्ससमोर उभी राहिली. ‘अपर्णा’ची भूमिका साकारताना ‘शालू’ या पात्राशी वाटणारी सहसंवेदना तिनं चांगल्या प्रकारे व्यक्त केली. काही ‘शोज्’नंतर ‘ध्यानीमनी’चे प्रयोग खूप मोठय़ा संख्येने झाले. त्यादरम्यान संदीप कुलकर्णीऐवजी सहभागी निर्माता महेश मांजरेकर हा स्वत: त्याच्या जागी उभा राहिला आणि त्यानंही अत्यंत धारदारपणे समीर करंदीकरची भूमिका झोकात सादर केली.

या अनवट नाटय़ानुभवासाठीचं तांत्रिक साहाय्यही तसंच कठीण पद्धतीचं होतं. पण दिमाखदार नेपथ्याचे स्पेशालिस्ट असणाऱ्या मोहन वाघांनी हा मध्यमवर्गीय, कंपनीनं दिलेल्या क्वार्टरमधला संसारसुद्धा यथार्थपणे उभारला. ‘चंद्रलेखा’च्या प्रेक्षकांना त्यांची ही आगळीवेगळी नेपथ्यरचना सुखद धक्का देऊन गेली. समीक्षकांनीही या वेगळेपणाचा प्रत्येक ठिकाणी विशेष उल्लेख केला. नाटकाच्या आशयाच्या गाभ्याला परिपोषक असं पाश्र्वसंगीत देणारा अनंत अमेंबल हा असाच एक जाणकार संगीतकार. घराघरात रेडिओवर ऐकू येणाऱ्या सकाळच्या बातम्या, गाणी यांच्या तालावरच दैनंदिनीचा क्रम ठरलेला असतो. त्याचा अचूक वापर अनंतने केला. अशा परिचित गाण्यांपासून ते शालिनीच्या मानसिक स्तरावरची घालमेल गडद करणाऱ्या संगीताच्या अनेक तुकडय़ांपर्यंत त्यानं अतिशय उच्च दर्जाचं पाश्र्वसंगीत नव्यानं निर्माण केलं.

मराठी हिंदी-गुजराती रंगभूमीमधील परस्पर देवाणघेवाण, आदानप्रदान यासाठी तो काळ खूप पूरक होता. मराठी नाटकाच्या शुभारंभाच्या पहिल्या पाच प्रयोगांदरम्यान हिंदी-गुजराती रंगभूमीवरचे निर्माते-दिग्दर्शक-नट आवर्जून उपस्थित राहत. याही वेळी शफी इनामदार, परेश रावल, इ. अनेक जणांनी ‘ध्यानीमनी’ पाहून भारावून गेल्याची प्रतिक्रिया दिली. जसा शिवाजी मंदिरबाहेर गप्पांचा एक अड्डा त्यावेळी होता, तसाच भाईदास हॉलच्याही बाहेर रंगकर्मीची मफल जमत असे. त्याच कोंडाळ्यात उभं राहून परेशभाई ‘ध्यानीमनी’चा रोमांचकारी अनुभव रंगवून सांगत असत याचेही किस्से अनेकांकडून ऐकले. तीन-चार महिन्यांनंतर गुजराती रंगभूमीवरही ‘ध्यानीमनी’ सादर झालं. निर्माते होते मनहर गढिया. तर मुख्य भूमिकेत होत्या- सिद्धहस्त अभिनेत्री सरिताबेन जोशी. आणि त्यांना खंबीर साथ होती- सिद्धार्थ रांदेरिया यांची. त्यांच्यासोबत होते रसिक दवे, केतकी दवे. नंतर काही प्रयोगांमध्ये अल्पना छेल आणि मेहुल गूचही काम करीत असल्याचं आठवतं. गुजराती भाषांतराचं उत्तम काम अनुभवी प्रवीणभाई सोळंकी यांनी केलं होतं, तर नेपथ्याच्या डिझाइनमध्ये ज्येष्ठ नेपथ्यकार छेल-परेशभाईंनी काही नव्या गोष्टींचा समावेश केला होता.

मराठी आणि गुजराती ‘ध्यानीमनी’च्या प्रयोगांच्या साक्षीदार असणाऱ्या विपुल शहाच्या मनात या नाटकाची आठवण खोलवर रुतली होती. आपली पत्नी शेफाली शहानं ही शालिनीची भूमिका हिंदीत करावी, तिच्या अभिनयाच्या Intensity ला ती योग्य आहे असं त्याला मनापासून वाटत होतं. गुजराती रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि हिंदी चित्रपटांत अनेक प्रकारच्या भूमिकांनी शेफालीनं आपली स्वतंत्र ओळख निर्माण केला होतीच. अर्थातच मी लगेचच तयारीला लागलो. हिंदी अनुवादासाठी अनिल देशमुख या मित्रानं होकार दिला आणि भाषांतर करताना अनेक नव्या तपशिलांची, हिंदी भाषेच्या लहेजाची जोड दिली. नाटकाचं हिंदीत नव्यानं बारसं झालं.. ‘बस इतना सा ख्वाब!’ किरण करमरकर, अधीर भट, अबीर अब्रार आणि शेफाली! उत्तम तालमी आम्ही केल्या. विपुल-शेफालीमुळे हिंदीच्या वेगळ्या दर्शकवर्गासमोर नाटक दिमाखात सादर झालं. संगीतकार आदेश श्रीवास्तव तर या नाटकाच्या वेडय़ासारखा प्रेमात होता. त्याच्याशी दोस्तीच झाली. उत्तम पाश्र्वसंगीत देताना त्यानं एका सुंदर ‘लोरी’चीही भर त्यात घातली. अमिताभ बच्चन आणि संपूर्ण बच्चन परिवार पहिल्या काही शोज्ला आवर्जून उपस्थित राहिला होता. नाटक आणि शेफालीच्या अभिनयाची त्यांनी व्यक्तिश: आणि सोशल नेटवर्कवर विशेष तारीफ केली. हिंदी नाटक, साहित्य, चित्रपटसृष्टीतली बडी मंडळी या नाटकाच्या प्रयोगांना येऊन गेली. किरण करमरकरनेही अतिशय ताकदीनं त्या भूमिकेचं आव्हान पेललं आणि अधीर-अबीरनंही समीर-अपर्णाच्या भूमिकांमध्ये जान ओतली. टाटा थिएटर, सोफिया, रंगशारदा अशा नाटय़गृहांमध्ये हिंदी प्रेक्षकांच्या सोबतीनं हा प्रयोग पाहण्याचा आनंद घेता आला. इंग्रजी हिंदी वर्तमानपत्रांनीही या नाटकाची आवर्जून दखल घेतली.

पुढे काही वर्षांनी ‘ध्यानीमनी’चं चित्रपट माध्यमात रूपांतर होताना महेश मांजरेकरच निर्माता म्हणून खंबीरपणे उभा राहिला. माझ्याबरोबर यावेळी कलावंतांची पुन्हा एक नवी टीम होती- स्वत: महेश, अश्विनी भावे, अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे. चित्रपटाच्या दृश्यभाषेत रूपांतर होण्याचा हाही एक वेगळा अनुभव होता. एकच नाटक, पण त्याची तीन भाषांमधली रूपांतरं आणि नंतर चित्रपटाच्या रूपानं एक माध्यमांतर.. असा हा ‘ध्यानीमनी’चा समृद्ध सहवास. या सर्व प्रक्रियेत दिग्दर्शक म्हणून दरवेळी अनुभवात मोलाची भर पडत गेली. एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं करून पाहता आली.

chandukul@gmail.com

Story img Loader