गेली साठहून अधिक वर्षे मराठी रंगभूमी अत्यंत जवळून न्याहाळणाऱ्या, काही काळ निरनिराळ्या नात्यांनी स्वत:ही तिचा अविभाज्य भाग असलेल्या एका सजग रंगकर्मीला आलेले चित्रविचित्र अनुभव, त्याने पाहिलेले तालेवार कलावंत, तसंच जाणते-अजाणतेपणी रंगभूमीला काहीएक वळण देणाऱ्या घटना-प्रसंगांची दिडदा दिडदा करत जाणारी भूतकालीन आगीनगाडी..
जग हे रंगभूमी आहे, हे जरी खरं असलं तरी त्यातील सर्व काही आपण रंगमंचावर सादर करीत नाही. निवडक तेवढंच घेतो, त्याची शिस्तबद्ध मांडणी करतो. नाटय़परिपोषक अशा प्रसंगांची रचना करतो आणि परिणामांचा आलेख हळूहळू उत्कर्षांप्रत पोचवत कळसाध्याय गाठला जातो. या सर्व प्रक्रियेमुळे नाटकाच्या कथानकाला ‘संविधानक’ म्हणतात. कथा, कविता, कादंबरी या माध्यमात उत्स्फूर्ततेला अधिक महत्त्व असते. नाटकाचा विषय, कथा सुचावी लागते हे तर खरंच; पण तिला नाटय़रूप देण्यासाठी, फुलवण्यासाठी ती काटेकोरपणे रचावी लागते. व्यक्तिरेखा निर्माण कराव्या लागतात. त्यांना संघर्षांच्या ठिणग्या उडवायला भाग पाडलं जातं. अनेक भावभावनांचं संमिश्रण करावं लागतं आणि या सर्वाचा सुबक, पिळदार गोफ विणावा लागतो. ही सगळी तांत्रिक कौशल्याची बाब असते. बरं, इतकं करूनही, त्याचं गणित व्यवस्थित जमवून प्रत्यक्ष सादरीकरणात मात्र ते उत्स्फूर्त वाटावं लागतं. त्या त्या व्यक्तिरेखेला ते त्याच वेळी सुचलं असं भासवावं लागतं. म्हणूनच नाटक लिहिणं हे सर्व साहित्य प्रकारांत कठीणतम कर्म असतं. कविता, कादंबरीचा वाचक एकेकटा असतो. नाटक समूहाचं आणि समूहाबरोबरच आस्वादलं जातं. म्हणूनच समूहाची मानसिकताही लक्षात घ्यावी लागते. नाटक किंवा नाटय़प्रयोग एकाच वेळी अनेकांवर परिणाम करीत असतो. म्हणूनच नाटककाराला प्रसिद्धी लवकर मिळते. ती प्रयोजक कला आहे. तिच्या प्रसिद्धीच्या आणि पैशाच्या मोहात पडून अनेक कादंबरीकारांनी वा कथाकारांनी नाटककार होण्याचा प्रयत्न केला, पण त्यात फारच थोडे यशस्वी झाले. अन्य साहित्य प्रकार हाताळणाऱ्यांना ‘नाटक’ लिहिता येईलच असं खात्रीने सांगता येत नाही. पण जो यशस्वी नाटक लिहू शकतो तो अन्य साहित्यप्रकारही समर्थपणे आपल्या कक्षेत आणू शकतो. नाटय़प्रयोगाशिवाय नाटकाला सद्गती मिळत नाही. म्हणूनच कुठल्याही नाटकाचा विचार करताना केवळ संहिता समोर ठेवून चालत नाही; त्याचबरोबर प्रयोगविचारही तितकाच महत्त्वाचा असतो. कारण संहितेत सुप्तपणा असलेली अनेक गुणवैशिष्टय़े दिग्दर्शक आणि नट व तंत्रज्ञ आपल्या कौशल्याने प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतात. याच कारणामुळे वाचनात साधारण वाटणारं नाटक केव्हा केव्हा प्रयोगात एकदम उसळी मारून उठतं.
नाटक जिवंत असतं. त्याची जागा अन्य कुठलंही माध्यम घेऊ शकत नाही. नाटक ही फसवेगिरी असेल; पण ती खरी वाटावी अशी फसवेगिरी असते. नाटकाचा प्रेक्षक काही गोष्टी गृहीत धराव्या लागणार, या समजुतीनेच नाटय़गृहात प्रवेश करीत असतो. त्याची मनोधारणा ‘विलिंग सस्पेंशन ऑफ डिसबिलिफ’ हीच असते.
कोलकात्यात एका नाटकाचे प्रयोग कित्येक वर्षे चालू होते. त्या नाटकात अखेरीस नायिका रेल्वेखाली आत्महत्या करण्यासाठी येते. दुरून गाडी येताना दिसते. तिचा आवाज, प्रकाशझोत प्रेक्षकांच्या जवळजवळ येतो. नायिका धाड्धिशी रुळांवर लोळण घेते. आता गाडी तिच्यावरून जाणार, इतक्यात नायक जिवाच्या आकांताने धावत येतो आणि नायिकेला रुळावरून मागे खेचतो. गाडी धाडधाड करीत वेगाने निघून जाते. सर्व प्रेक्षक वर्गातून एकच सुस्कारा सुटतो- क्षणभरानंतर टाळ्यांचा कडकडाट होतो.
हे असं प्रेक्षकांचं का होतं? अनेक दिवस चाललेला हा नाटय़प्रयोग असतो. ही नायिका रुळाखाली मरणार नाही याची खात्री सर्वाना असते, कारण दुसऱ्या दिवशीही त्याच नाटकात, त्याच नायिकेला घेऊन, त्याच रंगमंचावर प्रयोग व्हायचा असतो. ती धावती, आवाज करीत व प्रकाशझोत फेकीत येणारी गाडी खोटी आहे हेही सर्वाना चांगलंच माहीत असतं. आणि इतकं असूनही सर्व प्रेक्षकांची या खोटेपणाला अशी उत्स्फूर्त दाद कशी येते? कारण ते सारं त्या वेळेपर्यंत खरंच आहे असे तो मनोमनी मानत असतो. तो नाटकाचा प्रेक्षक असतो. तसं नसतं तर त्याला कुठल्याही नाटकाचा आनंद घेताच आला नसता. नाटकाची जादू म्हणतात ती हीच! नाटक एक स्वत:चं विश्व त्या वेळेपुरतं का होईना, निर्माण करतं. त्या जादुई विश्वात प्रेक्षकांना बुडवण्यात, भुलवण्यात आणि अन्य सगळं विसरून टाकण्यात जो यशस्वी ठरतो तोच सच्चा, उत्तम नाटककार होतो.
याच कारणासाठी नाटकात सूचकतेला स्थान आहे; पण ढोबळतेला स्थान नाही. कथनाला हद्दपार करावं लागतं आणि निवेदनाला अधिक जागा देऊन चालत नाही.
गोष्ट सांगण्यासाठी म्हणून सुरू झालेलं ‘नाटक’ हळूहळू विकास पावत आज गोष्ट सांगण्याऐवजी गोष्टीचा अनुभव देण्यापर्यंत आलं आहे. कथनाला कमीतकमी महत्त्व देऊन जे गडद अनुभव देऊ शकतं, ते आजचं नाटक समजलं जातं. अस्वस्थ करणं जसं नाटकाचं काम आहे, तसंच निखळ, प्रदूषणविरहित करमणूक करणं हेही नाटकाचं काम असू शकतं. त्यासाठी नाटकात ठाशीव व्यक्तिरेखा हव्यात, स्वभावदर्शनं हवीत, हालचाली हव्यात आणि हे सगळं सिद्धीला नेताना सर्व तंत्रमंत्रांची काटेकोर आखणी करणारा व नाटकाचा अन्वयार्थ प्रयोगातून प्रकट करू शकणारा दिग्दर्शकही हवा. पूर्वीच्या तालीम मास्तरांची जागा आता त्यापेक्षा वेगळ्या व अधिक प्रतिभेची मागणी करणाऱ्या दिग्दर्शकाने घेतली आहे.
आज नाटकाचं नेपथ्य म्हणजे केवळ सजावट राहिलेली नाही. प्रयोगात प्रेक्षकांशी प्रथम बोलतं ते नाटकाचं नेपथ्य. त्यामुळे नेपथ्याने आपल्या रचनेतून, रंगसंगतीतून, बहिर्दर्शनातून नाटकाच्या आशयाची, स्वभावाची ओळख करून देण्याची अपेक्षा असते. ललित कलादर्शच्या ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाला श्री. पु. काळे यांनी हुबेहूब रंगवलेल्या प्रार्थना समाज रोडच्या पडद्याला पाहून त्या वेळच्या प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट केला होता. आज केवळ पडद्यालाच टाळी मिळून उपयोगाची नाही. प्रथम टाळी हवी ती नाटकाला! नाटक- मग ते ज्वलंत विषयावरचे असो, राजकीय असो, ऐतिहासिक असो वा सामाजिक; प्रथम त्यात हवं ते ‘नाटक’! अन्य गोष्टी कितीही आकर्षक, नेत्रदीपक असल्या तरी त्या मूळ नाटय़ावर कुरघोडी करणाऱ्या असून चालत नाहीत. नेपथ्य म्हणजे शोरूम नव्हे, हे नाटकाच्या बाबतीत प्रेक्षकांनीही लक्षात ठेवून नेपथ्यात वाहून जाता उपयोगी नाही. तंत्राने, प्रकाशयोजनेने नाटकाचा सिनेमा करून उपयोगाचा नाही. ख्यातनाम नाटय़दिग्दर्शक बादल सरकार तर म्हणायचे की, ‘जे सिनेमा दाखवूच शकणार नाही, ते नाटकानं दाखवलं पाहिजे?’
कमानी रंगमंचाच्या बाहेरचंही नाटक व्हायला लागलं. रूढ चौकटीपासूनच दूरचं नाटक. ‘अंगण रंगमंच’, ‘परिसर रंगमंच’, बादलबाबूंचा ‘तिसरी रंगभूमी’ अशी वेगवेगळी मंचरूपं दिसायला लागली. दिल्लीतील जुन्या किल्ल्याच्या भग्न अवशेषांत इब्राहिम अल्काझी यांनी उभं केलेलं, महाभारतातील अखेरच्या पर्वावर आधारित ‘अंधायुग’ नाटय़विश्वातील एक अविस्मरणीय घटना ठरली आणि नेमकी त्याचीच भ्रष्ट नक्कल म्हणून की काय, चंद्रलेखाच्या मोहन वाघांनी ‘स्वामी’ नाटकाचा प्रयोग शनिवारवाडय़ावर केला. झुलत्या हत्तींसह आणि पेशवाईतल्या जेवणावळीसह! काय साध्य केलं या प्रयोगानं? कोणता नाटय़ानुभव दिला? केवळ भपकेबाजपणा, श्रीमंतीचं प्रदर्शन! ‘प्रेक्षकांना असंच आवडतं’, असं सांगून निर्माते मोकळे होतात. पण प्रेक्षकच कशाला, बालगंधर्वाच्या अत्तरात भिजलेल्या शालूशेल्यांच्या घमघमाटाचं कौतुक समीक्षक आजही करतातच. त्याच जमातीनं शनिवारवाडय़ातील त्या ‘स्वामी’च्या प्रयोगाचं वारेमाप कौतुक केलं. टीका केली ती फक्त एकाच समीक्षकानं- ‘माणूस’ साप्ताहिकातून! प्रा. पुष्पा भावे त्यांचं नाव! नाटय़बाह्य़ श्रीमंतीला न भूलणारा एक तरी समीक्षक आहे, याचं मला त्या वेळी कौतुक वाटलं होतं.
परिसर रंगभूमीचा अनुभव म्हणजे काय, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पीटर ब्रुक यांचा दगडाच्या खाणीच्या आणि दगडाच्या राशींच्या मध्ये पेश केलेला ‘महाभारत’चा प्रयोग! जमिनीवरही वाळू पसरलेली होती. या ‘परिसर रंगभूमी’ने प्रेक्षकांना रखरखीत महाभारताचा जळजळीत अनुभव संध्याकाळपासून पहाटेपर्यंत सलग १२ तास दिला! आपला प्रेक्षक असे अनुभव घ्यायला कधी सज्ज होणार?
या प्रकारच्या सर्व ‘नाटय़ायणा’तून मी गेले अर्धशतक फिरतो आहे. फिरस्ता होऊन आणि प्रत्यक्ष सहभाग घेऊन! चाळकरी नट, हौशी कलावंत, बालरंगभूमीचा पाईक, प्रायोगिक रंगकर्मी, अनुवादक आणि नाटय़समीक्षक या विविध भूमिकांत मी वावरलो आहे. पन्नास वर्षांच्या छापील समीक्षागिरीत छाप्यातले सोडून, समीक्षेला सोडून बरेच काही उरले आहे. ते विविधरंगी आहे. त्याचा आनंद मी अप्पलपोटेपणाने एकटय़ानं घेतला. आता आयुष्याच्या उत्तरार्धात तो सर्वाबरोबर द्विगुणित करावा, या इच्छेने ‘नाटकबिटक’ या सदराचं प्रस्थान मांडलं आहे. हे हलकंफुलकं असेल, मोकळंढाकळं असेल, कधी सडेतोड असेल, कधी टपल्या मारणारं असेल, थोडं विचार-बिचारांचंही असू शकेल. नाटकाच्या झेंडय़ाखाली येणारं सर्व काही, पण नक्काच समीक्षा नसेल. स्मरणरंजन असेल. अप्रत्यक्षरीत्या गेल्या अर्धशतकातील नाटकीय वातावरणाचंही दृश्य त्यातून दिसू शकेल. काल आणि आज यांतील फरकही गमतीशीरपणे पाहता येईल. रंगभूमीविषयक घटकांना स्पर्शून जाणारा हा खटाटोप वाचकांना बरोबर घेऊन करायचा आहे. बघू या! कसं जमतं ते! वाजली तर पुंगी, नाहीतर गाजरं! (तेही हल्ली महागच)! तुम्हा तो कमलाकर सुखकर हो! बेस्ट ऑफ लक फ्रॉम ‘नाटकबिटक’- अर्थात तुम्हालाच!

Story img Loader