मकरंद देशपांडे
मुंबईतील ‘पृथ्वी थिएटर’च्या बहुभाषिक नाटय़वर्तुळात सदासर्वकाळ वावर असलेले लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते मकरंद देशपांडे यांचे आपला नाटकीय प्रवास रेखाटणारे सदर.. ‘नाटकवाला’!
नमस्कार, तुम्हाला माझी ओळख ‘सत्या’, ‘जंगल’, ‘स्वदेस’, ‘दगडी चाळ’ अशा अनेक चित्रपटांतल्या छोटय़ा छोटय़ा भूमिकांमधून एक नट म्हणून झाली आहेच. पण याचं कारण चित्रपटांसाठी माझ्याकडे वेळ नव्हता असं नाही किंवा मला मोठय़ा भूमिका मिळत नव्हत्या असंही नाही. फक्त मला काही केल्या रंगमंचापासून.. नाटकाच्या तालमींपासून दूर राहायला आवडायचं नाही. त्यामुळे मीच चित्रपटकर्त्यांना सांगायचो, ‘मला छोटी भूमिका द्या.’ अगदी माझा मित्र आशुतोषलाही (गोवारीकर)! ‘लगान’मध्ये त्याने आणि आमिरने मला समजावण्याचा प्रयत्न केला, की चित्रपटाचा विषय ब्रिटिशांविरुद्धची लढाई हा असला तरी त्यात क्रिकेटचा सामना आहे. मी वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत यष्टीरक्षक व डावखुरा फलंदाज म्हणून चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळलो आहे. परंतु या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मला काही महिने सलग ‘पृथ्वी थिएटर’पासून दूर राहावं लागणार होतं. आमिरने मला असंही सांगून पाहिलं- ‘‘हे माझं पहिलंच होम प्रॉडक्शन आहे आणि तू त्यात क्रिकेटर- अॅक्टर आहेस.’’ आशूतोषही म्हणाला, ‘‘मॅक, तुझ्यासाठी लिहायला मी एक मस्त रूम देईन. सहा महिने तू मस्त नवीन नाटक लिही आणि मग परत आल्यावर ते कर.’’
मी दोन मिनिटं त्याच्या या आयडियेला बळी पडलो. पण नाटकात अभिनेता काही क्षण ब्लँक झाल्यावर पुन्हा त्याला एखादा लाइट स्पॉट बघून पुढचा संवाद आठवतो, तसं काहीसं माझं झालं. मी म्हणालो, ‘‘नाही रे, मी इतके दिवस नाटकापासून लांब राहू शकत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं कारण- मी माझा वेळ.. एकशे ऐंशी दिवस कुणालाही देऊ शकत नाही.’’
खरं तर ‘लगान’चा मी पहिल्यापासून भाग होतोच. कारण त्याचा पहिला ड्राफ्ट आशूतोषने माझ्या नरसी मोनजी कॉलेजच्या रिहर्सलच्या वेळी तालीम संपल्यावर मला रात्री तो ऐकवला होता. असो. ‘लगान’ क्रीएटेड हिस्ट्री! ऑस्करसाठी त्याचं नॉमिनेशन झाल्यानंतर २००२ च्या संक्रांतीला मी आणि माझ्या नाटकवेडय़ा टीमने २१ कंदिलांचे ‘ऑल दी बेस्ट’ आकाशात पाठवले. ‘लगान’चं ऑस्कर हुकलं; पण एका नाटकवेडय़ाचं हे ‘गेश्चर’ आशूतोषच्या स्मरणात राहिलं.
माझ्याबाबतीत तसं सगळंच थोडंसं ‘नाटकीय’ होतं.. अगदी सुरुवातीपासून!
६ मार्च १९६६. सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी माझ्या भावाचा जन्म झाला. वडील त्यांच्या भावाला हे कळवण्यासाठी फोन करून परत आले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, की ‘तुमच्या पत्नीच्या उदरात आणखीन एक बाळ आहे.’ आणि त्यानंतर तब्बल एक तास २२ मिनिटांनी मी या जगात एन्ट्री घेतली. ‘मिलिंद’चा जुळा भाऊ ‘मकरंद’ हे नाव एका गाण्यावरूनच ठरवलं गेलं. पण गंमत अशी की, ते गाणं १९६७ साली रंगमंचावर आलं. पण माझं नाव माझ्यानंतर आलं!
मी आयुष्यात काहीच ठरवून केलेलं नाही. वेळ, विचार, अनुभव, अनुभूतीने माझ्याकडून सगळं करवून घेतलं. आम्ही देशपांडेबाईंची जुळी मुलं- मिलिंद आणि मकरंद. खो-खो खेळत, माऊंटेनिअिरग करत आणि मधे मधे- म्हणजे ‘परीक्षा टू परीक्षा’ अभ्यास करत आम्ही लहानाचे मोठे झालो. देशपांडेबाईंना- म्हणजे माझ्या आईला शाळेत खूप प्रतिष्ठा होती. त्यामुळे आमचा बेशिस्तपणा आईला त्रासदायक वाटे. परंतु आमच्या अभ्यासाव्यतिरिक्तच्या विविध कलागुणांमुळे आम्ही बाजी मारत असू. शाळेत असताना मी एकांकिकेमध्ये काम केलं होतं. तेव्हा मी खूप लहान होतो. वय आता आठवत नाही. त्यावेळी ‘विठ्ठल तो आला आला’मध्ये मी भटजीची भूमिका केली होती. प्रयोग सुरू होण्याआधी विठ्ठलाच्या पायाशी जे पूजेचे थोडेबहुत सामान होतं, तिथे मी पुस्तक ठेवलं होतं. त्या लहान वयात मला ते कसं सुचलं, माहीत नाही. पण एवढंच आठवतंय, की प्रयोग सुरू झाल्यावर मला दुसऱ्या कशाचीच गरज पडली नाही. माझं सगळं नाटक तोंडपाठ होतं.
त्यानंतर मात्र माझा नाटकाशी काहीच संबंध आला नाही. कारण पुढे मी नाटय़मयरीत्या खो-खो, माऊंटेनिअिरग सोडून रस्त्यावर टेनिस बॉलने खेळणारा क्रिकेटपटू झालो. अचानक एका मोठय़ा इंटर-स्कूल फायनलमध्ये खेळलो. आणि मूळात मी खो-खोपटू असल्याने सराईत डाइव्ह मारत अप्रतिम यष्टिरक्षण केल्यामुळे मी संघाचा कप्तानही झालो. शाळेतल्या मुलांचंच नाही, तर सुनील गावस्कर यांचे मामा माधव मंत्री यांचंही मी लक्ष वेधलं. त्या सामन्यात मला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं बक्षीस मिळालं. मुंबईत सिलेक्शनला न जाताही आठवडाभराने वर्तमानपत्रात ज्या टीमची घोषणा झाली, त्यात माझंही नाव होतं!
माझा मोठा भाऊ श्रीकांत हा क्रिकेटर-अॅक्टर. माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा. त्याला माझ्या क्रिकेट टॅलेन्टचा खूप अभिमान होता. त्यावेळी घरची आर्थिक परिस्थिती माझ्या क्रिकेटप्रेमास पोषक नव्हती. क्रिकेटचे पॅड्स, ग्लोव्हज्, बॅट सगळंच महाग. यष्टिरक्षणाचे ग्लोव्हज् तर खूपच महाग. पण श्रीकांतने मित्रांकडून ते आणून मला वानखेडे स्टेडियमवर नेलं. पण त्याचा आणि माझा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न होता. त्याला मी नामवंत क्रिकेटपटू व्हावं असं वाटे आणि मी फक्त गंमत म्हणून क्रिकेट खेळत होतो.
मला भल्या सकाळी सव्वापाच वाजता उठून अॅटलास सायकलवरून पाल्र्याहून खार जिमखान्याला जायला आवडायचं. जाताना ग्राऊंडस्मन बाळूला त्याच्या घरी जाऊन जागं करायचं, त्याने स्टोव्हवर बनवलेला काळ्या गुळाचा चहा प्यायचा. मग खेळपट्टीवर रोलर फिरवायचो, नेट लावायचो आणि उजाडण्याची वाट पाहत बसायचो. एखाद्या नाटकात ब्लॅकआऊटमध्ये सेट लावण्यासारखंच हे सगळं करायचो. माझे कोच अब्दुल इस्माईल यांच्याकडे पाहून का कुणास ठाऊक, वाटायचं- हा एवढा ग्रेट स्विंग बॉलर- पण भारतासाठी का खेळला नाही? त्यांच्याविषयीची ही खंत नेहमी मनाला जाणवत असे. निवृत्त झाल्यावरही क्लब टुर्नामेंटमध्ये ते मला म्हणायचे, ‘‘मकरंद बघ, दादर युनियनच्या मोठय़ा टेस्ट प्लेयर्सना मी आता चार ओव्हरमध्ये आत पाठवतो की नाही ते!’’ आणि खरंच! नाव नाही घेत; पण त्या खेळाडूंना ते आऊट करायचे! त्यामुळे कधी कधी वाटतं- खरंच, नशीब वगैरे काहीतरी नक्कीच असावं. नाहीतर एवढा ग्रेट बॉलर भारतासाठी का खेळू शकला नाही? पद्माकर शिवलकर यांच्याबाबतीतही माझं हेच मत होतं.
माझ्या नशिबातही क्रिकेट काही वर्षच होतं. त्यामागचं कारण तसंच होतं. एक दिवस खार जिमखान्यावर सराव करताना माझ्या मनात एक विचार डोकावून गेला, की आपल्या कोचसारखंच आपल्यालाही कधीतरी हा खेळ सोडावा लागेल आणि मग त्याचं आपल्याला खूप वाईट वाटेल. आणि त्याच वेळी मी मनाशी निश्चय केला, की मी असं काहीच करणार नाही- की जे जिवंत असेपर्यंत मला सोडावं लागेल.. आणि तिथून मग मी थेट नरसी मोनजी कॉलेजच्या नाटकाच्या तालमीला गेलो. मिलिंद इंगळेच्या शिफारसीने लगेचच मला नाटकात कामही मिळालं.
त्याकाळी डॉ. अनिल बांदिवडेकरांच्या जवळपास प्रत्येक एकांकिकेत मी होतो. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास. त्यांच्या या विश्वासामुळेच माझा नट होण्याच्या दिशेने पुढचा प्रवास सुरू झाला. मला ‘सॉरी सर’ या एकांकिकेसाठी बक्षीस मिळालं नाही तेव्हा विनय आपटे आणि प्रकाश बुद्धिसागर यांनी ठरवलं, की ते जेव्हा कधी परीक्षक असतील तेव्हा मला बक्षीस द्यायचंच. आणि त्यांनी ते केलंही! मराठी, गुजराती, हिंदी अशा सगळ्याच भाषांतल्या एकांकिकांत मी काम करायचो. महेंद्र जोशी यांच्याकडून मला नट म्हणून शिस्त आणि बांदिवडेकरांकडून नाटकाचा विचार मिळाला. जोशींनी माझा आवाज आणि खेळाडू म्हणून असलेल्या माझ्यातल्या ऊर्जेचा वापर केला, तर बांदिवडेकरांनी माझ्या मी असण्याचा!
महेंद्र जोशींनी केलेल्या‘गुजरी खिलैय्या’मध्ये परेश रावल मध्यवर्ती भूमिकेत होता. शफी इनामदार व परेश रावलबरोबर एक हिंदी नाटक आणि सतीश आळेकरांच्या ‘महानिर्वाण’चं गुजराती रूपांतरही त्यांनी केलं होतं. जोशींनी नाटकाचे वेगवेगळे फॉर्मस् रंगमंचावर आणले. व्यावसायिक रंगभूमी हात पसरून त्यांच्या स्वागताला सज्ज असताना ते मात्र प्रायोगिक नाटकंच करत राहिले. त्यांनी बसवलेल्या ‘अश्वत्थामा’च्या तालमी व प्रयोग आजही माझ्या लक्षात आहेत. ते काळोखात- म्हणजे अगदी मिट्ट अंधारात आमच्याकडून संवाद बोलून घ्यायचे. त्यामुळे संवादाचं महत्त्व आणि परिणाम- दोन्ही चांगलंच लक्षात आलं.
इंदिरा गांधींनी सुवर्णमंदिरात केलेल्या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’वरील ‘केसभि’ (१९८७) हे गुजराती नाटक त्यांनी पृथ्वी थिएटरला केलं. त्यात त्यांनी मला एका शीख जवानाची मध्यवर्ती भूमिका दिली. मी गुजराती संवाद बिनधास्त बोलत असे. आजही मला त्या नाटकातला संवाद आठवतो. जेव्हा मी पहिलं नाटक लिहिलं तेव्हा हेच महेंद्र जोशी म्हणाले, ‘‘रंगभूमीवर एक नवीन लेखक आला आहे. ुी६ं१ी.. हा गोंधळ घालणार.’’ आणि एवढं बोलून ते थांबले नाहीत, तर पटकन् त्यांनी माझ्याकडून ‘प्रलय’ ही एकांकिका लिहून घेतली. त्यानंतर आम्ही एका स्क्रिप्टवर एकत्र काम करत होतो. एका रात्री मी त्यांना काही कामामुळे भेटायला गेलो नाही. त्या रात्रीच मला फोन आला.. ‘महेंद्र झोपेत कार्डिअॅक अरेस्टने गेला.’ या धक्क्यातून सावरायला मला पुढे खूप महिने गेले. कितीतरी वेळा ते स्वप्नात यायचे आणि मलाच मी सांगायचो, ‘अरे, ते बघ, महेंद्र तालीम करताहेत.’ आजही महेंद्रची आठवण येते तेव्हा माझ्या नाटकांचा एक मार्गदर्शक कायमचा गेला असं वाटत राहतं. ते म्हणायचे, ‘‘मॅक, फाड डाला तूने!’’ त्यामागची त्यांची भावनिक असोशीच आजही मला पृथ्वी थिएटरच्या रंगमंचावर खेचून नेते. तिथे मला लाइट रूममधला जिनियस महेंद्र दिसतो.. प्रयोगाचे लाइट्स चेक करताना!
ही वॉज अहेड ऑफ हिज टाइम्स. म्हणूनच वयाच्या ४५ व्या वर्षीच तो गेला असावा.
mvd248@gmail.com