मकरंद देशपांडे
मुंबईतील ‘पृथ्वी थिएटर’च्या बहुभाषिक नाटय़वर्तुळात सदासर्वकाळ वावर असलेले लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते मकरंद देशपांडे यांचे आपला नाटकीय प्रवास रेखाटणारे सदर.. ‘नाटकवाला’!
‘Dream Man’ हे नाटक त्या काळातलं, जेव्हा प्रत्येकाच्या घरी लँडलाइन नव्हता. सोसायटी जिन्यात, ऑफिसबाहेर किंवा रस्त्याच्या कोपऱ्यावर टेलिफोन बुथ असत. शक्यतो अपंग व्यक्तींना मदत म्हणून असे टेलिफोन बूथ दिले गेले होते. पाल्र्यात उत्कर्ष मंडळाच्या बाहेर विली फर्नाडिसला असाच एक बुथ दिला गेला होता. बुथला जाळी असल्यामुळे विलीचा चेहरा स्पष्ट दिसायचा नाही. खरं तर त्यावेळी आम्ही स्ट्रगलर असल्यामुळे आम्हाला फक्त फोनच दिसायचा. कारण प्रत्येक ऑफिसला जाणं परवडायचं नाही आणि बोलावल्याशिवाय का जावं, हा अहंकारसुद्धा!
त्या बुथवर ‘संत जनाबाई पथ, महंत रोड’ या परिसरातील जवळजवळ सगळ्या वर्गातले लोक यायचे. एक चांगल्या देहयष्टीची बाई- बॉबकट केलेली आणि डोळ्यांत भरतील अशा रंगसंगतीचे भडक कपडे घालणारी, ती देखील या बुथवर येऊन कोणाला तरी फोन करायची आणि तिला कोणीतरी येऊन भेटत असे. तिच्याबद्दल कधीच काही कळलं नाही, पण ती रस्त्यावरील कुत्र्यांना नेहमी खायला घालायची. कदाचित आजही घालत असेल. तिच्याबद्दल जर कुणाला काही माहिती असेल तर ते विलीलाच.. आणि कदाचित माझ्याबद्दलही त्यालाच! कारण कोणत्या ऑफिसला फोन केला, काय बोललो, हे सगळं तो ऐकायचा. कधी कधी वाटायचं, याच्या बाजूला कोणी बसला तर तो लेखकच होऊन जाईल!
का कुणास ठाऊक, पण एके रात्री घरी परतताना तो बंद टेलिफोन बुथ दिसला. घरी येऊन झोपलो, पण स्वप्नात फोन रिंग ऐकू आली. सकाळी उठलो आणि लिहायला सुरुवात केली. एका घरात दोन स्ट्रगलर झोपले आहेत. एक अॅक्टर ‘अनिल’ फ्रॉम हरियाणा, दुसरा ‘पंचम’ फ्रॉम सुरत. स्वप्नात टेलिफोनची रिंग वाजते. दोघेही जागे होतात आणि त्यांच्यासमोर उभा असतो ‘सूरजभान’! तो त्या दोघांचा इंटरव्ह्य़ू घेतो. आपापल्या स्वभावाप्रमाणे दोघे उत्तरं देतात. अॅक्टर अनिलला कमी मेहनतीत स्टार व्हायचं असतं, पण पंचमला मात्र आपला सूर पक्का करायचा असतो. सूरजभान हा ‘Dream Man’ असतो. तो दोघांनाही त्यांच्या स्वप्नपूर्तीची गॅरंटी देतो आणि त्या दोन स्ट्रगलरांमध्ये स्वप्न आणि वास्तव यामधला एक फंटास्टिक खेळ सुरू होतो. Dream Man दुधवाला, पोस्टमन, प्रोडय़ुसर, गंगुबाई, अफगाण मुलगी अशा अनेक रूपांत भेटतो आणि मग अचानक यायचा बंद होतो.
तो Dream Man कोण? या प्रश्नाचे उत्तर Fantacy या जॉनरला धरूनच- तो कोपऱ्यावरचा टेलिफोन बुथवाला ‘रवी शानबाग’, जो वास्तवात नाटकाच्या उत्तरार्धात आपल्या रोगाला बळी पडतो. रवी शानबाग हे पात्र टेलिफोन बुथवाला विली फर्नाडिस या व्यक्तीवर आधारित आहे. मला नेहमी प्रश्न पडायचा की, विलीचे स्वप्न काय असेल? तो नीट चालू शकत नाही, बोलू शकत नाही, त्याला जीवनात काय हवं असेल? त्याचं स्वप्न शोधताना मी माझी दोन पात्रांचं- जी त्याच्या टेलिफोन बुथवरून आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करतायेत- कनेक्शन करून दिलं आणि एक गमतीशीर पठडीतील नाटक वास्तवात आलं.
हे नाटक मी दोन वेगळ्या फॉर्ममध्ये केलं. १९९३ साली संगीतबद्ध केलं. विकास भाटवडेकर यांनी अप्रतिम गाणी संगीतबद्ध केली. विकास भाटवडेकरांबद्दल थोडं सांगतो. आता तुम्ही म्हणाल की, काय हा मकरंद देशपांडे, याला सदर लिहायला मिळालं तर आता हा काय प्रत्येक विचार, माणसाबद्दल लिहिणार आणि आपल्याला वाचावं लागणार; पण याला पर्याय नाही! आज जर लिहिलं नाही, तर ते राहून जाईल.. एखाद्या गल्लीतील त्रिकोणी भूखंडासारखं, ज्याला कोणी बिल्डर विकत घेत नाही आणि खेळण्यासाठीही पुरत नाही, मंदिरासाठी फार मोक्याची जागा नाही, की कॉफी शॉपला शोभेशी नाही. मग ती कायम रिकामी म्हणून होऊन जाते. तिच्या उल्लेखानं जर ती भरली जात असेल, तर का नको? तर.. विकास भाटवडेकर हा खूपच अप्रतिम क्रिकेटर. डेव्हिड गावरनंतर जर कोणी स्टायलिश लेफ्ट हॅन्डेड क्रिकेटर मी पाहिला असेन, तर तो विकास भाटवडेकर! नरसी मोनजी कॉलेजचा कॅप्टन. (मुंबई कॉलेज क्रिकेटमध्ये पहिली तीन उच्च दर्जाचं क्रिकेट खेळणारी कॉलेजेस होती, पैकी नरसी मोनजी एक.) विकास खूप चांगला गझल गायक, म्हणजे अगदी मिलिंद इंगळेसुद्धा (‘गारवा’फेम) म्हणायचा की, ‘विकास खूप छान गातो!’ विकास संगीत दिग्दर्शक कसा झाला, माहीत नाही; पण त्यानं दिलेलं संगीत हे एकांकिका वा नाटक संपल्यावरही लक्षात राहायचं. आत्ताही लिहिता लिहिता मी त्याची तीन-चार गाणी मनात म्हणतोय, रवींद्र साठेंनी गायलेली. मराठी एकांकिका स्पर्धेत पियानो आणला त्यांनी. माझ्याकडून लाइव्ह गाणी म्हणून घेतली. आज जर माझ्या संवादात लय-ताल-सूर असेल तर त्याचे श्रेय विकासला जाते. या वर्षी विकासच्या मुलाने- गंधारने रणजी करंडकात पदार्पण केलं आहे. आपण त्याला या लेखातून शुभेच्छा देऊ या, की त्याने एक दिवस भारतासाठी खेळावं.
विकासने आता संगीतातली आपली दुसरी पारी सुरू ठेवली आहे. तो गाणं गायला शिकवतो आहे. अगदी मुंबई ते सुरत त्याचे क्लासेस आहेत. त्याच्याबद्दल लिहिणं संपवता संपवता मला आणखी एका चांगल्या क्रिकेटरचं नाव आठवलं, ज्याने मराठी रंगभूमीसाठी जे योगदान दिलं आहे ते या चार ओळीत मावणार नाही. त्यासाठी एक अख्खा वेगळा लेख लिहावा लागेल. पण इथे त्याचे नाव आणि त्याला या पिढीचा ‘नाटय़भूषण’ हा पुरस्कार देऊ शकतो, जेणेकरून तीच तीच जुनी नावे यापुढे लिहावी लागणार नाहीत. त्या क्रिकेटर (ऑफस्पिनर अॅण्ड राइट हॅण्डेड बॅट्समन) आणि रंगकर्मीचे नाव आहे- विजय केंकरे!
‘Dream Man’ नाटकाची प्रकाशयोजना शीतल तळपदेने केली होती. शीतल माझा शाळा-मित्र, वर्ग-मित्र, कॉलेज-मित्र, माध्यम संस्था-मित्र. शीतल अभिनय न करता प्रकाशयोजनाकार का झाला, हे मला नेमकं सांगता येणार नाही. पण तो जर प्रकाशयोजनाकार झाला नसता, तर प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरची बरीचशी नाटकं अंधारातच राहिली असती. मला त्याचा प्रकाशयोजनेचा दृष्टिकोन आवडतो. तो नाटकाचा बाज, आशय, नेपथ्य, दिग्दर्शकाने स्टेजवर केलेली कलाकारांची बांधणी (blocking) या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अभिनय आणि विषय प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त परिणामकारकपणे पोहचवायचा प्रयत्न करतो आणि शक्यतो त्यात १०० टक्के सफल होतो. कुठल्याही दिवशी तुम्ही वर्तमानपत्रात नाटकाच्या जाहिरातीचं पान उघडा, त्यात निदान दोन नाटकं शीतल तळपदेची असतील. याचं कारण त्याला मिळालेली जवळजवळ सर्वच अॅवॉर्डस नाहीत, तर त्याच्यावर असलेला विश्वास, मग तो निर्माता असो वा दिग्दर्शक!
‘Dream Man’ नाटकाचे कलाकार एक ‘उंदियो’ (थंडीत मुंबईत मिळणाऱ्या सर्व भाज्यांची मिळून केलेली मिक्स भाजी) आहेत. मधले कलाकार म्हणजे मी स्वत: (जो नाटक करत करत शिकलेला नट), रुपल पटेल आणि राधाकृष्ण दत्ता हे दोघे एनएसडीतून शिकलेले नट, आनंद मिश्रा हे ‘हबीब तन्वीर ग्रुप, भोपाळ’चे. मिश्रा आता बॉलीवूडमधील इतर भाषकांना िहदी, उर्दू शिकवतात. हबीब तन्वीर यांची मुक्त पण शिस्तबद्ध शैलीत साकारलेली काही अजरामर नाटकं- ‘चरणदास चोर’, ‘आग्रा बाजार’ जर कुणी पाहिली असतील तर या छत्तीसगडच्या खेळकर कलाकारांना कोणीच विसरणार नाही. माझ्याही नाटकात त्यांच्या आनंद मिश्रा, अॅबनर रेजिनल्ड आणि ‘स्वदेस’मधील तो गरीब, ज्याच्या खऱ्याखुऱ्या अभिनयाने डोळ्यांत पाणी आणलं.. हे सगळे साधे, पण खरे कलाकार!
हबीब तन्वीर हे इंग्लंडच्या ‘राडी’ (Royal Academy of Drama Institute) मधून शिकले, युरोपमध्ये अनुभव घेतला आणि छत्तीसगडच्या स्थानिक कलाकारांसोबत काम करून लोककथा, लोकगीते, लोककलेचा फॉर्म वापरत मुक्त वाटणारी, पण शिस्तबद्ध नाटकं केली. या अशा माणसांबद्दल लिहिणारा मी कोण? मला काय अधिकार? तर, प्रज्ञा तिवारी ही नाटकातील सक्रिय व्यक्ती व कलाकारांबद्दल अतिशय उत्कंठा असलेली पत्रकार. तिनं हबीब तन्वीर आणि मकरंद देशपांडे अशी एक भेट ठरवली होती. त्यात मला त्यांना प्रश्न विचारायचे होते आणि त्यांनी मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. तिला वाटलं, ज्या स्वातंत्र्याने किंवा मुक्तपणे मी नाटक करतो, मग ते अगदी कलाकारांच्या निवडीपासून ते संगीत ते नेपथ्य ते प्रयोगागणिक आणि स्थळकाळाबरोबर बदलत जाण्यापर्यंत, ते कुठेतरी हबीबसरांची, त्यांच्या नाटकातल्या गमतीची आठवण करून देतं असं तिला- म्हणजे प्रज्ञा तिवारीला वाटलं.
मुलाखतीसाठी म्हणून हबीबसरांना भेटलो, पण बराच वेळ गप्पा मारत बसलो. दुपारची संध्याकाळ उलटून, रात्र ठेपली तेव्हा कुठे वेळेचं भान आलं. मी त्यांना घेऊन माझ्या फॅमिली डॉक्टर पंडय़ांकडे (पार्ला पूर्व) पोहचलो. कारण त्यांना अशक्तपणा वाटत होता. खोकला थांबत नव्हता. डॉक्टर पंडय़ांनी खूप आदराने आणि प्रेमाने त्यांना तपासलं आणि ते काही म्हणायच्या आधी हबीबसर म्हणाले, ‘‘यह कम्बख्त छुटता नहीं.’’ त्यांच्याबरोबर मी होतो. मला कळलं नाही कुणाबद्दल बोलातायेत. डॉक्टरांनी विचारलं, ‘‘कौन नहीं छुट रहा?’’ तर हबीबसरांनी त्यांच्या कुडत्याच्या खिशातून हात बाहेर काढला. हातात पाइप होता. त्यांना पाइप ओढायला खूपच आवडायचा. डॉक्टर आणि मला त्यांच्या त्या निरागसतेचं हसू आलं. हबीब तन्वीर हातात पाइप घेऊन खूपच रॉयल दिसायचे; पण त्या क्षणी ते हतबल होते, त्याच पाइपसमोर! माझी आणि त्यांची ती शेवटची भेट होती. जाता जाता त्यांनी मला मुलाखत घेऊ दिली आणि माझी मुलाखत घेतली. कुणी ऑटोग्राफ द्या म्हटलं, तर ते म्हणाले, ‘‘हम हस्ताक्षर नहीं दिया करते, बडी कारीगिरी से खुद को दिलोंपर टाँक दिया करते हैं!’’
‘Dream Man’ नाटकातील स्ट्रगिलगच्या भूमिकेसाठी दिल्लीच्या अनिल यादवला निवडला. कारण फक्त एकच, की त्याचे किस्से रंजक आणि क्रूर असायचे. असं वाटायचं यांचं अख्खं जीवन हे किस्से सांगायलाच यानं दिलं आहे. मला तेव्हा आजुबाजूचे अनेक हितषी सांगायचे, की अनिल चांगला अॅक्टर नाही. त्याचे कॉमिक टायिमग ऑफ आहे.. आणि मला तेच आवडायचं. पहिला शो झाला आणि अनिल हा खरंच प्रेक्षकांचा लाडका स्टार झाला. त्याच्या यशामुळे मला उमगलं, की अॅक्टर हा आवाज, उच्चार, आणि शारीरिक वळणाने जरी एखादं पात्र लोकांसमोर उभं करत असला, तरीही त्यात त्याची, त्याच्यातल्या ‘मी’ची खासियत असेल तर नाटक खरंच जिवंत होतं. ‘Dream Man’ मध्ये स्ट्रगिलग सिंगर म्हणून अमित मिस्त्री हा गायक आणि खरंच गुणी नट (जो महेंद्र जोशींच्या तालमीत तयार झाला होता.) फारच शिस्तबद्ध होता. तो उन्मुक्त अनिलला छान सांभाळायचा. हे नाटक मी बऱ्याच वेळा बंद करून पाहिलं. पण त्याच्यात आपली एक संजीवनी होती. कारण कुठून तरी अगदी चंदीगढ, कोलकातामधून एखाद्या शोची मागणी यायची. ते नाटक ‘एक कदम आगे’ या नावाने जास्त चाललं.
त्या नाटकाबद्दल फिल्म दिग्दर्शक अनुराग बसू म्हणालेले एक वाक्य माझ्या मनात घर करून आहे. ‘‘मॅक, तेरे इस नाटक का यह मजा है की तू एक नाटक दिखा रहा है और मैं उसमें अपना एक नाटक देख रहा हूं.’’ त्याचं म्हणणं होतं, इतकं मोकळं वाटतं हे नाटक बघताना, की बघणाऱ्यालाही आपला अर्थ काढून निर्मितीक्षम होता येतं.
खरंच एक भन्नाट अनुभव या नाटकाला घेऊन सांगतो.
या फ्रेंच ट्रॅव्हेलिंग थिएटर कंपनीची व्हायोलिन वादक काशा दोन दिवसांसाठी मुंबईत होती. पृथ्वी थिएटरला मला भेटली. माझा या नाटकाचा शो होता. मी तिला विषय सांगितला आणि ती म्हणाली की, ‘‘मला असं वाटतंय, की मी हे अनुभवलं आहे.’’ मी तिला सहज विचारलं की, ‘‘तू वाजवशील का शोमध्ये..’’ आणि ती ‘हो’ म्हणाली. नाटक िहदीत. शो हाऊसफुल. मी नाटकात अभिनय करत होतो, त्यामुळे मी तिला कुठे वाजवायचे आहे हे इशारा करून सांगणार असं ठरलं. कारण तालमीला वेळ नव्हता. शो सुरू झाला. मी पहिला इशारा केला. तिनं वाजवायला सुरुवात केली, आणि एक फ्रेंच कंपनीची पोलिश व्हायोलिनवादक हिंदी नाटकात व्हायोलिन वाजवत होती. गंमत तेव्हा वाढली. जसजसं नाटक पुढे गेलं, तिल्या माझ्या इशाऱ्याची गरज नव्हती. तिनं त्या नाटकाला, त्या शोपुरतं सिम्फनीच रूप दिलं. नाटक संपलं तेव्हा प्रेक्षकांनी नाटकाला आणि आम्ही तिला दहा मिनिटांचं standing ovation दिलं. आता तिच्याशी काही संपर्क नाही. पण या आठवणीत ती जिथे असेल तिथे तिला आपल्या सर्वाकडून प्रेम आणि शुभेच्छा. काशा तुला मी कधीच विसरू शकत नाही! पृथ्वीच्या वास्तूत उभी राहून व्हायोलिन वाजवणारी काशा कधी कधी आजही आठवणीत भेटतेच. शेवटी एक खरं, कदाचित जीवनाच्या वेगात विसर पडत असेल, पण नाटय़गृहाच्या आत आठवणी विसावतात वर्षांनुवर्ष!!
तालमीच्या जागेचं पण तसंच असतं. नरसी मोनजी कॉलेजची तालमीची जागा कितीतरी नाटकांच्या वाचन-चर्चा-विरोध-होकार यांनी नाटकाला मिळणाऱ्या आकाराची साक्ष आहे. प्रोफेसर राय या तेव्हा मुख्याधापिका होत्या. त्यांनी watchman ला सांगितलं होतं की मकरंद को रूम नंबर एक life time दे दी है, तालीम कराने! कारण त्याचं म्हणणं होतं की मकरंदनी कॉलेजला सहा वर्षे दिली. ज्यात मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्रजी सगळ्या नाटकांत कामे केली. क्रिकेट खेळला, एक वर्ष फुटबॉलसुद्धा खेळला, तर त्याला आपण पास आउट झाल्यावर काहीतरी द्यायला हवं. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पुढची पाच वर्षे, १९९६ सालापर्यंत मी नरसी मोनजी कॉलेजमध्ये तालीम केली. मी रायबाईंचं आणि केळवाणी मंडळाचं देणं लागतो म्हणून का की आजही मला कुठल्याही function बोलावले की जातो. मराठी वाङ्मय मंडळाच्या प्रो. मंजिरी गोंधळेकरबद्दल लिहिलं नाही तर मलाच नंतर वाईट वाटेल, कारण त्यावेळी मंजिरी टिंे या आमच्यापेक्षा पाच-सात वर्षांनीच मोठय़ा असाव्यात. पण त्यांनी त्या कॉस्मोपॉलिटिन कॉलेजमध्ये मराठी नाटकं केली आणि त्यासाठी फंड उभा केला आणि मराठी कलाकारांना मानसन्मान मिळवून दिला. मला तर maths-stats ची private tution दिली, कारण मला लेक्चर attend करायला वेळ नसायचा. त्यातही प्रो. राय यांनी सांगितलं होतं की मकरंदचं नाव black लिस्टमध्ये येऊ नये!!
बाप रे, केवढं प्रेम!!! नाटकामुळे, नाटकवाल्याला, नाटकप्रेमींकडून.
जय नाटक.
जय प्रेक्षक.
जय वाचक.