मकरंद देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काही वेळा घरातली माणसं म्हणतात, कंटाळा आला असेल तर बाहेर फिरून ये. संजना कपूर आणि मी फ्रान्समधील ‘Avignon Festiva’’ बघायला गेलो. गराज थिएटर ते सर्कस थिएटर, पपेट थिएटर ते म्युझिकल थिएटर, अॅब्स्ट्रॅक्ट ते अॅब्सर्ड थिएटर.. असं भरपूर, भरपेट नाटक अनुभवलं.
वीस बाय दहा फुटांच्या ब्लॅक बॉक्समध्ये- जे एक गॅरेजच होतं- एक सर्कसमधला ट्रॅपीझ अॅक्ट (Trapeze Act) दाखवणारा एकच ट्रॅपीझ लटकवला होता. गॅरेजची उंची आठ फूट होती आणि पाच फूटचा ट्रॅपीझ, म्हणजे खाली तीन फूट काळा पडदा. वाचकांनो, डोळे बंद करून एकदा हा अनुभव घ्या. प्रकाश फक्त ट्रॅपीझवर, सर्कशीचं संगीत सुरू आणि त्या काळ्या बॉक्सच्या मध्यभागी अधांतरी असलेल्या ट्रॅपीझवर अचानक खालच्या बाजूनं अंधारातनं हात येतात. मग आपल्यासमोर तो हात आपल्या शरीराला खेचून वर आणतो. एक ट्रॅपीझ आर्टिस्ट वर येतो. लोकांच्या टाळ्या आणि शिट्टय़ा. तो खाली पाहतो आणि ट्रॅपीझ जमिनीवर बसलेल्या खऱ्या ऑडिअन्सच्या डोक्यावर फिरायला लागतो. तो आर्टिस्ट मग आपलं अर्ध्या तासाचं स्वगत म्हणतो. ते फ्रेंच भाषेत होतं, पण त्या अॅक्टचा परिणाम भाषेला ठेंगणं करून गेला.
वीस बाय दहा फुटांत सर्कसचा तंबू उभा राहिला! आजही लिहिताना तो अनुभव अगदी ठळक आठवतोय आणि हे लिहिताना अचानक मला आठवलाय मी केलेला सोलो परफॉर्मन्स! आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सगळ्या भाषांतून तीन बक्षिसं असं स्पर्धेचं स्वरूप होतं. डॉ. अनिल बांदिवडेकर लिखित-दिग्दर्शित ‘विदूषक’ मी सेट आणि प्रॉपर्टीशिवाय फक्त माइमिंगने ट्रॅपीझ दाखवला होता. त्यातील शेवटची झेप चुकते आणि तो म्हातारा विदूषक खाली पडतो. ते दाखवण्यात शीतल तळपदेच्या प्रकाशयोजनेची मदत झाली आणि मला सुवर्ण पदक मिळालं! तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, की नाटकात सेट-प्रॉपर्टीपेक्षा नट आणि विषय महत्त्वाचा ठरतो. असो.
या मुंबईतल्या आठवणीतून पुन्हा जाऊ फ्रान्सला. तिथे गॅरेजमधल्या सर्कसनंतर खरंच एका सर्कस टेंटमधलं नाटक पाहायचा अनुभव हा अंगावर शहारे आणणारा होता. कलाकारांकडून सर्कस स्टंट्स करवून घेतले होते. एका सीनमध्ये एक पात्र दुसऱ्याचा पाठलाग करतं, तर तो दुसरा ट्रॅपीझवर चढतो. पहिला त्याच्यामागे असतो. मग दुसरा ट्रॅपीझवरून प्रेक्षकांच्या दिशेने उडी घेतो. आपल्याला धक्का बसतो; पण त्याच क्षणी वरून एक कपडा खाली येतो आणि त्याला पकडतो. तो त्याच्यावर घसरून खाली येतो आणि प्रेक्षकांमध्ये लपतो.
या नाटकाच्या शेवटी- कर्टन कॉलला जेव्हा सगळे नट उभे राहिले तेव्हा एका नटाच्या हातात कुबडय़ा होत्या आणि एकाच्या हाताला प्लास्टर. मी विचारपूस केली, ‘‘हे या नाटकात होते का?’’ तर कळलं की, ते मागच्या आठवडय़ात होते. अपघात झाला आणि आता ते बॅकस्टेज करतात.
प्रश्न पडतो की, असं नाटक का करावं? आणि उत्तरही मिळालं- केलं नाही तर कळणार कसं?
खरं तर नाटक हे माझं दैवत! नाटक निराकार आहे, म्हणजे देऊ तो आकार आणि पुन्हा निराकार!
फ्रान्समधल्या ‘Avignon Festival’चं स्पिरिट हे एवढं मुक्त आणि यंग होतं. असं वाटलं की, मोठय़ांनी (वयाने, अनुभवांनी) लहानपण न विसरता बेधडक, बिनधास्त, बेलगाम, बहारदार प्रयोग केले; कारण तिथे कसली सेन्सॉरशिप असावी असं वाटलं नाही. मग काय, कलेला स्काय इज द लिमिट!
आपल्याकडे फ्रान्समधील स्पिरिट आणायला काय करावं लागेल, असा विचार १९९६ साली पॅरिसमध्ये माझ्या मनात आला आणि मी ठरवलं- आपण एक नाटक करू या आणि त्यात मुंबईतल्या नको असलेल्या वृत्तींना नवनाथाच्या एखाद्या अस्त्राने, वाताकर्षण अस्त्राने दूर कुठे तरी भिरकावून देऊ या, आपल्याला पाहिजे असं मुक्त, तरुण आकाश निर्माण करू या!
..आणि ‘सोलह साल का आकाश’ या नाटकाचं भूमिपूजन झालं माझ्या मन:पटलावर!
तुक्या हा भुरटा चोर एका सोळा वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तिच्यासाठी सुंदर सुंदर गिफ्ट्स आणतो, पण चोरून. त्याचा एकच मित्र- कृष्णा, जो मुंबईबाहेरून आलेला, कामकाज नसलेला, फुटक्या नशिबाचा; पण फुटलेल्या टय़ूबलाइटच्या काचा खाण्याचं कौशल्य त्याच्याकडे होतं. म्हणजे भूक लागली किंवा तुक्याला पैशाची गरज असली, की तो कुठेही रस्त्यावर टय़ूबलाइट खायचा. लोक आ वासून पाहायचे. काही मुली ओरडायच्या, तर काही डोळे झाकून घ्यायच्या. काही लोक पैसे टाकायचे. तुक्या कृष्णाला म्हणायचा की, ‘तुझी कमाई खून-पसीने की नहीं, सिर्फ खून की.’ तुक्याला पोलिसांचा खूप राग होता; कारण एकदा कृष्णाच्या समोर एका दारुडय़ानं पाच हजार रुपयांचा पाऊस पाडला होता आणि त्यातसुद्धा पोलिसांनी आपला हफ्ता घेतला होता कृष्णाकडून! एका काच खाणाऱ्याकडून कसं कोणी हफ्ता घेऊ शकतं, असा प्रश्न एका भुरटय़ा चोराला पडला खरा; पण त्याहीपेक्षा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला- जेव्हा त्याला कळलं की, त्याच्या सोळा वर्षांच्या प्रेमिकेचे वडील इन्स्पेक्टर परदेशी आहेत. ती सोळा वर्षांची पोरगी कृष्णाच्या तोंडातील जखमांसाठी हळद, दहीभात घेऊन यायची. कृष्णानं तिला सांगितलं की, ‘तुझा तुक्या हा कोणी श्रीमंत मुलगा नाही तर एक चोर आहे, पण चांगला आहे.’ तेव्हा चांगल्या चोराने आपलं हृदय चोरलं आहे, अशी काहीतरी फॅण्टसी तिला वास्तवापासून दूर ठेवते.
एके दिवशी कृष्णा आणि तुक्याला इन्स्पेक्टर परदेशी खूप मारतात. कारण तुक्याचं प्रेम आणि त्याला कृष्णानं केलेली मदत. मग तुक्या चिडून इन्स्पेक्टर परदेशीच्याच घरी चोरी करतो आणि त्यांची मेडल्स आणि बक्षिसं घेऊन पळतो. तो एक चिठ्ठी मागे सोडतो- ‘या अस्सल भुरटय़ा चोराला पकडून दाखव!’ इन्स्पेक्टर परदेशी त्याचा माग घेतो. त्याला पकडून चार दिवसांनी परततो, तर पोलीस स्टेशन गायब, घर गायब, शहर गायब!
गोकुळाष्टमीच्या रात्री श्रीकृष्णाच्या जन्मानंतर कृष्णाच्या पोटात आग होते. तो ती शमवण्यासाठी दही खातो. आग वाढते. पोट वाढतं. तो मग काच, लाकूड, लोखंड खात खात अख्खं शहर खाऊन टाकतो आणि फक्त प्रेमापोटी त्या सोळा वर्षांच्या मुलीसाठी आकाश बनवतो. फक्त ती बाहेर असते. इन्स्पेक्टर तिला पाहतो, पण तो हजार फूट उंच कृष्णा त्याला जाऊ देत नाही. तुक्याला मात्र तिच्या म्हणण्यावर आत येऊ देतो. इन्स्पेक्टरला तुक्याची लव्ह स्टोरी लांबून पाहावी लागते. तुक्याच्या लव्ह स्टोरीला आवश्यक गोष्टी कृष्णा त्याला त्याच्या पोटातून देत असतो; पण एक दिवस तुक्या सोळा वर्षांच्या स्वप्नावकाशात प्रेमिकेवर बलात्कार करतो आणि कृष्णाच्या विश्वासाला तडा जातो. इन्स्पेक्टरला आत आणावं लागतं. तुक्या कृष्णाला आणि इन्स्पेक्टरला मारायला कृष्णाच्या पोटातून हत्यार काढतो. सोळा वर्षांचं आकाश फाडलं जातं.
या नाटकाला न्याय देण्यासाठी ‘इब्राहिम वेल्डिंग वर्क्स’कडून पाइप्सने वीस फुटी माणूस बनवला- ज्याला डोकं ठेवलं नाही. फक्त मोठ्ठं पोट. ते चाकावर. कृष्णाच्या भूमिकेत झकास अभिनय करणारा विजय मौर्य, जो आता नॅशनल अॅवॉर्ड मिळालेला लेखक (‘चिल्लर पार्टी’, ‘गली बॉय’) आहे. तो विजेच्या वेगात वर-खाली करायचा; कारण तोच कृष्णावतार आणि तोच काच खाणारा कृष्णा! कृष्णावतारात जेव्हा सोळा वर्षांचं आकाश त्या पाइपच्या स्ट्रक्चरमधून एका कॅनपीसारखं बाहेर आलं तेव्हा प्रेक्षकांनी ‘वाह’ म्हटल्याचं आठवतंय. अमित मिस्त्री तुक्याच्या भूमिकेत आपल्या चोऱ्या, प्रेम, राग गाण्यातून सांगायचा. त्या गाण्यांसाठी पहिल्यांदा केदार भगतच्या मदतीनं ट्रॅक्स रेकॉर्ड केले आणि नाटकाला म्युझिकल स्वरूप आलं. सादिया सिद्दिकीनं सोळा वर्षांच्या मुलीचा बेधडकपणा आणि स्वप्नाळू षोडशावस्था प्रभावीपणे दाखवली. खरं तर हे मुश्कील होतं, कारण तेव्हा ती वयानं- (नाही सांगत, पण)- मोठी होती.
इन्स्पेक्टर मी स्वत: फार्सिकल शैलीत केला. क्षणात क्रूर इन्स्पेक्टर, तर दुसऱ्या क्षणाला प्रेमळ बाप करताना मला माझ्यातील फार्सिकल अंगाची ओळख झाली आणि नाटकाबाहेरच्या जगातलं गांभीर्य कमी झालं. हलकं हलकं वाटायला लागलं. जय नाटक!
mvd248@gmail.com