मकरंद देशपांडे
नाटकं पुरुषप्रधान असतात तशीच स्त्रीप्रधान असतात; पण माझ्यातल्या नाटककाराला स्त्रीच्या स्त्रीपणाविषयी नाटक लिहावंसं वाटलं. बालिका, किशोरी ते प्रौढ स्त्री होताना त्या स्त्रीच्या शरीरात होणारे बदल हे नक्कीच तिच्या मानसिकतेवर प्रचंड टोकाचा परिणाम करत असणार, या विचाराने मी ‘कस्तुरी’ नावाचे नाटक लिहायला लागलो.
जेव्हा स्त्रीचं स्त्रीत्व तिच्याशीच शत्रुत्व पत्करतं तेव्हा ती हरवते आणि हरते पुरुषांच्या विश्वात आणि मग घाबरून स्वत:चं अपहरण करते, डांबून ठेवते स्वत:तल्या स्त्रीला.
जंगलात फिरणाऱ्या हरिणीच्या पोटात (नाभीत) कस्तुरी असते, पण तिला त्याचा गंध नसतो. त्या कस्तुरीच्या सुगंधाने वेड लागून हिंस्र श्वापदं तिची शिकार करतात, असं भीतीपोटी वर्णन केलं माया नावाच्या कादंबरीलेखिकेनं. तिनं लिहिलेल्या कादंबरीत तिची पात्रं ते सगळं करतात, जे तिला तिच्या जीवनात मान्य नाही. खासकरून पुरुषपात्रं! कारण मायाने कधीच आपल्या कस्तुरीचा स्वीकार केला नाही. पुरुषाच्या भीतीपोटी तिला ठाम वाटतं, की पुरुष हे फक्त एखाद्या हिंस्र श्वापदासारखं स्त्रीच्या कस्तुरीमागे लागतात आणि त्यासाठी ते तिला फाडून टाकतात. (शब्दश: नाही, पण मनाचे लचके तोडतात, सौंदर्य ओरबाडतात.)
भीती मायाला बर्फासारखी थंड करते. तिचं बोलणं, वागणं, अनुभवणं.. सगळंच! माया ही एखाद्या बर्फाळ प्रदेशाची, तर कस्तुरी ही एक ज्वालामुखी. कस्तुरीचा उद्रेक म्हणजे मायाच्या हिमाच्छादित, किंबहुना बर्फाखाली गाडलेल्या स्त्रीत्वाचा हिमवर्षांव!
मायाला तिच्यातील कस्तुरी का नकोय? तिला कसली भीती वाटते? आणि मग वास्तवात नकोय, तर कादंबरीत का हवी? ज्या कस्तुरीला वास्तवात डांबून ठेवलंय, तिला कादंबरीतल्या गोष्टीत एका जंगली पुरुषाबरोबर पळून जायला का दिलं? प्रश्नांची उत्तरं ‘कादंबरीकार माया’ देणार की ‘कस्तुरीची माया’ देणार? की एखादं पुरुष पात्र मधे ठेवलेले उत्तरांच्या बर्फाचे क्युब बाहेर काढायला भाग पाडणार?
माया-कस्तुरी यांच्या आकांडतांडव, भांडणामुळे शेजारीपाजारी पोलीस स्टेशनला फोन करतात. इन्स्पेक्टर वाघ हे चौकशीसाठी येतात आणि मायाच्या आक्रमक वागणुकीमुळे चक्रावून जातात. पण मायाकडून झालेल्या अपमानामुळे ते आणखी आकर्षित होतात आणि मायाला आश्वासन देऊन जातात, की ते या पोलीस स्टेशनमध्ये असताना कोणीच मायाला त्रास देऊ शकणार नाही. माया थंडपणे त्यांना जायला सांगते; कारण मायाला त्यांच्या बुटांना लागलेला कचरा, धूळ आणि अंगाला येणारा घामाचा वास अजिबात आवडत नाही. पण कस्तुरी मायाला सांगते की, ‘‘तुझ्या कादंबरीत लिहिलेला ‘नवाब टायगर’ हा इन्स्पेक्टर वाघच आहे. आणि कादंबरीत तर तो एका लेखिकेवर प्रेम करतो आणि तिच्याबरोबर जंगलात मुक्त रतिक्रीडा करतो.’’ तिची कस्तुरी नैसर्गिक गुणधर्म पाळतेही. मायाला मात्र राग येतो. कारण कस्तुरीनं गोष्टीचा अर्थ चुकीचा लावलेला आहे. गोष्टीत नवाब टायगरमधल्या जंगली वृत्तीने लेखिकेच्या कस्तुरीला पळवून नेलेलं असतं आणि तिच्यावर जबरदस्ती केलेली असते. कस्तुरीला मायाच्या गोष्टीतला अधोरेखित आशय कळलाच नाही, असं मायाला वाटतं.
माया इन्स्पेक्टर वाघ यांचा अपमान करत राहते. एक दिवस कस्तुरी नाहीशी होते. माया एकटी होऊन जाते. ते एकटेपण तिला सहन होत नाही. ती इन्स्पेक्टर वाघांना फोन करते. कस्तुरी नाहीशी झाली आहे, अशी मिसिंग कम्प्लेंट रजिस्टर करते. इन्स्पेक्टर वाघ आता ऑफिशिअली कस्तुरीचा शोध घेतात आणि इन्स्पेक्टर वाघ आणि मायाची प्रेमकथा पूर्ण होते. मायाला कस्तुरी मिळते!
या नाटकाचं पहिलं वाचन मी दीप्ती नवलच्या घरी केलं. तिचा मित्र विनोद आणि तिनं ऐकलं. ती म्हणाली की, ‘‘तुला स्त्रीबद्दल नुसतं कुतूहल, जिज्ञासा नाही तर करुणा आणि प्रेम आहे, म्हणून तू हे नाटक लिहिलंस!’’ तिचा मित्र विनोद (जो आता हयात नाही) म्हणाला, ‘‘खूप प्रामाणिकपणे लिहिलं आहेस, पण याचं मंचन करणार कसं?’’ मुळात आधी माया मिळायला हवी होती. दीप्ती म्हणाली, ‘‘मला तुझ्याबरोबर नाटक करायचंय, पण तू ज्या वेगाने तालमी करून नाटकांचे प्रयोग करतोस ते मी नाही करू शकणार.’’ पण का कुणास ठाऊक, तिनं मला डिंपल कपाडीयांना भेटायला सांगितलं. त्या दोघी मत्रिणी होत्या.
डिंपलला नाटक वाचून दाखवणं हेसुद्धा तिच्या सहज सौंदर्याएवढं सुंदर झालं. डिंपलला पुस्तकवाचनाची आवड असल्यामुळे संहितामांडणी आणि त्यामागे दडलेला अर्थ, त्यातलं काव्य तिच्यापर्यंत पोहोचलं. तिनं मला स्पष्ट सांगितलं की, ‘‘दीप्तीनं या नाटकाचं एवढं कौतुक केलं, की मला ते ऐकायचं होतं. आता मला पहिला प्रयोग पाहायला बोलव.’’ तिनं मायाच्या पात्रासाठी काय कपडे असू शकतात, हे सुचवलं आणि कपाटातनं एक छान लाँग स्कर्टदेखील काढून दिला.
रत्ना पाठक-शाहला फोन केला तेव्हा ती म्हणाली, ‘‘आपण एकत्र काम करायचंच आहे.’’ हे कळल्यावर वाचन ही एक फॉर्मलिटी होती. रत्ना आणि नसीरुद्दीन शाह या अप्रतिम आणि वेगळा प्रयोग आवर्जून बघणाऱ्या दाम्पत्याने नेहमीच माझी नाटकं पाहिली. प्रयोगानंतर ग्रीन रूममध्ये भेटायला येऊन म्हणायचे, ‘‘बहुत मजा आया!’’ माझ्या नाटकांना त्यांचं खूप प्रोत्साहन लाभलं. एवढं की, ‘कस्तुरी’च्या तालमीला नसीर सर यायचे. त्यांना माया आणि कस्तुरी यांचं लिहिलेलं नातं आणि मंचन करताना वापरलेली शैली खूपच गमतीशीर आणि ‘ब्रेकिंग द ग्राऊंड’ अशी वाटली.
कस्तुरीच्या भूमिकेत मोना आंबेगावकर ही अतिशय सुंदर अभिनेत्री होती. तिच्यात तरलता, धसमुसळेपणा आणि प्रसंगी गांभीर्य दाखवण्याची क्षमता होती. रत्नामध्ये होता ठहराव! आवाजात ज़्ारब! शारीरिक हालचाली संयमी तरीही वजनदार, प्रसंगी टोकाच्या रागाने ‘पृथ्वी थिएटर’ दणाणून सोडण्याची ताकद! आणि सेन्स ऑफ ुमर अफलातून!
माया आणि कस्तुरी खरं तर एकच पात्र, पण रंगमंचावर दोन अभिनेत्री. पण पात्र जसं बदलेल तशी त्यांची मांडणीही बदलायची. जेव्हा मायाला कस्तुरी नकोशी होते आणि कस्तुरी नाहीशी होते तेव्हा कस्तुरी मंचावर आहे, पण माया तिला पाहू शकत नाही. आणि कोण्या एका प्रसंगी कस्तुरी नैसर्गिक कारणांनी जर मायाशी संवाद साधू इच्छित आहे आणि माया तिला आपल्या घरातून बाहेर हाकलून देतीये वा रूममध्ये बंद करून ठेवतीये, हे असे प्रसंग दाखवताना काही वेळा फक्त कस्तुरीचा आवाज मायाला ऐकू येतो आणि इन्स्पेक्टर वाघ आल्यावर घडामोडींना वेगळं वळण लागतं. कारण वाघ मायातल्या कस्तुरीला पाहू शकतात, पण ऐकू शकत नाहीत. त्यामुळे वाघांना कस्तुरी दिसते आणि माया कस्तुरीचं बोलणं ऐकू शकते, पण तिला पाहू शकत नाही!
इन्स्पेक्टर वाघची भूमिका सुधीर पांडे या गज़्ाब नटाने केली. त्यांचा आवाज, कॉमिक टायमिंग लाजवाब! नसीर सरांना पांडेंनी केलेला दारूचा प्रसंग एवढा आवडला, की जेव्हा विक्रम कपाडिया या दिग्दर्शकाने कस्तुरी हे नाटक Musk Maiden या नावाने इंग्रजीत केलं तेव्हा नसीर सरांना ‘इन्स्पेक्टर वाघ’च्या भूमिकेसाठी विचारलं होतं. तेव्हा सर म्हणाले की, ‘‘सुधीर पांडे.. तो प्रसंग जितका छान करतो, तितका छान मी करू शकणार नाही.’’ (एक श्रेष्ठ नटच असं बोलू शकतो. कारण त्याला दुसऱ्या नटाला चांगलं म्हणण्यात कधीच कमीपणा वाटत नाही.)
या तिघांची तालीम घेण्यासाठी नसीर सर आले; पण पंधराएक दिवस तालीम झाल्यावर सुरुवातीच्या तालमीला रत्नाकडे प्रश्न असायचे. तिच्यामुळे सुधीरभाईंकडे पण आले. मोनाला माझ्यावर पूर्ण विश्वास होता. रत्ना आणि सुधीरची कॅरॅक्टरवर काम करायची पद्धत वेगळी होती.
रत्नाचं म्हणणं असायचं की, आपण आधी स्क्रिप्ट, त्यातली माया आणि कस्तुरी यांचं नातं काय आणि कसं दाखवायचं, याचा विचार करू या. आणि मला वाटायचं- आधी करूया, मग विचार करू या. कारण आधी सादर झालेल्या नाटकाचं स्क्रिप्ट आणि त्यातली पात्रं ही शक्यतो जिवंत झालेली असतात; पण नवीन नाटक हे तालमीत हळूहळू आकार घेत असतं. त्याला प्रश्नाचं बॉक्स थिएटरचं नेपथ्य न लावता फिरत्या रंगमंचावर ठेवावं.. उत्तर सापडण्याकरता! रत्नाला माझं म्हणणं पटलं, सुधीरभाईंचे प्रश्न गायब झाले आणि तालमीला खऱ्या अर्थाने मजा यायला सुरुवात झाली. तेव्हा सुधीरभाई आणि रत्ना शूटिंग करायचे. त्यामुळे सकाळी साडेसहा ते साडेनऊ तालीम करायचे आणि मग शूटिंग पॅकअप करून पुन्हा संध्याकाळी वा रात्री तालीम!
एकदा रत्नाने मला विचारलं, ‘‘अरे मॅक, तुझ्या नाटकात तू अॅक्टर्सकडून कधी रोप वॉक, कधी नृत्य, तर कधी मास्कशी संवाद.. असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून घेतोस. माझ्याबरोबर आत्तापर्यंत असं काही केलं नाहीस!’’ मी म्हटलं, ‘‘तुझ्या येण्यानं माझी शैली बदलली. कारण तुझी संवादफेक, तुझ्यातला ठहराव, स्टीलनेस हे बरंच काही सांगून जातं.’’ तिला ऐकायला बरं वाटलं; पण ती म्हणाली, ‘‘ते सगळं मी दुबेजींच्या आणि नसीरच्या नाटकात खूप केलंय. तू काहीतरी वेगळं करायला लाव.’’ मी म्हटलं, ‘‘तालमीत बघू काय सापडतंय.’’ आणि खरंच, आम्हाला खूपच धम्माल गोष्टी सापडल्या. उदाहरणार्थ, घराचा दरवाजा ही एक मोठी रिंग बनवून लावली आणि त्या शेजारी एक पितळ्याची थाळी व मायाचा एक लाकडी बूट अडकवला. कोणी आला की ती तो बूट त्या थाळीवर मारायचा आणि एक प्रकाशाचा गोळा रिंगमधून आत जायचा. त्या बॅक लाइटमध्ये इन्स्पेक्टर वाघचं भीषण रूप दिसायचं आणि ते पाहून घाबरलेली माया पुन्हा बूट मारून दरवाजा बंद करायची. पण इन्स्पेक्टर वाघ मात्र तिथेच उभे.. कस्तुरीची वाट पाहत. इन्स्पेक्टर वाघ जेव्हा मायाजवळ यायचे, तेव्हा ती हातातला झाडू त्यांच्यावर उगारायची आणि त्यातून हाताचा पंजा बाहेर यायचा!
मायाचा कॉम्पुटर खास अशा पद्धतीनं बनवला होता, की त्याच्या आतलं मशीन दिसायचं आणि असं वाटायचं, की नाटकातून कादंबरीत प्रवेश करतोय. कस्तुरीच्या हातात सुप होतं आणि त्यात आरशाचे तुकडे. त्यामुळे ती बोलताना सुप जाणूनबुजून वरखाली करायची आणि त्या आरशाच्या तुकडय़ांवर, वरून पडणाऱ्या स्पॉटमुळे असंख्य किरणे ‘पृथ्वी थिएटर’मध्ये पसरायची आणि मायाचं कोरडं जग कस्तुरीमय व्हायचं!
नाटक बसवणं जेवढं अवघड होतं तेवढंच त्याचं संगीत करणंही. फक्त मी नशीबवान असल्याने विशाल भारद्वाजनी स्क्रिप्ट ऐकून म्हटलं की, ‘‘मी म्युझिक करणार.’’ त्यानं माया आणि कस्तुरीच्या नात्याचं गाणं लिहिलं, रेखा (बायको) कडून गाऊन घेतलं आणि हितेश सोनीकला सांगून काही पार्श्वसंगीताचे ट्रॅक्ससुद्धा दिले.
वेडेपण हे संसर्गजन्य आहे याचे प्रमाण मला वेळोवेळी मिळत होतं! का माहीत नाही, पण शक्यतो मला तेव्हा कोणीही ‘नाही’ म्हणत नव्हतं. पण मला वाटतं, माझ्यापेक्षा ते माझ्या वेडेपणाला हो म्हणत असावेत!
जय स्त्रीत्व! जय वेडेपण!! जय नाटक!!!
mvd248@gmail.com