मकरंद देशपांडे
‘ऑपेरा हाऊस’ हे चर्नी रोड, मुंबईला १९११ साली किंग जॉर्ज पंचमच्या हस्ते, समाजातल्या उच्चभ्रू लोकांसाठी सुरू झालेलं थिएटर, पण त्याचा खरा आस्वाद सर्वागरूपाने घेतला गेला तो १९३५ सालापासून- पृथ्वीराज कपूर, बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर आणि बॉलीवूडच्या प्रतिभासंपन्न कलाकारांनी. या थिएटरमध्ये बसून नाटक, चित्रपट किंवा संगीत कार्यक्रम पाहणं हा एक मौलिक (रॉयल) अनुभव. एक राजस योग म्हणायला हरकत नाही.
२१ सप्टेंबर २०१९ म्हणजे मागच्या आठवडय़ात माझ्या ‘मिस ब्युटिफुल’ या हिंदी नाटकाचा प्रयोग झाला. (गेली दहा वर्षे या नाटकाचे प्रयोग कुठे ना कुठे होत असतात.) प्रयोगानंतर एक आनंदी वृद्ध जोडपं बॅकस्टेजला येऊन भेटलं आणि म्हणालं की, ‘नाटक फारच मार्मिक आणि गरजेचं आमच्यासारख्या वृद्धांसाठी! मी दिल्लीहून इथे कामासाठी आलोय. डॉक्टर आहे. ताज हॉटेलमध्ये राहतोय. आज संध्याकाळी असं वाटलं की या रॉयल थिएटरमध्ये एखादं नाटक पाहावं. तुझं नाव ऐकून होतो. म्हटलं, वेळेचा सदुपयोग करू, कारण तसा आता आमच्याकडे वेळ कमीच आहे.’.. आणि हसले. मग म्हणाले, ‘‘तू जो विषय निवडला आहेस ते एक शाश्वत सत्य आहे. माणसाचा शेवट मृत्यू! म्हाताऱ्या होणाऱ्या आई-वडिलांनी आपल्या मुलांना हे सांगून ब्लॅकमेल करू नये की, ‘आम्ही आता काही काळच जिवंत राहणार आहोत, तर तुम्ही लग्न करून आम्हाला नातवाचं तोंड बघू द्या म्हणजे आम्ही मरायला मोकळे!’ तो मुलगा/मुलगी घाईघाईत लग्न करतात. मुलंही होतात. मग म्हातारा-म्हातारी नातवांना डॉक्टर किंवा इंजिनीअर किंवा रिअॅलिटी शोमध्ये पाहण्याची इच्छा दर्शवतात आणि मुलामुलींची या सगळ्यात दमछाक होत असते.’’
खरं तर म्हातारा-म्हातारी आपल्या येणाऱ्या मृत्यूला तयारच नसतात, कारण आपल्याकडे खूप कृतघ्न नातेवाईक आणि मित्र आहेत. कोणी वयाच्या पंचाहत्तरीनंतर गेला तरी म्हणतील की, अजून दहाएक वर्षे जगला असता, फार लवकर गेला. एखादा आर्टिस्ट-कलाकार असेल तर बघायला नको. नव्वदीत गेलेल्या व्यक्तीबद्दलही म्हणतील की त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. याचा अर्थ त्याला सुखानं जाऊही देत नाहीत. आपल्या पुराण कथांत माणूस हजारो वर्षे जगायचा, हे आताही खरं करू पाहतायेत आजचे आप्तेष्ट आणि मग मृत्यूला उगाच नावं ठेवतात.
डॉक्टर मला म्हणाले की, ‘‘वर्षांनुवर्षे प्रत्येक गोष्टीचा भ्रष्टाचार होत आला. परंपरेचा, मूल्यांचा; पण मृत्यूचा नाही. मृत्यू आजही तसाच आहे. अनोळखी!’’ ‘मिस ब्युटिफुल’ हे नाटक लिहिण्यामागचे माझे कारण हे होते की, आपले आई-वडील आपल्या लहानपणी आपले हिरो असतात, पण त्यांच्या जीवनाच्या अखेरीस त्यांची मानसिक आगतिकता पाहून खूप त्रास होतो. असं वाटलं की ते मृत्यूला घाबरतायत. ज्या जीवनाला त्यांनी कधी जिंकलं, कधी सहन केलं त्याला पूर्णविराम देणाऱ्या त्यांच्याच मृत्यूला एवढं का घाबरतायत? याचं उत्तर शोधत लिहिलं गेलं हे नाटक. आपला मृत्यू अशुभ नाही. तोही जीवनासारखा सुंदर बनवता येईल का? म्हणून नाव ‘मिस ब्युटिफुल’.
सरकारी डाक सेवेतनं निवृत्त झालेले विनायक जोशी आणि सासर-माहेरच्या एकत्र कुटुंब पद्धतीतल्या दोन डझन माणसांना सांभाळणारी कुसुम, जी आता अंथरूण पकडून आहे. या दोघांना एकमेकांबद्दल सगळ्या चांगल्या-वाईट गोष्टी माहीत आहेत, तरीही आजही विनायक जोशी ‘आपण कसे वयाच्या अठराव्या वर्षांपासून नोकरी करत आहोत आणि रेल्वेच्या थर्डक्लास डब्यात गांधीजी भेटले होते,’ अशा अनेक आठवणी कुसुमला सांगत असतात. त्यांचा मित्र कर्वे हा वयानं त्यांच्यापेक्षा मोठा, पण चेंबूरहून एकटा बस पकडून आपल्या मित्राला भेटायला येतो. हे कुसुमला खटकतं, कारण कर्वे आल्यावर विनायक त्यांच्याशीच गप्पा मारत बसतात आणि कुसुमच्या बोलण्याचा त्यांना त्रास होतो. मग ते कुसुमला काहीही बोलतात म्हणून कुसुमही कर्वेना काहीही बोलते. एकूण घरात विनायक-कुसुम झोपलेले नसतील तर भांडण चालूच आणि त्यात कर्वे आले की महाभारत! त्यांचा मुलगा शिरीष आपल्या घरातल्या या अप्रतिम नटांना व्यवस्थित सांभाळतो.
शिरीष हा प्रायोगिक लेखक-दिग्दर्शक असल्यानं आपल्या आई-बाबांच्या मानसिकतेला ओळखून आहे. त्याला वाटतं की, त्यांच्या जीवनाचा तिसरा अंक चालू आहे आणि त्यात त्यांना कसंही करून शिरीषचं लग्न लावायचं आहे. एक सुंदर सून घरी आणली की ते मरायला तयार. शिरीषला मरण्यासाठी हे कारण पटत नाही म्हणून तो जीवनाला नाटक बनवत एक ‘रिअॅलिटी शो’ घरातच सुरू करतो. एका होतकरू अभिनेत्रीला- जिला काही केल्या अभिनय करायचाच असतो, तिला सांगतो की तुला माझ्या घरी आधी सून बनून अभिनय करायचाय, पण ती लग्न करून आलेली सून नाही, तर माझ्या आई-वडिलांचा मृत्यू म्हणून आलेली! कर्वे काकांना ही कल्पना फारच भन्नाट वाटते की या सुंदरीला म्हणजे ‘मिस ब्युटिफुल’ला पाहत मृत्युमुखी पडायचं.
रिअॅलिटी शोसारखं चालणारं नाटक हळूहळू खरं होत जातं. ‘मिस ब्युटिफुल’चा अभिनय करणाऱ्या नटीला आता हे सहन होत नाही. कारण तिच्याकडे सुंदर मृत्यू म्हणून पाहिलं जातं. ती मधेच नाटक सोडून जाते. आई-बाबा आणि कर्वे काका तिची विचारपूस करतात. शिरीषला आपला प्रयोग यशस्वी होतोय असं वाटायला लागतं, पण ‘मिस ब्युटिफुल’ आता नाटकाबाहेर आहे. शिरीषला मात्र विश्वास आहे की ‘मिस ब्युटिफुल’ नक्कीच परत येणार. कारण तिलाही आपल्या सख्ख्या बहिणीच्या आत्महत्येचा अपराधबोध असतो. जीवनाला कंटाळून जेव्हा तिच्या बहिणीनं पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती तेव्हा ही बाजूच्या खोलीत झोपली होती. आपण आपल्या बहिणीला वाचवू शकलो असतो, पण आपण झोपेत होतो या गोष्टीचा राग आता तिच्या मनात निर्माण झालाय- मृत्यूची भूमिका करता करता.
शिरीष घरी नसताना ती परत येते. आई-वडील खूश होतात. आता कर्वे हे जज होऊन कुसुम-विनायकच्या भांडणाला पॉइंट्स देतात. एकूण रिअॅलिटी शोचा, ‘मिस ब्युटिफुल’मुळे सगळे आनंद घेतात. शिरीषचं ‘मिस ब्युटिफुल’ला फक्त एवढंच म्हणणं असतं की, आपल्या बहिणीच्या आत्महत्येचा त्रास तुला खरंच झालाय का, हे स्वत:ला विचार. मृत्यूची भूमिका करताना मृत्यूची वेदनाही समजली तर जीवन अधिक संवेदनशीलपणे जगता येईल. नाहीतर अर्धअधिक जीवन हे झोपेत, ग्लानीत जातं. मरणारा मेल्यावर मात्र त्याच्या मरणाबद्दल शोक केला जातो.
विनायक-कुसुम हे वृद्ध जोडपं आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत पोहोचतं. शिरीषनं लिहिलेली दोन पत्रं त्यांना मिस ब्युटिफुलला वाचून दाखवायची असतात, कारण आता आई-वडिलांना ‘मिस ब्युटिफुल’ आपली वाटायला लागलेली असते. शेवटच्या प्रवेशात ‘मिस ब्युटिफुल’ आई-वडिलांना शिरीषनं लिहिलेली पत्रं वाचून दाखवते. त्यात लिहिलेलं असतं- ‘‘आई, कुबेराच्या तिजोरीतलं धन संपत आलंय म्हणून तो आता आईची माया, ममता गोळा करतोय. त्याचं कारण तू आहेस. बाबा, तुम्ही या देशाचे नागरिक म्हणून उगाच देशप्रेमाचा गाजावाजा न करता किती सहज सामान्य आयुष्य जगलात. त्यात कुटुंबासाठी प्रेम, मित्रासाठी आदर आणि जीवनासाठी कृतज्ञता होती.’’ आपल्या मुलांनी आपल्याबद्दलचे लिहिलेले विचार ऐकून आई-वडिलांचे डोळे पाणावले आणि मग त्यांनी ते कायमचे बंद केले. पण त्याआधी चेहऱ्यावर स्मित आणले. शिरीषचा प्रयोग यशस्वी होतो. रिअॅलिटी शोचा शेवट दु:खी असला तरी ती शोकांतिका होत नाही. रंगमंचावर देह टाकलेल्या आई-वडिलांना तो साष्टांग नमस्कार करतो.
नाटकाचा पहिला प्रयोग पृथ्वी थिएटरला सुरू झाला. मध्यांतर झालं आणि मी बॅकस्टेजला असताना आकाश खुराना या दिग्गज अभिनेता-दिग्दर्शकानं माझा हात धरला आणि दाटून आलेल्या कंठानं म्हणाले ‘‘मकरंद, अरे आता दुसऱ्या अंकात आणखीन काय दाखवणार आहेस?’’ त्यांना शेवटच्या प्रवेशाची भीती वाटून गेली होती. नाटकाचा शेवटचा प्रवेश झाल्यावर मात्र प्रेक्षागृह शाश्वत सत्याचं साक्षी झालं. पुन्हा एकदा नाटक हे माध्यम किती परिणामकारक आहे याची जाणीव झाली. प्रेक्षक आजही नाटक का पाहतात आणि रंगकर्मी आजही नाटक का करतात, याचं कारण नाटक करता करता नाटक खरं होऊन जातं. जीवनाचं उलट आहे, जीवन जगता जगता ‘नाटक’ होऊन जातं.
आकाश खुरानांनी आपल्या मुलाला- जो स्वत: नव्या पिढीचा लेखक-दिग्दर्शक अभिनेता आहे, त्याला नाटक बघायला सांगितलं. ‘मिस ब्युटिफुल’चा प्रयोग पाहिल्यावर तो म्हणाला, ‘‘मी आजपासून आणखीन चांगला मुलगा व्हायचं ठरवलंय.’’
अहलम खान कराचीवालाने ‘मिस ब्युटिफुल’ अल्लड, लाघवी, प्रसंगी उद्दाम, प्रसंगी हळवी, आत्मविश्वासानं उभी केली. अवघड पात्र तिनं खूपच सहज केलं. दिव्या जगदाळेनं आई- जी आपल्या बिछान्यावरून उठून चालूही शकत नाही, ती फक्त बिछान्यावर बसून अफलातून साकार केली. नागेश भोसलेनं केलेला बाप बघताना गतकाळातले दिग्गज नट आठवले. एवढा समर्थ अभिनय नाटकात आल्यावर दिग्दर्शकाचं काम थोडं कमी होतं आणि नाटककाराच्या लिखाणातला प्रयोग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना सहजता येते. कर्वेकाकांच्या म्हाताऱ्याच्या पात्रासाठी मी आनंदा कारकर या नटाला घेतलं. खरं तर त्याला मी मराठी व्यावसायिक नाटकात पाहिलं होतं. त्याचं विनोदी टायिमग छान होतं, पण या नाटकात विनोदाबरोबर एकाकी पडलेला म्हाताराही करायचा होता. पण का कुणास ठाऊक मला वाटलं की आनंदा करू शकेल आणि त्यानं केलेला कर्वे एखाद्या फॅशन शोमधल्या- शोचा टॉपर झाला. म्हणजे एवढा अप्रतिम, की तो भाव खाऊन गेला.
आणखीन एक गमतीशीर पात्र या गंभीर नाटकात होतं. ते म्हणजे एका अनुभवी, पण तरुण नटाचं. ज्याला ‘मिस ब्युटिफुल’बरोबर प्रेम करायचं असतं. पण शिरीष त्याला घाबरवत असतो की ते शक्य नाही कारण ‘ती’ मृत्यू आहे. एक दिवस त्याचे नाटकातले सीन संपतात आणि शिरीष त्याला सांगतो, ‘हा तुझ्या पात्राचा मृत्यू आहे या नाटकाच्या विश्वातून. संजय दधीचनं एका हुकमी एक्क्याप्रमाणे सुंदर भूमिका साकारली.
दिग्दर्शक म्हणून माझा आवडता प्रवेश होता, आई-वडिलांच्या अंतिम प्रवेशाआधी मला सुचलेलं गाणं. ‘मिस ब्युटिफुल’ ही सून बनून आईच्या स्वप्नात येते आणि आई-बाबा दोघं तिचा गृहप्रवेश आनंदानं तिच्या सोबत नाचून करतात आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू! नाटकातलं गाणं केदार रतनेशने लोकगीताच्या धाटणीत स्वरबद्ध केलं. रेखा भारद्वाजने ते प्रेमानं गायलं.
हे नाटक मराठीत नक्कीच व्हायला हवं.. असं वाटतंय आता मला!
जय जीवन! जय मृत्यू!
जय आई! जय बाबा!
mvd248@gmail.com