राष्ट्रीय दिनदर्शिका ही भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि २२ मार्च १९५७ रोजी केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकारलेली दिनदर्शिका. ती खगोलशास्त्रावर आधारित असून ऋतुचक्र, भौगोलिक परिस्थिती इ. अनेक घटकांचा सखोल विचार करून तयार करण्यात आली आहे. म्हणूनच तिचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे.
कालगणनेच्या बाबतीत भारतात खूपच विविधता आहे. काही पद्धतींत चांद्र महिने विचारात घेतात तर काही पद्धतींत सौर महिने. महिन्यांची कालगणना चंद्रभ्रमणावरून केली तर १२ महिन्यांचे वर्ष संपल्यावर होणाऱ्या एकूण दिवसांची संख्या ३५४ होते. त्यामुळे चांद्र वर्षांचा ऋतूंशी मेळ राहत नाही. ऋतू हे सूर्यभ्रमणावर अवलंबून आहेत आणि म्हणूनच सूर्याचे वार्षिकभ्रमण विचारात घेणारी राष्ट्रीय दिनदर्शिका व्यवहारात सोयीची पडते. सरासरी २४ तासांचा दिवस ही कल्पना सोयीची होते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पाच वर्षांनी म्हणजे १९५२ च्या सुमारास तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी पंचांग सुधारणा समिती (राष्ट्रीय कॅलेंडर समिती) या नावाने समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष डॉ. मेघनाथ साहा हे केवळ भौतिकशास्त्रज्ञच नव्हते तर ते काही काळ लोकसभेचे खासदारही होते. या समितीचे मुख्य काम असे होते की, भारतीय भौगोलिक परिस्थिती, ऋतुचक्र इ. सर्वागीण बाबींचा विचार करून आपल्या देशासाठी दिनदर्शिका सुचवणे. या पंचांग सुधारणा समितीने सर्व बाबींचा सखोल विचार करून त्यानुसार जी दिनदर्शिका सुचविली, ती केंद्र सरकारने राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून २२ मार्च १९५७ या दिवसापासून अधिकृतपणे स्वीकारली. हा दिवस राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे
१ चैत्र १८७९ असा होता.
आता आपण राष्ट्रीय दिनदर्शिका कशी आहे हे थोडक्यात समजून घेऊयात. राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये १२ महिन्यांची नावे जानेवारी ते डिसेंबर अशी नाहीत, त्यातील महिन्यांची नावे व वर्षांरंभाचा दिवस इ. गोष्टी वेगळ्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर ही नावे व्यक्तिसापेक्ष आहेत. उदा. जुलै हे नाव ज्युलिअस सीझरच्या नावाने पडले आहे तर ऑगस्ट हे नाव ऑगस्टस या राजाच्या नावावरून पडले आहे. मात्र राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या
१२ महिन्यांची नावे चैत्र ते फाल्गुन अशाच क्रमाने आहेत. फक्त मार्गशीर्ष महिन्याचे नाव ‘अग्रहायण’ असे आहे. ही
१२ महिन्यांची नावे व्यक्तिसापेक्ष नसून ती नक्षत्रांची नावे आहेत. म्हणजेच राष्ट्रीय दिनदर्शिका ही खगोलशास्त्राशी संबंधित असून, तिचे नाते हे आकाशाशी मिळतेजुळते आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वर्षांचा पहिला दिवस (लीप वर्ष सोडून) २२ मार्च हा असतो. या तारखेला राष्ट्रीय दिनदर्शिका १ चैत्र या नावाने संबोधते. राष्ट्रीय दिनदर्शिकेचे वैशाखापासूनचे महिने व महिन्यांचे दिवस हे प्रचलित दिनदर्शिकेच्या खालील तारखांना सुरू होतात-
lr03
वर्षांचा क्रमांक शालिवाहन शकाप्रमाणे घेतात. त्यामुळे राष्ट्रीय दिनदर्शिकेत महिन्याचे दिवस एक आड एक ३० किंवा ३१ असे घेत नाहीत. सूर्य उत्तर गोलार्धात असल्याचा काळ त्याच्या दक्षिण गोलार्धातील कालावधीपेक्षा थोडा जास्त असल्यामुळे राष्ट्रीय दिनदर्शिकेत वैशाख ते भाद्रपद या कालावधीत येणारे ५ सौर महिने प्रत्येक ३१ असून, उरलेल्या ७ महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३० घेतात. अशा तऱ्हेने ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण होते.
जे इंग्रजी वर्ष ‘लीप’ असते, त्या वर्षी सुरू होणारे राष्ट्रीय वर्षही ‘लीप वर्ष’ घेतात. अशा ‘लीप’ वर्षांची सुरुवात २२ मार्चला न होता २१ मार्चला करतात आणि त्या वर्षी चैत्र महिन्याचे ३१ दिवस घेतात.
राष्ट्रीय दिनदर्शिकेची शास्त्रीय बैठक
या दिनदर्शिकेची शास्त्रीय बैठक, सौर वर्षांची तसेच सौर महिन्यांची सुरुवात केव्हा करायची यात आहे. सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो, त्या दिवशी जगात सर्वत्र १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र असते. म्हणून त्या दिवशी नवीन वर्षांची सुरुवात केली जाते. साहजिकच ही तारीख १ चैत्र असते (इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे ही तारीख २२ मार्च असते. म्हणजे अधली-मधलीच तारीख झाली.) पुढे अदमासे
३ महिन्यांनी सूर्य जास्तीत जास्त उत्तरेकडे जातो. भूगोलाच्या भाषेत सांगायचे तर त्या दिवशी २३ १/२ उत्तर अक्षांशावर राहणाऱ्या लोकांच्या बरोबर माथ्यावर सूर्य माध्यान्ही तळपतो, आणि आपला मोहरा दक्षिणेकडे वळवतो. या दिवशी दक्षिणायन सुरू होते. हाच दिवस १ आषाढ म्हणून घ्यावा, अशी राष्ट्रीय दिनदर्शिकेची शिफारस आहे. या दिवशी कोणताच इंग्रजी महिना सुरू होत नाही. उलट इंग्रजी महिन्याची ती अधलीमधली तारीख असते (२२ जून).
यानंतर तीन महिन्यांनी सूर्य जेव्हा दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो, तेव्हा पुन्हा एकदा दिवस व रात्रीची समानता आपण अनुभवतो. या दिवशी १ अश्विन ही तारीख राष्ट्रीय दिनदर्शिकेने निश्चित केली आहे. (२३ सप्टेंबरशी ही तारीख जुळते.)
दक्षिण गोलार्धात प्रवेश केलेला सूर्य आणखी दक्षिणेकडे सरकत जातो. दक्षिणेकडे जाण्याची कमाल मर्यादा गाठण्यास त्याला अदमासे तीन महिने लागतात. या दिवशी उत्तरायण सुरू होते. हा दिवस म्हणजे पौष महिन्याची सुरुवात म्हणजे १ पौष असे राष्ट्रीय दिनदर्शिकेने ठरविले आहे (२२ डिसेंबर).
यावरून राष्ट्रीय दिनदर्शिकेची वैशिष्टय़े आणि त्याची शास्त्रीय बैठक लक्षात येईल. चैत्र, आषाढ, आश्विन आणि पौष या महिन्यांची सुरुवात सूर्याच्या स्थानांशी निगडित आहे. चैत्र आणि आश्विन महिन्याच्या सुरुवातीला (अनुक्रमे २२ मार्च आणि २३ सप्टेंबर) सूर्य वैषुविक वृत्तावर असतो. दिवस आणि रात्र समान असतात. आषाढ महिन्याच्या १ दिनांकापासून (२२ जून) दक्षिणायन सुरू होते, तर पौष महिन्याची म्हणजे उत्तरायणाची सुरुवात असते. (२२ डिसेंबर) इंग्रजी महिन्याची सुरुवात सूर्याच्या अशा विशिष्ट स्थानांशी निगडित नाही. वैशाख ते भाद्रपद या महिन्यांचे प्रत्येकी ३१ दिवस घेण्यामागील भूमिकाही आपण पाहिली.
असे हे राष्ट्रीय कॅलेंडर आपल्या देशाने अधिकृतरीत्या स्वीकारले असल्याने या दिनदर्शिकेला सध्यातरी घटनात्मक पाठिंबा आहे. स्वातंत्र्यानंतर इतर राष्ट्रीय बोधचिन्हे किंवा पद्धतीत बदल घडून आले म्हणजे कमळाला राष्ट्रीय फुलाचा दर्जा दिला गेला, तर मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून मानला गेला. त्याप्रमाणे ही दिनदर्शिकादेखील राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून स्वीकारली गेली. मेट्रिक वजनमापे चलनासाठी रुपये, पैसे हे बदलही १९५७ पासून स्वीकारण्यात आले. आज हे दोन बदल रूढ झाले आहेत. १६ आण्यांचा १ रुपया म्हणजे काय, हे आता नवीन पिढीला उलगडणारही नाही. मैल गेले, किलोमीटर आले हे बदल स्वीकारले गेले असले तरी आपल्या दैनंदिन व्यवहारात राष्ट्रीय दिनदर्शिकेचा समावेश सहजतेने होईल अशी काळजी सरकारने घेतली नाही. असे असले तरी ही राष्ट्रीय  दिनदर्शिका जनमानसात लोकप्रिय होत असून समाजातील सुजाण व वैज्ञानिक दृष्टिकोन  असणाऱ्या नागरिकांनी या राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वापर कागदोपत्री सुरू केलेला आहे. ही राष्ट्रीय दिनदर्शिका आपण कागदोपत्री वापरू शकतो, कारण केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय केंद्र दिनदर्शिका’ ही अधिकृतरीत्या स्वीकारली आहे. तसेच इंडियन बँक असोसिएशननेदेखील तसे तपशीलवार पत्रक ७ जानेवारी २०१३ रोजी काढले असून ते सर्व बँकांना पाठवले आहे. या पत्रकानुसार राष्ट्रीय सौर दिनांक जर चेकवर लिहिला असेल तर ती तारीख अवैध मानू नये. तसेच सेकंडरी स्कूल कोडमधील परिशिष्ट क्रमांक १८ नुसार शाळांनादेखील एक एप्रिल १९५७ किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या विद्यार्थ्यांचा जन्मदिनांक राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे नोंदला जावा अशा प्रकारची तरतूद केली आहे. औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकांनी राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या वापराबाबत ठराव संमत केले आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या जन्म-मृत्यूच्या दाखल्यावर राष्ट्रीय सौर आणि ग्रेगरिअन अशा दोन्ही तारखा टाकण्यात येतात. डोंबिवलीतील एका सांस्कृतिक परिवाराने राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या वापराबाबत पुढाकार घेतला आहे व त्या दृष्टीने जनजागृती करण्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली आहे. मराठी विज्ञान परिषद, ठाणे यांनीही यासंबंधीची जनजागृती केली होती. पुण्यातील पुणे जनता सहकारी बँकेने अशा प्रकारची दिनदर्शिका प्रसिद्ध केलेली आहे. कल्याणमधील ज्येष्ठ खगोल अभ्यासक हेमंत मोने यांचे राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या प्रसाराचे कार्यदेखील उल्लेखनीय आहे.
औरंगाबाद येथे राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचची स्थापना झाली असून, राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या प्रसाराचे व जनजागृतीचे काम हा मंच करीत आहे. अशा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वापर तसेच प्रसार खालील कृतीने साध्य करू शकतो-
१) आपण स्वत: व्यक्तिगत पातळीवर इंग्रजी व राष्ट्रीय तारखांचा बरोबरीने वापर करू या.
२) राष्ट्रीय तारीख चेकवर वैध आहे असा रिझर्व बँकेचा आदेश असल्यामुळे बँकेच्या चेकवर फक्त राष्ट्रीय तारीख लिहू या. त्याबाबत काही अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू या.
३) शालेय अभ्यासक्रमात याचा वापर करू या.
४) राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या तारखांचा समावेश सध्या प्रचलित असलेल्या विविध दिनदर्शिकांमध्ये करण्यासंबंधी प्रयत्न करू या.
५) राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून स्वत:साठी दिनदर्शिका खरेदी करू या. प्रयत्नांना आर्थिक मदत किंवा प्रोत्साहन देऊ या.
६) पत्रव्यवहारासाठी इंग्रजी दिनांकाबरोबर सौर दिनांक वापरू या.
७) राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या प्रसारासाठी आपल्या सोसायटीत किंवा संस्थेत एखादी बैठक आयोजित करू या.
८) मार्गदर्शनासाठी सौर कॅलेंडरबाबत आस्था आणि माहिती असणारी व्यक्ती आमंत्रित करू या.
९) चेकवर राष्ट्रीय सौर दिनांक टाकण्यासाठी किमान १० व्यक्तींना प्रवृत्त करू या.
१०) राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या प्रचारासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करू या.
राष्ट्रीय दिनदर्शिका हे एक राष्ट्रीय प्रतीक असून आपल्या देशाची अस्मिता आहे. विज्ञानाच्या प्रसारामुळे राष्ट्रीय दिनदर्शिका वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या सुजाण नागरिकांमध्ये झपाटय़ाने लोकप्रिय होत आहे. इंग्रजी तारीख संगणकाला पुरवली असता संगणकावर इंगजी तारखेचे भारतीय राष्ट्रीय सौर तारखेत त्वरित रूपांतर होते, अशी प्रणाली संगणकाच्या तंत्रज्ञानाने आता विकसित झाली आहे. नवनवीन कल्पनांचा स्वीकार व कालबाह्य़ पद्धतीचा त्याग ही तर वैज्ञानिकतेची लक्षणे आहेत. समाजात व जनमानसात राष्ट्रीय दिनदर्शिकेचा झपाटय़ाने प्रसार होत असून त्यायोगे समाजात एक क्रांतिकारी आणि वैज्ञानिक बदल घडून येत आहे. या बदलाचा आपणही एक घटक बनू या व आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा यथोचित सन्मान करू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा