नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन या माध्यमांतून आपला कलात्मक ठसा उमटविणाऱ्या सई परांजपे यांचे आपल्या कारकीर्दीचे सिंहावलोकन करणारे साप्ताहिक सदर..
पुण्याची ‘बालरंगभूमी’ आणि आकाशवाणीचे ‘बालोद्यान’ अशी दुहेरी जोखीम मी पत्करली होती, पण तिचे ओझे जाणवले नाही. ती एक सुखावह जबाबदारी होती. मुलांच्या नाटकांच्या सोपस्कारात अरुण जोगळेकर आणि मी जवळ आलो. ‘नाटक’ हा आम्हाला सांधणारा दुवा होता. आप्पांच्या पाठिंब्याच्या आधाराने मी आईच्या इच्छेविरुद्ध अरुणशी लग्न केले.
लग्न झाल्यावर अवघ्या महिनाभरात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची जाहिरात आमच्या पाहण्यात आली. नव्या वर्षांसाठी होतकरू विद्यार्थ्यांना त्यात पाचारण केले होते. जागा कमी होत्या आणि देशभरातल्या उमेदवारांमधून निवड होणार होती. राष्ट्रीय स्तरावर नाटय़शिक्षण देणारी ही एकमेव संस्था होती. नाटय़क्षेत्रात स्वत:ला झोकून देण्याचे ठरल्यावर या संधीकडे पाठ फिरवणे, हे अविवेकी ठरणार होते. पण त्याचबरोबर लग्न झाल्या झाल्या दूर मोहिमेवर निघणे, हेसुद्धा किती विसंगत! मोठाच कूट प्रश्न निर्माण झाला. ळ ॠ १ ल्ल३ ३ ॠ? मग अरुणनेच निर्णय घेतला. म्हणाला, ‘‘हे बघ. तू इंटरव्हय़ूला तर जा. पुढे एन.एस.डी.त भरती होणे- न होणे आपल्या हातात राहील. पण ही संधी जर हुकवलीस, तर नंतर हळहळत बसावे लागेल. शिवाय हा एक अनुभव तर पदरी पडेल.’’ आणि मग हसून म्हणाला, ‘‘आणि कुणी सांगावे? कदाचित तुला निवडणारही नाहीत.’’
पण माझी निवड झालीच. एका परीक्षकाने खोचकपणे म्हटले, ‘‘आम्ही सहसा मुलींना प्रवेश द्यायचे टाळतो. उद्या शिक्षणक्रम अध्र्यातच सोडून लग्न लावून पळून गेल्या तर?’’
‘‘माझ्या बाबतीत तसे घडणार नाही.’’
‘‘कशावरून?’’
‘‘कारण गेल्याच महिन्यात माझे लग्न झाले आहे.’’
मग मी आम्हा दोघांच्या नाटय़व्यासंगाची कल्पना त्यांना दिली आणि मी ही परीक्षा द्यावी, हा अरुणचाच आग्रह असल्याचे सांगितले.
‘‘म्हणजे एका महिन्यातच तो तुम्हाला कंटाळला!’’ परीक्षक हसून म्हणाले आणि निवड झालेल्यांच्या यादीत माझे नाव त्यांनी पक्के केले.
आमचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम होता आणि शिष्यवृत्ती होती महिना रु. २००! त्यातच खोलीभाडे, जेवण, चहापाणी, वह्या-पुस्तके सर्व काही भागवायचे. विद्यार्थी जवळपासच्या घरांमधून खोली भाडय़ाने घेत. दोघे-दोघे, क्वचित तिघे मिळून राहत. मी शाळेशेजारच्या मुखर्जी यांच्या बंगल्यात विलोमिना (मीना) विलियम्सबरोबर एका खोलीत राहू लागले. मीना ग्वाल्हेरची होती आणि मोठय़ा उत्साहाने माझ्याशी मोडकेतोडके मराठी बोले. तिचा स्वभाव छान विनोदी होता. सकाळी माझ्या चहाच्या कपात ती टोस्टचे तुकडे टाकायची आणि टाळ्या पिटत म्हणायची, ‘‘बाटवलं.. बाटवलं! तुला बाटवलं.’’ आमच्या वर्गात आम्ही एक डझन मुले-मुली होतो. अगदी ‘तीन बत्ती, चार रास्ता’! राजस्थानचे ओम शिवपुरी आणि सुधा शर्मा- दोघे जयपूरचे गाजलेले रेडिओ कलाकार होते. ‘पंजाबदा पुत्तर’  हरपालसिंह टिवाना, उडिसाचा बृजकुमार गिरी, तामिळनाडूचा नारायणस्वामी, मीरतचा सुरेन्द्र कौशिक, काश्मीरचा धर, सिंधी आनंद मथाई, अलाहाबादचा शंकर सोहेल, बंगलोरची पी. भारती आणि महाराष्ट्रातून दया डोंगरे आणि मी! आमची तुकडी क्रमवारीने तिसरी होती. आमच्या आधीच्या तुकडीत ज्योती व्यास, विनायक चासकर आणि बी. व्ही. कारंथ इ. मंडळी होती. ज्योती आणि चासकरने पुढे मुंबईच्या दूरदर्शनमध्ये कारकीर्द केली. कारंथने ‘चोमन दुडी’ हा एकमेव चित्रपट केला आणि राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. नंतर भोपाळच्या भारत भवनची धुरा त्याने अनेक वर्षे सांभाळली. आणि मग कर्नाटकात प्रचंड नाटय़सेवा केली. सगळ्यात पहिल्या तुकडीत केरळचा माधवन् नायर होता. भेदक डोळ्यांचा हा सावळा प्रति- राज कपूर पुढे केरळचा फार मोठा सिनेहीरो झाला. स्वत:च्या मालकीचा त्याने फिल्म स्टुडिओही बांधला. पाच वर्षांपूर्वी माझ्या ‘चकाचक’ या बालचित्रपटात ‘झाडूबाबा’ची फार छान भूमिका त्याने वठवली. दया डोंगरे आपला गोड स्वभाव आणि मोहक रूपामुळे खूप लोकप्रिय झाली.
नाटय़विद्यालयाचे प्रमुख नेमीचंद्र जैन हे स्वत: रंगकर्मी नव्हते. ते अभ्यासक आणि समीक्षक होते. नाटय़वेडय़ा तरुणांचे प्रेरक म्हणून ते स्फूर्तिदायी नेतृत्व करू शकले नाहीत. आपल्या तुटक आणि अलिप्त स्वभावामुळे ते मुलांची मनेही जिंकू शकले नाहीत. एकूणच शिक्षकवर्ग तसा निष्प्रभ होता. नाटय़शास्त्र (शांता गांधी), अभिनयकला (शीला वत्स), रंगमंच सज्जा (देव महापात्रा), मंचतंत्र (गोवर्धन पांचाल- जे पूर्वी कथ्थक नर्तक होते!), रंगभूषा (इन्दु घोष), वेशभूषा (कोकिळा मवानी) आणि सुतारकाम शिकवायला व्यवसायाने सुतार असलेले गुरुजी असा स्टाफ होता. प्रात्यक्षिक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांला स्कूलने दिलेली एक एकांकिका बसवावी लागे. मला मिळालेली एकांकिका अगदीच अळणी होती. ती बसवण्यात मला जरासुद्धा रस वाटला नाही. त्याचा प्रयोगही फारच सुमार झाला. मला खूप कमी गुण मिळाले.
कैलाश कॉलनीमध्ये एका प्रशस्त बंगल्यात आमची शाळा वसली होती. साधे वर्ग, तालमीचा हॉल, संगीतकक्ष, लायब्ररी, खाली कंपाऊंडमध्ये सुतारकामासाठी शेड आणि गल्लीमध्ये हस्तकला आणि मंचसामग्री निर्माण यासाठी आच्छादलेले कलादालन अशी एकूण रचना होती. या कलादालनात आम्ही कागदाच्या लगद्यापासून (पापियेर माशे) मुखवटे आणि वेताच्या कलाकृती बनवत असू. मुख्य इमारतीशेजारी सेवक वर्गासाठी जो निमुळता कक्ष बनवला होता त्यात कँटीन होते. अतिशय बकाल. तिथे खाल्लेल्या मोहरीच्या तेलातल्या राजम्याची नुसती आठवण झाली तरी पित्त होईल की काय अशी धास्ती वाटते.
पहिले वर्ष रेंगाळत, रुटुखुटू चालले होते. सगळे काही सोडून इथे येण्यात आपण चूक केली की काय, असे वाटू लागले.
आणि मग चमत्कार घडला!
अल्काझी नामक एका वादळाची स्कूलच्या प्रमुखपदी नेमणूक झाली आणि संस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडून आले. अल्काझी साक्षात् चैतन्यमूर्ती होते. त्यांच्या आगमनाने सुस्तावलेली संस्था आळस झटकून उभी राहिली. सगळी मरगळ निघून गेली.
अल्काझी लंडनच्या सुप्रसिद्ध ‘राडा’ (रॉयल अकॅडेमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट) या संस्थेचे पदवीधर होते. त्यांना बी.बी.सी.चे पारितोषिक मिळाले होते. मुंबईमध्ये एक दर्जेदार नाटय़चळवळ चालवून मोठा निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रचंड नाव कमावले होते. ‘बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’शी ते संलग्न होते. त्यांच्या नाटकांना हुसेन, तय्यब मेहता, रझा, अकबर पदमसी अशांसारख्या दिग्गज चित्रकारांनी मंचसज्जा संकल्पिली होती. इब्राहिम अल्काझी हे गाढे पंडित होते आणि पाश्चिमात्य रंगभूमीचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांच्या या पाश्चात्त्य अनुभूतीमुळे की काय, त्यांना परके मानले जाई. दिल्लीतल्या नाटय़क्षेत्रात वावरलेल्या अतिरथी महारथींना डावलून त्यांची नेमणूक झाल्याबद्दल काही भुवया उंचावल्या होत्या. भारतीय नाटय़सृष्टीशी या उपऱ्या इसमाचा काय संबंध?
काय संबंध, ते अल्काझींनी रुजू झाल्या झाल्याच दाखवून दिले. मोहन राकेश यांचे ‘आषाढ का एक दिन’ हे नाटक त्यांनी बसवले. कालिदासकालीन ही नाटय़रूप प्रेमकथा भारतीय संस्कृतीचा एक विलोभनीय नमुना म्हणून मानली जाते. त्याकाळची रंगसज्जा, वेशभूषा, केशभूषा आणि इतर तपशील यांचा बारकाईने अभ्यास करून अल्काझींनी अप्रतिम वातावरणनिर्मिती केली. नाटकाच्या प्रारंभीच पावसात चिंब भिजलेली मल्लिका (सुधा शर्मा) बाहेरून धावत येते आणि आपल्या आईच्या- अंबिकेच्या (मीना विलियम्स) मांडीवर लोळण घेते. ‘‘आषाढ का पहला दिन, और ऐसी वर्षां, मां..’’ हा तिचा पहिलाच संवाद मनाची पकड घेतो. ही पकड नाटकभर कायम राहते. कैलाश कॉलनीतल्या बंगल्याच्या मागच्या आवारात छोटा मंच बांधून त्यावर लहान झोपडी उभारली होती. हे नाटक प्रेक्षकांना थेट कालिदासाच्या काळात घेऊन गेले आणि ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ची खुमारी या ‘परक्या’ दिग्दर्शकाने टीकाकारांना दाखवून दिली. कालिदासाचे काम ओम शिवपुरीने केले. तो उंचापुरा, धष्टपुष्ट, गोरा असल्यामुळे भूमिकेत शोभला. अभिनयही तो चांगला करायचा. पण प्रत्येक संवादानंतर त्याचे डोके डुगडुगत असे. अल्काझींनी त्याची ही सवय बरोबर घालवली. मी प्रियंगुमंजिरीचे काम केले. ते सुमारच झाले. त्यावेळी मी चांगलीच लठ्ठ होते. अल्काझी मला रागवत- ‘नटाने बांधेसूद असले पाहिजे. तू वजन कमी केले नाहीस तर तुला चांगल्या भूमिका मिळणार नाहीत.’ मला चांगल्या भूमिकांचा मुळीच सोस नव्हता. नाटय़लेखन आणि दिग्दर्शन हा माझा प्रांत होता. पण मी हे त्यांना सांगितले नाही. ‘हो, हो’ म्हणत राहिले. वजन काही कमी झाले नाही.
नाटक बसवायचे म्हणजे केवढा खटाटोप असतो, याचा प्रथमच प्रत्यय आला. इथे प्रत्येक नाटक युद्धपातळीवर होत असे. त्यामानाने आमची बालरंगभूमीची नाटके म्हणजे छान विरंगुळा होती असे वाटू लागले. प्रयोगाच्या तालमी तीन-चार महिने आधीपासून सुरू होत. अगदी साग्रसंगीत. ध्वनियोजना, प्रकाश, पोशाख, रंगभूषा आणि सामग्री यांच्यासकट! प्रत्येक बारकावा जोखलेला असे. बुटाची नाडीसुद्धा वाटेल ती चालणार नाही. यासंदर्भात पी.डी.ए.चा एक प्रयोग आठवतो. टेनेसी विलियम्सचे ‘कॅट ऑन अ हॉट टिन रूफ’ (मराठीतून) संस्थेने दिल्लीला आणले होते. अरुण आणि मी कौतुकाने नाटक पाहायला बसलो होतो. (‘आमची’ संस्था!) स्टेजवर राम खरे ड्रेसिंग गाऊन घालून आणि हातात पाइप धरून ऐटीत वावरत होता. मंचावर समोर दोन वेताचे मुडे होते. त्यांना अभ्रे चढवले होते. एका मुडय़ाच्या मध्याला पट्टा बांधलेला होता. दुसऱ्याचा अभ्रा सरळ लोंबला होता. दोन्ही मुडे शेजारी शेजारी असल्यामुळे ही विसंगती फारच खटकत होती. ‘‘एवढी कशी काळजी घेत नाहीत? दुसरा पट्टा नको का?’’ मी कुरकुरत होते. जरा वेळाने मला कोपराने ढोसून अरुण माझ्या कानात म्हणाला, ‘‘आहे! आहे! दुसरा पट्टा आहे, पण तो रामच्या कमरेला आहे. त्याच्या ड्रेसिंग गाऊनला बांधला आहे बघ.’’
अल्काझींनी एकापाठोपाठ एक अशा विस्मयकारक निर्मिती दिल्लीकरांसाठी सादर केल्या. डोळ्यांचे पारणे फिटावे अशा एकेक कलाकृती! त्यांची सौंदर्यदृष्टी खूप उच्च दर्जाची होती. नुसता सेट पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होई. शेक्सपियर, लोर्का, इब्सेन, चेकॉव्ह, मोलिएर, आयनेस्को, जां आंवी अशा महान नाटककारांच्या श्रेष्ठ नाटय़कृती त्यांनी बसवल्या आणि प्रत्येक प्रयोगाला दाद घेतली. प्रयोगाला मायक्रोफोन नसे. ‘तुमच्या घशात तुमचा माइक हवा,’ ते म्हणत. ‘शेवटच्या रांगेपोतर तुमचा आवाज पोचला पाहिजे.’
दुसरे वर्ष सुरू झाले तेव्हा अरुणही एन. एस. डी.मध्ये दाखल झाला. म्हणजे मी सीनियर! त्याला पहिल्यापासून अल्काझी लाभले म्हणून मी त्याचा हेवा करीत असे. त्यांची अतिशय गाजलेली निर्मिती ठरली ‘अंधा युग’! धर्मवीर भारतींनी महाभारतातील एका खंडावर लिहिलेलं हे समर्थ नाटक अल्काझींनी चक्क फिरोझशहा कोटला या जुनाट किल्ल्याच्या परिसरात बसवले. तुटलेले बुरूज, भंगलेल्या दगडी भिंती आणि ढासळलेल्या कपारी यांच्या साक्षीने महाभारत उलगडत गेले. या विलक्षण पाश्र्वभूमीवर पाहिलेले ते नाटक खरोखरच अद्भुत होते. रोमांचकारी. अरुणने ‘अंधा युग’मध्ये अश्वत्थाम्याची अतिशय प्रभावी भूमिका केली.
शाळेच्या जवळच एका खोलीत आम्ही बिऱ्हाड थाटले. दोन विद्यार्थ्यांच्या बिऱ्हाडात होते काय? वह्या, पुस्तके आणि चहा.. फार तर खिचडी बनवण्यापुरती एक-दोन पातेली. आम्हा दोघांच्या वर्गामधली मुलं-मुली आळीपाळीने आठवडय़ातून एकदा बाकीच्यांना चहा-फराळाला बोलवीत. तेव्हा आपापल्या प्रांतामधले वैशिष्टय़ पेश होई. आमचा मराठी बेत सपशेल पडला. एकदम फ्लॉप! नेहमीचे पोहे, खिचडी नको म्हणून आम्ही आंब्याची (कैरीची) डाळ योजली. मोठय़ा उत्साहाने कैऱ्या आणि महाग नारळ आणला. डाळ भिजत घातली आणि छान हिंगाची चरचरीत फोडणी देऊन मी डाळ केली. आमची केवढी टिंगल व्हावी? कच्ची डाळ म्हणून कुणी बोट लावीना. काहींना तर वाटले, की मला स्वयंपाक नीट येत नाही म्हणून मी डाळ शिजवायलाच विसरले. जाता जाता एका शहाण्याने टोला दिला-‘आमच्याकडे फक्त घोडय़ांना कच्चे चणे देतात.’ ‘बरोबर!’ अरुणचा पुणेरी तिरकसपणा उफाळून आला, ‘म्हणूनच खास तुमच्यासाठी आज हा बेत योजला.’
हा एक साप्ताहिक ‘स्नेहसोहळा’ सोडला तर आम्हाला भेटीगाठी, गप्पाटप्पा किंवा इतर करमणुकीसाठी वेळच उरत नसे. अल्काझींनी शाळेच्या वेळा ताणल्या होत्या. आता सकाळी आठ वाजता शाळा भरू लागली. सुरुवातीचे तास वेगवेगळ्या विषयांची थिअरी शिकवण्यात जात. अल्काझी स्वत: पाश्चिमात्य नाटय़ शिकवत. शेक्सपिअर, चेकॉव्ह, मोलिएर, इब्सेन, आयनेस्को, स्ट्रिंडबर्ग, बेकेट अशा अनेक थोर नाटककारांच्या कार्याची ओळख ते अतिशय रसिकतेने करून देत असत. त्यांची ओघवती वाणी, ज्ञान, नाटय़पूर्ण शैली- सारेच विलक्षण. माझ्या उभ्या आयुष्यात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ वक्ता मला आढळला नाही. गंमत म्हणजे कधी लहर लागली की ‘इम्प्रेशनिस्ट’ चित्रकारांचे आख्यान ते लावीत असत. पाश्चिमात्य चित्रकलेचे त्यांचे ज्ञान अगाध होते. व्हॅन गॉग, मोने, माने, तुलुझलोत्रेक, सेझान, इ. चित्रकारांच्या ब्रशच्या एकेक फटकाऱ्याचे महत्त्व ते समजावून सांगत. आम्हाला स्लाइड्स दाखवत. पुढे अनेक वर्षांनी मी जेव्हा पॅरिसला गेले तेव्हा ऑरेंजरी संग्रहालयात या थोर चित्रकारांची चित्रे प्रत्यक्ष पाहताना अल्काझींचा ‘साऊंडट्रॅक’ आठवून मी त्या- त्या कलाकृतींचा आस्वाद घेऊ शकले.
दुपारनंतर तालमी होत. त्या उशीपर्यंत चालत. खुद्द त्या नाटकातले नट सोडले तर बाकीची मुले अन्य विभागांमधल्या जबाबदाऱ्या उचलीत. जराही अळंटळं, कंटाळा, बेपर्वाई चालत नसे. मानेवर जूं ठेवून काम करावे लागे. खूप थकायला होई. पण शिक्षक जिथे ताठ उभा, तिथे विद्यार्थी कसे मरगळणार? तो चैतन्याचा झरा कधी आटत नसे. म्हणून तर ‘किंग लियर’ (ओम शिवपुरी), ‘तुघलक’ (मनोहर सिंह), ‘अँटिगनी’ (सुधा शर्मा, मी- इसमेनी), ‘कॉकेशिअन चॉक सर्कल,’ ‘तारतूफ,’ ‘चेरी ऑर्चर्ड’ अशी एकाहून एक सरस नाटके उभी राहिली.
एव्हाना कैलाश कॉलनीची जुनी जागा सोडून शाळा मध्यवर्ती बंगाली मार्केटजवळच्या रवींद्र भवनमध्ये दाखल झाली होती. अरुणने आणि मीपण आमचे विंचवाच्या पाठीवरचे बिऱ्हाड हलवले आणि लोदी कॉलनीत एक खोली घेऊन राहू लागलो. अवघ्या ४०० रुपयांमध्ये भागवायचे म्हणजे एक सत्त्वपरीक्षाच होती. घरून मदत मागवायची नाही असा आमचा निर्धार होता. भाजी-बाजारात ‘दहा पैशाची मेथी नको. महाग आहे. सहा पैशाची पालक गड्डी बरी त्यापेक्षा!’ अशा प्रकारच्या आमच्या चर्चा होत असत. ‘खस’ पेयाची एक बाटली आणून ती महिनाभर पुरवायची- ही आमची चैन असे. शेजाऱ्यांकडून बर्फ मागून आणत असू. त्या हिरव्या खसच्या सरबतात बर्फाच्या खडय़ाबरोबर दिवसाचा थकवा विरघळून जाई.
अल्काझींची शिस्त ही केवळ नाटय़प्रयोग किंवा विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नव्हती. शाळेचा कर्मचारी- वर्ग, कारकून, शिपाई, प्राध्यापक आणि साहजिकच आम्ही विद्यार्थी- सगळ्यांनाच तिच्या झळा लागत. शाळेचे दृश्यस्वरूप पार बदलून गेले होते. ठायी ठायी डायरेक्टरच्या सौंदर्यदृष्टीची साक्ष पटू लागली. पाहता पाहता बदकाच्या कुरूप पिल्लाचा राजहंस झाला. पण त्यासाठी किंमत मोजावी लागत होती. सतत घडय़ाळाच्या काटय़ांच्या तालावर चालावे लागत होते. भारतीय ढिलाई वृत्तीला मज्जाव होता. त्यामुळे अधूनमधून कुरकूर ऐकू  येऊ लागली.
नव्या नवलाईचा बहर ओसरल्यावर हळूहळू मुले अल्काझींच्या त्रुटी शोधू लागली. त्यांच्या तालमीतून निघालेले सर्व नट एकाच मुशीतून ओतल्यागत वाटत. कलाकाराच्या स्वतंत्र विकासाला वाव नसे. पूर्ण दिवस बांधलेला आणि शाळा हे एकच सूक्त- ही परिस्थिती तरुण मुलांना जाचक वाटू लागली. एक दिवस सर्वच्या सर्व मुलांनी बंड पुकारले. मला वाटते, अल्काझींना हे अनपेक्षित होते, धक्कादायक होते. त्यांनी आम्हा सर्वाची सभा घेऊन प्रत्येकाला- तो या विरोधात सामील आहे का, विचारले. त्यांना होकारच मिळत गेला. या घटनेनंतर परिस्थिती थोडी निवळली. पण थोडीच!
दुसरे वर्ष पुरे झाल्यावर माझी परीक्षा झाली आणि एन.एस.डी.चा देखणा डिप्लोमा माझ्या हाती पडला. मला मिळालेले मार्क वा शेरा फारसे उत्साहजनक नव्हते. शाळेत मी भव्यदिव्य असे काहीच केले नव्हते. खरे तर मी अल्काझींच्या पट्टशिष्यांमध्ये कधीच नव्हते. मला वाटते, स्वत:चे काही वैशिष्टय़ किंवा वेगळेपणा असलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा ‘घडवता’ येतील असे शिष्य त्यांना अधिक प्रिय असावेत. हे आपले माझे मत आहे. ते चूकही असेल! एवढे मात्र खरे, की त्यांना द्रोणाचार्य मानून मी एकलव्याप्रमाणे जेवढे शिकता येईल, साठवता येईल ते शिकत, साठवत गेले. त्यांच्यासारख्या शिक्षकाचा- एका वर्षांपुरताच का होईना- पण लाभ झाला, हे मी माझे अहोभाग्य समजते. त्यांची मोलाची शिकवण पदरी बांधून मी शाळा सोडली. ती शिकवण मला जन्मभर पुरली.. पुरते आहे.

article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
priya bapat shares opinion on marathi industry
“क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमे ऑफर झाले नाहीत” प्रिया बापटने व्यक्त केली खंत; कलाकार म्हणून मांडलं प्रामाणिक मत
CBSE instructed affiliated schools to publish staff and other information on their websites
संकेतस्थळावर माहिती, कागदपत्रे जाहीर न करणाऱ्या शाळांवर कारवाई; सीबीएसईचा इशारा
Slower shahane  Middle class awareness Daily
लोक-लोलक: ‘स्लोअर शहाणे’च्या जाणिवांच्या प्रदेशात…
SHIVA
Video : “तू कुठल्या अधिकाराने…”, शिवा-आशूमध्ये होणार पुन्हा भांडण; सिताई देणार नातं संपवण्याचा सल्ला, पाहा प्रोमो….
Story img Loader