अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी पावसाचे पूर्वसंकेत देणाऱ्या निसर्गातील घटना-घडामोडींबद्दलचे स्वानुभव तसेच प्राचीन ग्रंथांतील उल्लेख यावर आधारीत ‘मेघा छाए..’ हा लेख ९ जूनच्या ‘लोकरंग’ पुरवणीत लिहिला होता. त्यातल्या निरीक्षणांचा प्रत्यक्ष प्रत्यय घेऊन लिहिलेला हा लेख..
बो रीवलीला नॅशनल पार्कपासून जेमतेम चालत दहा मिनिटांवर आमचे तिसऱ्या मजल्यावरचे घर. घराच्या आजूबाजूस झाडांची भरपूर गर्दी. दिवाणखान्यातून आंबा, माड, पिंपळ , अशोक, जांभुळ अशा डौलदार वृक्षांचे रोज दर्शन घडते. यंदा मे महिन्याच्या मध्यापासून समोरच्या विशाल आंब्याच्या झाडावर एक सुंदर व विलक्षण अशी गोष्ट आणि त्याअनुषंगाने एक निसर्गचक्र अनुभवयास मिळाले. आंब्याच्या झाडाच्या मधोमध थोडेसे पूर्वेस एका कावळा-कावळिणीने आपले घरटे बांधण्यास प्रारंभ केला होता. मी दररोज या झाडाकडे पाहत असल्याने त्यात झालेला अगदी बारीकसा बदलही माझ्या ध्यानी आल्याशिवाय राहत नाही. दोन कावळ्यांचा मिळून घरटे बांधण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. सुकलेल्या छोटय़ा छोटय़ा काटक्या, काडय़ा, गवत त्या आंब्याच्या झाडावर जमवायला कावळ्याने सुरुवात केली. हळूहळू कावळ्याचे घरटे आकारत होते. रोज सकाळ- संध्याकाळ त्या घरटय़ाचे निरीक्षण करणे नित्याचेच झाले होते. घरटय़ाची होणारी प्रगती लक्ष वेधून घेत होती.
मनोरम अनुभव होता तो. त्यात कुतूहलजन्य आनंदही होता.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात कावळिणीने बहुधा घरटय़ात अंडी घातली असावीत. किती अंडी आहेत, हे जाणून घेण्याच्या भानगडीत मी पडलो नव्हतो. पण त्याचदरम्यान एक सुंदरसा योगायोग जुळून आला. नऊ जूनच्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘मेघा छाए..’ हा मारुती चितमपल्लींचा लेख माझ्या वाचनात आला आणि माझी जिज्ञासा जागृत झाली. अरण्यऋषी चितमपल्लींच्या या लेखात जंगलातील पावसाळ्याचे पूर्वसंकेत देणाऱ्या घडामोडींसंबंधीची संशोधनपूर्वक गोळा केलेली तसेच अनुभवसिद्ध अशी माहिती त्यांनी दिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं, ‘कावळ्याबाबतची निरीक्षणे आश्चर्यकारक असतात. संस्कृत ग्रंथांमध्ये उल्लेख केलेली स्निग्ध झाडे आंबा, करंज तसेच काटेरी झाडे यांचा व कावळ्याचा पूर्वापार संबंध आहे. हवामानातील बदल, पावसाचे संकेत आणि दुष्काळाची नांदी देणारे है नैसर्गिक चक्र आहे. पण त्याचा अभ्यास या नव्या युगात कुणीही करीत नाही. कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे बांधले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षावर घरटे बांधले तर त्या वर्षी पाऊस चांगला पडतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळा आणि कावळीण दोघेही घरटे तयार करण्यासाठी एकत्र झटतात. कावळा घराला लागणाऱ्या काटक्या, कापूस, गवत कावळिणीला आणून देतो, तर कावळीण घराची सुरेख अशी रचना करते. यावेळी त्यांची गडबड मोठी पाहण्यासारखी असते. कारण त्यांना पावसाळ्यापूर्वी पिल्लांसाठी छानसा निवारा तयार करण्याची घाई झालेली असते. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेस केले तर सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर ती अवर्षणाची नांदी होय. यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी पाऊस. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन होते.’
हे त्यांचं स्वानुभवांवर आधारीत निसर्गनिरीक्षण वाचलं आणि मन आनंद, जिज्ञासा व कुतूहलाने भरून गेले. निसर्गाबद्दल मुळातच वाटणारा जिव्हाळा उत्साहाने अधिकच उफाळला. लगोलग मी आमच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन पाहिले तर घरटय़ात चार अंडी होती आणि घरटे पूर्वेला होते.
घरी परतून मी ‘मेघा छाए’ पुन: पुन्हा वाचला आणि तो अंक मुद्दाम जपून ठेवला. लेखात उल्लेखिल्याप्रमाणे खरोखरच घडते का, हे पाहण्यासाठी पुढचे दोन-तीन महिने तरी नियमितपणे निसर्गचक्र निरीक्षण्याचे मी ठरवले. आणि पुढचे तीन महिने लेखात वाचल्याप्रमाणे अक्षरश: घडत गेले. त्याकरता माझा डॉ. चितमपल्ली यांना विनम्र सलाम. जून-जुलैमध्ये मुंबईत प्रचंड पाऊस कोसळला. आंब्याच्या झाडावर कावळ्याने पूर्वेस केलेले घरटे, त्यात कावळिणीने घातलेली चार अंडी आणि त्यानंतर मुंबईत कोसळलेला दमदार पाऊस.. सगळं अजबच. पुढच्या तीन-चार महिन्यांत प्रचंड पाऊस कोसळणार आहे, हे त्या कावळ्यांना कुणी सांगितले? निसर्गाचे संकेत प्राणिमात्रांना कसे कळतात? चितमपल्ली म्हणतात, त्याप्रमाणे निसर्गचक्राचा अभ्यास या युगात कुणीही करत नाहीत, हे दुर्दैवीच म्हणायला हवं.
निसर्गनिरीक्षणाचे हे तीन-चार महिने म्हणजे माझ्यासाठी एक आनंदोत्सवच होता. या काळात मनाला एक वेगळीच शांती लाभली. पावसाळ्यात निसर्गाचे निरीक्षण हा एक आनंदसोहळाच असतो, हे मी नॅशनल पार्कमध्ये अनेकदा अनुभवले आहे. आजूबाजूस सहजी उपलब्ध असलेला निसर्गातला हा आनंद आपल्याला उपभोगता येत नाही, निसर्गाशी संवाद साधता येत नाही, हे आपले दुर्भाग्य. आपण सारेच सध्या जाहिरातबाजी आणि बाजारशरण संस्कृतीचे पाईक झालेलो असल्यामुळे या सहजप्राप्य नैसर्गिक आनंदाला मुकतो आहोत. माझा चार महिन्यांचा ‘पाहिले म्या डोळा..’ हा निसर्गानुभव खूप आनंद देऊन गेला.
निरपेक्षपणे निसर्गावर प्रेम केले, त्याची मनापासून आराधना केली तर अवघा निसर्ग आनंददाता बनून आपल्यासमोर हात जोडून उभा असतो. पशुपक्षी-प्राणी हे निसर्गाच्या गळ्यातील मौलिक अलंकार आहेत. आणि पावसाळ्यात तर निसर्ग स्वत:च्या मस्तकावर शंृगाराचा मुकूटच चढवतो. हे सगलं खरोखरीच अनुभवण्याजोगंच असतं.
सर्व प्राणिमात्र निसर्गात सामावून राहतात. फक्त माणूस तेवढा स्वत:करिताच्या सुखसुविधा आणि विकासासाठी आपल्यापासून निसर्गाला दूर दूर लोटतो आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने माणसाची बुद्धी आणि अंत:करण शुद्ध राहतं. मनाला प्रगाढ शांतता लाभते. सध्याच्या आभासी, निव्वळ प्रदर्शनकारी आणि तणावपूर्ण अशा धकाधकीच्या जीवनात ज्यांना आपले आयुष्य- विशेषत: आपले मानसिक आरोग्य शुद्ध, ताजे, टवटवीत, सुखी व आनंददायी ठेवायचे आहे त्यांच्यासाठी जगाच्या पाठीवर निसर्गासारखे दुसरे विद्यापीठ नाही.
पाहिले म्या डोळा…
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी पावसाचे पूर्वसंकेत देणाऱ्या निसर्गातील घटना-घडामोडींबद्दलचे स्वानुभव तसेच प्राचीन ग्रंथांतील उल्लेख यावर आधारीत ‘मेघा छाए..’
First published on: 06-10-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nature watching