मलाकर नाडकर्णी यांचा ‘नाटय़ाचार्य देवलांची ‘दुर्गा’’ हा लेखन वाचनात आला. या लेखासाठीचा एकमेव संदर्भ श्री. ना. बनहट्टीकृत ‘नाटय़ाचार्य देवल’ हा आहे. ‘दुर्गा’ या नाटकाची सामाजिक-वाङ्मयीन पाश्र्वभूमी त्यात मांडण्यात आली आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्याबाबत माझ्या वाचनात आलेली माहिती यानिमित्ताने मांडणे उचित ठरेल.
‘देवलांना रूपांतरणासाठी मूळ नाटकं कुठून मिळाली, हेही एक गूढच आहे,’ असे नाडकर्णी म्हणतात. श्री. ना. बनहट्टी यांनी त्यांच्या ग्रंथात अशी नोंद केली आहे की, ‘पुण्यातील गोऱ्या लोकांच्या हौशी नाटय़संस्थांमध्ये देवलांना दुर्गा नाटकाचं मूळ गॅरिकचे ‘इझाबेला’ आणि फाल्गुनरावाचे मूळ मर्फीचे ‘ऑल इन् द राँग’ यांच्या प्रती वाचावयास मिळाल्या असतील. कदाचित या दोन्ही नाटकांचा वा एकाचा प्रयोग त्यांनी पाहिलाही असेल.’ कृ. बा. मराठेकृत ‘मराठी रंगभूमीचा पूर्वरंग’ या पुस्तकात याबाबत थोडे वेगळे तपशील आहेत. ते पुढीलप्रमाणे- ‘देवल हे एक प्रयोगशील, प्रयत्नवादी नाटककार आहेत. रंगभूमीवरील आपल्या नाटकाचे प्रयोग पाहून त्यावर वारंवार संस्करण करण्याची त्यांना सवय असावी. महादेवशास्त्री कोल्हटकर यांच्या ‘अजितसिंग’ या रूपांतरित नाटकाची रंगावृत्ती ‘दुर्गा’ या नावाने देशी बनावटीत रंगभूमीवर आली. त्याचे परिष्करण होऊन पुढे ‘झुंजारराव’ झाला. त्याचप्रमाणे ‘All in the wrong’ चे रूपांतर होऊन ‘फाल्गुनराव’ झाले. त्याला इकडील पेहेराव चढवून त्याचा ‘संशयकल्लोळ’ संगीतरूपाने नटला. हे करीत असता मूळच्या विलायती फाल्गुनरावाला देशी भाषा शिकवून, त्याच्या अंगावर इकडील कपडे चढवून व इकडील चालीरीतींची त्यास माहिती करवून देऊन लोकसेवेस सादर करीत असल्याचे सांगताना ते आपला स्वाभिमान मात्र जागृत ठेवतात.’
हा संदर्भ संभ्रमात टाकणारा आहे. १८६७ साली महादेवशास्त्री कोल्हटकरांनी शेक्सपिअरच्या ‘ऑथेल्लो’चा पहिला मराठी अनुवाद सिद्ध केला. त्यावरून देवलांनी ‘झुंजारराव’ बेतले, हेही सर्वमान्य आहे. या पाश्र्वभूमीवर कृ. बा. मराठेंनी ‘दुर्गा’ या नाटय़ावृत्तीला महादेवशास्त्री कोल्हटकरांच्या ‘अजितसिंग’चा आधार आहे, हे सांगणे अनाकलनीय आहे. ‘दुर्गाचे परिष्करण म्हणजे झुंजारराव’ हे त्यांचे मत तर आणखीच बुचकळ्यात टाकणारे आहे.
नाडकर्णीच्या लेखात ‘ऑल इन द राँग’ (ऑर्थर मर्फी) या नाटकाचा उल्लेख आहे. हे आवडलेलं नाटक देवलांनी क्लबातून आणून त्याचंही रूपांतर करून ठेवलं असावं. (‘फाल्गुनराव’) असे श्री. ना. बनहट्टी यांना वाटत असावे. कृ. बा. मराठेंनी फाल्गुनरावाबद्दलही आपले मत नोंदवले आहे. ते म्हणतात, ‘फाल्गुनराव मूळचा विलायती’ असे खुद्द नाटककार देवलच सांगतात. याचा पाठपुरावा त्या नाटकाच्या टीकाकारांनी मुळापर्यंत नेला आणि तो ऑर्थर मर्फी आणि त्याच्याही पूर्वी जाऊन मोलिएरच्या ‘गानारेल’ प्रहसनाशी जोडून दिला. म्हणजे फ्रान्सहून निघालेला ‘गानारेल’ महाराष्ट्रात पोहोचायला तब्बल सव्वादोनशे वर्षांहून अधिक काळ गेला.’ त्यापुढे जाऊन मराठे म्हणतात, ‘फाल्गुनराव ऊर्फ तसबिरीचा घोटाळा’ हे लिहिताना ‘तसबिरीची साक्ष’ हा विनायक कोंडदेव ओक यांचा लघुनिबंध देवलांच्या दृष्टीपुढे होता की काय, याचा विचार करण्यासाठी तो रसिकांपुढे ठेवत आहे.’ मराठे असेही म्हणतात, ‘देवलांच्या या नाटकाचा एक शोधधागा त्यांच्याच पिढीतील एका लघुनिबंधकाराच्या एका निबंधात पाहता येईल असे मला वाटते. माझा तसा दावा नाही; पण एक कल्पना आहे,’ असे म्हणून मराठेंनी तो लघुनिबंध पुस्तकात उद्धृत केला आहे. हा लघुनिबंध विनायक कोंडदेव ओक यांच्या ‘मधुमक्षिका’ निबंधसंग्रहातला आहे. मराठे म्हणतात, ‘या निबंधाची जी कथावस्तू आहे, तीच ‘तसबीर’ नाटकाची नाटय़वस्तू आहे.’
‘विष्णुदास भाव्यांचं नाटक दबा धरून बसलेलं असताना, किलरेस्करांची रंगभूमी संगीतात आकंठ बुडालेली असताना मधे जी गद्य-नाटकांची पोकळी निर्माण झाली होती ती या ‘दुर्गा’ने भरून काढली. मला वाटतं, प्रभावी कौटुंबिक नाटकाचा हा प्रारंभ असावा,’ असे नाडकर्णी लेखाच्या समारोपात म्हणतात. यासंदर्भात डॉ. वा. पु. गिंडे यांच्या ‘शेक्सपिअर आणि मराठी नाटक- तौलनिक साहित्याभ्यास’ (शब्दालय प्रकाशन) काही विशेष माहिती मिळू शकते. १८८० मध्ये पुण्याला काही सुशिक्षित नाटय़व्यासंगी तरुणांनी एकत्र येऊन नाटकाच्या अभिवृद्धीकरिता आयरेद्धारक नाटक मंडळीची स्थापना केली. या मंडळीनी जे उद्देश डोळ्यासमोर ठेवले होते त्यात ‘देशातील नाटय़कला सुधारून लोकांस नवी अभिरुची लावण्याचे ध्येय होते.’ नाटय़कलेच्या उद्धाराकरता बद्धपरिकर होऊन ही मंडळी रंगभूमीच्या क्षेत्रात उतरली होती. देवल, पाटकर हे त्यात प्रमुख होते. एका अभिनयनिपुण अशा इंग्रजी गृहस्थाकडून त्यांनी अभिनयशिक्षण घेतले होते असे सांगतात. या आयरेद्धारक मंडळीनी ‘ऑथेल्लो’ (२५-१-१८८१) ‘तारा’ (१४-५-१८८१) आणि त्यानंतर त्याच महिन्यात ‘किंग लिअर’ असे एकामागून एक नाटकांचे प्रयोग करून दाखवले. पैकी ‘तारा’ हे वि. म. महाजन यांचे शेक्सपिअरच्या ‘Cymbeline’चे मराठी रूपांतर होते. १८७५ साली ‘टेम्पेस्ट’ नाटकाचे मराठी भाषांतर नीलकंठ जनार्दन कीर्तने यांनी प्रसिद्ध केले. प्रामुख्याने विद्यार्थ्यांस त्याचा फायदा होईल, असेही कीर्तन्यांनी म्हटले आहे. डॉ. गिंडे पुढे म्हणतात की, ‘प्रारंभीची विष्णुदास भावेप्रणीत नाटय़कविता म्हणजे नाटके ही कल्पना मागे पडून कथावस्तू, पात्रे, संवाद, अंकरचना या नाटकांच्या अंगांचा समावेश नाटय़कल्पनेत हळूहळू होऊ लागला. १८६१ साली लिहिले गेलेले कीर्तन्यांचे ‘थोरले माधवराव’ हे नाटक यादृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. कीर्तने हे डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी होते. पौराणिक आणि संस्कृत नाटय़परंपरांचा तो काळ होता. संस्कृत नाटय़शास्त्र व त्यातील नियमांचे उलंघन करणे, हे त्यावेळी धाडस होते. या नाटकाच्या शेवटी माधवरावांचा मृत्यू होतो व रमाबाई सती जाते. शिवाय माधवरावांचा मृत्यू प्रत्यक्ष रंगभूमीवर दाखवलेला आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी (शालापत्रक- मे १८६५) आपल्या परीक्षणात दु:खपर्यवासी म्हणून हे नाटक ट्रॅजेडी आहे असा अभिप्राय देऊन अशा प्रकारचे नाटक लिहिण्याचा उपक्रम केल्याबद्दल कीर्तन्यांचा गौरव केला आहे.
थोडक्यात, देवलांच्या दुर्गेच्या आगेमागे विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन स्वतंत्र व रूपांतरित गद्य नाटके मराठी रंगभूमीवर दाखल होत होती. १८५७ साली मुंबई विश्वविद्यालयाची स्थापना झाल्यावर शेक्सपिअरच्या नाटकांचा अभ्यास होऊ लागला. त्याच्या नाटकांचे प्रयोग होऊ लागले. इंग्रजीच्या अभ्यासक्रमात शेक्सपिअरची नाटके समाविष्ट झाली. एलफिन्स्टन व डेक्कन महाविद्यालय या दोन महत्त्वाच्या शिक्षणकेंद्रातून जी नवसुशिक्षितांची पिढी शिकत होती त्यांच्यावर पाश्चिमात्य वाङ्मय व शेक्सपिअरसारख्या नाटय़कारांच्या नाटय़संस्कृतीचा परिणाम होत होता. न. चिं. केळकर यांनी आपल्या एका लेखात आपल्याला बी. ए. ला ‘रिचर्ड द थर्ड’ व एलएल.बी.ला ‘र्मचट ऑफ व्हेनिस’ ही दोन नाटके होती असे लिहिले आहे. नाटय़कलेचे प्रायोगिक अंग लक्षात घेऊन प्रा. केळकरांनी ‘द टेमिंग ऑफ द श्रू’चे ‘त्राटिका’ हे नाटय़रूपांतर सादर केले.
नाडकर्णी यांनी प्रभावी कौटुंबिक नाटकाचा प्रारंभ ‘दुर्गा’ हाच असावा असे लेखात म्हटले आहे. त्यापूर्वी असे प्रयत्न झाले असल्याची नोंद आहे. कृ. बा. मराठे याबाबत म्हणतात, ‘पं. ईश्वरचंद्र विद्यासागर उत्तरेत सामाजिक सुधारणांचे सुकाणू हाती घेऊन समाजनौका हाकारीत होते, तर दक्षिणेत विष्णुशास्त्री पंडित हे विधवा- विवाहाच्या अनुरोधाने सामाजिक दु:खे वेशीवर टांगत होते. रानडे, आगरकर यांनीही हा सुधारणेचा ध्वज खांद्यावर घेतला. त्याचे पडसाद महाराष्ट्रभर पसरले आणि त्यादृष्टीने मराठी नाटके रंगभूमीवर येऊ लागली. अशापैकी त्यावेळी गाजलेले प्रयोग म्हणजे ‘मोर एल्एल्बी’ व ‘स्वैर सकेशा’ हे होत. ‘स्वैर सकेशा’ हे नाटक रघुनाथ शंकरशास्त्री अभ्यंकर यांनी १८७१ साली प्रकाशित केले. पण त्याचे प्रयोग त्यापूर्वीही होत. हे नाटक त्यावेळी सर्व महाराष्ट्रभर चांगले गाजले. या नाटकाचे अनुकरणही पुढे अनेक अंगांनी झाले. या सामाजिक आंदोलनातूनच देवलांची ‘शारदा’ जन्मली, हे नाटय़वाचक जाणतातच.’ नाडकर्णी यांच्यासारख्या समीक्षकांचा ‘देवलांची दुर्गा’ हा अभ्यासपूर्ण लेख माझ्यासारख्या नाटय़रसिकांना बरेच काही देऊन गेला.
जया नातू – natujaya@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा