आपल्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा होत होता. स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासाची उजळणी करणारे देशभक्तीपर कार्यक्रम साजरे केले जात होते. रस्त्यावर मिरवणुका निघत होत्या. राष्ट्रभक्तीपर गाणी वाजत होती. मिरवणुकींत गांधींचा पोषाख चढवलेले आणि हुबेहूब गांधी वाटावेत असे गल्लीतले काहीजण हातात मजबूत लाठय़ा घेऊन फिरताना दिसत होते. शाळकरी मुलांच्याही मिरवणुका निघत होत्या. कमी खर्चात गांधी होता येतं हे लक्षात आल्यामुळे पालक आपल्या मुलांना गांधी करून मिरवणुकीत पाठवीत होते. मोठय़ा काठय़ा घेतलेले छोटे गांधी बघून अनेकांना उचंबळून येत असे. जो-तो आपल्या पद्धतीने इतिहास जागवीत होता. वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावलेलं होतं.
त्याचदरम्यान शासनातर्फे मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास दाखवणारा एक भव्य कार्यक्रम व्हायचा होता. हे महानाटय़ बघायला प्रत्यक्ष राष्ट्रपती येणार होते. या कार्यक्रमाच्या तालमी मैदानावर सुरू होत्या. वामन केंद्रे, पुरुषोत्तम बेर्डेसारखे माझे काही मित्र या कार्यक्रमाशी संबंधित होते. मी एका संध्याकाळी सहज तालीम बघायला गेलो. कार्यक्रमाशी संबंधित शेकडो माणसं तिथं लगबग करीत होती. हत्ती, घोडे, तोफा असा सर्व भव्य प्रकार होता. मी मैदानात शिरत असतानाच पंडित जवाहरलाल नेहरू पटकन् पुढे आले आणि तोंडात धरलेली सिगारेट पेटवायला माझ्याकडे काडीपेटी मागू लागले. या अचानकच्या झटक्याने मी गडबडलो. हे नेहरू म्हणजे आपला बापू कामेरकर आहे हे कळायला थोडा वेळ लागला. पुढे तालमीला बसलो. तालीम थांबल्यावर झाशीची राणी, टिळक, नेहरू, गांधी यांच्यासोबत कटिंग चहावर सैल गप्पा झाल्या. खूप हसलो. आणि यात कुठेतरी नाटक दडलंय असं वाटायला लागलं. पण पुढे हे मी विसरून गेलो.
पुढे त्याचदरम्यान कधीतरी मला उदयपूरहून एक फोन आला. ‘वेस्ट झोन कल्चरल सेंटर, उदयपूर’तर्फे सिल्वासा येथे विविध राज्यांतल्या नाटककारांसाठी एक निवासी शिबीर आयोजित केलेलं होतं. आपल्या प्रांतातल्या स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्या एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाची वीरगाथा मांडणारं आणि स्वातंत्र्याचा रोमहर्षक इतिहास दाखवणारं नाटक असावं आणि शिबिरात आठवडाभरात ते पूर्ण करावं अशी अपेक्षा होती. मराठी नाटककार म्हणून मी सहभागी व्हावं असा त्यांचा आग्रह होता. माझ्या डोक्यात नाटक नव्हतं. नाटकाची पुसट कल्पनाही नव्हती. त्यांना हवं तसं नाटक मी कधी लिहिलंही नव्हतं. पण तिथे जाऊन इतर नाटककारांना भेटता येईल, त्यांचं नाटक समजावून घेता घेईल, त्यांच्या सोबत नवीन काही सुचेलही असा विचार करून मी ‘हो’ म्हटलं.
आम्ही सिल्वासाला जमलो. सर्व उत्साहाने आपापल्या नाटकांवर बोलत होते. मी सोडून सगळ्यांना नाटक स्पष्ट दिसत होतं. फक्त माझाच काय तो प्रॉब्लेम होता. रोज सकाळी आढावा घ्यायला बैठक होत असे. मी ‘सुचतंय.. जवळपास कच्चा आराखडा मनात तयार झालाच आहे..’ वगैरे सांगून वेळ मारून नेत असे. सर्वाना माझ्या नाटकाची चिंता लागून राहिली होती.
मी नाटकच लिहिलं नाही तर माझ्यावर खर्च झालेल्या सरकारी पैशांचा हिशेब तरी कसा द्यायचा, असाही एक अडचणीचा मुद्दा होता. सोबत आलेला सरकारी अधिकारी ‘फक्त पंधरा-वीस पानं भरली तरी पुरे!’ असा मला धीर देत होता. इतरांची नाटकं ब्रिटिशांच्या पाडावापर्यंत येऊन पोहोचलेली; आणि माझं नाटक ‘पडदा उघडतो’च्या पुढे काही सरकत नव्हतं. सोबतचे नाटककार धीर देत होते. जुलमी इंग्रज आणि स्वातंत्र्याला आसुसलेले भारतीय अशा दोन पाटर्य़ा करून कागदावर झुंज लावली तर प्रॉब्लेम सहज सुटेल असं समजावत होते. मी इथं आलो हे चुकलंच असं वाटून मला शरमल्यासारखं होत होतं. ताण वाढला होता. सकाळी काहीतरी नाटकाची गोष्ट, कल्पना ऐकवणं गरजेचं होऊन बसलं होतं.
मी कागदावर रेघोटय़ा मारत बसलो होतो. ट्रकच्या रथातून निघालेले, डोक्यावर मुकूट घातलेले, पौराणिक पोषाखांतले, तळपत्या तलवारी नाचवणारे नेते दिसत होते. त्यांच्यामागून गर्दी निघाली होती. पण या सगळ्याचा नाटकाशी काय संबंध होता?.. मी अस्वस्थ होतो.
स्वातंत्र्यानंतर गेल्या पन्नास वर्षांत आपल्या समाजाचा जो ऱ्हास झाला त्याविषयी अस्वस्थता वाटत होती. स्वातंत्र्य नेमकं कुणाला मिळालं, याचं उत्तर सापडत नव्हतं. भ्रष्टाचार, जाती-जमातींचं गलिच्छ राजकारण, स्वत:च्या फायद्यासाठी केलेलं इतिहासाचं विकृतीकरण, हिंसेला शरण गेलेला समाज आणि भौतिक सुखांमागे ऊर फाटेस्तोवर धावणारे संवेदनाहीन लोक या सगळ्या गोष्टींची विलक्षण चीड येत होती. ही चीड, अस्वस्थता, घालमेल, हताशा मनाला आतून सतत पोखरत होती. पण हे दुखणं नाटकातून दाखवायचं कसं?
सकाळी उठलो. तिथे कुणीतरी स्थानिक चार पानी हिंदी वर्तमानपत्र आणून टाकलं होतं. ते चाळत बसलो. कोपऱ्यातल्या एका छोटय़ा बातमीपाशी थबकलो. राजस्थानातल्या एका गावात घडलेली घटना होती. जीपला लोंबकळत एक गावकरी प्रवास करत होता. त्याचं गाव आल्यावर तो गाठोडं घेऊन उतरला. ड्रायव्हरने भाडय़ाचे पैसे मागितले. त्याच्याकडे पैसे कमी होते. त्यावरून वादावादी झाली. ड्रायव्हरने गाडी मागे घेऊन त्याला गाडीखाली चिरडला. देशभर स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा जल्लोष सुरू असताना दूर एका गावात हे असं घडत होतं. मी अस्वस्थ झालो. गाडीखाली चिरडला गेलेला गावकरी मला स्वस्थ बसू देईना. या बातमीने तत्काळ काही लिहिण्याची गरज निर्माण केली. आता लिहिल्याशिवाय सुटका नाही अशी अवस्था झाली. अचानक विस्मृतीत गेलेल्या अनेक गोष्टी पुन्हा नव्याने लख्ख आठवायला लागल्या. ऑगस्ट क्रांती मैदानावरचा तो किस्सा पुन्हा आठवला. जल्लोषात निघालेल्या शोभायात्रा, रथयात्रा आणि गेल्या पन्नास वर्षांत स्वातंत्र्याचे कसलेच फायदे हाती न पडलेल्या भेदरलेल्या सामान्य लोकांच्या झुंडी डोळ्यासमोर दिसू लागल्या. झाशीची राणी, गांधी, नेहरू, टिळक, सुभाषबाबू आणि ट्रकखाली पुन: पुन्हा चिरडला जाणारा बाबू गेनू माझ्या मदतीला धावले. नाटक अस्पष्टसं दिसायला लागलं.
स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने एका पॉवरफुल भाईने भव्य शोभायात्रा आयोजित केली आहे. निव्वळ भाईच्या शब्दाखातर समाजातल्या काही प्रतिष्ठित व्यक्ती गांधी, नेहरू, टिळक, सुभाषबाबू, झाशीची राणी बनून शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. हे सर्वजण भाईच्या गोदामात शोभायात्रा सुरू व्हायची वाट बघत थांबले आहेत. काही कारणामुळे शोभायात्रा सुरू व्हायला उशीर होतो. सगळेजण कंटाळतात. ऐतिहासिक पोषाखात अडकून पडल्यामुळे त्यांना बाहेरही निघता येत नाही. त्यांच्या गप्पा सुरू होतात. आणि त्यांतून इतिहासाआड दडलेली, प्रतिष्ठितपणाचा बुरखा पांघरलेली, किडलेली माणसं आणि त्यांचं राष्ट्रप्रेमाचं सोंग उघडं पडू लागतं. शांत, सभ्य वाटणारी माणसं हळूहळू हिंसक होत जातात.. असं काहीतरी तुकडय़ा- तुकडय़ांत मला दिसत होतं.
सकाळच्या बैठकीत मी सर्वाना ही कल्पना ऐकवली. कल्पना ऐकवता ऐकवताच माझ्याही नकळत काही सुटय़ा जागा आपोआप भरल्या गेल्या. काही चांगल्या नवीन जागा सुचल्या. शिबिरातल्यांना कल्पना आवडली. सर्वानाच सुटल्यासारखं झालं. मी तिथे हिशेबाला आवश्यक तेवढी पंधरा-वीस पानं लिहिली. मुंबईत परतल्यावर लेखन बाजूला ठेवलं आणि पुन्हा एकदा सगळा इतिहास वाचून काढला. पहिला खर्डा दीड-दोनशे पानांचा भरला होता. हा सर्व मजकूर साठ-सत्तर पानांत बसवता बसवता दमछाक झाली. मला आवडलेल्या अनेक गोष्टी कापाव्या लागल्या.
आमचा अस्वस्थ नाटकवाल्यांचा एक ग्रुप होता. गणेश यादव, किशोर कदम, सयाजी शिंदे, नंदू माधव, विश्वास सोहोनी, विक्रम वाटवे, सचिन खेडेकर असे आम्ही नाटकवाले जवळपास रोज भेटायचो. सर्वाच्यात उत्साह होता.. काहीतरी वेगळं करायला हवं अशी तळमळ होती. ‘शोभायात्रा’ नाटकाचं पहिलं वाचन त्यांच्यासमोर झालं. ‘नाटक वेगळं आहे, मजेशीर आहे आणि अस्वस्थ करतंय,’ असं सगळ्यांचं मत पडलं. त्यांनीच हे नाटक करावं असं मला वाटत होतं. पुढे या नाटकाची अनेक वाचनं झाली. एक वाचन तेंडुलकरांकडे झालं. त्यांना नाटक आवडलं. तेव्हा नाटकाला नाव नव्हतं. फक्त वेस्ट झोन कल्चरल सेंटरच्या सोयीसाठी प्रोजेक्टला ‘उजाडलं.. पण सूर्य कुठे आहे?’ असं नाव दिलं होतं. तेंडुलकरांनी ‘शोभायात्रा’ हे नाव सुचवलं.
गणेश यादवने प्रयोग कुठे होणार, कधी होणार, याची काहीच कल्पना नसतानाही मोठय़ा उत्साहाने तालमी सुरू के ल्या. काही दिवस तालमी झाल्यावर अचानक एक दिवस तालीम थांबवून सगळे सहजच आल्यासारखं करत माझ्या घरी धडकले. मला न दुखावता, सांभाळून घेत नाटकावर बोलू लागले. त्यांना माहीत असलेल्या नाटकांपेक्षा हे नाटक वेगळं असल्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला होता. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो.
‘हे एक सलग गोष्ट सांगणारं नाटक नाही. ते तुटक आहे. पण हा दोष नव्हे. अधल्यामधल्या मोकळ्या जागा प्रेक्षकांनी भरणं, विचार करणं, आणि सर्व बरं आहे असं जरी वाटत असलं, तरी जे चाललंय ते काही बरं नाही, बदलांची गरज आहे, हे त्यांना जाणवणं महत्त्वाचं आहे. सलग गोष्ट सांगून हे साधणार नाही..’ वगैरे बरीच चर्चा झाली. त्यानंतर त्यांचा गोंधळ कमी झाला आणि पुन्हा दणकावून तालमी सुरू झाल्या. नाटक बसत आलं. हे नाटक समांतर रंगभूमीवर न करता व्यावसायिक रंगभूमीवर करावं असा एक विचार पुढे आला आणि निर्मात्याचा शोध सुरू झाला. अनेकांकडे वाचनं झाली. पण व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटक चालणार नाही, म्हणून निर्मात्यांनी पाठ फिरवली. काहींनी चेष्टा केली. एकदा चंद्रकांत राऊत तालीम बघायला आले. ते सतत हसत होते. त्यांना नाटक आवडलं आणि त्यांनी त्यांच्या ‘श्री चित्र-चित्रलेखा’ या संस्थेतर्फे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याची तयारी सुरू केली. नंदू माधव, सयाजी शिंदे, दिनकर गावंडे, विश्वास सोहोनी, पुष्कर श्रोत्री, हृषिकेश जोशी, रवी काळे, विदुला मुणगेकर, श्रीधर पाटील, पल्लवी या नटांनी तीन महिने झपाटून तालमी केल्या होत्या. मला हवं तसं नेपथ्य लावल्यामुळे काही अडचणी निर्माण होत होत्या. प्रदीप मुळ्ये आला. त्याने वेगळंच नेपथ्य केलं. त्यामुळे पात्रांचं हिंस्त्र होत जाणं जास्त ठसठशीत झालं. सिराज खानने प्रकाशयोजनेत अंधुक प्रकाश आणि भगभगीत उजेड वापरून मुखवटय़ाआड दडलेल्या पात्रांना उघडंनागडं करण्याचा प्रयत्न केला. सर्वानीच झपाटल्यासारखं काम केलं आणि एक हसवणारा, ओरबाडणारा, दचकवणारा आणि अस्वस्थ करणारा प्रभावी प्रयोग सादर केला.
या नाटकाचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर सुमारे दोनशे प्रयोग झाले. छोटय़ा शहरांतले सहसा नाटकाकडे न फिरकणारे गरीब प्रेक्षकही ठरवून दूरदुरून टेम्पो करून नाटकाला येत. सिद्धार्थनगरचा शोषित तरुण बाबू, समाजाने कोंडी केलेली बाई आणि आगापिछा नसलेल्या चहावाल्या पोराची गोष्ट त्यांना आपलीच गोष्ट वाटायची. नाटकाच्या शेवटी चहावाला पोरगा बाबू आणि बाईचा हात धरून तिरंगा फडकवत स्टेजवर धावायचा तेव्हा प्रेक्षक उभे राहायचे.. ‘भारतमाता की जय!’ म्हणत प्रेक्षागृह दणाणून सोडायचे. हा अनुभव नवीन होता. पुढे या नाटकाचे अनेक भाषांतून प्रयोग झाले. विजय घाटगेने त्यावर सिनेमाही केला. आमिर खानच्या ‘रंग दे बसंती’ या सिनेमाची गोष्ट आणि संवादही ‘शोभायात्रा’सारखेच होते.
मनोज जोशीने हिंदीत ‘शोभायात्रा’ नाटक केलं. अहमदाबादला झालेल्या प्रयोगाला मोदी आले होते. ते शेवटपर्यंत थांबले. त्यांना प्रयोग आवडल्याचं कळलं. खूप वर्षांनी मोदी पंतप्रधान झाले. क्षणभर शोभायात्रेतला चहावाला पोरगा तिरंगा फडकवतोय असा भास झाला. पण नंतर वाटलं, हे वेगळे! त्यांच्यासोबत बाबू नाही, बाई नाही. बाबू, बाई कुठे गेल्या? वीस वर्षांत त्यांचं काय झालं?
आता पुन्हा नवीन ‘शोभायात्रा’ लिहायची वेळ झाली आहे, हे मात्र खरं!
shafaat21@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा