मीएक नट आहे. आणि नटाची शोकांतिका अशी की, अनेक आवडणाऱ्या, आपल्या अभिनयाला आव्हान देऊ शकतील अशा वाटणाऱ्या भूमिका त्याला मिळतच नाहीत. त्या दुसरा कोणीतरी साकारताना बघण्याची पाळी त्याच्यावर येते. अर्थात बरेच उत्तम, गुणी नट याला अपवाद ठरले आहेत. ते आपल्या आवडीचं नाटक हुडकतात, किंवा कधी कधी असं नाटकच त्यांच्यापर्यंत चालून येतं. पण हा भाग्ययोग व्यावसायिक मराठी नाटकांची हिशोबी गणितं बांधून केल्या जाणाऱ्या प्रयोगांमुळे फार कमी वेळा वाटय़ाला येतो. मी असा सुदैवी, की ही प्रतीक्षा दोन नाटकांनी माझ्या बाबतीत संपवली. आणि ही दोन्ही नाटकं माझा मित्र जयंत पवार याची होती, हा आणखी एक योगायोग. त्यातलं पहिलं नाटक म्हणजे ‘अधांतर’! या नाटकानं जयंतलाच नव्हे, तर हे नाटक करणाऱ्या आम्हा प्रत्येकाला एका उंचीवर नेऊन ठेवलं. त्यातली माझी कामगार नेता अरविंद राणेची भूमिका हे नाटक पाहणारे आजही विसरलेले नाहीत. या भूमिकेच्या आठवणींनी मीही आजदेखील आतून उजळून जातो. अशीच नटाचा कस बघणारी भूमिका मला मिळाली ती ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ या नाटकाच्या रूपानं. हे नाटक माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहेच; पण मराठी नाटकांच्या आधुनिक कालखंडातलाही महत्त्वाचा टप्पा आहे, हे अनेक जाणकारांनी मान्य केलं आहे.
हे नाटक माझ्या वाटय़ाला योगायोगानंच आलं. जयंतची नाटक लिहिण्याची पद्धत खरं तर ते करू बघणाऱ्याचा अंत पाहणारी आहे. तो एकाच नाटकाचे अनेक खर्डे करतो. परत परत लिहितो. त्याचं समाधान होईपर्यंत तो ते दुसऱ्यांना वाचायलाही देत नाही. ‘अधांतर’ नाटक तो सात वर्षे लिहीत होता. त्याचे सात-आठ ड्राफ्ट त्याने केले होते. ‘काय डेंजर वारा सुटलाय’ हे नाटक आम्ही जरी २०१० साली रंगभूमीवर आणलं असलं तरी तो हे नाटक २००२ सालापासूनच लिहीत होता, हे त्यानंच कुठंतरी लिहून ठेवलंय. त्याचे वेगवेगळ्या फॉम्र्समधले सहा ड्राफ्ट त्याने केले होते. आधी हे नाटक आमच्या वाटय़ाला आलंच नव्हतं. माझ्या माहितीप्रमाणे, दिग्दर्शक वामन केंद्रे यांना हे नाटक करायची फार इच्छा होती. पण त्यांच्या अॅकॅडेमीच्या कामातून त्यांना वेळ मिळेना. पुढे काही मोठय़ा नाटय़निर्मात्यांनी ते करण्यात रस दाखवला. सचिन खेडेकर, किशोर कदम अशा नटांपुढे त्याची वाचनं झाली. त्यांनाही हे नाटक करावंसं वाटत होतं; पण ते सिनेमात अडकलेले. प्रत्येकाच्या प्रतीक्षेत काळ पुढे जात होता आणि जयंतची तगमग वाढत जात होती. शिवाय तो काळही असा होता की, ‘डेंजर वारा’सारखं सतरा पात्रांचं, अनेक स्थळांवर घडणारं, अनेक पातळ्यांवर वेगवेगळ्या तुकडय़ांत उलगडणारं आणि व्हिडीओ शूटिंगची गरज असल्यामुळे खर्चीक ठरणारं.. पुन्हा सर्व पातळ्यांवर जगणाऱ्या महानगरीय सामान्य माणसांची शोकांतिका दाखवणारं असं हे नाटक व्यवसायाच्या हिशोबात धाडसच ठरणार होतं. त्यामुळे सुरुवातीला ते करावंसं वाटणाऱ्या निर्मात्यांचा उत्साह पुढे कमी झाला असावा. अर्थात हा माझा अंदाज. पण आता काही नाटक होत नाही, हे लक्षात आल्यामुळे जयंत नव्र्हस झाला होता. त्याचवेळी आमचे कॉमन मित्र उदय कुलकर्णी यांनी, आपण सर्वानी हे नाटक सहकारी तत्त्वावर का करू नये, असा विचार ट्रेनमधल्या एका प्रवासात जयंतच्या कानावर घातला आणि इथेच अंगात वीज सळसळून जावी तसे आम्ही कामाला लागलो.
आमचा हा नाटक उभारणीचा प्रवास थरारक आहे. पण त्याआधी मी हे नाटक काय आहे, हे सांगतो. शिवाजी पार्कमध्ये राहणाऱ्या सत्यविजय दाभाडे नावाच्या एका मध्यमवर्गीय माणसाच्या घरात एका भल्या पहाटे पाच माणसं घुसतात आणि बघता बघता त्याचं घर ताब्यात घेतात. हा दाभाडे एलआयसीत ऑफिसर आहे. एलआयसी एजंट म्हणून त्याची अख्खी कारकीर्द गेली आहे. त्याने आजवर अनेकांच्या पॉलिसीज् काढून त्यांना जीवनसुरक्षेची हमी दिली आहे. पण ज्या मुंबईने एकेकाळी त्याला पोटाशी धरलं, तीच मुंबई आता त्याला बाहेर फेकू बघते तेव्हा त्याला कळतं, की कुणाच्याच सुरक्षेची हमी देता येत नाही. तो म्हणतो, ‘‘नाकाचा विमा काढता येतो; पण श्वासाचा विमा नाही काढता येत. दातांचा विमा काढता येतो; पण ठणक्याचा नाही काढता येत. मरणाचा विमा काढता येतो; पण मणक्यात गोठणाऱ्या थंडीचा नाही काढता येत.’’ कधीकाळी तरुणपणी इंदूरहून आलेला, पुढे मुंबईतच लग्न करून, घर मिळवून बायको-मुलांसह घरगृहस्थी करणारा आणि एक सुखी, सुरक्षित आयुष्य जगणारा दाभाडे अचानक एके दिवशी या शहरात असुरक्षित, एकटा आणि विस्थापित होतो.
पण ही केवळ दाभाडेची गोष्ट नाही. ती त्याच्या कुटुंबातल्या त्याच्या बायकोची आणि त्याच्या दोन तरुण मुलांचीही गोष्ट आहे. ती त्यांच्या घरात घुसणाऱ्या पाच गुंडांची गोष्ट आहे. ती तो राहतो त्या ‘कुसुमकुंज’ या इमारतीतल्या माणसांची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट ज्या निवेदकाच्या तोंडून उलगडते त्या निवेदकाला ठरावीक टप्प्यावर पुन्हा पुन्हा भेटणाऱ्या बबन येलमामेचीही गोष्ट आहे. हा बबन येलमामे मराठवाडय़ातल्या दुष्काळी गावातून जगण्यासाठी मुंबईला आला आहे. तो नाना उचापती करून शहरात आसरा शोधतो. अनेक छोटे धंदे करतो. त्याला वारंवार शहराच्या बाहेर फेकलं जातं. म्युनिसिपालिटीवाले त्याचं झोपडं बुलडोझर लावून नष्ट करतात. पोलीस वारंवार छळतात. पण हा पुन्हा पुन्हा चिवटपणे उभा राहतो. मुंबईत येणारे परप्रांतीयांचे लोंढे ज्या असंख्य अडचणींना तोंड देत चिवटपणे इथंच टिकून राहतात, त्यांचा बबन येलमामे हा प्रतिनिधी आहे. अशी ही शहरातल्या निरनिराळ्या स्थलांतरितांची आणि विस्थापितांची गोष्ट आहे. अनेक पातळ्यांवरची ही गोष्ट रंगमंचावर सादर होत असताना मागच्या बाजूला एक मोठा स्क्रीन आहे. त्यावर आपल्याला ‘बिल्डर-रत्न अॅवॉर्ड नाइट’चं लाइव्ह रेकॉìडग दिसतं. आपण टीव्हीवर अनेक अॅवॉर्ड सोहळे बघतो, तसाच हाही एक. त्यात या सोहळ्यांमध्ये असतात तशी विनोदी स्किट्स आहेत, अॅवॉर्ड मिळवणाऱ्यांची मनोगतं आहेत, निवेदकाचं खुसखुशीत निवेदन आहे. वरकरणी मागे चाललेल्या भागाचा पुढच्या नाटकाशी थेट संबंध नाही. पण पुढे एका इसमाची जागा बळकावली जात असताना मागे बिल्डरांचा सोहळा साजरा होणं, यातून या सगळ्या विस्थापनाच्या घडामोडीमागे अदृश्यपणे कोण आहे, हे कळावं अशी लेखकाने योजना केली आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आणि त्यातल्या गुंतागुंतीमुळे ‘काय डेंजर वारा सुटलाय’चं स्वरूप एखाद्या एपिकसारखं झालं होतं.
त्यामुळेच हे नाटक करणं, हे आम्ही ठरवलं तरी, सोपं मुळीच नव्हतं. आमचे मित्र उदय कुलकर्णी हे अर्थविषयक लेखन करणारे आणि सातत्याने वेगळी नाटकं बघणारे एक रसिक गृहस्थ. त्यांनी असा प्रस्ताव मांडला की, आपण सगळ्यांनी मिळून थोडे थोडे पैसे टाकून निर्मिती खर्च उभा करू या आणि नाटक करू या. सुरुवातीला कुलकर्णी, जयंत आणि मी आम्ही आमच्या परीने पैसे उभे केले. हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर करण्यासाठी जो तारखांचा व्यवहार करावा लागतो, त्यासाठी एखादा निर्माता पाठीशी असणं गरजेचं असतं. ही जबाबदारी ‘महाराष्ट्र रंगभूमी’चे संतोष कोचरेकर यांनी उचलली. त्यांनी न मागता काही रक्कमही स्वत:हून नाटकात गुंतवली आणि नाटकाच्या निर्मितीची धुरा उचलली. तरीही एका मोठय़ा खर्चीक नाटकाच्या निर्मिती खर्चासाठी पैसे कमी पडत होते. कवी संजय कृष्णाजी पाटील यांनी ‘रंगनील’ संस्थेचे निर्माते विलास कोठारी आणि कल्पना कोठारी या दाम्पत्याकडे शब्द टाकला आणि त्यांनी तत्परतेनं आर्थिक मदत दिली. कुलकर्णी यांनी उद्योजक आणि अर्थतज्ज्ञ नितीन पोतदार यांच्याकडे हे नाटक वाचलं होतं. त्यांनी आमच्या को-ऑपरेटिव्ह स्किममध्ये न मागता स्वत:चा वाटा दिला. कुलकर्णी तर झपाटल्यासारखे प्रत्येकाकडे शब्द टाकत होते आणि नाटकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे थोडीफार तरी मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. अशा प्रकारे आम्ही प्रॉडक्शन कॉस्ट उभी करत आणली.
हे नाटक आपण दिग्दर्शित करावं असं मला सुरुवातीपासून वाटत होतं. पण जयंतच्या डोक्यात वेगळं होतं. तो मला म्हणाला, ‘‘तू नाटक दिग्दर्शित करू नकोस. तू यातली दाभाडेची भूमिका कर. या नाटकात इतका गुंतून जाणारा दुसरा नट मला मिळणार नाही. आणि आता मी दुसऱ्या कोणाला शोधणारही नाही. मी या नाटकाच्या अनेक निर्मात्यांपैकी एक असल्यामुळे नट म्हणूनही माझं प्राधान्य हे या नाटकालाच असणार, हा सगळ्यांच्याच दृष्टीनं प्लस पॉइंट होता. आणि तो मलाही पटला. शिवाय दाभाडेची अवघड भूमिका वाटय़ाला येणं हे कोणत्याही नटासाठी स्वप्नवतच होतं. त्यामुळे मी माझ्या दिग्दर्शकीय महत्त्वाकांक्षेला मुरड घातली आणि नट म्हणून हे आव्हान स्वीकारायचं ठरवलं.
अनिरुद्ध खुटवड हा प्रायोगिक रंगभूमीवरचा हुशार दिग्दर्शक या नाटकाने आम्हाला दिला. अनिरुद्धने पुण्याच्या ललित कला केंद्रात जयंतचं ‘अधांतर’ बसवलं होतं आणि त्याचा अतिशय वेगळा प्रयोग आम्ही पाहिला होता. त्यामुळे ‘डेंजर वारा’ची जबाबदारी अनिरुद्धवर सोपवावी असं सर्वानुमते ठरलं. अनिरुद्ध हा काही व्यावसायिक पठडीतला दिग्दर्शक नाही. त्याची काम करायची पद्धत वेगळी होती. त्याने इतर सगळी कामं बाजूला ठेवून दीड महिना फक्त ‘डेंजर वारा’साठी दिला. त्याआधी त्याने स्क्रिप्टवर बरंच काम केलं होतं. नाटकात गाणी होती, कविता होत्या. त्यासाठी गंधार संगोराम या तरुण संगीतकाराने अफलातून संगीत दिलं. त्याच्याबरोबर, तसंच पाश्र्वसंगीतासाठी अनिरुद्धने बरंच काम केलं. नाटकाचं नेपथ्यही अनिरुद्धनेच केलं होतं आणि ते वेगळं होतं.
नाटकात सतरा पात्रं होती. अकरा नटांच्या संचात त्या भूमिका बसवल्या. आम्हाला असे नट हवे होते- जे टीव्ही मालिका, चित्रपट आणि दुसऱ्या नाटकांत बिझी नसतील; तसंच सुरुवातीचा काही काळ तरी दुसरी कामं घेणार नाहीत. त्यांना नाव नसलं तरी चालेल, पण गुणवत्ता हवी. अनिरुद्ध सतत नव्या मुलांबरोबर नाटकं करणारा दिग्दर्शक. त्याने मुंबईच्या अॅकॅडेमी ऑफ थिएटर आर्ट्स आणि पुण्याच्या ललित कला केंद्रातून पूर्णानंद वांढेकर, सिद्धेश शेलार, अक्षय शिंपी, अमृता मापुसकर, नितीन भजन, निशांत, वैखरी पाठक असे युवा कलाकार निवडले. संजय देशपांडे, दीपक कदम, प्रकाश पेटकर, विशाल राऊत, राजहंस शिंदे, उदय दरेकर असे हौशी-व्यावसायिक रंगभूमीवरचे गुणी कलावंत मोक्याच्या भूमिकांत आले. दाभाडेच्या बायकोची भूमिका आभा वेलणकर करत होती. पण सुरुवातीच्या दोन प्रयोगांनंतर तिच्या काही व्यक्तिगत अडचणीमुळे तिला काम करणं अशक्य झालं तेव्हा आम्ही खरं तर गर्भगळीतच झालो होतो. पण मृणाल चेंबूरकर ही गुणी अभिनेत्री एक-दोन तालमींतच तिच्या जागी उभी राहिली. नाटकातल्या व्हिडीओ चित्रीकरणाची जबाबदारी विनय आपटे या जाणत्या दिग्दर्शकानं स्वत:हून स्वीकारली. आम्ही सर्वानी आमच्या मानधनात कपात केली. नाटकाचा प्रयोग खर्च जितका कमी राखणं शक्य आहे तितका कमी राखला. कुलकणींची यावर नजर होतीच. ते निर्मितीच्या आणि प्रत्येक प्रयोगाच्या बारीकसारीक खर्चाचा हिशोब ठेवत होते. आम्ही सारे झपाटल्यासारखे कामाला लागलो. सगळ्या सैन्याने मिळून शर्थीने खिंड लढवावी तसे नाटकाला भिडलो. यात गैरसमज, वाद झालेच नाहीत असं नाही. पण ते आम्ही वेळीच मिटवले. एकमेकांच्या निष्ठेबद्दल कधीच शंका घेतली नाही.
आम्ही प्रयोग सुरू केले. चोखंदळ प्रेक्षकांचा प्रतिसाद आमचा हुरूप वाढवणारा होता. पण आम प्रेक्षकांना खेचण्यासाठी जी चिकाटी लागते त्यासाठी लागणारं अर्थबळ आमच्यापाशी कमी होतं. अशावेळी ठाण्याचे नितेश खोपडे आमच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या पालवी प्रॉडक्शनने आम्हाला ऐन मोक्याच्या वेळी आर्थिक मदतीचा मोठा हात दिला. संतोष कोचरेकरांनी नाटकाची निर्मितीमूल्यं चोख सांभाळताना तारखांची गणितंही व्यवस्थित मांडली. तरीही नाटकाचा एकूण डोलाराच खर्चीक होता. चांगलं नाटक तग धरून उभं राहण्यासाठी मुळात जी आर्थिक ताकद लावावी लागते आणि चिकाटीनं वाट बघावी लागते, त्यात आमची दमछाक झाली. आम्ही कोणीही रूढार्थानं निर्मिती क्षेत्रातले नसल्यामुळे नाटकाचं व्यवस्थापन बघणं आणि आपापली कामं करणं अशा दुहेरी गोष्टी आम्हाला कराव्या लागत होत्या. त्यात आनंद होता; पण आमचा अनुभव कमी पडत होता. नाटकाला मिफ्ता, झी गौरव, मटा सन्मानची लेखन-अभिनयाची पारितोषिकं मिळाली. महाराष्ट्र फाऊंडेशनचा नाटय़लेखनाचा पुरस्कार नाटकाला मिळाला. हे नाटक बघून बृहन्मुंबई निवारा अभियान समितीने ‘बिल्डर माफियांचा डेंजर वारा आणि सर्वसामान्यांची घर-हक्काची लढाई’ या विषयावर जाहीर परिसंवाद घेतला आणि त्यात मुंबईत घराच्या प्रश्नावर लढणाऱ्या अनेक संघटना सहभागी झाल्या. नाटकाचं महत्त्व लोकांच्या लक्षात येत होतं, पण आमची आर्थिक रसद संपत आली होती. अखेर ४५ प्रयोगांनंतर आम्ही थांबलो. मुंबईच्या बाहेर अनेकांना या नाटकाविषयी कुतूहल होतं, पण आम्हाला नाटक त्यांच्यापर्यंत पोहचवता आलं नाही.
हा सर्व प्रवास आमच्यासाठी थकवणारा असला तरी आनंदाचा होता. कारण नाटक बघून जाणाऱ्यांना त्यातली भव्यता आणि सर्वसामान्य निरुपद्रवी माणसाची आजच्या जगण्यात होणारी शोकांतिका हादरवून टाकत होती. एक अस्वस्थ करणारा अनुभव घेऊन प्रेक्षक नाटय़गृहाबाहेर जात होते. ही समस्या केवळ मुंबईची नव्हती. जमीन बळकावण्याचे प्रकार आजही सर्रास चालले आहेत. म्हाडाच्या इमारतींत हजारो बोगस माणसं राहतात, अशा बातम्या आपण आजही वाचतो. गावच्या जमिनींचे सातबारा हातोहात बदलले जातात. री-डेव्हलपमेंटच्या नावाखाली लाखो माणसं बेघर होतात. तुमच्या पायाखालची जमीन तुमचीच असेल यावर कोणाचाही भरवसा राहिलेला नाही. घुसखोरी हे या काळाचं लक्षण झालं आहे. नाटकातला दाभाडे म्हणतो, ‘‘घुसखोरीचाच इतिहास आहे माणसाचा. पांडवांनी खांडववन जाळलं ही आदिम एन्क्रोचमेंट. इंद्रप्रस्थ नगरी नावाच्या मोठय़ा टाऊनशिपसाठी झालेलं सामूहिक हत्याकांड.. धर्मग्रंथात याची गौरवपूर्ण नोंद आहे.’’
आज जरी आम्ही थांबलो असलो तरी हे नाटक मनातून काही केल्या जात नाही. ज्यांनी ‘डेंजर वारा’ पाहिला त्यांच्या मनातून ते गेलेलं नाही. ही आजच्या काळाची वेदना आहे. स्थलांतर आणि विस्थापनाच्या आगीची धग गावखेडय़ापासून ते जगातल्या मोठय़ा शहरांपर्यंत माणसांना होरपळून काढते आहे. ही तीव्रता पकडणारं हे नाटक पुन्हा कुणीतरी करावं, एखाद्या सक्षम निर्मात्याने ते पेलवावं, नव्याने करावं असं मला अजूनही वाटतं.
anil_gawas007@yahoo.com (समाप्त)