विश्वास पाटलांची ‘पानिपत’ कादंबरी एक वाचक म्हणून आधी मी वाचलेली होती. आणि मला ती खूप आवडलीही होती. परंतु तेव्हा त्यावर नाटक करावं म्हणून या हेतूनं मी ती वाचली नव्हती. त्यानंतर कधीतरी ‘चंद्रलेखा’ संस्थेचे निर्माते मोहन वाघ यांनी कुठेतरी म्हटल्याचं माझ्या कानावार आलं की, विश्वास पाटलांच्या ‘पानिपत’ कादंबरीवर त्यांना नाटक करायचंय. आणि ‘वामन केंद्रेच ते डायरेक्ट करू शकतील,’ असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु प्रत्यक्ष माझ्याकडे मात्र त्यांनी हा विषय तोवर काढलेला नव्हता.
त्यानंतर सुमारे वर्षभराने त्यांनी या नाटकासंदर्भात पहिल्यांदा मला विचारणा केली. मग मी नाटक करण्याच्या दृष्टिकोनातून ही कादंबरी पुन्हा एकदा संपूर्ण वाचून काढली. त्यावेळी मला प्रकर्षांनं एक जाणवलं, की ही एका मोठय़ा युद्धमोहिमेची.. त्यावेळच्या संघर्षांची कहाणी आहे. ती केवळ माणसांचीच गोष्ट नाही. मी तसं मोहन वाघांना बोलून दाखवलं. म्हटलं, ‘मला या कादंबरीत एक भव्यदिव्य असं मैदानी नाटक दिसतंय. एका मोठय़ा गोलाकारात मध्यभागी प्रेक्षक बसलेत आणि या गोलाच्या बाहेर एक वर्तुळाकार रस्ता आहे. त्या रस्त्याच्या परिघावर नाटकातली निरनिराळी लोकेशन्स असतील. आणि शेवटाला जे पानिपतचं घमासान युद्ध होईल, ते ही सगळी लोकेशन्स आणि रस्ता यांच्या मधे होईल. या सगळ्यातून एक असं इल्युजन तयार होईल, की गोलाच्या मध्यभागी बसलेल्या ऑडियन्सला वाटेल की, आपणच प्रत्यक्षात या युद्धात सापडलो आहोत. पानिपतावरील त्या भीषण युद्धात जसे बाजारबुणगे, योद्धे आणि स्त्रिया.. सारेच सापडले होते, तसे.’
मोहन वाघांनी मला नाटकाचं अंदाजे बजेट काय होईल असं विचारलं. मी म्हटलं, ‘चार-पाच कोटीचं नक्कीच होईल!’ या नाटकात खरे हत्ती-घोडे, उंट, शेकडो माणसं असतील. असंख्य लोकोशन्स असतील. त्याकाळचा पानिपतावरचा माहोल हुबेहुब उभा करायचा तर हे नाटक ब्रेबॉर्न स्टेडियम किंवा शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानावरच सादर व्हायला हवं असं मला वाटत होतं. डोक्यावर खुलं, मोकळं आकाश आणि नाटकाचा विस्तीर्ण, महाकाय पट माझ्या डोळ्यांसमोर होता. यादरम्यान लेखक विश्वास पाटील, मी आणि मोहन वाघ यांच्यात या प्रोजेक्टसंबंधात बरीच चर्चा झाली. परंतु त्यानंतर पुढे काही घडलं नाही. तो विचार तिथंच थांबला.
त्यानंतर चार-पाच वर्षांनी मोहन वाघ अमेरिकेत गेलेले असताना त्यांनी तिथं ‘ला मिझरेबल’ हे नाटक पाहिलं आणि त्यांनी मला फोन केला. पुनश्च एकदा ‘पानिपत’वर नाटक करण्याचा विचार त्यांच्या मनात फणा वर काढून आला होता. त्यानंतर ते, मी आणि विश्वास पाटील- आम्हा तिघांची या नाटकावर आठ-दहा तरी ब्रेन स्टॉर्मिग सेशन्स झाली. या नाटकाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये मी (दिग्दर्शक या नात्यानं) आणि लेखक विश्वास पाटील पहिल्या दिवसापासून ते थेट रंगमंचावर ‘रणांगण’चा प्रत्यक्ष प्रयोग उभा राहीपर्यंत एकत्र अविश्रांत काबाडकष्ट केले. नाटकाच्या दृष्टीने कादंबरीतील प्रसंगांची निवड करण्याचंच काम आठ-नऊ महिने चाललं होतं. एवढा महाकाय पट असलेल्या कादंबरीतून अडीच-तीन तासाच्या नाटकाचं कोरीवकाम करणं ही अत्यंत अवघड अशीच गोष्ट होती. एकतर ‘पानिपत’ कादंबरी आधीच लोकप्रिय झालेली होती. त्यामुळे तिच्यावर आधारित नाटक कच्चं झालं असतं तर लोकांनी आम्हाला फाडून खाल्लं असतं. ‘पानिपत’च्या युद्धातील अपयशाचं प्रयोगाच्या यशात रूपांतर करणं हे अक्षरश: शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं. तब्बल सव्वादोन वर्षे नुसतं नाटकाच्या संहितेवरच काम चाललेलं होतं. विश्वास पाटील यांना कादंबऱ्या लिहिण्याची सवय असल्याने त्यांनी ‘रणांगण’चे सतत बदललेले नवनवे ड्राफ्ट्स तयार करण्याची ढोरमेहनत कसलीही अळमटळम् न करता उत्साहानं केली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नाटक लिहिलं जात होतं आणि त्यानुरूप दिग्दर्शक म्हणून मलाही त्याच्या प्रयोगरूपात नित्य बदल करावे लागत होते.
अखेरीस एकदाची नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली. तालमीला तीन-चार महिन्यांचा अवधी लागणार होता. त्यामुले त्यासाठी लागणारा वेळ देऊ शकणाऱ्या नटांची निवड करणं, हेही एक मोठं आव्हान होतं. म्हणून मग प्रस्थापित नटांना यात घ्यायचं नाही असं आम्ही आधीच ठरवून टाकलं. तब्बल अडीचशे-पावणेतीनशे नटांची ऑडिशन्स घेतली गेली. त्यातून संहितेच्या मागणीनुसार प्रत्येक नटाची चोख निवड करण्यात आली. यातले कैकजण तर आयुष्यात पहिल्यांदाच नाटकात काम करणार होते. हे नाटक नेहमीच्या इतर नाटकांसारखं नसल्यानं नटांना स्पीच, व्हॉइस प्रोजेक्शन, अभिनयशैली या सगळ्याचाच वेगळा विचार करावा लागणार होता. दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडून हे सारं करवून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ही सगळी प्रोसेस माझ्याकरताही एक चॅलेन्जच होती. नटांना युद्धातील तलवारबाजीचं खास ट्रेनिंग देण्यासाठी मणिपूरहून मार्शल आर्टचे ट्रेनर बिर्जित नगुम्बा यांना मी मुद्दाम पाचारण केलं. त्यांनी सगळ्या नटांना कसून तालीम दिली. प्रभादेवीच्या भूपेश गुप्ता भवनमध्ये तब्बल चार महिने दिवसभर ‘रणांगण’च्या तालमी होत होत्या.
आपल्याकडील ऐतिहासिक नाटकांचा पूर्वापार चालत आलेला टिपिकल बाज ‘रणांगण’नं प्रथमच मोडला. ऐतिहासिक नाटकातील शैलीदार अभिनय आणि तशीच संवादफेक, भरजरी पेहेराव, भव्य महाल, ठरीव साचेबद्ध भाषा हे सगळं मला हेतुत: टाळायचं होतं. ‘रणांगण’मधली माणसं ही सर्वसामान्य माणसांसारखीच हाडामांसाची माणसं वाटावीत असा माझा प्रयत्न होता. या माणसांच्या व्यथा-वेदना, त्यांची शोकांतिका, त्यांची भावनिक आंदोलनं या प्रयोगात आविष्कारित होणं मला अधिक महत्त्वाचं वाटत होतं. ती आजची तर वाटावीत; परंतु अगदी वास्तववादीही वाटू नयेत, हेही त्याचबरोबर पाहायचं होतं. त्यामुळे ‘रणांगण’मध्ये समकालीन वैचारिक पेरणी अतिशय तरलपणानं मला करता आली. ‘रणांगण’ हे ऐतिहासिक असूनही पाहणाऱ्याला ते आजचंच.. आजच्या काळाचं नाटक वाटत असे, ते यामुळेच.
मराठी माणसाच्या स्वभावाची सखोल चिरफाड, त्यांच्या मनाचा मोठेपणा, त्यांचं थिटेपण, त्यांचं काही बाबतींतलं खुजेपण, मराठी राजकारण्यांची चिंतनशील वृत्ती, त्यांची आव्हानाला भिडण्याची प्रवृत्ती, त्याचवेळी आपल्याच माणसांना हीन लेखण्याची कोती वृत्ती या सगळ्यावर या नाटकानं प्रकाश टाकला. मराठी माणसाच्या चांगल्या बाजू जशा या नाटकानं लोकांसमोर आल्या, तशाच त्याच्या कमकुवत बाजूही ‘रणांगण’मध्ये प्रकर्षांनं चित्रित झालेल्या दिसतात. ‘रणांगण’चं आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे परदेशी माणसाच्या नजरेतून मराठी माणसाचं केलं गेलेलं तटस्थ विश्लेषण! या विश्लेषणाशी मराठी प्रेक्षकही सहमत झाले, हे विशेष.
या प्रचंड, भव्य कॅनव्हास असलेल्या नाटकाच्या पाठीशी निर्माते मोहन वाघ सर्वार्थानं उभे राहिले, हे मला उन्मेखून इथं नमूद करावंसं वाटतं. त्यांच्या बरोबरीने प्रभाकर पणशीकर, लेखक विश्वास पाटील, संगीतकार संगीतकार अनंत अमेंबल, जागतिक कीर्तीच्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथय्याजी, कोरिओग्राफर अर्चना जोगळेकर, नाटकासाठी गाणी लिहिणारे कविवर्य मंगेश पाडगावकर अशा सगळ्यांचंच या नाटकातलं योगदान आपापल्या परीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. दिग्दर्शकाच्या मनात नाटकाचं जे स्वरूपनिर्णयन होतं, त्याचं प्रत्यक्ष प्रयोगात रूपांतर होण्यासाठी संबंधित सर्व घटकांचं एकजीव रसायन नाटकात तयार व्हावं लागतं; तेव्हा कुठं असं एखादं महानाटय़ आकाराला येऊ शकतं. ‘रणांगण’च्या बाबतीत या साऱ्या गोष्टी छान जुळून आल्या होत्या. मराठी रंगभूमीने आजवर जे पाहिलं नव्हतं, ते आशय, विषय, फॉर्म आणि आगळंवेगळं अर्थनिर्णयन घेऊन हे नाटक उभं राहिलं होतं. आणि हीच ‘रणांगण’ची स्ट्रेन्ग्थ होती.
मोकळ्या, उघडय़ा आकाशाखाली घडणारं हे आगळं नाटक! मोहन वाघांनी ‘रणांगण’चा मुहूर्तही पानिपतचं युद्ध प्रत्यक्ष ज्या ठिकाणी झालं तिथं.. त्या स्थळी जाऊनच केला. तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विश्वास पाटील, मी आणि मोहन वाघ- आम्ही त्यासाठी पानिपतला गेलो होतो. त्या विस्तीर्ण, सपाट मैदानी प्रदेशात उभ्या असलेल्या वांग्यांच्या शेतात शिरून विश्वास पाटलांनी तिथली दोन कोवळी वांगी तोडून आणली. आजच्या पानिपतची खासीयत म्हणून! त्यावर मी त्यांना म्हटलं, ‘तीन मोठी युद्धं ज्या भूमीत झाली आहेत, हजारो योद्धय़ांच्या रक्ताचं शिंपण जिथं झालेलं आहे, अशा सुपीक जमिनीत चांगलं कसदार वांग्यांचं पीक न येतं तरच नवल!’
‘रणांगण’साठी मोहन वाघांनी मला नेपथ्याच्या व्हिज्युअलायझेशनसंदर्भात विचारलं, तेव्हा नापीक, वैराण असं विस्तीर्ण माळरान आणि खुलं, मोकळं आकाश हेच नेपथ्य मला या नाटकासाठी दिसत होतं. एक तटस्थ अवकाश मला अभिप्रेत होता. प्रत्येक सीनला वेगवेगळ्या रंगांचं आकाश नेपथ्यातून प्रतीत व्हावं अशी अपेक्षा होती. खुल्या आकाशाच्या मंडपाखाली असं ऐतिहासिक नाटक आजवर मराठीत तरी सादर झालेलं नव्हतं. भानू अथय्यांच्या सूक्ष्म ऐतिहासिक तपशिलांचा खोलात जाऊन विचार करणाऱ्या, संशोधनाधारित कॉस्च्युमनं या नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. अनंत अमेंबल यांच्या म्युझिक बॅकड्रॉपला तर तोडच नाही. विलक्षण अस्वस्थ, बेचैन करणारं असं ‘रणांगण’चं म्युझिक होतं.
‘रणांगण’च्या बाबतीत असा सगळा मेळ मस्त जुळून आला. सुदैवाने प्रेक्षकांनीही त्याला उत्तम साथ दिली. मोहन वाघांनी उद्घाटनाच्या प्रयोगाच्या जाहिरातीतच ‘रणांगण’च्या शंभराव्या प्रयोगाचीही घोषणा केली होती! एवढं जबरदस्त प्लॅनिंग आणि मार्केटिंग.. तेही मराठी नाटकाच्या बाबतीत- अशक्यकोटीतली वाटावी अशीच ही गोष्ट होती!
‘रणांगण’मधले सारेच नट हे ताज्या दमाचे असल्याने प्रत्येक प्रयोग सळसळत्या ऊर्जेनं भारलेला असे. ‘इतकं कोरीव नाटक मी आजवर पाहिलेलं नाही,’ अशी ग्वाही दस्तुरखुद्द लेखक विश्वास पाटील यांनीही दिली.
त्या वर्षी नवी दिल्लीतल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) प्रतिष्ठेच्या भारत रंगमहोत्सवात ‘रणांगण’ची निवड झाली. त्याचा ७५ वा प्रयोग अमेरिकेतील सॅन होजे येथे झाला. पावणेतीन तासांचं हे नाटक तिथल्या रसिकांनीही चांगलंच डोक्यावर घेतलं. अविनाश नारकर, अशोक समर्थ, प्रसाद ओक, शीतल क्षीरसागर, सचित पाटील, सौरभ पारखे, आसावरी परांजपे, श्रीकांत देसाई, राजन जोशी यांच्यासह केवळ १८ नटांमध्ये हे भव्य महानाटक सादर केलं गेलं होतं, यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. कृष्णा बोरकर यांच्या रंगभूषेची ती कमाल होती. यातला प्रत्येक नट नाटकात अनेक भूमिका साकारत असूनही प्रत्येक पात्राचं वेगळेपण ठसलं ते बोरकरकाकांच्या मेकपच्या अचाट कामगिरीमुळेच! ‘सर्वागाने बांधलेला उत्तम प्रयोग’ असंच ‘रणांगण’चं वर्णन करावं लागेल.
‘रणांगण’ची उभारणी करताना अनेक अडचणींचाही वेळोवेळी आम्हाला सामना करावा लागला. मूळ महाकादंबरीचं हे नाटय़रूप साकारताना सलग असे प्रसंग बसवले जात नव्हते. नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाआधी अडीच महिनेपर्यंत चक्क नाटकाचा फॉर्म सापडावा म्हणून आमची धडपड सुरू होती. पण काही केल्या तो हाती लागत नव्हता. शेवटी नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला महिना उरला असताना एकदाचा नाटकाचा फॉर्म अकस्मात सापडला. पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या गारद्यांच्या आत्म्यांना दरवर्षी संक्रांतीच्या रात्रीपुरती मुक्ती मिळते आणि ते आपापल्या गावाला जाऊन येतात, अशी कल्पना पुढे आली.. आणि इथून तोवर चकवा देणारा नाटकाचा फॉर्म अखेरीस आम्हाला सापडला. गारद्यांनी मराठय़ांना आपल्या दृष्टिकोनातून सांगितलेली पानिपतावरील युद्धाची गोष्ट असे तिचे स्वरूप ठरले. अशा तऱ्हेने नाटकाच्या फॉर्मचा सतावत राहिलेला प्रश्न एकदाचा निकाली निघाला. नाटकात वापरावयाच्या संगीताकरिता दौलताबाद, हाजी मलंग आदी ठिकाणच्या सुफी फकिरांच्या गाण्याची शैली मुद्दाम अभ्यासली. त्यातून गारद्यांच्या समूहाच्या कोरसमधून ‘रणांगण’ची कथा उलगडायची, हे निश्चित झालं. तंबोरे, ताशा या वाद्यांचा वापर करायचं ठरलं. त्यांतून नाटकाचा नाद कसा ऐकू येईल, हे जाणवलं. कोरिओग्राफीनं त्याला एक ऱ्हिदम.. लय आली. निवेदन, गाणी, घटना यांच्या एकमेळातून ‘रणांगण’ हळूहळू उलगडत गेलं.
या सगळ्या प्रोसेसची सुरुवात खरं सांगायचं तर निर्माते मोहन वाघ यांच्या पुढाकाराने झाली होती. ‘वाघ सिंहासारखे आमच्या मागे लागले,’ असं गंमतीनं मी कधी कधी ‘रणांगण’च्या बाबतीत म्हणतो. त्यातही प्रभाकर पणशीकरांच्या साथीने त्यांनी आमचा जो सतत पाठपुरावा केला, त्यातूनच मराठी प्रेक्षकांना एका आशयसंपन्न नाटकाची देणगी मिळाली असं मला वाटतं. दुर्दैवानं आज हे दोघंही हयात नाहीत. मला नाही वाटत, की आज अशा प्रकारच्या भव्यदिव्य स्वप्नांचा पाठपुरावा करणारा कुणी निर्माता आपल्याकडे असेल. इतिहास घडवणारी अशी नाटकं निर्माण होण्यासाठी तितकाच खंबीर आणि नाटकाची जबरदस्त पॅशन असलेला निर्माताच असावा लागतो. मराठी रंगभूमीवरचे असे अनेक तालेवार निर्माते आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. असे निर्माते पुन्हा एकदा निर्माण होण्याची गरज आहे. जे केवळ मराठी रंगभूमीलाच नव्हे, तर समस्त भारतीय रंगभूमीसाठी महत्त्वाचं योगदान करू शकतील.. तिला नवे आयाम प्रदान करू शकतील. त्या घडीची मी आतुरतेनं वाट पाहतोय..
-wamankendre@gmail.com