नेहा आणि विनय माझ्याकडे त्यांची एक समस्या घेऊन आले होते. नेहा तिच्या हावभावांवरून अतिशय त्रस्त, संतप्त दिसत होती, तर विजय अगदी गप्प गप्प वाटत होता. मी त्यांना विचारलं, ‘हं बोला, काय प्रॉब्लेम आहे?’ त्यावर दोघंही एकमेकांकडे बघायला लागले. मग विजयने सुरुवात केली- ‘डॉक्टर, ही माझी पत्नी नेहा. माझं नाव विजय. आमच्या लग्नाला दोन वष्रे होत आली, पण सतत तिचे रागाचे स्फोट होत असतात. एकदा रागावली की मग ती कोणाला आवरत नाही. इतकी आरडाओरडा करते! घरातल्या सगळ्यांचा अपमान करते. मग दोन-तीन दिवस तिचा अबोला, असहकार आंदोलन सुरूच असतं. काही वेळा तर ती रात्र रात्र झोपत नाही. अस्वस्थपणे फेऱ्या मारत राहते. नीट जेवतही नाही. त्यानंतर काही काळानं ती व्यवस्थित व्हायची. पण हल्ली मधल्या (रागाच्या स्फोटाच्या दरम्यानच्या) काळातदेखील  ती उदास असते. छोटय़ा छोटय़ा गोष्टींत तिची चिडचीड सुरूच असते. जास्त बोलत नाही. घरातल्या कामांमध्येही लक्ष घालत नाही. सगळं काम आईलाच करावं लागतं. त्यामुळे मला त्या बाजूनेही बोलणी ऐकावी लागतात. त्यामुळे आता माझाही संयम सुटू लागलाय. मलाही अस्वस्थ वाटतं. बँकेतल्या कामात लक्ष लागत नाही. कशाचीच इच्छा होत नाही. आज चार महिने झाले- आमच्यात शारीरिक संबंधदेखील झालेला नाही. डॉक्टर मी अगदी गोंधळून गेलो आहे. तुम्हीच आता काही मार्ग दाखवावा असं मला वाटतं.’
‘विजय, हे बघ- मी आधी तुमची समस्या जाणून घेतो पूर्णपणे. मग आपण नक्कीच मार्ग काढू या. आधी मी नेहाशी एकटीशीच बोलतो. तिचं म्हणणं समजून घेतो.’ ‘ठीक आहे,’ म्हणत विजयने नेहाच्या पाठीवर थोपटलं व तो बाहेर गेला. मी नेहाकडे वळून विचारलं, ‘हं, बोल नेहा, विजयने त्याच्या परीने समस्या मांडली माझ्यासमोर. त्याबाबत तुला काय सांगायचे आहे?’ त्याबरोबर नेहाचा गोरा चेहरा एकदम लालबुंद झाला. डोळ्यांत अश्रू जमा झाले आणि एकदम ती स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. मी तिला रडू दिलं. मग शांत झाल्यावर ती म्हणाली, ‘डॉक्टर, सॉरी, मला एकदम रडायलाच आलं. पण काय करू? विजयने बरोबर सांगितलं सगळं. मी खूपच उदास झाले आहे. कशातच उल्हास वाटत नाही. पण त्याचं कारण त्याने नाही सांगितलं.’
‘मग तू सांग सविस्तरपणे.. काय कारण आहे? कशी सुरुवात झाली? वगरे.’
‘डॉक्टर, आम्ही घरात चार माणसं. सासूबाई, सासरे, मी आणि विजय. मी आणि विजय दोघंही एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करतो. दोघेही मॅनेजर लेव्हलच्या पोस्टवर आहोत. घरातही मी संध्याकाळी सगळं, सकाळी थोडं काम करायची. पण माझ्या कामात सतत कोणी चुकाच काढत राहिलं तर राग नाही येणार? भाजीत मीठ कमी या गोष्टीवरून किती वेळ आणि नंतरही किती काळ बोलायचं, यालादेखील काही सीमा असावी. पण सासूबाई अगदी सगळ्या सीमा ओलांडतात. अगदी मी टिकली कोणती लावायची, ओढणी कशी घ्यायची, हे पण त्याच ठरवणार! नाही ऐकलं तर बोलत राहणार. सासरे माझे चांगले आहेत. पण त्यांचंही त्या काही ऐकत नाहीत. विजय मूग गिळून गप्प बसतो. काहीच भूमिका घेत नाही. मला त्याचाच राग येतो. असे अनेक प्रसंग सहन केल्यावर मग कधीतरी स्फोट होणारच ना? माझं चुकत असेल तर त्याने मला जरूर सांगावं. पण त्याच्या आईचं चुकत असेल तर त्यांना पण त्याने समजवायला नको का? त्याला विचारा- त्याचे आई-वडील दोन महिने यूएसला त्याच्या बहिणेकडे गेले होते तेव्हा कसं होतं सगळं. आमच्या वैवाहिक आयुष्यातला तो परमोच्च सुखाचा काळ होता असंच मी म्हणेन. पण त्या दोन महिन्यांची कसर सासूबाईंनी आल्यावर दुप्पटीने भरून काढली. पण त्या दोन महिन्यांत खरंच मी कशी होते, आमचं दोघांचं कसं चाललं होतं, हे विजयला तुम्ही विचाराल तर तोही हेच सांगेल.’
मी मग दोघांना सांगितलं की, नेहाला या सगळ्या समस्येतून नराश्य आलं आहे आणि विजय चिंता- नराश्याच्या सीमारेषेवर आहे. त्यामुळे दोघांनाही औषधोपचार सुरू केले तर थोडं बरं वाटेल. मगच आपल्याला पुढे जाणं सोपं जाईल. त्याप्रमाणे दोघांना आठवडाभराने येण्यास सांगितलं.
आठवडय़ाने आल्यावर दोघेही थोडे रिलॅक्सड् वाटत होते. मग दोघांना समोर बसवून म्हटलं की, ‘हे बघा- कुठच्याही समस्येचा परिणाम हा थेट होत नसतो. तर त्या समस्येकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपल्याला त्या परिणामांकडे नेत असतो. विजय, तुला चिंता-नराश्याचे सौम्य परिणाम जे जाणवत होते ते तुला वाटत होतं की, नेहाच्या वागण्यामुळे; किंवा नेहा व तुझी आई यांच्यातील भांडणामुळे. पण मग नेहाच्या वागण्यामुळेच केवळ- किंवा दोघींच्या भांडणाचा हा थेट परिणाम नाही. दोघींच्या वादाकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन त्याला कारणीभूत आहे. आणि नेहा, तेच तुझ्याही बाबतीत म्हणता येईल. सांगा बरं, काय आहेत तुमचे ‘कारणीभूत’ दृष्टिकोन?’
दोघांनी खूप विचार केला, पण त्यांना काही सांगता येईना. मग मी सांगितलं, ‘हे बघ विजय, माझ्या कृतीने कोणीही दुखावता कामा नये, सर्वाना ती आवडलीच पाहिजे, हा तुझा अविवेकी विचार किंवा दृष्टिकोन आहे. तुला आईला दुखवायचं नाही आणि बायकोलाही. मग तू तटस्थ भूमिका घेतोस. पण एक लक्षात घे- त्या दोघी तुझ्यामुळे एकमेकांच्या नातेसंबंधात आल्या आहेत. तू दुवा आहेस. तूच तटस्थ भूमिका घेतलीस तर कसे चालेल? जिथे तुला चूक वाटत असेल, ती त्या- त्या वेळी दाखवून देणं, व्यक्त करणं, हे तुला जमणं आवश्यक आहे. त्यात एखादी व्यक्ती दुखावली जाणारच. पण आपला नवरा किंवा मुलगा काही भूमिका मांडतो आहे, हे बघितल्यावर हळूहळू दोघी आश्वस्तही होतील व वादही टाळतील. फक्त भूमिका कशी मांडायची, हे तुला शिकायचं आहे.’
‘नेहा, तुझ्या बाबतीत असं म्हणता येईल की, समोरच्याचे जे आवडत नाही, ते व्यक्त करणं तू टाळत राहतेस; पण विसरत मात्र नाहीस. मग एकदम स्फोट करतेस. त्यापेक्षा त्या- त्या वेळेला एकतर व्यक्त केलंस स्वतला, किंवा खरंच- दुर्लक्ष केलंस तर स्फोट होण्याचा दुष्परिणाम टळेल. तुझा अट्टहास आहे की, सासूबाईंनी बदलावं. तर आपल्या हातात काय आहे, याचा तू विचार कर. म्हणजेच आपल्याला बदलणं आपल्या हातात असतं, हा ‘विवेक’ तू बाळगावास व स्वत: काही संवादशैली शिकून घ्याव्यास.’
थोडक्यात- दोघांनीही विवेकी दृष्टिकोनाने संवादशैली वापरल्या तर तुमचं सहजीवन बहरेल. पण तरीही सगळे स्वभाव बदलत नाहीत. त्यामुळे परिस्थिती सतत हाताबाहेर जात असेल तर दोघांना ‘वेगळं’, दुसऱ्या घरात राहण्याचा ‘अप्रिय’ निर्णय स्वीकारायची तयारीही ठेवली पाहिजे. दीर्घ भविष्याचा जोडीदार की भूतकाळातील जन्मदाती, याचा निर्णय तुला घ्यावा लागेल. परंतु उचित संवादशैली आत्मसात केल्यास ती वेळ कदाचित येणारही नाही.’
सहजीवनाच्या सुरुवातीसच शब्दांनी संवाद होत राहिला तरच नंतर ‘शब्देविण संवादु’ असा टप्पा येतो. काही काळानंतर ‘शब्दांच्या पलीकडला’ संवाद आपोआप होतो, हे नक्की! ज्येष्ठ तत्त्वज्ञ द व्हाईसरॉ यांनी म्हटलेच आहे की, ‘चांगला विवाह जोपासना करून विकसित करावा लागतो. एक महान वैवाहिक जीवन उभारणं ही एक कला आहे. तेव्हा कलावंत बना!’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा