मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रिय वाचकहो,
माझ्या ‘सांगतो ऐका’ या सदरातला हा शेवटचा लेख आहे. वाचकांसाठी मला दोन महत्त्वाचे मुद्दे सांगावेसे वाटतात. एक म्हणजे आयुष्यातल्या चांगल्या-वाईट कुठल्याही गोष्टीला शेवट असतोच. (गेली ६८ र्वष वेस्ट एण्ड थिएटरमध्ये सातत्याने प्रयोग होत असलेलं अॅगाथा ख्रिस्ती यांचं ‘माऊसट्रॅप’ हे नाटकदेखील या वर्षी कोविड-१९ मुळे बंद पडलं.) आणि माझं हे सदर तर २०२०च्या जानेवारीत सुरू होऊन डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात संपणार होतंच. मला थोडं वाईट वाटतं ते या गोष्टीचं, की ‘लोकसत्ता’तील वाचकांशी संवाद साधण्याची ही माझी शेवटची वेळ आहे असं निदान आज तरी वाटतं आहे. पण त्याचवेळी मला आनंद होतो आहे की, या सदरामुळे लाखो वाचकांशी संवाद साधण्याची अभूतपूर्व संधी मला मिळाली.
सदरातील शेवटच्या लेखात सदरलेखकाने आपल्या वर्षभरातील लेखांचा आढावा घ्यावा, काय चांगलं झालं, काय वाईट झालं याकडे मागे वळून बघावं असा एक संकेत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने वाचकांशी हितगूज करावं अशी अपेक्षाही त्याच्याकडून असते. हा संकेत पाळण्यात मला आनंदच होईल. माझा जिगरी दोस्त आणि सहृदय टीकाकार सोपान यालाच वाचकांचा प्रतिनिधी करून त्याच्याशी संवाद साधला तर चांगलं हितगूज होईल असं वाटलं म्हणून मी त्याच्याशीच बोललो. आमच्यात जो संवाद झाला तो असा..
सोपान : या वेळी तुझ्या भावना काय आहेत? काय वाटतं तुला?
– खरं सांगू का, एका बाजूने सुटका झाल्यासारखं वाटतंय आणि दुसऱ्या बाजूने वाईटही वाटतंय. प्रथम सुटकेबद्दल बोलतो. मला मराठीत बऱ्यापैकी लिहिता येतं; चांगल्यापैकी नाही. त्यामुळे मी मराठीचा एक सामान्य लेखक आहे. (त्यामानाने मी इंग्रजीत एक चांगला लेखक आहे असं जाणकार म्हणतात.) दुसरं असं की, मी तसा सुस्त आणि आरामात काम करणारा मनुष्य आहे. माझ्या सगळ्या गोष्टी गोगलगाईच्या गतीने चाललेल्या असतात. आणि ‘लोकसत्ते’च्या वाचकांसाठी दर आठवडय़ाला एक वाचनीय लेख वर्षभर लिहायचं म्हणजे अशा माणसासाठी ते केवढं मोठं दिव्य असेल याची कल्पना तुम्हाला नक्कीच करता येईल. पण माझ्या या इंग्रजाळलेल्या बाळाला सुबोध मराठीचं आंगडं-टोपडं घालून, त्याला मराठीचा साज चढवून ‘लोकरंग’च्या वाचकांसाठी तत्परतेनं पेश करण्यात आनंद थत्ते यांची मला मोलाची मदत झाली. त्याबद्दल त्यांचे आभार मानले नाहीत तर मी कृतघ्न ठरेन. तेव्हा ‘थँक यू आनंदराव’! मला आज खूप मोकळं मोकळं वाटतंय. पण यापुढे मला वाचकांशी संवाद साधता येणार नाही याबद्दल वाईटही वाटतंय.
सोपान : तुझ्या या सदराला वाचकांचा प्रतिसाद कसा होता?
– असं म्हणता येईल की, काही वेळा माझ्यावर खूप स्तुतीसुमनं उधळली गेली; तर काही वेळा अतिशय कठोर टीकादेखील झाली. इंग्रजीत बोलायचं I received more than my share of bouquets as well as brickbats. या दोन टोकाच्या प्रतिसादांबद्दल थोडक्यात..
१) काही महिन्यांपूर्वी मराठवाडय़ातील मराठीच्या एका प्राध्यापिकेने मला लिहिलं होतं, ‘‘पारनेरकर सर, मला तुमच्या लिखाणात कधी कधी सायबर युगातील नरहर कुरुंदकर, तर कधी जयवंत दळवी दिसतात.’’ माझ्याकडे स्त्रीदाक्षिण्य कमी असतं तर मी कदाचित
त्यांना सांगितलं असतं, ‘‘बाई, तुम्ही किती खुळ्या आहात हो. मी तुम्हाला कसं समजावू, की कुरुंदकर जर इंद्राचा ऐरावत असतील, तर मी शामभट्टाची तट्टाणी आहे. आणि जयवंत दळवी जर राजा भोज असतील, तर मी गंगू तेली आहे.’’
२) असंख्य वाचकांनी माझ्याशी ई-मेलद्वारे थेट संपर्क साधला. कधी कधी त्यांचे फोनदेखील आले. माझी साधी-सोपी अनौपचारिक शैली त्यांना आवडली. त्यातला संवादी सूर त्यांना भावला. लेख माहितीपूर्ण असल्यानं आणि त्यांत वैविध्य असल्यानं ते आवडले असं अनेकांनी आवर्जून कळवलं. (वाचकांचं प्रबोधन वगैरे करणं हा माझा हेतू कधीच नव्हता, पण तरीही काही वाचकांनी ते झालं असंही कळवलं.) जेव्हा एका बहुराष्ट्रीय कंपनीचे भारतातील सीईओ तुम्हाला कळवतात, की ते तुमच्या लेखाची दर रविवारी उत्सुकतेनं वाट पाहतात, आणि आयआयटीचे एक प्राध्यापक तुम्हाला फोन करून सांगतात की, ते सर्व लेखांची कात्रणं जपून ठेवतात, तेव्हा खूप आनंद तर होतोच आणि भारीदेखील वाटतं.
३) नेहमीच्या टीकेखेरीज माझ्या काही लेखांवर ट्रोलिंगदेखील झालं. नेहरूंवरच्या स्तुतीपर लेखावर पुण्यातील एका वाचकाने माझ्यावर बरीच आगपाखड केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, नेहरूंनी देशाची वाट लावली. मी कॉम्रेड कन्हैयाकुमारचा मित्र असल्याचा संशयदेखील त्यांनी व्यक्त केला. (जेव्हा मी त्यांना सांगितलं की, मी कन्हैयाकुमारच्या आजोबांच्या वयाचा आहे, तेव्हा त्यावर त्यांचा विश्वास बसेना.) रत्नागिरीतील एका माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला कळवलं की, माझे लेख टाकाऊ असतात आणि मी माझं नाव ‘पाटय़ाटाकणकर’ असं बदलून घ्यावं. नाना फडणवीसांवरचा लेख वाचून औरंगाबादमधील एका वाचकाने मला मनुवादी ठरवलं. इक्बालवरच्या लेखाने नाशिकमधील एका वाचकाने मी ‘संघीय’ असल्याचा आरोप केला. मी प्रवीण तोगडिया यांचा अनुयायी आहे असं जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ते आणखीनच भडकले. अजून तरी मी ओवैसींच्या एमआयएम पार्टीचा सदस्य आहे असा आरोप कोणी केलेला नाही, हे माझं भाग्यच म्हणायचं!
सोपान : तुझे लेख विस्कळीत असतात. त्याला अनेक फाटे फुटलेले असतात. विषयांतर फारच असतं. कंसांचा जरा जास्तच वापर असतो. त्यात आंतरसांस्कृतिक संदर्भाची रेलचेल असते. आणि बऱ्याचदा ते भरकटलेलेही असतात, असं मराठीतील काही प्रथितयश लेखकांचं म्हणणं आहे. यावर तुला काय म्हणायचंय?
– मी हाडाचा लेखक नाही हे मी जाणतो. मी रेसचा उत्तम पैदासीवाला घोडा नसून, सैरभैर वृत्तीचा जंगलात भटकणारा घोडा आहे याचीदेखील मला पूर्ण कल्पना आहे. वरील सर्व आरोप मला मान्य आहेत. फक्त एक सोडून.. तो म्हणजे आंतरसांस्कृतिक संदर्भ. ते मी कमी करण्यापेक्षा ते समजून घेण्यासाठी वाचकांनी प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं.
सोपान : प्रख्यात अमेरिकन लेखक गोर विडाल यांचं असं एक विधान आहे की, वाचकांच्या प्रतिसादानुसार लेखकाला एकतर मद्याचं व्यसन लागतं किंवा वाचकांच्या स्तुतीचं! तर वाचकांच्या प्रतिसादाचा तुझ्यावर काय परिणाम झाला?
– गोर विडाल यांच्यासारख्या प्रतिभावंताला आपल्या संवादामध्ये आणणं जरासं क्रूर वाटतं आणि विनोदीही! (मला त्यांचं हे वाक्य मात्र खूपच भावलं. ते खूपच चमकदार आहे.) पण तुझा हा थोडा कठोर विनोद जरा बाजूला ठेवून तुझ्या प्रश्नाचं साध्या शब्दांत उत्तर देतो. इतर सामान्य लेखकांवर वाचकाच्या प्रतिसादाचा जो परिणाम होतो तसाच परिणाम माझ्यावरही झाला. हे जरासं नीट सांगतो..
‘हे बंध रेशमाचे’ या नाटकातील शांता शेळके यांचं अभिषेकीबुवांनी गायलेलं गाणं आठवतं का? त्यातला नायक आपल्या दु:खाला ‘काटा रूते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूलही रूतावे..’ अशा शब्दांत वाट करून देतो. तर माझा दृष्टिकोन या नायकाच्या बरोब्बर विरुद्ध आहे. वाचकांच्या स्तुतीसुमनांनी मी सुखावतो. पण त्यांच्या टीकेचा काटा मलाच रूततो आणि आक्रंदित करतो, दुसऱ्या कोणाला नाही.
तुझा मुद्दा मला कळला सोपान. पण जरा विषयांतर करतो आणि सांगतो की, माझ्या अनेक वाचकांना तू खूपच फ्रेंडली, स्मार्ट आणि शहाणा वाटतोस. आणि आपल्या मैत्रीबद्दल अधिक जाणून घ्यायची त्यांची इच्छा असते.
सोपान : हे ऐकून बरं वाटलं. पण तू काय सांगतोस त्यांना?
– हेच, की आपण खूप जुने आणि घट्ट मित्र आहोत. आणि तू माझा सहृदय टीकाकार आहेस. त्यानंतर मी त्यांना सांगतो की, ‘राज को राज रहने दो, आज को आज रहने दो.’ आणि हो, माझ्या दोन वाचकांनी ‘सोपान’ हे नाव आम्ही कधीच ऐकलं नव्हतं असं यावर म्हटलं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की : एक सोपान म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे संत सोपानदेव- हे संत ज्ञानेश्वरांचे लहान भाऊ. आणि दुसरे- कवी सोपानदेव चौधरी.. प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई यांचे सुपुत्र.
जाता जाता : एक पत्रकार मित्र मला एकदा म्हणाला की, ‘वर्तमानपत्रात सदर लिहिणारे लेखक हे त्या वृत्तपत्राच्या लोकप्रियतेइतकेच लोकप्रिय होतात.’ या वाक्याचा प्रत्यक्ष प्रत्यय येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. या सदराच्या निमित्ताने ज्यांच्याशी माझा कधीच संबंध आला नसता अशा अनेक प्रसिद्ध, प्रतिभावान व्यक्तींशी माझी ओळख झाली. त्यांच्याबद्दल लिहायचं म्हटलं तर आणखी एक लेख मला लिहावा लागेल. पण ते आता शक्य नाही. म्हणून फक्त एका प्रसिद्ध व्यक्तीबद्दल इथे सांगतो.
१) ‘बहरला अभंग तंजावुरी’ हे ऑगस्टमध्ये लिहिलेले दोन लेख माझ्या एका पुणेरी मित्रामुळे राजकुमार प्रतापसिग्ां सरफोजीराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचले. ते तंजावूर मराठा घराण्याचे वारस आहेत. प्रतापसिंगांनी मला चेन्नईवरून फोन करून सांगतलं की, त्यांना माझे ते लेख खूप आवडले. आणि विचारलं की, तंजावूरच्या मराठा राजांबद्दल असेच आणखी लेख मला लिहिता येतील का? त्यांना मी सांगितलं की, मला आत्ता तसे लेख लिहिणं शक्य नाही. पण पुढच्या वर्षी मी याचा जरूर विचार करीन. ही छोटीशी घटना आजच्या सायबरविश्वातदेखील छापील वर्तमानपत्रांचा आवाका किती मोठा आहे हे दर्शवते.
२) अनेक वाचकांनी मला कळवलं की, ‘सांगतो ऐका’ सदरातील लेख पुस्तकरूपाने आले तर खूप चांगलं होईल. आज मी इतकंच सांगतो की, सगळं सुरळीत झालं तर असं पुस्तक २०२१ च्या मध्यापर्यंत येईल.
इन्शाल्ला!
शब्दांकन : आनंद थत्ते
(समाप्त)