हवालदार : (अदबीने मुजरा करीत) महाराज, मैं हूं ना!
महाराज : दरबारात सगळे मिळून तुम्ही एकलेच? अरे, हा दरबार आहे का मोदी सरकार? आमचं प्रधानजी कुठं गेलं?
हवालदार : महाराज, ते कचेरीत ट्विटरवर बसले हायेत!
महाराज : आणि आमचं पीएमो?
हवालदार : ते सरकारचा गाडा हाकत हायेत!
महाराज : (हाताने स्वत:ची दाढी कुरवाळीत) व्वा व्वा! बहोत खूब!.. बरं मग आमच्या राज्याची काय हालहवाल?
हवालदार : ती काय इचारू नका महाराज. तुम्ही ती इचारू नये आणि आम्ही ती सांगू नये..
महाराज : (दाढीवरचा हात कपाळावर!) ओएमजी! प्रॉब्लेमची मेजर समस्या आहे की काय? तरी तुम्हाला सांगत होतो, जनतेमधी नवी क्यालेंडरं वितरित करा. अरे, जरा त्या मोदींकडून काही शिका!
हवालदार : ते काम प्रायॉरिटीनं केलं महाराज! जिथं जिथं म्हणून दिनदर्शिका असं लिहिलेलं हाय, तिथं तिथं अच्छे दिन-दर्शिका अशा पट्टय़ा लावल्या. लोक काय खूश हायेत त्याच्यामुळं!
महाराज : मग आता प्रॉब्लेम काय उरला या जगात?
हवालदार : महाराज, राज्यात पाणीटंचाईची स्थिती आहे. धरणं आटू लागलीत.
महाराज : का? अजितदादा रजेवर आहेत?
हवालदार : (आश्चर्याने तोंडात करंगळी घालत) आँ?.. ते कशाला?
महाराज : कशाला म्हंजे? त्यांना अनुभव आहे सिंचनाचा! त्यांच्याकडं ते काम सोपवा आणि..
हवालदार : आणि काय महाराज?
महाराज : चितळ्यांची समितीपण लगे हात नेमून टाका! जमल्यास तिचा अहवालपण आधीच फोडून टाका..
हवालदार : पण महाराज, पाऊसच नाही, तर सिंचनाचं कसं करणार?
महाराज : (रागाने संतापून) असा कसा पाऊस नाही? आपलं हवामान खातं करतंय काय? अजून मान्सून नाही याचा अर्थ काय? आम्ही ही लापरवाही बिल्कूल मंजूर करनार नाही. मान्सून सरासरीइतका पडलाच पाहिजे. नाय तर जनता माफ नही करेगी.
हवालदार : ओके महाराज. त्याच्याबद्दलचं नवं कलम ताबडतोबीनं जाहीर करायला सांगतो.. पण महाराज, मान्सून आलेला हाय राज्यात.
महाराज : (वैतागून) हवालदार, डोस्कं ठिकाणावर आहे ना तुमचं? एकदा म्हणता मान्सून आहे. एकदा म्हणता पाऊस नाही. अरे, काय चाललंय काय?
हवालदार : त्याचं कायहे महाराज. मान्सूनचंपण त्या अच्छा दिवसांसारखं झालंय! आलाय, पण पडत नाय!
महाराज : (जरा विचार करीत) शेवटी कायहे हवालदार, हा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. उद्या तुम्ही म्हणाल, पाऊस नसल्यामुळे पेरण्या रखडल्या..
हवालदार : आपल्याकडचं पावसाचं मॉडेलच तसं हाय महाराज! पेरण्यांचा प्रॉब्लेमच होतो पाऊस नसला की.
महाराज : तेच तर म्हंतोय मी. पेरण्या रखडतात. पेरलेलं उगवत नाही. हे माहीत असताना तुम्ही पहिल्यांदा पेरणी करताच कशाला?
हवालदार : सवय महाराज, सवय! मृगाचं किडं दिसू लागले रे लागले की ही कास्तकारं शेतात औतं अन् पाभर घालतात..
महाराज : या सवयीच मोडल्या पाहिजेत आता.
हवालदार : जी महाराज. पण कास्तकारांनी पेरणी नाय करायची, तर काय सेझ काढायचं आपल्या शेतात?
महाराज : डायरेक्ट दुबार पेरणीच करायची! बीबियाणं ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा अपव्यय होता कामा नये. तेव्हा ताबडतोब पेरणीवर बंदी घाला. आणि दुसरी गोष्ट..
हवालदार : जी महाराज?
महाराज : नव्या क्यालेंडरमधून मृगाच्या तारखा वगळून टाका. तसं ट्विटरवरून जाहीर करा. सुधारित अच्छे दिन-दर्शिका जारी करा. काय?
हवालदार : जी. पण हे नवं क्यालेंडर जरा कटकटीचंच काम होतंय, नाय का महाराज?
महाराज : प्रश्नच नाही! नवा दिवस उजाडायचा असेल, तर आधी रात्र व्हावीच लागते हवालदार! काय
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा